ही बेफिकिरी कशासाठी?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Apr-2019   
Total Views |




आधुनिक युगात प्रवास आणि दैनंदिन कार्य यात सुलभता यावी यासाठी दुचाकीचा वापर करणे निश्चितच अनिवार्य आहे. यात दुमत नाहीच. मात्र, दुचाकीचा वापर करत असताना बाळगली जाणारी कमालीची बेफिकिरी ही कायमच व्यक्ती, तिचे कुटुंब आणि समाज यांच्यासाठी वेदनादायी ठरत असते. आज या सर्व गोष्टींचा ऊहापोह करण्याचे कारण इतकेच की, नाशिक शहरात जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांत म्हणजेच केवळ ९० दिवसांत ३७ दुचाकीस्वारांचा मृत्यू झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. या ३७ पैकी ३४ दुचाकीस्वार हे केवळ हेल्मेट परिधान न केल्यामुळे मृत्युच्या कवेत ओढले गेले आहेत. नाशिक शहरात दुचाकींची संख्या लाखांच्या घरात आहे. तसेच, नाशिक शहरात प्रभावी अशी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची वानवा आहे. त्यामुळे खाजगी वाहतूक व्यवस्थेचा वापर करण्याशिवाय शहरवासीयांना पर्यायदेखील उरत नाही. मात्र, केवळ चमकोगिरी करण्यासाठी आणि एक विशिष्ट प्रकारचा बाळगलेल्या अभिनिवेशाची जपणूक करण्यासाठी काही दुचाकीस्वार हेल्मेटचा वापर न करता सर्रास दुचाकी उडवत (चालवत नाहीच) असल्याचे चित्र नाशिकसाठी तसे नवीन नाही. यात आघाडीवर असणाऱ्या तरुणवर्गाची ही बेफिकिरी त्यांना व त्यांच्या कुटुंबाला कायमच चिंतेच्या वर्तुळात नेत असते. शहरात दुचाकीस्वारांच्या अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्यांमध्ये १८ ते ४० या वयोगटातील तरुणांचा आकडा हा सुमारे ७० टक्क्यांच्या घरात आहे. या अपघातातील सुमारे ९० टक्के मृत्यू हे डोक्याला मार लागल्याने झाले आहेत. अपघातसमयी डोक्याला मार लागल्यास कायमचे अपंगत्व किंवा मृत्यू ओढवला जाऊ शकतो, याची संपूर्ण जाणीव असूनही नागरिक हेल्मेट वापरत नाही, ही मोठी शोकांतिका आहे. नाशिकमध्ये पोलीस प्रशासन, विविध सामाजिक संस्था या हेल्मेट जनजागृतीबाबत सातत्याने उपाययोजना करत असतात. मात्र, काही नागरिकांना त्याचे काही सोयरसुतक नाही, असेच या तीन महिन्यांतील अपघाताच्या प्रमाणावरून समजते. नाशिककर नागरिकांच्या मनी हेल्मेट हे अडचण नसून आपल्या सुरक्षेसाठी आहे, हे भाव आजमितीस जागृत होण्याची गरज आहे. तसेच, वृत्तपत्रात येणारे वृत्त आणि त्यातून केली जाणारी जनजागृती यांची सजगता नाशिककरांनी मनी जागृत करण्याची गरज आहे.

 

हेल्मेटसाठी ‘बीआयएस’ मानांकन

 

प्राणरक्षक हेल्मेटसाठी ‘आयएसआय’ मानांकन आजमितीस भारतात ग्राह्य धरले जाते. मात्र, अगदी मिक्सर, ग्राइंडर, ज्यूसर, इस्त्री अशा गृहोपयोगी वस्तूंसाठी ‘बीआयएस’ प्रमाणपत्र घेणे अनिवार्य आहे. मात्र, हे निकष हेल्मेटसाठी अद्याप तरी भारतात नाहीत. या सर्व पार्श्वभूमीवर आणि हेल्मेटचे मानवी जीवन रक्षणाकामी असणारे महत्त्व लक्षात घेऊन केंद्र सरकारतर्फे हेल्मेटलादेखील ‘बीआयएस’ मानांकन देण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे वृत्त आहे. हेल्मेटला ‘बीआयएस’ मानांकन देऊ केल्यास देशभरात विक्री होत असलेल्या हेल्मेटचा दर्जा आणि सुरक्षितता निर्धारित करणे सोयीचे ठरणार आहे. मागे काही हेल्मेट कंपन्यांनी दावा करताना असे म्हटले होते की, देशात दोन कोटी हेल्मेट विक्री होत असतात. मात्र, त्यातील सुमारे ७० टक्के हेल्मेट या छोट्या किंवा असंघटित क्षेत्रातील उद्योगामार्फत तयार करण्यात येत असतात. शास्त्रीय आणि दर्जेदार कच्चा माल न वापरता बनविलेले गेलेले हेल्मेट किती सुरक्षित आहेत, हा मोठा प्रश्नच या निमित्ताने पुढे येत आहे. ग्रामीण भागात काय किंवा अगदी शहरी भागातदेखील २०० ते ३०० रुपयांना रस्त्याच्या कडेला हेल्मेट विक्री होत असल्याचे चित्र सर्रास पाहावयास मिळत असते. या हेल्मेटला केवळ पोलीस दंड भरावा लागू नये म्हणून नागरिकही पसंती देत असतात. मात्र, जर हेल्मेटला बीआयएस मानांकन प्राप्त झाले तर, सुरक्षित हेल्मेट नागरिकांना सहज उपलब्ध होतील, यात शंका नाही. ‘बीआयएस’ मानांकन या नियमाची अंमलबजावणी १५ जानेवारीपासून करण्यात येणार होती. मात्र, त्यास १५ एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आणि आता ती मुदत १५ जुलैपर्यंत पुढे वाढविण्यात आली आहे. बीआयएस कायदा २०१६ अंतर्गत हेल्मेटच्या सुरक्षा निकषांबाबत केंद्र सरकारतर्फे २ ऑगस्ट, २०१८ ला हेल्मेट ऑर्डर या नावाने निवेदन देण्यात आले होते. यासंबंधी मसुदादेखील तयार करण्यात आला आहे. मात्र, तो मसुदा अद्याप संबंधितांच्या विचारविमर्शादाखल ठेवण्यात आलेला नाही. या सर्व पार्श्वभूमीवर हेल्मेट उत्पादक कंपन्या आपल्या क्षमतेनुसार नव्या नियमांची पूर्तता करणार असल्याचेदेखील वृत्त आहे. हेल्मेटला ‘बीआयएस’ कक्षेत आणल्यास भारतीय नक्कीच अजून सुरक्षित होण्यास मदत होईल, हे नक्की.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@