चर्चच्या आवारात बेकायदेशीररित्या शव दफन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Apr-2019
Total Views |




ठाणे (भटू सावंत) : पाचशे-सहाशे वर्षांपूर्वी ठाण्यातील जानकीदेवी मंदिराच्या परिसरात काही पोर्तुगीज लोक उतरत असत. कालांतराने त्या जागेवर एक लहानसे चर्चही उभे राहिले. सेंट जॉन बाप्टिस्ट ट्रस्टने या परिसरातील जागा विविध मार्गाने आपल्या नावावर चढवली. मात्र, १९९५ नंतर शहर विकास आराखडा तयार होत असताना पालिकेने या जागेवर मैदानाचे आरक्षण निर्धारित केले. या जागेचा टीडीआर २००७ साली हिरानंदानी बिल्डरने विकतही घेतला. तसेच जागेचे हस्तांतरणदेखील ठाणे महानगरपालिकेकडे करण्यात आले. या व्यवहाराविरोधात सेंट जॉन चर्च व इतर दोन कथित मालकी असलेल्या लेडी ऑफ मर्सी चर्च व माजिवडा चर्च यांनी न्यायालयात दावा दाखल केला. दरम्यानच्या काळात सेंट जॉन बाप्टिस्ट ट्रस्टऐवजी दुसऱ्यांनी येथे करुणा केंद्र, बगीचा, खत प्रकल्प उभारत पालिकेच्या या जागेवर बेकायदेशीर कब्जा करायला सुरुवात केली. यावर अतिरेक म्हणजे, पालिकेची कोणतीही रीतसर परवानगी नसताना एका निवृत्त सैनिकाच्या शवाचे या जागेत दफन करून शाळा, चर्च आणि मंदिर परिसरात पसरलेले सर्व मैदान हडपण्याचा डाव ‘लेडी ऑफ मर्सी’ या चर्चच्या माध्यमातून सुरू असल्याची भावना येथील नागरिकांनी दै. ‘मुंबई तरुण भारत’शी बोलताना व्यक्त केली. यामुळे स्थानिक रहिवाशांच्या नाराजीचा उद्रेक झाला असून बेकायदेशीररित्या दफन केलेल्या या शवामुळे मैदानात खेळणारी मुले व शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांमध्येही एकच घबराट पसरलेली दिसते.

 

 
 

मौजे माजिवडा येथील सर्वे क्रमांक १८९/२/अ ही जागा मैदानाच्या आरक्षणाच्या कारणास्तव ठाणे महानगरपालिकेच्या नावावर आहे. २००७ साली ‘सेंट जॉन बाप्टिस्ट ट्रस्ट’च्या कमिटीने या जागेचा टीडीआर हिरानंदानी बिल्डरला विकला. या बदल्यात हिरानंदानी बिल्डरने ट्रस्टला अधिकृतरित्या २० कोटी रुपये दिले. हिरानंदानी बिल्डरने या जागेचा टीडीआर घेऊन जागा ठाणे महानगरपालिकेकडे हस्तांतरित केली. मात्र, हा टीडीआर घेईपर्यंत त्या भागात जे अतिक्रमण झाले, ते हिरानंदानी बिल्डरने काढून दिल्यास, त्याला त्या अतिक्रमित जागेचाही टीडीआर दिला जाणार आहे, जो अद्याप हिरानंदानी बिल्डरला दिलेला नसल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांकडून मिळाली. ही जागा मैदानासाठी राखीव असल्याचे जवळपास १२ बोर्ड ठाणे महानगरपालिकेने लावले होते. मात्र, एका रात्रीत हे सगळे बोर्ड कुणीतरी हटवले असल्याचा आरोप स्थानिकांनी केला. ‘सेंट जॉन बाप्टिस्ट ट्रस्ट’ ने आपला अधिकार सोडल्यानंतर येथे ‘लेडी ऑफ मर्सी’ने ही जागा आपलीच आहे, असे समजून तेथे शाळा, चर्च, बगीचा, खत प्रकल्प, करुणा केंद्र व मेरीचा पुतळा उभा केला. चर्चच्या या कथित अतिक्रमणाविरोधात या मैदानात असलेल्या जानकीदेवी मंदिराने दाखल केलेल्या केसेस गेली अनेक वर्ष अव्याहतपणे सुरू आहेत. बेकायदेशीररित्या माती भरणी केल्याबद्दल त्यांना २००५ साली ७ लाख, ७९ हजार, ५३० रुपयांचा दंडदेखील ठोठावण्यात आला होता. त्यातील केवळ एक लाख रुपये त्यांनी भरल्याची माहिती स्थानिकांकडून समजलीकाही दिवसांपूर्वी या चर्चशी संबंधित लोकांच्यावतीने या भागात ख्रिश्चन धर्मीयांसाठी दफनभूमीची मागणी करण्यात आली होती. मात्र, मैदानाचे आरक्षण असल्याने व स्थानिक रहिवाशांचा विरोध असल्याने ही मागणी फेटाळण्यात आली. मात्र, एरवी लोकशाही आणि कायद्याची भाषा बोलणाऱ्या चर्चच्या हितसंबंधितांनी एका ९५ वर्षीय निवृत्त सैनिकाचे दफन बेकायदेशीररित्या त्या जागेत केले. या दफन केलेल्या शवाच्या ३० मीटरच्या अंतरावर असलेल्या रवी इस्टेट, सुरेश पार्क, हिल व्ह्यू सोसायटी, कॉसमॉस इस्टेट, रेनआर्ट सोसायटी, स्कायलाईन सोसायटी या गृहसंकुलांतील नागरिकांनी दफनभूमीला आक्षेप घेतला. वास्तविक या जागेवर ‘लिटिल फ्लॉवर’ नावाची शाळा उभी करण्यात आली असून या शाळेला आता सीबीएससी बोर्डाशी संलग्न व्हायचे आहे. पण, त्यासाठीच्या अटींच्या पूर्ततेसाठी अतिरिक्त जागेची गरज असून ती जागा अशा विविध मार्गाने गिळंकृत करण्याचा डाव आखला जात असल्याचा आरोप येथील रहिवाशी व जानकीदेवी मंदिर ट्रस्टच्या विश्वस्तांनी केला आहे.

