निकालाआधीच फुकाच्या बाता कशाला?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Apr-2019   
Total Views |




स्वत: पवार यांचीही पंतप्रधानपदी येण्याची सुप्त मनीषा आहे. पण, राष्ट्रीय लोकशाही आघाडी या निवडणुकीत पराभूत झाली तर आणि तरच या सर्व चर्चेला अर्थ आहे. अजून मतदान पूर्ण व्हायचे आहे. निकाल लागणे बाकी आहे. त्या आधीच अशा फुकाच्या बाता मारण्यात काय अर्थ आहे?

 

लोकसभा निवडणुकीचे चार टप्पे पार पडले असून अजून तीन टप्पे अजून बाकी आहेत. नऊ राज्यांमधील लोकसभेच्या ७१ जागांसाठी चौथ्या टप्प्यात सोमवारी मतदान पार पडले. २०१४ मध्ये या मतदार संघांमध्ये भारतीय जनता पक्षाने उत्तम कामगिरी बजाविली होती. या ७१ जागांपैकी राष्ट्रीय लोकशाही आघाडीला ५६ जागा मिळाल्या होत्या. महाराष्ट्रात या टप्प्यातील सर्व म्हणजे १७च्या १७ जागा भाजप-शिवसेनेने जिंकल्या होत्या. महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यांच्या पाठीशी उभे असलेले लिंबूटिंबू पक्ष, राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार विजयी होऊ नयेत म्हणून प्रयत्नाची शर्थ करीत असले तरी, बोलघेवड्या नेत्यांचे ऐकून मतदार त्यांच्या मागे जाण्याची शक्यता नाही.

 

महाराष्ट्रातील सर्व ४८ लोकसभा मतदार संघातील मतदान आता पूर्ण झाल्याने महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बाजूने उभे राहिले आहे की नाही, हे २३ मे रोजीच पाहायला मिळणार आहे. तोपर्यंत आपापल्या वावड्या उडवायचे विरोधी नेत्यांना पूर्ण स्वातंत्र्य आहे. पाचव्या, सहाव्या आणि सातव्या टप्प्यासाठी अनुक्रमे ६ मे, १२ मे आणि १९ मे रोजी मतदान होत आहे. लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा सुरू असलेला जोरदार प्रचार आणि त्या तुलनेत विरोधकांच्या प्रचारात सुसूत्रतेचा, सरकारविरुद्ध प्रचार करण्यासाठी ठोस मुद्द्यांचा अभाव असल्याचे प्रकर्षाने जाणवत आहे. असे असतानाही राष्ट्रीय लोकशाही आघाडीस पुन्हा सत्ता मिळणार नाही, अशा फुशारक्या विरोधी नेत्यांकडून मारल्या जात आहेत. शरद पवार यांच्यासारख्या, स्वत:स राजकारणातील चाणक्य समजणार्‍या नेत्यांनी आताच पुढची समीकरणे मांडण्यास प्रारंभ केला आहे. आम्हीच जिंकणार, अशा थाटात हे सर्व चालले आहे.

 

विरोधी पक्षांमध्ये ऐक्य झाल्याचे जनतेला अजूनही दिसलेले नाही. अनेक नेत्यांची तोंडे वेगवेगळ्या दिशेला असल्याचे दिसून येत असताना कशाच्या आधारावर विरोधक एकत्र येतील, असा दावा विरोधी नेते करीत आहेत? तसेच विरोधकांना बहुमत मिळाले तरच्या पुढच्या या गोष्टी आहेत. भाजप सरकारविरुद्ध आपण जो खोटा प्रचार चालविला आहे, त्याला भुलून मतदार आपल्यामागे उभा राहील, अशी भाबडी आशा विरोधकांना वाटत आहे. पण, विरोधी पक्षांनी आणि विरोधी नेत्यांनी आतापर्यंत काय ‘कर्तृत्व’ दाखविले हे मतदार चांगल्याप्रकारे जाणून असल्याने ‘सुजाण’ मतदार अशा नेत्यांना आणि पक्षांना त्यांची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाहीत.

 

काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात वारेमाप आश्वासने दिली असली तरी, अशी आश्वासने त्या पक्षाने या आधीच्या प्रत्येक निवडणुकांच्या वेळी दिली होतीच आणि त्यामधील किती आश्वासनांची पूर्तता झाली, हे देशातील जनता जाणून आहेच. त्यामुळे अशा जाहीरनाम्यांना भुलून मतदार काँग्रेसच्या मागे धावणार नाही, हे स्पष्टच आहे. काँग्रेस पक्ष १९७१चा कार्यक्रम घेऊन २०१९ची निवडणूक लढवत असल्याची टीका भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांनी केली आहे. काँग्रेसकडून जे ‘फेक’ आरोप करण्यात येत होते, तेही आता विरून गेल्याचे दिसत आहे. काँग्रेसने निवडणुकीच्या मध्येच हातपाय गाळल्याचे दिसून येत असल्याची टीकाही जेटली यांनी केली आहे. २०१४ पेक्षाही जास्त संख्येने राष्ट्रीय लोकशाही आघाडी विजयी होईल, असा विश्वासही जेटली यांनी व्यक्त केला आहे. कर्नाटकमधील भाजप नेते बी. एस. येडीयुरप्पा यांनी कर्नाटकमधील २८ पैकी २२ जागा भाजप जिंकू शकतो, असे भाकीत वर्तविले आहे. माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा, मल्लिकार्जुन खरगे, के. एच. मुनियप्पा, वीरप्पा मोईली या सारख्या काँग्रेसच्या नेत्यांना भाजप उमेदवारांकडून पराभव स्वीकारावा लागेल, असे त्यांनी ठामपणे म्हटले आहे.




