कर‘नाटकी’ राजकारण...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Apr-2019
Total Views |



‘कर्नाटकी राजकारण’ हा भारतीय राजकारणात नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. मात्र, ‘कर्नाटकी संगीत’ हे ज्याप्रमाणे चांगल्या संगीतासाठी ओळखले जाते, त्याप्रमाणे ‘कर्नाटकी राजकारणा’चा उल्लेख चांगल्या पद्धतीने केला जात नाही. कटकारस्थान, विश्वासघात, पराकोटीचा स्वार्थ, पाताळयंत्री स्वभाव हा राजकारणाचा ‘युएसपी’ असला, तरी कर्नाटकी राजकारणातून हे अवगुण जास्तच तीव्रतेने झळकतात. हे सांगायचे कारण म्हणजे, लोकसभेच्या निवडणुकांचा पंचवार्षिक गोंधळ सुरू असतानाच कर्नाटकातील राजकारणाने पुन्हा एकदा उचल खाल्ली आहे. कर्नाटकातील लोकसभेच्या निवडणुका पार पडल्यानंतर कुमारस्वामी यांचे खिचडी सरकार पडणार, या कानडी चर्चेने या प्रांतातील राजकारण घुसळून निघाले आहे. बेळगावातील जारकीहोळी बंधू या अस्थिर कर्नाटकी राजकारणाचा केंद्रबिंदू ठरत असून माजी मंत्री आणि काँग्रेस आ. रमेश जारकीहोळी हे कर्नाटकी बंडाचे नेते आहेत. गेल्या मे महिन्यात कुमारस्वामी सरकार सत्तेवर आल्यापासूनच हे सरकार पडणार, अशी हाकाटी सुरू झाली आहे. आता मात्र “या सरकारच्या वर्षपूर्तीनंतर हे सरकार आम्ही चालू देणार नाही,” असा दावा रमेश जारकीहोळी ठामपणे करत आहेत. त्यांनी येत्या शनिवारी आपल्या बंडखोर आमदार मित्रांची बैठक बंगळुरूत आयोजित केली आहे. त्यानंतर ते विधानसभा अध्यक्ष रमेशकुमार यांचीही भेट घेणार आहेत. रमेश हे काँग्रेसकडून निवडून आले खरे, पण मंत्रिपद न मिळाल्याने काँग्रेस पक्षश्रेष्ठींवर ते डूख धरुन आहेत. तुलनेने कमी अनुभवी आणि त्यांचेच बंधू असलेल्या सतीश जारकीहोळी यांना महत्त्वाचे मंत्रिपद मिळाल्याने त्यांनी हे सरकार पाडण्याचा चंगच बांधला आहे. बेळगाव जिल्ह्यातील गोकाक भागात रमेश हे लोकनेते असल्याने त्यांना पुन्हा निवडून येण्यात कोणतीही अडचण वाटत नाही. परंतु, बल्लारीचे आ. बी नागेंद्र, अथणीचे आ. महेश कुमठहल्ली, हिरेकेरुरचे आ. बी. सी. पाटील, भीमा नायक, जे. एन. गणेश या भाजपमध्ये प्रवेश करू इच्छिणार्‍या काँग्रेसी आमदारांना निवडून येण्याची खात्री वाटत नसल्याने पक्षांतराचे घोडे काहीसे अडले आहे. पण, केंद्रात भाजप सरकारची पुनर्स्थापना व्हायच्या मुहूर्तावर कर्नाटकातही कुमारस्वामी आणि काँग्रेसची सरकाररूपी नौका बुडून त्या ठिकाणी ‘कमळ ’ फुलण्याची शक्यता असून त्या दिशेनेच कर्नाटकी राजकारणाची वाटचाल सुरू आहे.

 

कर्नाटकातील जारकी‘होळी’ बंधू

 

मराठमोळ्या बेळगावातील कानडी भाषिक जारकीहोळी बंधू हे या कर्नाटकी राजकारणातील होऊ घातलेल्या भूकंपाचा केंद्रबिंदू आहेत. सीमाप्रश्नाचे केंद्र असलेल्या बेळगाव महानगरात मराठी भाषकांचे वर्चस्व असले तरी बेळगाव जिल्ह्यात मात्र गेल्या दशकापासून कानडी भाषिक रमेश, सतीश, भालचंद्र आणि लखन या चौघा सख्ख्या बंधूंचे वर्चस्व आहे. या चौघांपैकी तीन बंधू आमदार असून त्यांनी सुरुवातीला बेळगाव जिल्ह्यातील राजकारण काबीज केल्यावर आपला मोर्चा कानडी राजधानी बंगळुरूकडे वळवल्याचे बोलले जाते. राजकारणात सक्रिय असलेल्या या चार जारकीहोळी बंधूंपैकी दोन बंधूंनी याआधीच्या वेगवेगळ्या सरकारमध्ये मंत्रिपदे भूषवली आहेत, तर सतीश जारकीहोळी कुमारस्वामी सरकारमध्ये वन आणि पर्यावरण खात्याचे मंत्री आहेत. सतीश, रमेश व धाकटा लखन हे काँग्रेसमध्ये, तर भालचंद्र भाजपमध्ये अशी या भावांमधील राजकीय विभागणी. आता काँग्रेसी रमेश धाकट्या लखन यांच्यासह ‘कमळ’ हाती घेण्याची शक्यता आहे. याआधी भाजपमध्ये जसे भालचंद्र एकटे होते, तशी वेळ आता मंत्री असलेल्या सतीश यांच्यावर येणार आहे. सध्या या चार भावांमध्ये भावकीचे राजकारण सुरू असून त्याचे पडसाद कर्नाटकी राजकारणावर उमटणार, हे निश्चित. कर्नाटकातील काही राजकीय शक्ती या भावांमधील भावकी जोरदार पेटण्याची वाट बघत आहेत, तर काही शक्ती हे भावकीतील भांडण मिटवण्याच्या प्रयत्नात आहेत. यापैकी काहीही जरी झाले तरी नजीकच्या काळात हे जारकीहोळी बंधू कर्नाटकी राजकारणात होळी पेटवणार, एवढे नक्की! येत्या काही दिवसांत नेमके कुठले जारकीहोळी कोणत्या पक्षात हेही स्पष्ट होणार आहे. सीमाप्रश्नामुळे कर्नाटकच्या राजकारणात नेहमीच चर्चेत असणारे बेळगाव यावेळी मात्र या जारकीहोळी बंधूंच्या राजकीय कोलांटउड्यांमुळे चर्चेत आले आहे.

 

- शाम देऊलकर

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@