पुतळे, मायावती आणि सर्वोच्च न्यायालय...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला आता एक आठवडा उरला असताना, पंतप्रधानपदाचे स्वप्न पाहणार्या आणि त्यासाठी आपल्या शत्रूशीही म्हणजे समाजवादी पार्टीशी हातमिळवणी करणार्या बसपाच्या सर्वेसर्वा आणि उत्तरप्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती आपल्या पुतळ्यांमुळे अडचणीत आल्या आहेत.
उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्री असताना मायावती यांनी राजधानी लखनौपासून नोएडापर्यंत आपले पुतळे उभारले होते. सरकारी पैशाची उधळपट्टी करून पुतळे उभारण्याच्या मायावती यांच्या निर्णयाला एका जनहित याचिकेद्वारे सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते.
 
 
 
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्राद्वारे मायावती यांनी पुतळे उभारण्याच्या आपल्या निर्णयाचे निर्लज्जपणे समर्थन केले आहे. हे करताना त्यांनी आपली तुलना अप्रत्यक्षपणे भगवान राम, छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केली. महात्मा गांधी आणि सरदार पटेल यांनाही त्यांनी आपल्या रांगेत आणले. एवढेच नाही, तर पंडित जवाहरलाल नेहरूंपासून अनेक माजी पंतप्रधानांच्या पुतळ्यांवरही मायावती यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सर्वांत महत्त्वाची आणि वेदनादायी बाब म्हणजे मायावतींनी आपल्या रांगेत घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनाही आणून उभे केले आहे. हा पुतळा पाहिला म्हणजे, मायावती व कांशीराम समोर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागे असे हे शिल्प आहे. या शिल्यावर त्यावेळीही बराच आक्षेप नोंदविण्यात आला होता.
अयोध्येत भगवान राम यांचा 221 फूट उंच पुतळा उभारण्याबाबत कोणी आक्षेप घेत नाही, मात्र माझ्या पुतळ्यावर आक्षेप घेतला जातो, अशी मायावती यांची भूमिका आहे. मायावती यांच्या या भूमिकेवरच आमचाही आक्षेप आहे. त्यांनी आपले कितीही पुतळे देशातच काय पण विदेशातही उभारावे, पण प्रभू रामचंद्रांशी आपली तुलना करू नये. मायावती यांचे व्यक्तिमत्त्व भगवान राम आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पासंगालाही पुरणारे नाही, असे चोख प्रत्युत्तर भाजपानेही दिले आहे.
 
 
 
फक्त पुतळे उभारल्यामुळे आपण महात्मा गांधी आणि सरदार पटेल तसेच अन्य नेत्यांची बरोबरी करू शकत नाही, याची जाणीव मायावती यांनी ठेवली पाहिजे. आपल्या देशात पुतळे उभारण्याची प्राचीन परंपरा आहे. संसदभवनाच्या प्रांगणात आणि संसदभवनाच्या इमारतीत विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांचे किमान 50 पुतळे असावेत.
आपल्या देशात पुतळे उभारण्याची मोठी हौस आहे. पुतळा उभारणे गैर नाही. मात्र, पुतळे उभारताना कार्यकर्त्यांमध्ये असलेला जोश नंतर नाहीसा होतो. एकदा पुतळा उभारल्यावर त्याची देखभाल करण्याची कोणतीच व्यवस्था पक्षीय तसेच सरकारी पातळीवर नसते. वर्षात दोनदाच म्हणजे संबंधित नेत्याच्या जयंतीला तसेच पुण्यतिथीला या पुतळ्याची आठवण येते. अग्निशामक दलातर्फे पुतळा धुवून स्वच्छ केला जातो तसेच त्याला माल्यार्पण केले जाते.
 
 
एरवी 363 दिवस हा पुतळा उन्हातान्हात धूळ खात उभा असतो. पक्षी त्यांच्या खांद्याचा वापर आपल्या सोयीसाठी करत असतात. सर्वच पुतळ्यांच्या नशिबी एवढेही भाग्य येत नाही. पुतळ्याची विटंबना तसेच त्यानंतर निर्माण झालेल्या दंगली या आपल्यासाठी नवीन नाही.  सामान्यपणे कोणत्याही राजकीय नेत्याचा पुतळा हा त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कार्याची जाणीव होण्यासाठी तसेच लोकांना प्रेरणा देण्यासाठी उभारला जातो. तसे करणे स्वाभाविकही आहे. मायावती यांनी ज्या राजकीय नेत्यांच्या नावांचा उल्लेख केला, त्यातील एकानेही जिवंतपणी आपल्या हाताने आपला पुतळा उभारला नाही. कारण त्यांना त्याची गरजच वाटली नाही. कारण आपल्या कर्तृत्वावर त्यांचा विश्वास होता. एवढेच नाही, तर आपण गेल्यानंतर आपले अनुयायी आपल्याप्रती आदर व्यक्त करण्यासाठी आपले पुतळे उभारतील, याची त्यांना खात्रीही असावी.
 
 
 
मायावती यांना त्याची खात्री नसावी. त्यामुळे त्यांनी आपल्या जिवंतपणीच पुतळ्यांची मालिका उभी केली. फक्त आपलाच पुतळा उभा करणे योग्य ठरणार नाही, म्हणून आपल्यासोबत आपले धर्मपिता (गॉडफादर) कांशीराम तसेच आपल्या पक्षाचे निवडणूक चिन्ह असलेल्या हत्तीचेही पुतळे उभारले आणि स्वत:ला हास्यास्पद करून घेतले.दलित आणि त्यातही दलित समाजातील महिला नेता म्हणून तसेच दलित समाजाच्या उत्थानासाठी केलेल्या कामामुळे लोकभावनेचा आदर करत आपण आपले पुतळे उभारल्याचा मायावती यांचा न पटणारा दावा आहे. मायावती यांची उत्तरप्रदेशात एवढी लोकप्रियता असती, तर 16 व्या लोकसभेत उत्तरप्रदेशातून त्यांच्या पक्षाचा एकतरी खासदार निवडून आला असता. विधानसभा निवडणुकीतही बसपाची स्थिती यापेक्षा वेगळी नव्हती.
 
