जगाच्या मानगुटीवर भुकेचा वेताळ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Apr-2019   
Total Views |



येमेन, डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कांगो, अफगाणिस्तान, बांगलादेश, म्यानमार, सीरियासह आफ्रिका खंडामध्ये ही समस्या भीषण आहे. एकट्या आफ्रिका खंडात ७.२ कोटी लोक अन्नटंचाईने ग्रस्त


संयुक्त राष्ट्राच्या खाद्य आणि कृषी संघटनेच्या (एफएओ) नुकत्याच प्रकाशित अहवालामध्ये असा निष्कर्ष समोर आला की, सध्या जगातल्या ५३ देशांपैकी ११.३ कोटी लोक भूकेने व्याकुळ होऊन मृत्यूकडे वाटचाल करत आहेत. भयानक.. माणूस जगतो कशासाठी? याचे उत्तर अनेक स्तरातून विभिन्न येऊ शकते. मात्र, ‘कशासाठी ? पोटासाठीचा’ संघर्ष जगाच्या पाठीवर सर्वत्र सारखाच आहे. माणूस भुकेने तडफडून मृत्यू पावावा, यापेक्षा दुर्दैव ते कोणते... कारण, जो चोच देतो, तो चाराही देतो हे वाक्य प्रसिद्ध आहे. या चिमुकल्या पक्षाला अन्न मिळू नये? या अशा अस्मानी संकटाचे कारण काय असावे? जगभरात काही देशांमध्ये आर्थिक आणि त्यानिमित्ताने येणारी सगळीच सुबत्ता ओसंडून वाहत असताना या ११.३ कोटी लोकांच्या मुखी अन्नाचा कणही न यावा याचे कारण काय? येमेन, डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कांगो, अफगाणिस्तान, बांगलादेश, म्यानमार, सीरियासह आफ्रिका खंडामध्ये ही समस्या भीषण आहे. एकट्या आफ्रिका खंडात ७.२ कोटी लोक अन्नटंचाईने ग्रस्त आहेत.

 

ही अशी परिस्थिती निर्माण का झाली असेल? अन्नसंकट का आले असेल? अहवालात खाद्य आणि कृषी संघटनेने या परिस्थितीची काही कारणे दिली आहेत. त्यामध्ये प्रमुख कारण आहे अन्न संकटग्रस्त देशाची किंवा त्या देशाच्या शेजारील देशाची युद्धजन्य आणि युद्धखोर परिस्थिती. युद्धाच्या भीतीमुळे या लोकांनी स्थलांतर केले. ज्या देशात गेले तिथली साधनसामुग्री तर मर्यादित होती. त्यामुळे तिथे स्थलांतर केल्यानंतरही लोकांना जगणे मुश्किल आहे. दुसरीकडे युद्धाची भीती असल्याने त्या देशाने लोकांच्या दैनंदिन गरजांपेक्षा सैनिकीकरणामध्ये आर्थिक गुंतवणूक जास्त केली. त्यामुळे अन्नधान्याची टंचाई निर्माण झाली. साहजिकच महागाईने रूद्रावतार धारण केला. सततच्या दंगली, हल्ले त्यातून बंद पडलेली रोजगार व्यवस्था, त्यामुळे आर्थिक उत्पन्नात घट. या सर्व चक्रामध्ये युद्धजन्य स्थिती असलेल्या देशामधले लोक बेरोजगारी आणि आर्थिक संकटाने पिचून गेले. हे आर्थिक संकट त्या एका व्यक्तीपुरते नसून त्या संकटाने संपूर्ण देशाचे वाटोळे केले. हे य्ाुद्धाच्या परिस्थितीतले देश आपल्या देशातील नागरिकांना अन्न सुविधा देण्यास असमर्थ झाले आहेत. तसेच अन्न संकटग्रस्त असलेले काही देश असेही आहेत की, जे स्वतः युद्धखोर किंवा युद्धजन्य परिस्थितीमध्ये नाहीत. मात्र, तिथे इस्लामिक दहशतवादाने हाहाकार माजवला आहे. सातत्याने हल्ले, दहशतवादाचे सावट यामुळे हे देश अस्थिर झाले आहेत. यामध्ये सीरिया आणि येमेन यांचे उदाहरण देता येईल. ‘इसिस’ या दहशतवादी संघटनेच्या क्रूर कारवायांमुळे या देशामध्ये कमालीची वंचित परिस्थिती निर्माण झाली आहे. अर्थात ही कारणे मानवनिर्मितच आहेत.

 

पण, अन्नाची टंचाई निर्माण झालेल्या देशामध्ये बहुसंख्य देश असेही आहेत की, तिथे शांतता होती, सुबत्ता होती. तरीही तिथे अन्नाची टंचाई निर्माण झाली. भूकबळीचे राज्य प्रस्थापित झाले. या देशांमध्ये अशी परिस्थिती निर्माण व्हायचे कारण म्हणजे निसर्गाचा प्रकोप. जल आणि वायु या दोन घटकांमुळे ओढवलेली विघातक परिस्थिती. अन्नाची भीषण टंचाई असणाऱ्या या देशांमध्ये सातत्याने महापूर, महाअवर्षण, भूकंप, वादळ, ज्वालामुखी यांची भर पडली. या अस्मानी संकटांनी, नैसर्गिक प्रकोपाने या देशांची अर्थव्यवस्था आणि त्या अनुषंगाने असणारी समाजप्रशासन व्यवस्था पूर्णतः कोलमडली. मानवाने प्रगती केली, पण स्वतःची भौतिक प्रगती करताना निसर्गाची अक्षम्य वाताहत केली. त्याचे परिणाम या देशांना भोगावे लागत आहेत. मागोवा घेतला तर दिसते की, या देशामध्ये जरी प्रदूषण फोफावले नसले तरी जगाच्या पाठीवर दुसऱ्या कोणत्या तरी देशाच्या प्रदूषणाचा फटका या देशांना बसला आहे. पण काहीही असो, चूक तर माणसाचीच आहे. त्यामुळे या ना त्या रूपात जगाच्या पाठीवर ती माणसालाच भोगायची आहे. संयुक्त राष्ट्राने याबाबत असाही निष्कर्ष काढला आहे की, जे देश अन्नटंचाईने ग्रस्त आहेत, त्या देशाची अर्थव्यवस्था मुख्यत कृषिप्रधान होती. तसेच ही कृषिप्रधानता पारंपरिक प्रवाहातूनच होती. निसर्गाच्या लहरीवर आधारित शेती करणे ही यातल्या काही देशांची आर्थिक परंपरा. त्यामुळे ज्यावर्षी पाऊस पडला नाही, त्यावर्षी पीक नाही, अन्न नाही, असे चक्र. संयुक्त राष्ट्राने नव्हे साऱ्या जगाने या भूकग्रस्त देशांसाठी चिंता व्यक्त केली आहे. कारण, आदिम काळापासून माणसाचे चिंतन आणि जगणे माणूसपणाची व्याप्ती अन्नाच्या शोधानेच झाली.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@