 

 
 

बेकायदेशीर शव दफन केल्याबद्दल ठाणे महानगरपालिकेच्या जन्म-मृत्यू नोंदणी विभागाच्या उपनिबंधकांनी वर्तकनगर पोलीस स्थानकात एफआयआरदेखील दाखल केली. या प्रकरणात काही जणांना अटक झाली व लगेचच त्यांची जामिनावर सुटकाही करण्यात आली. मात्र, या अटक झालेल्यांनी ही अटक साजरी करत ख्रिश्चन धर्मासाठी व दफनभूमीसाठी आपण बलिदान करीत असल्याचे धार्मिक वातावरण तयार केले. काँग्रेसच्या एका नगरसेवकाने तर या दफनभूमीच्या बाजूने आपले राजकीय वजन वापरल्याचा आरोपही स्थानिकांनी यावेळी केला. त्यामुळे न्यायालयाने एका महिन्याच्या आत सुनावणी घेऊन या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावण्याच्या सूचना ठाणे महानगरपालिकेला केल्या आहेत. वास्तविक, शव दफन करण्यासाठी लागणारी कायदेशीर परवानगी चर्चकडे नाही. शिवाय, ज्या जागेत शव दफन करण्यात आले आहे, त्या जागेच्या मालकीबाबतही प्रश्नचिन्ह आहेत. चर्चने सुरुवातीला जागा बळकावली, मग शाळा बांधली आणि त्यानंतर खतप्रकल्प व बगीचा तयार करून आता दफनभूमीचा विषय पुढे आणून जागा बळकावण्याचे षड्यंत्र असल्याचा आरोप स्थानिक रहिवाशी करत आहेत. तसेच बेकायदेशीर दफन करण्यात आलेल्या गृहस्थाचा मृत्यूचा दाखला महानगरपालिकेच्या जन्म-मृत्यू विभागाकडून अद्याप देण्यात आलेला नसल्याची माहितीही रवी इस्टेटच्या रहिवाशांनी दै. ‘मुंबई तरुण भारत’शी बोलताना दिली. या मैदानाच्या परिसरात १९३२ साली उभ्या राहिलेल्या आणि शासनदरबारी नोंद असलेल्या पुरातन अशा जानकीदेवी मंदिराला काहींनी आक्षेप घेतला आहे. त्याविरोधातील लढाईदेखील मंदिर व्यवस्थापन लढत आहे. जुने मंदिर लहानशा जागेत अनेक वर्षे पडून आहे. माहितीच्या अधिकारात पालिकेच्या जागेवर अतिक्रमण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतरही पालिका कार्यवाही करत नसल्याने रहिवाशांनी आता आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. या जागेच्या मालकीबाबत बरीच गुंतागुंत आहे. माजी आमदार व जानकीदेवी उत्कर्ष मंडळाचे सल्लागार अनंत तरे, आ. दिवाकर रावते, आ. डॉ. दीपक सावंत, तत्कालीन आमदार व विद्यमान खा. नितीन गडकरी, आ. अशोकराव मोडक यांनी ‘फिरंगी धर्माचे देऊळ’ असा उल्लेख असलेली जागा १९७६ कशी आणि का सेंट जॉन बाप्टिस्ट चर्चच्या नावावर कशी करण्यात आली? याबाबत विधिमंडळाच्या चर्चेत प्रश्न उपस्थित केले होते.

