हापूसच्या नावावर कर्नाटकच्या आंब्यांची विक्री

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Apr-2019
Total Views |



 

मुंबई : उन्हाळ्यात आंब्याचा हंगाम सुरू झाला असून बाजारात हापूसला ग्राहकांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही चांगली पसंती दिली आहे. मात्र, कोकणातील रत्नागिरी, देवगड हापूसच्या नावे व्यापारी कर्नाटकातील आंबा ग्राहकांच्या माथी मारत आहेत. ही विक्री नवी मुंबई, मुंबई आणि ठाण्याच्या बाजारपेठांमध्ये सर्रास सुरू आहे. आंबा विक्री करणारे कर्नाटकचा आंबा हापूस सारखाच दिसत असल्याचा फायदा घेत आहेत.

 

हापूस आंबा असल्याचे सांगत किलोच्या भावात हा कर्नाटकी हापूस विक्री केला जात आहे. रस्त्यावरील दुकाने, शॉपिंग मॉल, सिग्नल जवळील फेरीवाले, रेल्वे आणि बस स्थानकानजीक अशाप्रकारचे आंबे विक्रीस उपलब्ध आहेत. हे विक्रेते दिवसभर विविध ठिकाणी जाऊन मालाची विक्री करतात. त्यामुळे आंबा हापूस नाही हे लक्षात आल्यानंतर विक्रेत्याला जाब विचारण्याची सोयही नाही. त्यामुळे ग्राहकांची अडचण होत आहे. काही आंबे खरेदी विक्रीसाठी किलोच्या भावात उपलब्ध आहेत, तर काही आंबे देवडग, रत्नागिरी हापूस असे नाव असलेल्या पेट्यांमध्ये भरून विकले जात आहेत.

 

जीआय नामांकन मिळाल्यानंतरही फसवणूक

२०१८ मध्ये कोकणातील रत्नागिरी आणि देवगड हापूस आंब्याला जीआय मानांकन मिळालेले आहे. या टॅगमुळे कोकणातील आंबाच केवळ हापूस म्हणून विकला जाऊ शकतो. जीआय मानांकन मिळाल्यानंतर कर्नाटक, गुजरात आणि आंध्रप्रदेशातील आंब्याला हापूस म्हणून विकले जाऊ शकत नाही. आंब्याचे व्यापारी या नियमांचे पालन करत असले तरीही फेरीवाल्यांकडून हे नियम धाब्यावर बसवले जात आहेत.

कसा ओळखाल हापूस आंबा ?

हापूस आंब्याची साल ही पातळ स्वरूपात असते, तर इतर आंब्याची साल जाडसर असते. हापूस आंबा खाल्ल्यानंतर जीभेवर एकप्रकारचा गोडवा रेंगाळत राहतो, मात्र, इतर आंब्यांची चव ही काहीशी गोड आणि आंबट असते. हापूस आंब्याचा आकार हा गोलसर आणि मोठा असतो, मात्र, इतर आंबे तुलनेने लहान असतात. हापूस आंब्याच्या आतील रंग हा केशरी आणि पिवळाधम्मक असतो. मात्र, इतर आंबे हे फिकट पिवळसर दिसतात. हापूस आंब्याची पारंबी लहान आणि पातळ असते. इतर आंब्यांमध्ये ती मोठी आणि जाड असते. हापूस आंब्यांवर आतून रेषा नसतात. इतर आंब्यांवर त्या दिसतात. हापूस आंबा देठाकडून
थोडासा दबलेला दिसतो मात्र, इतर आंब्यांच्या देठाखालील भाग सपाट असतो. हापूस आंब्यांच्या तळाचा भाग गोलाकार दिसेल मात्र, इतर आंब्यांना खालून टोकेरी भाग असतो. हापूस आंबा हातात घेतल्यावरच तुम्हाला एक सुगंध जाणवू लागतो. इतर आंब्यांना तो सुगंध जाणवणार नाही.

 

     काय आहे आंब्याला भाव ? (प्रति डझन)

 प्रकार किरकोळ भाव घाऊक भाव

 कोकणातील हापूस  ५०० ते ८०० रुपये ८०० ते १५०० रुपये

 इतर आंबा         २०० ते ३५० रुपये ३०० ते ५०० रुपये

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@