मतदानाचा वाढता टक्का स्वागतार्ह

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Apr-2019
Total Views |

 

महाराष्ट्रापुरता तरी लोकसभा निवडणुकीचा धुमधडाका आता संपला आहे. सोमवारी चौथ्या टप्प्याचे मतदान पार पडल्याने आता निकालाकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. यावेळी मुंबईत समाधानकारक आणि आतापर्यंतच्या सर्वोच्च मतदानाची नोंद झाली. मुंबईत ५७ टक्क्यांपेक्षा जास्त मतदानाची नोंद झाली आहे. हा आकडा मतदारांच्या जागरूकतेचे प्रतीक असून मतदानाविषयी नागरिक आपली जबाबदारी समजून पुढे येत आहेत. यात जुन्या मतदारांबरोबर नवीन मतदारांची संख्या वाढली असल्याचे मुंबईतील मतदानाच्या टक्केवारीतून दिसून येते. मुंबई उत्तर-५९.३२ टक्के, मुंबई उत्तर-पश्चिम -५४.७१ टक्के, मुंबई उत्तर-पूर्व-५६.३१ टक्के, मुंबई उत्तर-मध्य- ५२.८४ टक्के, मुंबई दक्षिण-मध्य- ५५.३५ टक्के, तर मुंबई दक्षिण- ५२.१५ टक्के, अशी आकडेवारी गेल्या २०१४ व त्यापूर्वीच्या लोकसभा निवडणुकांच्या मतदान टक्क्यांपेक्षा जास्त आहे. मतदानासाठी सर्वच स्तरातून केलेल्या प्रचाराचा, जनजागृतीला याचे श्रेय द्यावे लागेल. मतदानाच्या दिवशी ज्येष्ठ नागरिक, दिव्यांगांसह नवमतदारांचा उत्साहही ओसंडून वाहत होता. काही ठिकाणी अगदी नवजोडप्यांनीसुद्धा राष्ट्रहिताचा विचार करत ‘आधी लग्न लोकशाहीचे‘ म्हणत आपला मतदानाचा हक्क बजावला. अगदी खेड्यापाड्यातल्या आदिवासी बंधू-भगिनींनी उन्हातान्हात कित्येक किलोमीटर चालत मतदान केंद्र गाठले. यावेळी मराठी, हिंदी कलाकारांनीही मोठ्या प्रमाणात मतदान केले. आपल्या आवडत्या कलाकारांना मतदान करताना बघून अनेकांना मतदानाची प्रेरणा मिळाली. हाच आपला बदलणारा समाज आहे, फक्त गप्पा मारून किंवा सोशल मीडियावर ज्ञान पाजळलेले अनेकजण प्रत्यक्षात मात्र याच महत्त्वाच्या जबाबदारीपासून लांब पळतात. असो. पण, यंदा समाजलाजेखातर, काहींनी मतदान केलं तरं मिळणाऱ्या विविध ऑफर्समुळे, तर काहींनी चक्क सेल्फीसाठीही मतदानाला घराबाहेर पडणे पसंत केले. याचे काही प्रमाणात श्रेय राजकीय पक्षांनाही द्यावे लागेल. त्यामुळे राष्ट्रहितासाठी मतदानाइतकी चांगली संधी कोणतीच नसेल.‘बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले‘ हाच आदर्श समोर ठेऊन प्रत्येक भारतीय वागल्यास बदल घडण्यास वेळ लागणार नाही. यासाठी फक्त दोनच गोष्टी हव्या...एक म्हणजे देशप्रेम आणि दुसरे म्हणजे समाजप्रेम. या दोन्ही गोष्टींवर आपण देशात बदल नक्कीच आणू शकतो

वाढत्या मतदानाचा फायदा कोणाला?


महाराष्ट्रातल्या मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला असला तरी देशात अजून तीन टप्प्यांच्या निवडणुका शिल्लक आहेत. पण, साधारण या चार टप्प्यांचा विचार करता, मतदारांचा उत्साह यंदाह दुणावलेला दिसत नाही. २०१४ साली मोदी लाटेमुळे मतदानाच्या प्रमाणात वाढ झाल्याचे निष्कर्ष निवडणुकीनंतर काढले गेले. पण, आता मोदी लाट नाही म्हणणार्‍यांची हीच अडचण झालेली दिसते. कारण, मग वाढत्या मतदानाचे क्रेडिट त्यांना मोदींना द्यावयाचे नाही आणि अजूनही मोदी लाट कायम असल्याचे मान्यही करायचे नाही. पण, एक समजून घेतले पाहिजे की, २०१४ च्या निवडणुकीनंतर मतदारांनाही स्थिर सरकारच सत्ताधारी हवे आहे. देशाच्या दुर्देवाने, आज भाजप सोडल्यास स्थिर सरकार देशाला देऊ शकेल, असा दुसरा कुठलाही पक्ष नाही. काँग्रेस तसेच इतर प्रादेशिक पक्षांनाही एकहाती बहुमताच्या आकड्याच्या जवळपासही जाता येणार नाही. याची पूर्ण कल्पना देशवासीयांना आहेच. म्हणूनच, चार टप्प्यांतील मतदारांचा प्रतिसाद बघता, पुन्हा एकदा मतदान हे देशातील स्थैर्यासाठी, सुरक्षेसाठी झाल्याचा अंदाज बांधता येईल. वाढत्या मतदानाचा टक्का हा प्रस्थापितांना धक्का देणारा ठरू शकतो, असे नेहमी राजकीय विश्लेषकांकडूनही सांगितले जाते. पण, ही बाब प्रत्येकवेळी लागू होईलच असे नाही. इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्या हत्येनंतर झालेल्या निवडणुकांतही मतदानाचा टक्का वाढला आणि सहानुभूतीच्या लाटेवर काँग्रेसची सरकारे पुन्हा सत्तारुढ झाली. दुसरीकडे २००४ पेक्षा २००९ साली तुलनेने मतदानाचा टक्का घसरला तरी संपुआचे सरकार पुन्हा निवडून आलेच. त्यामुळे वाढत्या मतदानाच्या टक्केवारीचा फायदा प्रस्थापितांना धक्का देणारा ठरतो की विरोधकांना धूळ चाळणारा, हे २३ मे रोजी निकालानंतर स्पष्ट होईलच. पण, एकीकडे प. बंगालमध्ये दर टप्प्याला वाढलेली आकडेवारी, तर जम्मू-काश्मीरमध्ये १० टक्केही न गाठू शकलेला मतदानाचा टक्का चिंतेत भर टाकणारा आहे. म्हणूनच, निवडणुकांच्या निकालांचे लक्ष या दोन राज्यांकडेही प्रामुख्याने असेलच. पण, तूर्तास तरी वाढत्या मतदानाचा टक्का हा सत्ताधार्‍यांच्या बाजूनेच कौल देणारा असेल, असा प्राथमिक अंदाज आहे आणि तो खरा ठरल्यास ‘फिर एक बार मोदी सरकार’ हा नारा सत्यात उतरल्याशिवाय राहणार नाही.


 - कविता भोसले 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा  twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@