अहमदनगर काँग्रेस कमिटीला आणखी एक हादरा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Apr-2019
Total Views |



नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष करण ससाणे यांचा राजीनामा

 

अहमदनगर : अहमदनगर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष करण ससाणे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या नावाने त्यांनी आपला राजीनामा पाठवला. काही दिवसांपूर्वीच काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अण्णा शेलार यांना हटवून करण यांच्याकडे जिल्हाध्यक्षपदाची सूत्रे देण्यात आली होती. त्यामुळे करण यांच्या राजीनाम्यानंतर अहमदनगर काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी पुन्हा एकदा उफाळून आली आहे.

 

करण यांनी पत्रकार परिषद घेत आपण राजीनामा देत असल्याचे सांगितले आहे. मात्र अद्याप आपण पक्ष सोडला नसल्याचे त्यांनी सांगत याबाबत येत्या शनिवारी आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचे त्यांनी सांगितले. ससाणे हे विखे गटाचे समर्थक मानले जातात. त्यामुळे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या भूमिकेआधीच करण ससाणे यांनी राजीनामा दिल्याने जिल्हा काँग्रेसमध्ये मोठी खळबळ उडाली असून बाळासाहेब थोरात गटाला मोठा धक्का मनाला जात आहे.

 

कोण आहेत करण ससाणे?

 

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विखे यांच्या भूमिकेनंतर काँग्रेसचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष अण्णा शेलार यांनी आपण विखे यांच्यासोबत असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर बाळासाहेब थोरात यांनी शेलार यांना हटवून काँग्रेसचे करण यांच्याकडे जिल्हाध्यक्षपदाची सूत्रे दिली होती. विशेष म्हणजे ससाणे हे विखे समर्थक असूनही थोरातांनी पुढाकार घेत करण यांना संधी दिली होती. तसेच दिवंगत माजी आमदार जयंत ससाणे हे करण यांचे वडील होते. जयंत ससाणे हे शिर्डीच्या श्री साईबाबा संस्थानचे सात वर्ष अध्यक्ष, श्रीरामपूरचे दोन वेळा आमदार राहिले होते तसेच त्यांनी अहमदनगर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्षपदही भूषवले होते.

 

राजीनामा देण्याचे नक्की करण काय?

 

शिर्डी लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांनी एक वादग्रस्त विधान केले होते. एका प्रचार सभेत बोलताना कांबळे यांनी साईबाबांच्या झोळीत हात घालणा-याचे कधीच चांगले झाले नसल्याचेच बोलले होते. कांबळे यांच्या वक्तव्यामुळे ससाणे समर्थक नाराज होते व त्यांनी आपली नाराजी जाहीर बोलून दाखवत कांबळेचे काम करणार नसल्याचे जाहीर केले होते. समर्थकांची नाराजी लक्षात घेऊन आपण राजीनामा दिल्याचे करण यांनी पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केले.

 

राहुल गांधींची उद्या संगमनेरला सभा

 

शिर्डी लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांच्या प्रचार्थ काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांची उद्या शुक्रवारी संगमनेर येथे सभा होणार आहे. विखेंच्या राजकीय भूमिकेमुळे नाराज असलेले राहुल गांधी यांनी जिल्ह्यात थोरात गटाला बळ देताना दिसून येत आहेत. त्यामुळे या सभेच्या एक दिवस आधीच जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देत विखे व करण यांनी थोरात गटाला मोठा धक्का दिल्याचे जिल्ह्यात बोलले जात आहे.

 

ससाणे आणि विखे भाजपात प्रवेश करणार?

 

शिर्डी लोकसभा मतदारसंघातील युतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवारी श्रीरामपूरला येत आहेत. तर शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुंबई येथे सभा होणार आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांनी येत्या दोन दिवसात आपली भूमिका स्पष्ट करू असे सांगितले होते तर करण ससाणे शनिवारी आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. त्यामुळे आता ससाणे आणि विखे काय भूमिका घेतात, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@