टिकटॉक है भाई, सब टिकटॉक है!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Apr-2019
Total Views |

गेल्या आठवड्यात फारच मोठी चिंता दाटून आली होती. आता कुणाच्या मनात असे येईल की एका विदेशी हवामान अंदाज संस्थेने यंदा अलनिनो मुळे पर्जन्यमान कमी राहील, असा अंदाज वर्तविला अन् स्कायमॅट ही विदेशी संस्था असल्याने हवामानाचे असले तरीही त्यांचे अंदाज खरेच असतात. म्हणून यंदाचे वर्ष आणखी खराब जाणार म्हणून अनेकांना चिंता वाटली असेल, असा तुमचा अंदाज असेल तर ते साफ खोटे आहे. मग राहुल गांधी सत्तेत आल्यावर दर महिन्याला सहा हजार रुपये गरिबांच्या खात्यात कसे भरतील, ही चिंता कुणाला असेल, तर त्यातही काही तथ्य नाही. राहुलना अगदी प्रायमरी शाळेतली पोरंही फार गांभीर्याने घेत नाहीत. मग यंदा आंब्यांची आवक कमी आहे म्हणून चिंता का? की शेतकर्यांना आणखी कर्जवाटप करण्याची चिंता? असे काहीही नाही. मग हे तर नक्कीच आहे की आता इराणच्या तिढ्यामुळे भारतात पेट्रोल महाग होणार आहे, निवडणूक झाल्यावर नक्कीच होणार आहे, याची चिंता? अरे हॅट! अजिबातच नाही... पेट्रोल; मग ते गाडीत टाकायचे असेल किंवा माणसांच्या पोटांत, ते कितीही महाग झाले तरीही आपले अॅव्हरेज बमच असते... मग चिंता नेमकी कुणाची? अन् कशाची?
आजकाल इतक्या चिल्लर चिंता कुणी करतच नाहीत. चेन्नईच्या न्यायालयाने टिकटॉकवर बंदी आणली होती. आता टिकटॉक म्हणजे नेमके काय आहे, असा प्रश्न कुण्या नतद्रष्टाला पडेल असे वाटत नाही. कारण भारतात हे मोबाईलवर आणि ऑनलाईन उपलब्ध असलेले अॅप म्हणजे खेळणे 26 कोटी लोक वापरतात. जगातल्या किमान शंभरेक देशांपेक्षा ही लोकसंख्या जास्त असेल. त्यामुळे टिकटॉक बंद केल्यामुळे कोट्यान्कोटी भारतीयांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा वगैरे आली. अनेकांना ही न्यायालयाची हुकूमशाही वाटली आणि मग 2014 नंतर असे काही मुद्दे सापडतात का याच्या फिराकीतच असणार्या काही लोकांनी लगेच हे सरकार कसे अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपीच करत असते आणि मग ही कशी अघोषित आणिबाणी आहे आणि न्यायालयाच्या आडून निवडणुकीच्या आधी कसे लोकांना गप्प करण्यात आले आहे, असेही आरवणे सुरू झाले. त्यावेळी घटनाकारांना भविष्यात होणार्या तंत्रक्रांतीचा अन् संवाद माध्यमांत येणार्या गतीचा अन् त्यातून निर्माण होणार्या अधोगतीचा अंदाज आला असता तर त्यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा थोडा अडसून घेतला असता. आजकाल तर लोक जसे प्रत्यक्ष बोलतच नाही, मुद्रित (आणि हस्तलिखित) माध्यमातूनही व्यक्त होत नाहीत, जे काय बोलायचे अन् सांगायचे ते थेट समाजमाध्यमांवरच सांगून मोकळे होतात. त्यामुळे टिकटॉक, व्हाटस्अॅप वैगरे वर बंदी घातली तर लोकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा प्राणच घेतला जाईल. आजकाल लोकांना बाकी काहीही नाही दिले तरीही चालेल; पण इंटरनेट अन् तेही हायस्पीडच असले पाहिजे. ते नसले तर त्यांच्या सर्वच स्वातंत्र्यावर गदा येते. इंटरनेट हा प्राणवायू आहे. आजकाल खासगी असे काही राहिलेच नाही.
