इमरानचा गोल गोल भूगोल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Apr-2019   
Total Views |



पाकिस्तानचे समाजकारण धार्मिक अतिरंजकतेच्या कायद्यात गुरफटले आहे, तर राजकारण दहशतवादामध्ये गुंतले आहे. अशा देशाच्या पंतप्रधानाला आपण काय बोलतोय, काय नाही याचे भानच नसेल.


“परिवर्तन संसार का नियम है।” हा गीतेमधील अपरिवर्तनीय नियम. परिवर्तन होत असतेच म्हणा. पण, इतके परिवर्तन व्हावे की, जर्मनी आणि जपान हे कधीकाळी महायुद्धात सामील झालेले देश एकमेकांपासून दूरच दूर, तरीही ते एकमेकांचे शेजारी व्हावेत. इतके परिवर्तन झाले का? पाश्चात्त्य संस्कृती आणि त्यातही ‘नाझीझम’च्या पुसटशा का होईना, आठवणी बाळगणारा जर्मनी आणि आशियाई राष्ट्र म्हणून स्वतःची अशी खास सांस्कृतिक आणि धार्मिक बैठक असलेला जपान, हे दोघे एकमेकांचे शेजारी झाले? जग खेडे झाले हे खरेच आहे. मोबाईलच्या एका क्लिकवर जग मुठीत मावते. त्यामुळे जर्मनी आणि जपान ही दोन राष्ट्रे एकमेकांचे शेजारी झाले आहेत का? असा प्रश्न सगळ्या पाकिस्तानला आणि जगालाही पडला आहे. कारण, “जर्मनी आणि जपान हे शेजारी शेजारी आहेत. त्यांच्या सीमा एकमेकांना लागून आहेत,” असे छातीठोकपणे ‘भिकीस्तान’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाकिस्तानच्या पंतप्रधानाने इमरान खानने म्हटले आहे.

 

कोणे एकेकाळी आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिकेट खेळणारे आणि देशाच्या सीमा लांघून इतर देशातील स्त्रियांशी विवाह करणारे इमरान खान यांना जर्मनी आणि जपान आजूबाजूचे देश वाटले. का बरं? कदाचित क्रिकेट खेळायला इमरान खान जगभर हुंदडले, पण जपान आणि जर्मनीमध्ये क्रिकेट खेळाची चलती नसल्यामुळे या देशात क्रिकेट खेळायला जायचा त्यांना योगच आला नसेल. त्यामुळे क्रिकेट न खेळणारे देश हे एकमेकांचे शेजारी असतील, असा ठाम समज इमरान खान यांचा असेल किंवा दुसरे असे की, शेजारी शेजारी असलेल्या देशांमध्येच दुश्मनी, हेवेदावे, युद्धे होत असतील, असे त्यांना बाळकडूच मिळाले असेल. त्यामुळे कधीकाळी युद्ध वगैरेंच्या चर्चेत जर्मनी आणि जपानच्या युद्धाच्या कहाण्या इमरान यांच्या कानावरून गेल्या असतील. पाकिस्तानच्या राजकारणाच्या मातीतच गुण आहे की, कोणत्याही शेजारी राष्ट्राला जमेल त्याप्रमाणे त्रास द्यायचा प्रयत्न करायचा. त्यामुळे इमरान यांना पक्के वाटले असेल की, जपान आणि जर्मनी या दोन देशांनी युद्ध वगैरे केले असेल. कारण, ते शेजारी असतील. एकमेकांच्या सीमेवर हल्ला करताना युद्धे झाली असतील.

 

इमरान तरी काय करणार? माणूस जे अनुभवतो तेच शिकतो. त्यामुळे जर्मनी आणि जपानला शेजारी राष्ट्र म्हणताना इमरान यांना आपण चुकीचे काही म्हणतोय, याची जरासुद्धा खंत वाटली नाही. पाकिस्तानचे समाजकारण धार्मिक अतिरंजकतेच्या कायद्यात गुरफटले आहे, तर राजकारण दहशतवादामध्ये गुंतले आहे. अशा देशाच्या पंतप्रधानाला आपण काय बोलतोय, काय नाही याचे भानच नसेल. कारण, या देशात शांतता स्थैर्य यांचे नामोनिशाण नाही. कुठून कोणते राज्य बंड करून स्वतंत्र होईल, याचे सातत्याने भय. त्यातच या देशाने त्याच्या जन्मापासून हिंसाचार, भ्रष्टता यांना खतपाणी घातलेले. जे पेरले तेच पाकिस्तानमध्ये उगवले आहे. त्यामुळे या देशाचे एकप्रकारे चालक असलेल्या इमरान यांना सैरभेर वाटतच असणार. भारताने नुकताच एअर स्ट्राईक करत जगभरात पाकिस्तानची नाचक्की केली. त्यावेळीही इमरान यांनी आज एक तर उद्या दुसरे आणि परवा तिसरेच विधान केले. या सर्व विधानांनी त्यांची पुरती फजिती झाली. आता तर भारत सरकारच्या नैतिक नीतीमुळे पाकिस्तानची जगभरात कोंडी झाली आहे. पाकिस्तान आज दहशतवादाचे केंद्र म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. मग, मसूद अझहर असू दे की, नुकताच झालेला इस्टर संडेचा श्रीलंकेमधील नरसंहार; या साऱ्यांची पाळेमुळे पाकिस्तानमध्येच दिसून येत आहेत. आपले हिडीस रूप जगासमोर उघड झाले. आता कितीही शिष्टाई रडगाणे केले तरी उपयोग शून्य शून्य, हे पाकिस्तानी पंतप्रधानांच्या लक्षात आलेच असेल.

 

या सगळ्या विचाराने इमरान इतके थकले असतील की, त्यांना आपण काय बोलतोय याचे भानही राहिले नाही. त्यामुळेच बेनझीर भुत्तोच्या पुत्राला बिलावल भुत्तो झरदारी यांना इमरान यांनी चक्कबिलावल साहिबा’ म्हटले. बिलावल स्त्री आहे की पुरुष याचाही पंतप्रधानांना विसर पडला की मुद्दाम असा शब्दप्रयोग केला कोणास ठावूक! जर्मनी आणि जपान शेजारी शेजारी असलेल्या इमरान खान यांच्या स्पेशल गोल गोल भूगोलात आणि गोंधळलेल्या मानसिकतेत आणखी काय काय असेल ते आणि त्यांचा अल्लाहच जाणो!

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@