 

या जागेपैकी आठ हजार चौरस मीटर जागा वाघे नावाच्या एका आदिवासीच्या नावाने होती. कायम कब्जेदार त्याचे नाव होते. त्यात १९७६ साली ही जागा ‘सेंट जॉन बाप्टिस्ट’ च्या नावावर चढविण्यात आल्याचा दावा आदित्य कन्स्ट्रक्शन बिल्डरने केला आहे. विशेष म्हणजे, २०१२ साली हिरानंदानी बिल्डरने यातील ९०० चौरस मीटर जागा परस्पर आदित्य कन्स्ट्रक्शनला विकल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले. त्यामुळे ही जागा धार्मिक कारणासाठी ‘गिफ्ट डीड’ची आहे आणि त्यावर आरक्षण टाकता येत नाही, हा दावादेखील निष्फळ ठरतो, असाही युक्तिवाद आदित्य कन्स्ट्रक्शनकडून केला जात आहे. ज्या जागेत शव दफन करण्यात आले आहे, ती जागा पालिकेला हस्तांतरित झालेल्या व मैदान म्हणून आरक्षण असलेल्या जागेत असल्याचा शासकीय नकाशा रवी इस्टेटच्या रहिवाशांनी शोधून काढला आहे. कागदोपत्री मैदानाच्या जागेचा ताबा पालिकेने घेतला असला तरी, पालिका प्रत्यक्ष या जागेचा ताबा का घेत नाही? हा विषय मात्र गुलदस्त्यात आहे. यामुळे येथे अतिक्रमण झाल्याचा आरोप स्थानिक रहिवाशी करीत आहेत. नागरी प्रश्नांचा मुलामा देऊन काही चर्चधार्जिण्या मंडळींनी एक फोरम उभा केला आहे. या फोरमच्या व्हॉट्सअ‍ॅप समूहावर ठाण्याच्या नेत्यांनी व पालिकेच्या लोकप्रतिनिधींनीही या बेकायदेशीर दफनभूमीला परवानगी दिल्याचे संदेश प्रसारित करून इतर नागरिकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. बेकायदेशीररित्या दफनविधी केल्याच्या विरोधातील एफआयआर मागे घेण्यासाठीची विनंती न्यायालयाने फेटाळून लावली आहे. शाळेचा बेकायदेशीर विस्तार, विविध समाजोपयोगी उपक्रमांच्या नावाने धर्मांतरांसाठी असलेल्या जागेचा वापर करणे, जुन्या पवित्र हिंदू मंदिराला विरोध करणे, अशी कृत्ये सध्या या ठिकाणी सुरू आहेत. परिसरातील नागरिकांनी लोकसभा निवडणुकीनंतर या विरोधात आपले आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला आहे.

 

पाच हजारांत धर्मांतर?

 

चर्चच्या धर्मांतराच्या कारवाईबाबत या परिसरात मोठ्या प्रमाणावर नाराजी आहे. पाच हजार रुपयांत या भागातील भीमनगर व आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांचे धर्मांतर केले जात असल्याची शंका येथील स्थानिकांनी दै. ‘मुंबई तरुण भारत’शी बोलताना व्यक्त केली. अनेक घरकाम करत असलेल्या महिलांनी गेल्या काही वर्षांत ख्रिश्चन धर्म स्वीकारल्याचे आढळून आले आहे. तसेच धर्मांतरित अशा अनेक लोकांच्या घरातील केवळ देवीदेवतांचेच नव्हे, तर त्यांची श्रद्धा असलेल्या समाजपुरुषांच्या प्रतिमादेखील हद्दपार झाल्याचा धक्कादायक प्रकार पाहायला मिळत आहे.