 
देशात सरकारी पैशाने छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी, सरदार पटेल, जवाहरलाल नेहरू, श्रीमती इंदिरा गांधी, राजीव गांधी, पी. व्ही. नरिंसह राव, अटलबिहारी वाजपेयी यांचे पुतळे उभारण्यात आले; आपल्या समकक्ष नेत्या जयललिता, एन. टी. रामाराव, वायएसआर रेड्डी यांच्या पुतळ्याचा उल्लेखही त्यांनी केला. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अयोध्येत भगवान रामाचा भव्य पुतळा उभारण्याची घोषणा केली, त्याला कोणाची हरकत नाही, मात्र आपला पुतळा उभारला तर गहजब होतो, असे मायावती म्हणतात. काही वर्षांपूर्वी सपाचे मुलायमिंसह यादव आणि बसपाचे कांशीराम यांनी आघाडी केली होती, त्या वेळी ‘मिले मुलायम-कांशीराम हवा में उड गये जय श्रीराम’ असे नारे देण्यात येत होते. म्हणजे बसपाच्या लेखी भगवान श्रीरामाचे महत्त्व काय होते, हे दिसते.
 
आपल्या पक्षाचे निवडणूक चिन्ह म्हणून नाही, तर भारतीय संस्कृतीचे तसेच वास्तुशास्त्राचे प्रतीक म्हणून आपण हत्तीचे पुतळे उभारल्याचा युक्तिवाद मायावती यांनी केला. ‘हाथी नही गणेश है ब्रह्मा विष्णू महेश है,’ असा बसपाचा एकेकाळचा गाजलेला नारा होता. भारतीय संस्कृतीबद्दल मायावती यांना एवढे प्रेम होते, तर ओम, कमळ यांसह भारतीय संस्कृतीची अन्य अनेक प्रतीके आहेत, त्यांचे पुतळे, प्रतीके मायावती यांनी का उभारले नाही, याचे उत्तर मायावती यांच्याजवळ नसावे. मायावती यांचा हा युक्तिवाद सर्वोच्च न्यायालयाला मान्य होतो की नाही, ते लवकरच समजणार आहे. मात्र, भगवान प्रभू रामचंद्र, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी आणि सरदार पटेल यांच्यासारख्या महान नेत्यांच्या रांगेत आपल्याला बसवण्याच्या मायावती यांच्या हिमतीचे कौतुक केले पाहिजे. या महान नेत्यांशी आपली तुलना करून मायावती यांनी आपले महत्त्व वाढवले, की या महनीय विभूतींचे अवमूल्यन केले, हा प्रश्नच आहे.
 
मुळात मायावती यांनी आपले पुतळे उभारण्यावर कोणाचा आक्षेप असण्याचे कारण नाही. त्यांनी आपल्या पैशातून वा बसपाच्या निधीतून देशभर आपले पुतळे उभारावे, मात्र यासाठी सरकारी पैशाची उधळपट्टी करणे मान्य होण्यासारखे नाही. आक्षेप हा यावर आहे. मायावती यांच्या पुतळ्यांकडे पाहिल्यामुळे देशातील गोरगरिबांचे जीवनमरणाचे प्रश्न सुटणार नाहीत.
मायावती यांनी आपल्या पुतळ्यांची मालिका उभारण्यासाठी शेकडो कोटी रुपये खर्च केले. या पैशातून ज्या दलित समाजाच्या कल्याणाच्या गोष्टी मायावती करतात, त्यांच्यासाठी शाळा, रुग्णालये तसेच अन्य सुविधा उभारता आल्या असत्या. असे करून मायावती आज आहेत, त्यापेक्षा आणखी मोठ्या झाल्या असत्या. स्वत:चे पुतळे उभारल्यामुळे कोणी मोठा होऊ शकत नाही, तर मोठे झाल्यामुळे लोकांनी स्वयंस्फूर्तपणे तुमचे पुतळे उभारले पाहिजे, पण मायावती यांना हे सांगणार कोण?
स्वत:च स्वत:चा पुतळा सरकारी निधीतून उभारायचा आणि नंतर त्याचे निर्लज्जपणे समर्थनही करायचे हे योग्य नाही. म्हणजे आपल्या एका चुकीचे समर्थन करण्यासाठी दुसरी चूक करायची, हा त्यातला प्रकार म्हणावा लागेल. आपल्या देशातील राजकीय नेत्यांची कातडी गेंड्यासारखी असल्याचे म्हटले जाते, त्याचे प्रत्यंतर यातून येते.
आपण कायदा आणि घटना यापेक्षा मोठे असल्याची भावना राजकीय नेत्यांमध्ये वाढू लागली आहे. लोकशाहीच्या दृष्टीने हे धोकादायक आाहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने याप्रकरणी कठोर भूमिका घेतली पाहिजे. दु:ख म्हातारी मेल्याचे नाही, काळ सोकावतो, त्याचे आहे.
 
 
 
 
श्यामकांत जहागीरदार
9881717817
@@AUTHORINFO_V1@@