जयद्रथाचा अंत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Apr-2019
Total Views |



कौरवांना जयद्रथाचे शीर त्या अस्त्राबरोबर आकाशातून जाताना दिसले. ते त्याच्या पित्याच्या मांडीवर जाऊन विसावले. त्यावेळी जयद्रथाचा पिता संध्याप्रार्थना करत होता.


नि:शस्त्र भूरिश्रवाचा वध करून सात्यकीला अजिबात विषाद वाटला नाही. त्याने सर्वांकडे पाहून म्हटले, “तुम्हा सर्वांना असे वाटत असेल की, मी मोठ्ठी चूक केली आहे पण, मला तरी असे मुळीच वाटत नाही. कारण, दुसऱ्याला धर्म शिकवणे खूप सोपे आहे. त्याचा मुलगा, अभिमन्यू सांगत होता की, एकामागून एक या, पण, तेव्हा त्याचे कोणीच ऐकले नाही. तेव्हा काय तुमचा धर्म जागृत होता? त्याच्या मागे उभे राहून राधेयाने त्याचे धनुष्य तोडले तेव्हा त्याचा धर्म कुठे गेला होता? मी मुळीच अधर्माने वागलो नाही. मी प्रतिज्ञा केली होती की, जो माझा अपमान करेल, त्याचा मी वध करेन. या भूरिश्रवाने माझ्या छातीवर पाय ठेवून माझा अपमान केला आणि म्हणून मी त्याला मारले!” हे युद्ध पाहायला आकाशात देव जमले होते. त्यांनीही अनुमोदन दिले की, सात्यकीचे बरोबर आहे. त्याला कोणी दोष देऊ नये! खरे तर अर्जुनाला मात्र सात्यकीचे हे कृत्य आवडले नव्हते. पण, अर्जुनाला आता जयद्रथाकडे जाण्याची घाई होती. कारण, सूर्यास्त खूप जवळ आला होता.

 

तो कृष्णाला म्हणाला, “कृष्णा, खूप उशीर झाला आहे. आता आपण अधिक वेळ वाया घालवूया नको. आपल्या बळीजवळ मला त्वरेने पोहोचव.” जयद्रथाच्या रक्षणासाठी दुर्योधन, राधेय, वृषसेन, अश्वत्थामा, कृप असे एकेक उमदे वीर होते. सात्यकी अर्जुनापाशी पोहोचू नये, म्हणून राधेय त्याच्याशी लढू लागला. राधेयाचे हे धाडस पाहून अर्जुनाला आश्चर्य वाटले. तो कृष्णाला म्हणाला, “मला राधेयकडे घेऊन चल. त्याला सात्यकीने मारता कामा नये. तो माझा बळी आहे.” खरंतर अर्जुन व राधेय यांच्यात आताच्या क्षणी युद्ध व्हावे, असे कृष्णाला वाटत नव्हते. कारण, त्याला भीती होती की, राधेय अर्जुनावरती इंद्राने दिलेल्या शक्तीचा प्रयोग करून त्याला मारेल की काय! म्हणून कृष्ण म्हणाला, “आता वेळ वाया घालवू नकोस. सूर्य मावळायला आला आहे. तेव्हा तू त्या जयद्रथाकडेच लक्ष केंद्रित कर. त्याच्या रक्षणाला अनेक वीर उभे ठाकले आहेत. त्यांना तुला ओलांडून जायचे आहे!”

 

अर्जुनाने राधेयकडे जाऊन म्हटले, “मी हजर नसताना तू माझ्या पुत्रास मारले. आता बघ मी तुझ्या समक्षच तुझ्या पुत्राचा, वृषसेनाचा वध कसा करतो ते!” दुर्योधन, राधेय, वृषसेन, शल्य, अश्वत्थामा असे कौरव वीर जयद्रथाच्या रक्षणास उभे होते. अर्जुनाने आपल्या सर्व अस्त्रांचा वापर करीत या सगळ्या वीरांशी लढू लागला. तो जयद्रथाच्या खूप जवळ येऊन पोहोचला. आपले मरण जवळ आलेले पाहून जयद्रथ अधिकच प्राणपणाने लढू लागला. तो एक कुशल योद्धा होता. आता त्याला वेळकाढूपणा करायचा होता. कारण, सूर्य अस्ताला गेल्यावर अर्जुनाला त्याच्या प्रतिज्ञेप्रमाणे अग्निप्रवेश करावा लागणार होता. कृष्णालाही कळून चुकले की, आता सूर्य अस्तास जाण्यापूर्वी जयद्रथाला मारणे कठीण आहे. तो अर्जुनाला म्हणाला, “सूर्यास्तापूर्वी जयद्रथास मारणे तुला शक्य होईल, असे वाटत नाही. काही क्षणातच आता सूर्यास्त होईल, मीच आता माझी योगशक्ती वापरून काहीतरी करतो. मात्र, मी फेक म्हटल्यावर तू जयद्रथावर तुझ्या हातीचे अस्त्र फेक!” कृष्ण आपल्या मनात सुदर्शनचक्राचा विचार करू लागला. त्याने त्या सुदर्शनचक्राने सूर्याला पूर्ण झाकून टाकले. त्या क्षणी सगळीकडे काळोख पसरला. अर्जुनास खूप वाईट वाटले. कौरव आनंदाने बेभान झाले. जयद्रथाचे आयुष्य वाचवून बुडालेल्या त्या सूर्याकडे ते पाहत होते.

 

जयद्रथानेही आपली मान वर करून सूर्याकडे पाहिले, पण तो दिसला नाही. त्याक्षणी कृष्ण म्हणाला, “अर्जुना पाहा, सूर्य दिसतो का, हे पाहण्यासाठी जयद्रथाने आपली मान उंचावली आहे. तो बेसावध आहे. अस्त्र फेक.” असे म्हणून कृष्णाने सुदर्शनचक्र सूर्यावरून काढले आणि अर्जुनाने क्षणार्धात आपले पाशुपत अस्त्र जयद्रथावर फेकले. त्या अस्त्राने जयद्रथाचे मस्तक धडापासून वेगळे झाले. ते भूमीवर पडण्यापूर्वी कृष्ण अर्जुनाला म्हणाला, “आपल्या अस्त्राला ते मस्तक घेऊन जाण्यास आणि जयद्रथाच्या पित्याच्या मांडीवर ठेवण्यास सांग. असे का ते मी नंतर सांगतो.” अर्जुनाने तसे केले. कौरवांना जयद्रथाचे शीर त्या अस्त्राबरोबर आकाशातून जाताना दिसले. ते त्याच्या पित्याच्या मांडीवर जाऊन विसावले. त्यावेळी जयद्रथाचा पिता संध्याप्रार्थना करत होता. ती संपवून तो उठून उभा राहताच ते शीर जमिनीवर पडून त्याचे हजारो तुकडे होऊन विखुरले गेले. अशा रीतीने जयद्रथाचा दारुण अंत झाला. सर्व कौरव दु:खात बुडून गेले. सूर्य मात्र अजून तळपत होता. जणू काही तो मावळलाच नव्हता! त्यानंतर कित्येक क्षणांनी तो सूर्य पश्चिमेच्या डोंगरात अदृश्य झाला.

  

- सुरेश कुळकर्णी

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@