दुकान बंद झाल्यानेच राज यांना मोदीद्वेषाने पछाडले!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Apr-2019
Total Views |



नाशिक : मोदी सरकारने घेतलेल्या नोटबंदीच्या निर्णयामुळे राज ठाकरे यांचे दुकान बंद झाले. त्यामुळेच त्यांना मोदीद्वेषाने पछाडले, असा घणाघात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी नाशिक येथे केला. राज्यातील या निवडणुकीची अखेरची सभा नाशिक येथील हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर झाली. राज ठाकरे भाजपच्या विरोधात का प्रचार करत आहेत ही राज की बात मुख्यमंत्र्यांनी आज उघड केली.

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी इंजिन भाड्याने घेतले आहे. मात्र तोंडाच्या वाफेवर इंजिन चालत नाही. हे इंजिन गल्लीत पण उरले नाही. नोटबंदीमुळे राज ठाकरे यांचे दुकान बंद झाले. त्यामुळेच ते चिडत असून त्यांना मोदीद्वेषाने पछाडले आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, नाशिकने तुम्हाला का नाकारले याचा राज यांनी गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे. आम्ही दिलेल्या पैशामुळे नाशकात काम झाले. महापालिका रिकामी आहे असे राजच म्हणाले होते. कुंभमेळ्यावेळी आम्ही राज्याचे पैसे नाशिकला दिले. नाशिकमधील कामे भाजपमुळे झाली आहेत असे सांगून राज यांचे कर्तृत्व काय, असा सवालही त्यांनी केला. सध्या दोन हजार कोटींची कामे नाशिकमध्ये सुरू असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यानी यावेळी कामांचा हिशोब आणि यादीच उपस्थितांसमोर सादर केली. ७८० कोटींच्या निविदा निघाल्या असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच आगामी काळात नाशिकमध्ये प्रस्तावित विकास कामांची यादीही सादर केली. हायब्रीड मेट्रो व बस यांची इन्ट्रीगेड सिस्टीम लागू करणार असल्याचे त्यांनी सांगीतले.

 

भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेसची अवस्थादेखील इंजिनसारखी होणार आहे असे सांगून येत्या २३ मेला घडाळ्याचे पार बारा वाजणार आहेत, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर केली. यावर छगन भुजबळांवर निशाणा साधतांना ते म्हणाले की, भुजबळ हे भ्रष्टाचारी असल्यानेच त्यांना जेलमध्ये टाकले. आगे आगे देखो होता हे क्या असे म्हणत काल राज ठाकरे यांच्या भुजबळांना जेलमध्ये टाकले पुढे काय या प्रश्नाचे उत्तर मुख्यमंत्र्यानी दिले. भुजबळांचे कर्तृत्व त्यांना त्यांची जागा दाखवेल न्यायदेवता आपले काम करेल असे मुख्यमंत्री म्हणाले. सुर्याकडे पाहून थुंकल्याने तुमच्याच अंगावर थुंकी पडते हे विरोधकांनी ध्यानात ठेवावे असे त्यांनी विरोधकांना उद्देशून सांगितले. भारतीय लष्करावर संशय घेणे चुकीचे असून राज हे पुरावे मागत आहेत मग काँग्रेस आणि राज यांच्यात फरक काय असा सवालदेखील त्यांनी यावेळी केला. आपल्या सैन्याच्या पराक्रमावर जगात संशय घेणारे केवळ पाक, महाआघाडी आणि राज ठाकरे हेच लोक आहेत असे सांगत त्यांनी आधी संगीतले असते तर या कारवाईवेळी रॉकेटला लावून त्यांना पाठवले असते, अशा शब्दात मुख्यमंत्र्यानी पुरावे मागणार्‍यांचा कठोर समाचार घेतला.

 

भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार खा. हेमंत गोडसे यांनी जनतेसाठी गत पाचवर्षपासून काम केले असल्याचे सांगत यावेळी देखील नाशिककर मलाच निवडून देतील असा विश्वास यावेळी व्यक्त केला. नाशिकला गुंडगिरी व भ्रष्टाचारी नेते नको असल्याने यावेळी आपल्यला पुन्हा नाशिकच्या सेवेची संधी द्यावी, असे आवाहन गोडसे यांनी यावेळी केले. यावेळी नाशिकचे शिवसेनेचे संपर्क नेते संजय राऊत म्हणाले की, काही लोकांना कावीळ झाली असून त्यांना सगळीकडे मोदीच दिसतात. त्यांची कावीळ उतरविण्यासाठी मुख्यमंत्री आले आहेत. मुख्यमंत्री हे सो सोनार की एक लोहार की आहे अशा शबब्दात त्यांनी मुख्यमंत्र्यांचे कौतुक केले. सभेत मंचावर पालकमंत्री गिरीश महाजन, खा. संजय राऊत, महापौर रंजना भानसी, आमदार बाळासाहेब सानप, देवयानी फरांदे, सीमा हिरे, लक्ष्मण सावजी, दिनकर पाटील, बबनराव घोलप, विनायक पांडे, दत्ता गायकवाड यांसह पदाधिकारी उपस्थित होते.

 

पंतप्रधान मोदींची गुगली पाहून कॅप्टन बारावे खेळाडू झाले!

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आजच्या सभेत शरद पवारांवर खोचक टीका केली. ते म्हणले, सुरुवातीला कॅप्टन मोठ्या आवेशात म्हणाले, मी लढणार. साहेब सर्व तयारीने उतरतही होते. पण पंतप्रधान मोदी यांची गुगली पाहून ते चक्क बारावे खेळाडू झाले. पक्षाच्या कॅप्टनचीच अशी अवस्था असेल तर इतरांचे काय, अशा शब्दात त्यांनी शरद पवार यांचा समाचार घेतला.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@