 

 

भाजप नेत्यांकडून विजयाबद्दल आत्मविश्वास व्यक्त केला जात असतानाच कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्यासारखे नेते आताच रडू लागले आहेत. त्यांचा मुलगा निखील मंड्या लोकसभा मतदार संघातून उभा आहे. माध्यमांनी त्याची नकारात्मक प्रसिद्धी केल्याबद्दल ते माध्यमांवर संतापले आहेत. माध्यमांशी न बोलण्याचा पवित्रा त्यांनी घेतला असल्याचा बातम्या झाळकल्या आहेत. “मी तुमच्यावर बहिष्कार टाकीत आहे. तुमच्या ‘स्टोरी’साठी तुम्हाला जे हवे ते तुम्ही करा. जा... हवे ते करा. मजा करा...” असे कुमारस्वामी म्हणाल्याचे प्रसिद्ध झाले आहे. देशाच्या सुरक्षेसह देशांतर्गत अनेक प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी मोदी सरकारने अनेक उपाय योजले असले तरी, विरोधकांकडून केवळ अपप्रचार करण्यापलीकडे काहीच चालू नाही. आपल्याला सर्व समस्यांची चांगली जाण असल्याचे समजून काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी याही, ‘मोदी यांनी शेतकर्‍यांसाठी काही केले नाही,’ असे बोलून आपल्या भावाची री ओढू लागल्या आहेत. केंद्राच्या किसान योजना म्हणजे शेतकर्‍यांचा अपमान आहे, मोदी सरकारने शेतकर्‍यांचा विश्वासघात केला आहे, असा अपप्रचार करून मतदारांना आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न काँग्रेसने चालविला आहे.

 

विरोधकांना आपला पराभव दिसत असल्याने निवडणूक आयोगास लक्ष्य करण्याचे प्रयत्नही विरोधकांकडून चालू आहेत. निवडणुकीचे काही टप्पे पार पडले असतानाच विरोधकांनी पुन्हा ईव्हीएमबद्दल शंका उपस्थित करण्यास प्रारंभ केला आहे. आमच्या बाजूने मतदान होईल, पण इव्हीएममुळे काय होईल, हे सांगता येत नाही, अशा शंका पसरवून स्वायत्त असलेल्या निवडणूक आयोगाबद्दल जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न चालला आहे. काँग्रेसचे नेते पी. चिदंबरम यांनी भाजपकडून जो ‘अतिरेक’ केला जात आहे, त्यासंदर्भात निवडणूक आयोग ‘मूक प्रेक्षका’ची भूमिका घेत असल्याचा आरोप केला आहे. विविध विरोधी नेत्यांकडून होत असलेले आरोप पाहिले असता, त्यांच्या पायाखाली जी थोडी फार वाळू शिल्लक आहे तीही घसरू लागल्याचे दिसून येत आहे.

 

विरोधकांची अशी अवस्था असतानाच, पंतप्रधान म्हणून कोणाचा विचार होऊ शकतो, याचे पिल्लू राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी सोडून दिले आहे. राहुल गांधी यांनी खूप आधीच, आपण पंतप्रधान होऊ इच्छितो, असे म्हटले असतानाही, राहुल गांधी यांना त्या पदामध्ये रस नसल्याचे स्पष्ट करून, त्यांना या शर्यतीतून दूर ठेवण्याची खेळी ते खेळले आहेत. मायावती, चंद्राबाबू नायडू, ममता बॅनर्जी यांना प्रशासन चालविण्याचा अनुभव असल्याने त्यांचा पंतप्रधान म्हणून विचार होऊ शकतो, असे पवार म्हणतात. द्रमुक नेते स्टालिन आणि राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी पंतप्रधानपदासाठी राहुल गांधी यांना या आधीच पाठिंबा दिला आहे. राहुल गांधी हे पंतप्रधान व्हावेत, अशी काँग्रेसचीही इच्छा आहे. असे सर्व असताना निवडणुकीच्या मध्यावर पवार यांनी हे पिल्लू कशासाठी सोडून दिले? दुसरे म्हणजे, स्वत: पवार यांचीही पंतप्रधानपदी येण्याची सुप्त मनीषा आहे. पण, राष्ट्रीय लोकशाही आघाडी या निवडणुकीत पराभूत झाली तर आणि तरच या सर्व चर्चेला अर्थ आहे. अजून मतदान पूर्ण व्हायचे आहे. निकाल लागणे बाकी आहे. त्या आधीच अशा फुकाच्या बाता मारण्यात काय अर्थ आहे?

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@