जे काय आहे ते तातडीने समाजाला कळलेच पाहिजे. अगदी घरी भजी केली अन् रस केला आंब्याचा तरीही तो तातडीने म्हणजे खाण्याच्या आधीच अन् देव असतील घरात तर त्यांना नैवेद्य दाखविण्याच्याही आधीच समाजमाध्यमांवर आयुष्यात कधीही न पाहिलेल्या फ्रेंडस् अन् फॉलोअर्सना त्याचे सचित्र दर्शन करवणे अत्यंत आवश्यक असते. अगदी आपल्या जोडीदारासोबत (नवरा- बायको असे नाही म्हटले, कारण जोडीदार म्हणजे वैवाहिकच असतो असे नाही. पेड पासून लिव्ह इन पर्यंत काहीही असू शकते) तर जोडीदाराने लाड केला किंवा ताड केला तरीही ते समाजमाध्यमांवर सांगणे अत्यंत आवश्यकच झाले आहे. ‘शी स्लॅप्स मी’ असे स्थिर किंवा चलचित्रांच्या पुराव्यांसह तातडीने समाजमाध्यमांवर टाकायचे असतेच. त्यासाठी टिकटॉक हे अत्यंत उप(द्रवी)योगी माध्यम आहे. ते खुटीउपाड आहे कारण ते चिनी आहे. यात तुम्ही तुमचा कुठलाही दीड- दोन मिनिटांचा व्हिडिओ टाकू शकता. त्यात मग नाच असेल, गाणे असेल कविता म्हणत असाल किंवा मग छोटे कथानक किंवा विनोद मांडला असेल... म्हणजे कुठल्यातरी पडद्यावर दिसण्याची सामान्यांची हौस यांत भागते आणि मग त्यांना न दिसणारे असंख्य चाहते मिळतात. आपण काहीतरी सेलिब्रेटी झाल्याचा भासही त्यांना होतो आणि त्या अत्यानंदात ते असतात. असे स्वप्नांचे वास्तव वाटणारे बुडबुडे ही समाजमाध्यमे निर्माण करत असतात. त्यातून मग कधी एखादा डान्सींग अंकल उधम करतो तर कधी धिंचॅक पूजा येडेचाळे अन् गाण्याचे जवचकोळे करून ट्रोलर्सच्या जगात स्वरलता ठरल्याचा आनंद घेते. हे चित्कार इतके वाढत चालले आहेत, चेकाळलेपण बोकाळते आहे की मग साडीतल्या काकूही, ‘आप जैसा कोई, मेरे जिंदगी मे आए’ सारख्या गाण्यांवर नाचत त्याचा व्हिडिओ टिकटॉक करतात. आता यातून नेमके काय होते, हे कळते तेव्हा कळूनही काही फायदा नसतो. आता मात्र ते हवेच आहे अन् नाही मिळाले तर मग आमचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य बळी पडते आहे, अशी छानपैकी ओरड करण्याचे कारण साडपले आहे. आता यावेळीही तेच करण्यात आले. इतक्या कोटी लोकांचे इचावडीवर नाचण्याचे स्वातंत्र्य चेंदामेंदित होते आहे, म्हणत लोक सर्वोच्च न्यायालयांत गेले.
ऐरवी चिनी विरुद्ध ओरड केली जाते, मात्र टिकटॉक हा आयटेमच चिनी आहे, हे टिकटॉकींना माहिती नसावे. ‘बीजिंग बाइटडान्स टेक्नॉलॉजी लिमिटेड’ नामक मूळच्या चिनी कंपनीने तातडीने मद्रास उच्च न्यायालयात आव्हान याचिका केली. शिवाय या कंपनीने सर्वोच्च न्यायालयापर्यंत धाव घेतल्यामुळे फेरविचार सुकर झाला. भारतातील बंदीच्या आदेशामुळे आमचे दररोज सुमारे साडेतीन कोटी रुपयांचे (50 हजार डॉलरचे) नुकसान होते आहे, आम्ही भारतीयांना पुरवलेल्या 250 रोजगारांवरही संक्रांत येते आहे, असेही या कंपनीचे म्हणणे होते. न्यायालयाने बाकी काही नाही; पण अभिव्यक्तीच्या मुद्याचा विचार करता बंदी दूर केली आहे. आता ही चिनी कंपनी आहे. त्यानिमित्ताने तुमचा डेटा त्यांच्याकडे गेला आहे. 26 कोटी लोकांचा अन् त्यांच्या माध्यमातून इतरांचीही माहिती थेट कळली आहे. म्हणजे तुमचे नाव, गाव, जात, धर्म, शिक्षण, आर्थिक स्थितीच नाही तर तुमच्या आवडीनिवडी अन् विकृती, विकारदेखील त्यांना कळतात. म्हणजे तुम्ही कुठला व्हिडिओ अपलोड केला त्यावरून त्यांना तुमची आवड कळते, तुम्हाला पोर्न व्हिडिओच येत असतील अन् त्याचा तुम्ही आनंदही घेत असाल तर (म्हणजे तो व्हिडिओ कितीवेळ पाहता अन् फॉरवर्ड करता यावरून ते तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा अंदाज बांधतात.) त्यावरून मग तुम्हाला तसल्या कंपनींच्या जाहिराती किंवा ऑफर्स येणे सुरू होते, याचा अर्थ तुमचा टेडा कंपन्यांना विकला गेला... हे असे असतानाही आम्ही मात्र टिकटॉक करत सुटलो असतो. सध्या एक गाणे खूप वाजते आहे, बाकी सब फर्स्टक्लास है, त्या धरतीवर, टिकटॉक है, भाई सब टिकटॉक है... असे म्हणावे लागेल!
@@AUTHORINFO_V1@@