सहज विस्मरण झालेल्या कस्तुरबांची आठवण...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Apr-2019   
Total Views |

हे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे सार्ध शती वर्ष आहे. म्हणजे दीडशेवे जयंती वर्ष आहे तसेच ते कस्तुरबा गांधी यांचेही 150 वे जयंती वर्ष आहे. त्याचे मात्र आम्हा सर्वांनाच सहज विस्मरण (फार भीषण अवस्था ही) झाले आहे. गांधींच्या नावाने इतकी वर्षे सत्ता उपभोगणार्यांना आणि वेळी अडचणीच्या काळात स्त्रीशक्तीच्या आड दडणार्यांनाही कस्तुरबांची आठवण आली नाही, असा तिरकस आणि बोचरा सवाल अगदी नैसर्गिक सहजतेने आला, असे वाटण्याची शक्यता दाट आहे. सार्वजनिक प्रमादांच्या बाबत व्यवस्थेला लांछन लावण्याचा फारच सोपा मार्ग आम्ही नेहमीच पत्करत असतो. अशा प्रमादी व्यवस्थेचे आम्हीदेखील भाग आहोतच, याचा सोयिस्कर विसर आम्हाला नेहमीच पडत आला आहे. व्यवस्थेच्या पापांमध्येही आपला सहभाग आहे, याचे भान ठेवणे म्हणजेच गांधी कळणे आहे. ते त्यांचा वारसा मिरविणार्यांनाही कधी कळले नाही अन् या देशात गांधींचे आम्ही वारस नाही, असे कुणी म्हणू नये. त्यात कस्तुरबा या देशातील स्त्रियांच्या विवेकशील संघर्षाला आवश्यक असलेल्या मणक्यांच्या स्त्रिया घडविणार्यांपैकी एक होत्या. त्याबाबत त्यांचे स्थान वरचे आहे. महात्मा गांधींना राग आला की ते आपल्याच थोबाडीत मारून घेत, पण कस्तुरबांवर तशी वेळ कधीच आली नाही... आपल्याला राग येतो याची स्वत:ला शिक्षा करून घेणे किंवा मग एका गालावर मारली म्हणून दुसरा गाल समोर करणे, हीदेखील एक प्रतिक्रियाच आहे. ती आत्मिंहसाच आहे. आगीने जाळणे आणि बर्फाने पोळणे यात संवेदनांच्या पातळीवर वेगळेपण असले, तरीही त्याचा परिणाम अगदी सारखाच असतो...
कस्तुरबा शिकलेल्या नव्हत्या. म्हणजे क्रमिक अभ्यासक्रमांच्या शाळेत शिकण्याची औपचारिकता त्यांनी पार पाडली नव्हती. त्यांच्याकडे दाखवायला प्रमाणपत्री शहाणपण, साक्षरता नव्हती. मात्र, अनेक प्रसंगांत हे लक्षात येते की त्या क्षरहीनच होत्या. त्यांनी गांधी स्वीकारताना अंधपणे नाही स्वीकारला. त्या गांधींवर प्रेम करणार्या होत्या; पण त्यांच्या साक्षेपी टीकाकारही होत्या. आपले स्वत्व कायम ठेवत आपल्या सहचराच्या आयुष्यात, आरशात आलेल्या प्रतिमेइतक्याच नि:शब्द समर्पित भावानं मिसळून जाण्याचं सत्त्व बांमध्ये अगदी भावमयतेनं होतं. म्हणूनच जगाच्या या महात्म्याला सत्ता आणि प्रभावाच्या मत्तभावापासून दूर राहता आलं. महात्मा गांधींच्या आयुष्यावर प्रभाव टाकणार्या तीन स्त्रिया होत्या. त्यांची आई पुतळीबा, दाई रंभा आणि मग बा. हे बापूजींनीच लिहून ठेवले आहे. कस्तुरबांच्या मृत्यूनंतर लॉर्ड वेव्हेल आणि त्यांच्या श्रीमतींच्या सांत्वनपर पत्राला उत्तर देताना बापूजींनी लिहिले होते, ‘‘ती अतिशय तीव्र इच्छाशक्ती असणारी स्त्री होती. सुरुवातीला तिचा हा गुण मला आडमुठेपणाचा वाटला; परंतु तिच्या या तीव्र इच्छाशक्तीमुळेच ती अिंहसक असहकाराची कला शिकविणारी आणि ती अंमलात आणणारी माझी गुरू ठरली.’’
