सावधान; ‘फनी’ चक्रीवादळ अधिक तीव्र होणार!

    30-Apr-2019
Total Views |


 


नवी दिल्ली : बंगालच्या खाडीलगत जास्त दाबाच्या पट्ट्यामुळे तयार झालेल्या फनीवादळाचे रूपांतर सोमवारी सायंकाळपर्यंत अधिक तीव्र होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तविली आहे. केरळ, आंध्र प्रदेश, तामिळनाडू व ओडिशा राज्यांना याचा फटका बसणार आहे. त्यामुळे येथील प्रशासनासोबतच भारतीय नौदल, राष्ट्रीय आपत्ती दल (एनडीआरएफ) व भारतीय तटरक्षक दलाला हाय अलर्ट देण्यात आला आहे.

 

फनी चक्रीवादळामुळे १ ते ३ मे पर्यंत तामिळनाडू आणि इतर काही राज्यात वादळी वारे वाहणार असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. याबाबत भारतीय हवामान विभागाने एक निवेदन काढत माहिती दिली. १ ते ३ मे पर्यंत बंगालच्या खाडीपासून तामिळनाडू, पुडुचेरी आणि दक्षिण आंध्र प्रदेशच्या काही भागात तुफानी वारे वाहणार असून हे वादळ पुढील काही तासात तीव्र रूप धारण करण्याची व पुढील ३६ तासात अतितीव्र रूप धारण करण्याची शक्यता, या निवेदनात वर्तवण्यात आली आहे.

 

दरम्यान, 'फनी' चक्रीवादळाच्या बचावकार्यासाठी गृहमंत्रालयाकडून आंध्र प्रदेश, ओडिशा, तामिळनाडू आणि प. बंगालला १,०८६ कोटी रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर मच्छीमारांनी समुद्रात न जाण्याचे आवाहन केंद्रीय गृहमंत्रालयाने केले आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat