देव, देश आणि धर्मासाठीच युती : उद्धव ठाकरे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Apr-2019
Total Views |



नाशिक : “ शिवसेना-भाजप युती ही देव, देश आणि धर्मासाठी झाली आहे. भगवी वज्रमूठ ही सक्षम आहे. शिवसेनेकडे हेमंत अप्पा असून बाकीकडे केवळ गप्पा आहेत,” या शब्दांत युतीवर टीका करणाऱ्या विरोधकांचा उद्धव ठाकरे यांनी नाशिकमधील सभेत बोलताना समाचार घेतला. येथील हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर नाशिक लोकसभेचे शिवसेना उमेदवार हेमंत गोडसे आणि दिंडोरी लोकसभा मतदार संघाच्या भाजप उमेदवार डॉ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी पालकमंत्री गिरीश महाजन, उत्तराखंडचे मंत्री आणि भाजपचे स्टार प्रचारक सत्पालजी महाराज, ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, खा. संजय राऊत, नाशिक महानगरपालिका विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, माजी मंत्री बबन घोलप, भाजपचे पवन भागूरकर, विजय साने, महापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गीते, आ. बाळासाहेब सानप, देवयानी फरांदे, सीमा हिरे यांसह युतीच्या घटक पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. अपक्ष केवळ मते फोडण्यासाठी उभे राहत असल्याचे सांगत भुजबळांचे नाव न घेता त्यांच्यावर, “सेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अटक करायला का निघाला होतात, याबद्दल सांगा,” अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी टीकास्त्र सोडले. सेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावरील त्या काळात दाखल झालेल्या गुन्ह्याची माहिती उद्धव ठाकरे यांनी यावेळी उपस्थितांना दिली. “जो कोणी भगव्याचा द्रोह करतो, त्याची गत अशीच जेलवारीने होते,” अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी आपले विचार व्यक्त केले.

 

उपस्थित विराट जनसमुदायाला संबोधित करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, “सेना-भाजपमध्ये काही मतांवर मतभिन्नता होती. जेव्हा भाजप व सेना यांचे वाद होत होते, तेव्हा विरोधकांना आनंद होत होता. युती ही हिंदुत्वाच्या मुद्द्यावर झाली होती व त्यासाठी अनेकांनी श्रम घेतले होतेे. मत कोणाला देऊ नका, हे काही लोक सांगतात, पण कोणाला द्या, हे नाही सांगत,” अशा शब्दांत उद्धव यांनी यावेळी राज यांच्यावरही अप्रत्यक्ष निशाणा साधला. यावेळी त्यांनी उत्तर प्रदेशात, बंगालमध्ये आणि इतर राज्यांत घडलेल्या राजकीय घडामोडींचा परामर्ष घेत, त्या राज्यांनादेखील काँग्रेस नको असल्याचे म्हटले. विरोधक अजेंडा न ठेवता केवळ द्वेषापोटी विरोधी प्रचार करत असल्याचे सांगत काँग्रेस काळातील घोटाळ्यांची त्यांनी माहिती दिली. “या घोटाळ्यांची विरोधकांना लाज वाटत नाही का?” असा सवाल उद्धव ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केला. “नरसिंहराव यांच्या काळातील काँग्रेस सरकार हे अतिरेक्यांशी चर्चा करण्यात धन्यता मानायचे.” पण, आताचे सरकार हे अतिरेक्यांचा खात्मा करत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. “सैनिकी कार्यवाहीवर प्रश्न उपस्थित करत विरोधक जवानांच्या शौर्याचे खच्चीकरण करत आहेत. शरद पवार कधीही आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या घरी गेले नाही, मात्र इशरत जहाँच्या घरी गेले, ” असे सांगत त्यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. “युती ही घेण्यासाठी नसून देशाला देण्यासाठी आहे,” असे सांगत त्यांनी देशाभोवती हिरवा फास आवळला जात असल्याचे सांगत कन्हैयाकुमारचा देखील समाचार घेतला. ज्या बंगालने देशाला स्वातंत्र्याचा मंत्र दिला, वंदे मातरम दिले, तिथे बांगलादेशातील नागरिक प्रचाराला का मागवता, याचा विचार करण्याची गरज असल्याचेही ते यावेळी म्हणाले. राहुल गांधी यांची सावरकरविरोधी वक्तव्याची क्लिप दाखवत उद्धव यांनी, “राहुल जन्माला आले नव्हते, तेव्हा सावरकर यांनी मोलाचे योगदान देशाला दिले होते. या देशात सावरकर जन्मले नसते, तर राहुल गांधी तुम्ही पंतप्रधानाच्या खुर्चीचे स्वप्न पाहू शकला नसता,” अशा शब्दांत त्यांनी राहुल यांचा समाचार घेतला. आज शिवसेनाप्रमुख असते, तर राहुल गांधींचे काय केले असते,” असा सवाल त्यांनी उपस्थितांना केला.