कुठल्याही व्यक्तीची सार्वजनिक जीवन आणि तिचे खासगी आयुष्य यात तफावत असते. सार्वजनिक आयुष्यातला मुखवटा आणि खासगीतले मूळ वेगळे असते. कस्तुरबांमुळे गांधींना त्यांच्यातली ही दांभिकता वेळोवेळी लक्षात आली. पती-पत्नीच्या नात्यात तो शरीराकडून आणि पुरुषी मानसिकतेच्या सत्तेकडून भावनेकडे आणि समर्पपणाकडे आणि ती गुलामगिरीच्या मानसिकतेवर समर्पणाची शाल पांघरली असते ती काढून प्रवास करते आणि मग ते ज्या बिंदूवर आणि समपातळीवर भेटतात ते खर्या अर्थाने त्यांचे मिलन असते. गांधी नावाच्या महात्म्याच्या आयुष्यात हे घडले त्याला कारण कस्तुरबा होत्या. त्यांनी गांधींवर डोळस माया केली. जे नाही पटले त्याला, ‘का?’ असा सवाल त्यांनी बापूंना वेळोवेळी केला अन् मग त्याचे नीट उत्तर मिळाल्यावरच त्याचा बांनी स्वीकार केला. वेळी आपले स्त्रीधन विकून त्यांनी गांधींच्या शिक्षणाचा खर्च केला. दक्षिण आफ्रिकेत असताना लॉरेन्स नावाच्या दलित-ख्रिश्चन कारकुनाचा शौचकूप साफ करण्याचे कामही बापूजी स्वत: करीत. एक दिवस ते काम कस्तुरबांच्या वाट्याला आले. आपल्या पत्नीने ते करावे, असे बापूजींना केवळ वाटत नव्हते, तर तो त्यांचा अट्टहास होता. बांनी त्याला कणखर नकार दिला. महात्मा गांधींनी बांना हात धरून दाराबाहेर केले आणि ‘‘घर सोडून जा,’’ अशी ताकीद दिली. त्या वेळी बांनी गांधींना योग्य शब्दांत समज दिली आणि मग गांधींनाही, आपण जुलमी सत्तेविरुद्ध लढणारे असतानाही घरात मात्र आपण तेच करतो आहोत, याची जाणीव झाली. दक्षिण आफ्रिका सोडताना करमचंद गांधींना अनेक मौल्यवान भेटवस्तू आल्या. सोन्या-चांदीचे दागिनेही होते. त्यावर आपला अधिकार नाही, त्याचा सार्वजनिक कोष तयार करावा, असे बापूंचे म्हणणे होते. तसा त्यांचा निर्णय होता. बांनी त्यालाही विरोध केला. वाद झाला. बा म्हणाल्या, ‘‘तुम्हाला आवडत नाही म्हणून मी कधीच दागिने घातले नाही अन् घालणारही नाही, मात्र माझ्या सुनांचे काय?’’ हरिलाल आणि मणिलाल वडिलांच्या बाजूने झाले. गांधीही म्हणाले, ‘‘मी इथे या लोकांची जी सेवा केली त्याचा हा भाग आहे.’’ कस्तुरबांनी नेमका प्रश्न विचारला, ‘‘तुमच्या या कामात मीही खपत होती. तुमच्या घरात मीही राबत होती. त्याची काय किंमत?’’ गांधींनी त्यानंतर हे मान्य केले की, पुरुष जे काय कमावतो त्यात त्याच्या स्त्रीचाही वाटा असतोच... अर्थात, त्या दागिन्यांचे गांधींच्या मनाप्रमाणेच झाले.
कस्तुरबांनी दक्षिण आफ्रिकेपासून तर अगदी भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातही महात्मा गांधींच्या बरोबरीने साथ दिली. दक्षिण आफ्रिकेतील भारतीय खाण कामगारांच्या लढ्यात त्यांनी कामगारांच्या स्त्रियांमध्ये जाणीवजागृती केली आणि त्यांनी त्या स्त्रियांना लढ्यात उतरविले. तिथल्या लढ्यात तुरुंगात जाणार्या त्या पहिल्या स्त्री आंदोलक होत्या! फिनिक्स वसाहतीचा लढा असो, भारतातील चंपारण सत्याग्रह असो, की मग 1922 ला महात्मा गांधींवर ब्रिटिश सरकारने देशद्रोहाचा खटला भरला त्या वेळी त्यांच्यामागे लढा सुरू ठेवणे असो, कस्तुरबांनी ते स्वत्वाने केले. दलित-ख्रिश्चन कारकुनाचा शौचकूप साफ करण्यावरून वाद घालणार्या बांनी कोचरब आश्रमात मात्र एका दलित मुलीला पोटच्या मुलीप्रमाणे जवळ केले. राजस्थानच्या ठाकुरांच्या जातीय विद्वेषाविरुद्धच्या आंदोलनात त्यांचाच पुढाकार होता. 1930 ला सहा आठवड्यांची सक्तमजुरीची शिक्षा झाल्यावरही त्या 1932 साली अस्पृश्यताविरोधी परिषदेत भाग घेत्या झाल्या.
