‘मॅचमेकर’ तुंबा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Apr-2019   
Total Views |



दहशतवादाचा मार्ग पत्करणार्‍यांचा शेवट हा मृत्यू किंवा पश्चात्ताप हाच असतो. जिहाद किंवा अन्य पर्यायांसाठी दहशतवादाच्या मार्गावर चालणार्‍यांना शेवटी आपल्याच कर्माची फळे भोगावी लागली, हा आजवरचा इतिहास. मग ते काश्मिरी तरुणांना भडकावून नापाकी कारवाया करण्यास भाग पाडणार्‍या पाकिस्तानी दहशतवादी संघटना असो किंवा ‘इसिस’मध्ये सहभागी होण्यासाठी थेट घरातून पळ काढणारे तरुण-तरुणी असो, शेवट हा वाईटच... ब्रिटनसारख्या देशात राहणारी तुंबा गोंडल ही अशाच एका प्रकरणाची शिकार बनली आहे. ‘इसिस’च्या जाळ्यात अडकलेली तुंबा पश्चात्तापानंतर आता एका नव्या आयुष्याची भीक ब्रिटनकडे मागत आहे.


तुंबा गोंडल
... वय वर्ष २५...ब्रिटनमधील एका व्यावसायिक कुटुंबात जन्मलेली तरुणी. सध्या सीरियात ‘इसिस’चा मुख्य तळ असलेल्या रक्का येथील कॅम्पमध्ये राहते. सामान्य मुलींना दहशतवाद्यांशी लग्न करण्यासाठी तयार करते. या कामातूनच तिची ‘मॅचमेकर’ अशी ओळख झाली. दहशतवादाच्या जाळ्यात इतरांना अडकविणारी तुंबा आता स्वतःच या प्रकारातून बाहेर पडू इच्छित आहे. सतत सुरू असलेल्या अतिरेकी कारवाया, असुरक्षित जीवन याला कंटाळत एकेकाळी ज्या संघटनेत जिहाद मिळावा यासाठी आली होती, तिथूनच तिला आणि तिच्या दोन मुलांना या दहशतवादाच्या जगतापासून ‘मुक्ती’ मिळावी ही मागणी करत आहे.

 

वडील ब्रिटनमध्ये व्यावसायिक. २०१६ मध्ये तुंबा गोंडल नाव असलेली मुलगी ब्रिटनमधून गायब झाली.‘युनिव्हर्सिटी ऑफ लंडन’च्या ‘गोल्डस्मिथ कॉलेज’मध्ये ती शिकत होती. वयाच्या २५व्या वर्षी ती ‘इसिस’मध्ये दाखल झाली. तिथे तिने एका दहशतवाद्याशी लग्न केले. मात्र, त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर तिने दुसरे लग्न केले, तो इसमही पाकिस्तानचा दहशतवादी होता. मात्र, काही दिवसांपूर्वी त्याचाही मृत्यू झाला... सध्या आपल्या दोन्ही मुलांसह तुंबा सीरियामध्ये भटकत असल्याचे वृत्त आहे. दोन महिन्यांपूर्वी तिने या भागातून पळ काढण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी दहशतवाद्यांनी तिला पकडून रेफ्युजी कॅम्पमध्ये पाठवले. तिथून बाहेर पडण्याचे तिचे प्रयत्न सुरू असून ती आता ब्रिटनकडे याचना करत आहे. ब्रिटनने मात्र, अशा मुलींना परत मायदेशात घेण्यास नकार दिला आहे. तिच्यासारख्या अनेक मुली आज पुन्हा परतण्याची मागणी करत आहेत. मात्र, ‘इसिस’कडून तिला परतण्याची परवानगी नाही आणि ब्रिटननेही बंदी घातल्याने दोन्हीकडून ती कात्रीत सापडली आहेत.

 

एकेकाळी स्वतःसारख्या शेकडो मुलींचे आयुष्य ‘जिहाद’च्या नावाखाली उद्ध्वस्त करणारी तुंबा आता दयायाचना करत आहे. ब्रिटनसाठी मी कशी धोकादायक नाही, हे पटवून देत आहे. आम्हाला सामान्य जीवन पुन्हा सुरू करायचे असल्याचे ती सांगत आहे. याशिवाय ‘इसिस’मध्ये मुलींना मिळणार्‍या वागणुकीबद्दलची व्यथा तिने मांडल्या आहेत. तिच्या पाकिस्तानी पतीच्या निधनानंतर तिने दीड वर्षे भटकत दिवस काढले. सीरियात त्यांच्यावर हल्ले केले जात आहेत. ती कुणासह राहत आहे, याचीही माहिती तिला नाही, अशा वातावरणातून सुटकेसाठी तिचे प्रयत्न सुरू आहेत.

 

ब्रिटनकडे मदत मागणार्‍या तुंबाने २०१५ मध्ये झालेल्या पॅरिस हल्ल्याचे समर्थनही केले होते. ब्रिटनला ‘वाईट देश’ म्हणून संबोधणारी पोस्ट त्यावेळी सोशल मीडियावर तिने शेअर केली होती. तिला याबद्दल आता पश्चात्ताप होत आहे. स्वतःसह इतर स्थानिक मुलींचे आयुष्य धोक्यात घातल्यानंतर नशिबी आलेले हे जगणे तिच्या स्वतःच्या कर्मामुळेच आले. ‘जिहाद’च्या नावाखाली दहशतवादाच्या मार्गावर पाऊल ठेवणार्‍यांचा शेवट हा असाच होतो, हा आजवरचा इतिहास आहे. ब्रिटनमधील शमीम बेगम हिचीही कहाणी तुंबासारखीच आहे. २०१५ साली ब्रिटनमधून पळून गेलेली शमीम बेगम हिचेही आयुष्य टांगणीलाच आहे. तिने एका दहशतवाद्याशी लग्न केले. दहशतवाद्यांशी संबंध ठेवल्याची शिक्षा तिच्या लहानग्या मुलाला मिळाली. काही दिवसांपूर्वीच जन्मलेला बाळाला उपचाराअभावी प्राण गमवावे लागले. बेगमच्या आई-वडिलांनीही तिच्या घरवापसीसाठी ब्रिटन सरकारकडे याचना केली. मात्र, तिचे नागरिकत्वही ब्रिटनने रद्द केले. दहशतवादाच्या मार्गावर जाणार्‍या प्रत्येकाची अवस्था ही इथेच येऊन संपते....

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा...facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@