 

पालिकेने मैदानाला कुंपण घालावे

 

सामान्य करदाता आणि एक जागरूक नागरिक या नात्याने ठाणे महानगरपालिकेला स्वत:च्याच मालकीच्या मैदानाला कुंपण घाला, अशी विनंती करणे चुकीचे आहे का? चर्च आणि शाळेच्या अतिक्रमणामुळे आम्ही रवी इस्टेटसह या भागातील इतर सात सोसायट्यांच्या नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. बेकायदेशीर दफनभूमी उभी राहत असताना प्रशासन बघ्याची भूमिका का घेत आहे, याबाबत आम्हाला आश्चर्य वाटते. लवकरच आम्ही या विरोधात निकराचा लढा उभा करणार आहोत.

 

 - महेश नाडकर्णी, रहिवासी, रवी इस्टेट

 

हा धार्मिक मुद्दा नसून शासकीय जागा बळकावण्याचा प्रयत्न

 

जुन्या पूर्वापार असलेल्या जानकीदेवी मंदिराला काही जण विरोध करीत आहेत. त्यासाठी आम्हाला कायदेशीर लढाई लढावी लागत आहे. दुसरीकडे राजरोसपणे अतिक्रमणे होत आहेत. त्याबाबत वर्तकनगर प्रभाग समितीचे अधिकारी काहीही कार्यवाही करत नाही. यामुळे प्रश्न अधिक चिघळेल. हा मुद्दा धार्मिक नसून, शासकीय जागा बळकावण्याचा आहे आणि शासनाला स्वत:ची जागा सुरक्षित ठेवण्याचा अधिकार असावा, असे वाटते.

 

- अनंत टेमकर, सचिव, जानकीदेवी उत्कर्ष मंडळ

 

या प्रकरणाची वरिष्ठ स्तरीय सुनावणी होणार

 

रवी इस्टेट सोसायटीच्या मागील भागात शव दफन केल्याच्या तक्रारीवर न्यायालयाने आयुक्त स्तरावर सुनावणी घेऊन मार्ग काढण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यावर वरिष्ठ पातळीवर निर्णय होतील. आजघडीला या जागेत कुठलेही नवे अतिक्रमण झालेले नाही. मी स्वत: त्या ठिकाणी जाऊन आलो आहे.

 

- अशोक बुरपुले, उपायुक्त अतिक्रमण, ठाणे मनपा

 

आम्ही शव कुठे पुरणार?

 

अवर लेडी ऑफ फातिमा, माजिवडा, सेंट जॉन द बाप्टिस्ट चर्च, जांभळी नाका व अवर लेडी ऑफ मर्सी चर्च, पोखरण अशा तीन जणांची मालकी असलेली जागा सेंट जॉन बाप्टिस्ट ट्रस्टच्या मंडळींनी भ्रष्टाचार करून हिरानंदानी बिल्डरला विकली. त्याविरोधात व मैदानाच्या आरक्षणाच्या विरोधात आमची उच्च न्यायालयात लढाई सुरू आहे. एक दिवस आम्ही हे अतिक्रमण नक्की हटवणार. चर्चच्या बाजूला दफनभूमी ही ख्रिश्चन धर्मीयांची पद्धत आहे. आमच्या हक्काच्या २६०० स्क्वेअर मीटर जागेत आम्ही दफनभूमी करीत आहोत. आम्हाला दफनभूमीसाठी ठाण्यात जागा नाही. एका शवाच्यावर दुसरे शव आम्ही पुरतो. शासन आम्हाला जागा देत नाही, तर आम्ही शव कुठे पुरणार? ‘लिटिल फ्लॉवर’ शाळेच्या बाजूला आमच्या जागेवर हिंदू स्मशानभूमी उभी राहिली. तिचे आरक्षण बदलून तिथे जर एका बांधकाम व्यावसायिकाला इमारत उभी करण्याची परवानगी मिळू शकते, तर आम्हाला आमच्या हक्काच्या जागेवर दफनभूमी का नाही मिळणार?

 

- मेनवीन फर्नांडिस, दफन प्रकरणी चौकशीसाठी ताब्यात घेतलेले गृहस्थ

 
 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@