मौनात काय ताकद असते, हे गांधींना बांमुळेच कळले. जीवनाला भिडणारी दुर्दम्य इच्छाशक्ती, करारी स्वभाव आणि उपजत देशी शहाणपण, यामुळे आपले स्त्रीसत्व कायम ठेवत एकजीनसी कसे व्हायचे, याचा मूर्तिमंत परिपाठच होत्या बा! गांधींवर झपाटल्यागत स्नेह करणार्या स्त्रियांचा स्नेह त्यांनी चळवळीची ऊर्जा म्हणून परावर्तित केला. मात्र, सरलादेवी चौधुरानी या 1919-20 च्या प्रकरणात गांधींनी सरलादेवींना, मला तुमच्यासोबत आध्यात्मिक मिलन व्हावे असे वाटते, अशा भावना लिहून कळविल्याची नोंद आहे. या प्रकरणातही बा अवाक्षरही बोलल्या नाहीत. त्या वेळी त्यांच्या मनात उपेक्षेच्या, डावललेपणाच्या भावना निर्माण झाल्याच नसतील असे नाही; पण त्यांनी समंजस विवेकाने मौनच पत्करले. दक्षिण आफ्रिकेत असताना गांधींनी 1906 साली एकतर्फी ब्रह्मचर्य स्वीकारले. आपल्या पत्नीशीही अशारीरी मैत्रभाव निर्माण व्हावा म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला. त्यावरही बा काहीच व्यक्त झाल्या नाहीत, मात्र त्यांनी गांधींच्या या व्रताला पाठिंबाच दिला. हरिलालच्या दुराव्यातही त्या होरपळल्या. एकदा कटनी स्टेशनवर गांधी आणि बांची ट्रेन थांबली असताना गर्दी जमली आणि गांधींच्या जयजयकाराच्या घोषणा सुरू झाल्या. तिथे अचानक हरिलाल आला. करपलेला, दाढी वाढलेला, होरपळलेला हरिलाल घोषणा देऊ लागला, ‘‘कस्तुरबा माता की जयऽऽऽ.’’ त्याने एक संत्र आणले होते ते बांना दिले. बापू म्हणाले, ‘‘मला नाही देणार का?’’ तर तो म्हणाला, ‘‘तुम्ही आज जे काय आहात ते माझ्या बांमुळेच...!’’
 
 
 
 
बा केवळ त्यांच्या चार अपत्यांची माता राहिल्या नाहीत. 40 कोटी जनतेच्या माता झाल्या होत्या. स्त्री ही जन्मत:च आई असते. त्यासाठी तिला जननी होण्याची गरज नसते, हे बांनी दाखवून दिले. बापूंचे 150 वे जयंती वर्ष साजरे केले याचा अर्थ ते बांचेही आहेच, असा लटका युक्तिवाद कुणी करेल. महान पुरुषांची पत्नी ही हिमालयाची सावली, वटवृक्षाची छाया वगैरे म्हणून दांभिक आदर दाखविला जातो. ती सावलीच का? तिला स्वत:चे असे अस्तित्व असतेच. ती कर्ती आणि करवितीही असते... तरीही बा या बिच्चार्या अजीबातच नव्हत्या. तसे त्यांना अनेकवार म्हणण्यात आले. एका महान पुरुषाचा तो छळ होता, असेही मत आहे. मात्र, त्यांना बाही कळल्या नाहीत आणि बापूही. बा आणि बापूंचे सहजीवन कळण्याइतके समजावून सांगण्यासाठी या स्तंभाची जागा नक्कीच अपुरी आहे. बांचे असे कृतघ्न विस्मरण म्हणूनच बोच लावून जाणारे आहे...
@@AUTHORINFO_V1@@