 

यावेळी उद्धव ठाकरे यांनी आम्ही कलम ३७० काढणार व राम मंदिर बांधणार असल्याचे सांगत देव, देश आणि धर्म यांची व्याख्या व त्यामागील विचार स्पष्ट केला. यावेळी त्यांनी एमआयएमचादेखील खरपूस समाचार घेतला. यावेळी सत्पाल महाराज म्हणाले की, “भारताचा आजमितीस जगात मान वाढत आहे, याचे कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कार्यशैली आहे.” आज भारतास जगात सशक्त देश म्हणून गणले जाते असल्याचे आणि याचे कारण मोदी असल्याचेही ते यावेळी म्हणाले. भारताने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकमुळे भारताचा जगात गौरव वाढला असल्याचे आणि यामागे सक्षम राजकीय शक्ती असल्याचे सत्पाल महाराज म्हणाले. “आज भारताकडे अंतराळातील ताकददेखील आहे. त्यामुळे भारताकडे आता कोणीही वाईट नजरेने पाहू शकत नाही.” हे सर्व भाजपशासित शासनामुळे शक्य झाले असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. “हेमंत गोडसे यांनी नाशिकमध्ये अनेक विकासकामे केली आहेत. त्यांचा विकासासाठी कायमच प्रयत्न असतो,” असे सत्पाल महाराज यांनी यावेळी सांगितले. यावेळी त्यांनी उपस्थितांना धनुष्यबाणासमोरील बटण दाबण्याचे आवाहन केले.

 

यावेळी हेमंत गोडसे म्हणाले की, “पाच वर्ष मला नाशिककर नागरिकांनी साथ दिली. त्याबद्दल मी जनतेचा ऋणी आहे. लोकप्रतिनिधी म्हणून सक्षमपणे जबाबदारी मी पार पाडली आहे तसेच अनेक प्रश्न संसदेत उपस्थित केले आहेत.” यावेळी त्यांनी नाशिकमधील विकासकामांबाबत माहिती दिली. यावेळी गिरीश महाजन म्हणाले की, “हेमंत गोडसे हे जमिनीवरील नेते आहेत.” त्यांनी आपल्या कार्यातून अनेक विकासकामांत मोलाचे योगदान दिल्याचे यावेळी महाजन यांनी सांगितले. भुजबळ यांच्याबाबत सांगण्याची गरज नाही. त्यांचे चरित्र आपल्यासमोर आहे. त्यांची जेलयात्रा सर्वश्रुत असल्याचे सांगत महाजन यांनी समीर भुजबळ यांच्यावर निशाणा साधला. “संसदेत जाणारा खासदार हवा की, जेलमध्ये जाणारा खासदार हवा,” असा सवाल यावेळी महाजन यांनी उपस्थितांना केला. “विरोधकांना नेमका कोण पंतप्रधान असावा, हे ठरविता येत नाही,” अशी टीकाही त्यांनी यावेळी विरोधकांवर केली. यावेळी खा. संजय राऊत म्हणाले की, “उद्धव ठाकरे यांचा विचार हा एकच आहे की तो म्हणजे मोदी पुन्हा पंतप्रधान होणे.” असे सांगत त्यांनी देशात पुन्हा मोदी सरकार येणार असल्याचे सुतोवाच केले. “अयोध्येत राम मंदिर हवे असेल, तर मोदींशिवाय पर्याय नाही. मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास पाक जगाच्या नकाशावर राहणार नाही,” असे मत यावेळी खा. संजय राऊत यांनी व्यक्त केले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@