राष्ट्रवादी बलुचींचा पाकविरोधात संघर्ष तीव्र

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |



बलुचिस्तानला स्वातंत्र्य मिळावे यासाठीच्या सशस्त्र संघर्षाला मोठा इतिहास आहे. पण, दहशतवादी पाकिस्तानबरोबर साम्राज्यवादी चीनने ‘ना-पाक’ आघाडी केल्याने बलुच राष्ट्रवाद्यांच्या अस्तित्वावरच मोठे संकट निर्माण झाले आहे.


नैसर्गिक साधनसंपत्तीने समृद्ध असलेला बलुचिस्तान प्रांत मोहम्मद अली जिना यांनी धोका देऊन बळकावला. हा प्रांत क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा असला तरी, सर्वात कमी लोकसंख्येचादेखील आहे. परंतु, गेल्या जवळपास १५ वर्षांपासून पाकिस्तान सरकार आणि सैन्याने प्रायोजित केलेल्या भीषण दहशतवादाने बलुचिस्तान प्रांत ग्रासलेला असल्याचे दिसते. स्थानिक समुदायांना आपला प्रांत नैसर्गिक साधनसंपत्तीने समृद्ध असला तरी, कधी त्याचा फायदा झाला नाही. त्यामुळे तिथे बलुच राष्ट्रवादी आंदोलनानेही जोर पकडला. पाकिस्तानी सैन्य या कारणामुळे मात्र बलुच राष्ट्रवाद्यांशी शत्रुत्वाच्या भावनेतून व्यवहार करू लागले. वर्षानुवर्षांपासून बलुचिस्तानच्या सुई क्षेत्रातील नैसर्गिक वायूमुळे पाकिस्तानातील घरे, वीज संयंत्रे, कारखाने आणि अन्य प्रत्येक गोष्टीला इंधन पुरवले. परंतु, पाकिस्तान सरकारने त्याबदल्यात बलुचिस्तानकडे तुच्छपणे ‘आठाणे-बाराणे’ फेकले. २०१४ नंतर तर या क्षेत्रात साम्राज्यवादी चीनने आपले पाय पसरण्यास सुरुवात केली, ज्यामुळे बलुचिस्तानच्या सार्वभौमत्त्वावर गंभीर संकट निर्माण झाले. सध्याची घडी ही बलुच राष्ट्रवाद्यांसाठी जगण्या-मरण्याचा प्रश्न झाली असून १८ एप्रिलसारख्या घटना याच क्षोभ आणि रोषाची अभिव्यक्ती आहेत. गेल्याच आठवड्यात नव्याने घडलेल्या घटनाक्रमात दि. १८ एप्रिल रोजी बलुचिस्तान प्रांताच्या दुर्गम भागातील ओरमारा क्षेत्रात कराची ते ग्वादर प्रवास करणाऱ्या सैन्यदलांच्या कर्मचाऱ्यांवर दबा धरून बसलेल्यांनी हल्ला केला, ज्यात १४ जणांचा बळी गेला. मकरान सागरी मार्गावरून जाणाऱ्या बसला रोखले गेले आणि स्वयंचलित बंदुकांच्या फैरी झाडल्या गेल्या. मृतांमध्ये पाकिस्तानी नौदलाच्या नऊ, तटरक्षक दल आणि वायुसेनेच्या प्रत्येक एका अधिकाऱ्याचा समावेश आहे, तर उर्वरित तिघांची ओळख जाहीर केलेली नाही. सुरक्षादलांवर आक्रमण करणाऱ्या हल्लेखोरांनी निमलष्करी दलांचा गणवेश परिधान केला होता. ‘झिंक्वा’ या चिनी वृत्तसंस्थेनुसार बलुच राजी अजोई संगर नामक संघटनेने आपल्या अनधिकृत ट्विटर अकाऊंटवर हल्ल्याचा दावा करत अशाच प्रकारचे अजूनही हल्ले केले जातील, असा इशारा दिला.

 

हल्ल्याआधीच्या घटना

 

बलुचिस्तानात गेल्या आठवड्यात दोन दहशतवादी हल्ले झाले. क्वेट्टामध्ये अल्पसंख्याक हजारा समुदायाला लक्ष्य करणाऱ्या एका हल्ल्यात २० लोकांचा मृत्यू झाला, ज्यात ‘पाकिस्तानी सैन्य’ आणि ‘लष्कर-ए-झांगवी’ या मूलतत्त्ववादी संघटनेचा हात असल्याचे म्हटले जाते. दुसरीकडे चमन या ठिकाणी सुरक्षा दलांना निशाणा करत झालेल्या स्फोटात दोन नागरिकांचा मृत्यू, तर दहापेक्षा अधिक जखमी झाले. इथल्या हल्ल्यांची जबाबदारी ‘बलुच लिबरेशन टायगर्स’ने (बीएलटी) घेतली. ही इस्लामाबादविरोधातील एक सक्रिय बलुच राष्ट्रवादी संघटना आहे. मार्च महिन्यात बलुचिस्तानच्या डेरा बुगती भागातील एका गॅस पाईपलाईनवर झालेल्या बॉम्बस्फोटाची जबाबदारी याच संघटनेने घेतली होती. ही संघटना पाकिस्तानाच बलुच नागरिकांना समान अधिकार मिळावेत, यासाठी संघर्षरत आहे. उल्लेखनीय म्हणजे, फेब्रुवारी महिन्यात पाकिस्तानी सैन्यावर दोन मोठे हल्ले करण्यात आले. १७ फेब्रुवारीला बलुचिस्तानमध्ये तुर्बत आणि पंजगुरमधील चीन-पाकिस्तान आर्थिक मार्गिकेवर (सीपेक) पाकिस्तानी सैन्याच्या एका ताफ्यावर आत्मघाती हल्ला झाला, ज्यात किमान नऊ कर्मचारी ठार झाले, तर ११ जण जखमी झाले होते. हा हल्ला पुलवामातील दहशतवादी हल्ल्यानंतर काही दिवसांतच झाला, ज्यात एका आत्मघाती हल्लेखोराने स्फोटकांनी भरलेले वाहन सीआरपीएफच्या ताफ्यात घुसवले व ४०० पेक्षा अधिक सैनिकांना हौतात्म्य प्राप्त झाले. दरम्यान, पाकिस्तानी सैन्यावर झालेल्या हल्ल्याची जबाबदारी बलुच राजी अजोई संगर (बीआरएएस) या गटाने घेतली होती. या घटनेच्या सहा दिवसांनंतरच २३ फेब्रुवारीला बलुचिस्तानच्या डेरा बुगती जिल्ह्यात सैन्याच्या ताफ्यावर हल्ला झाला, ज्यात किमान सहा पाकिस्तानी सैनिकांवर मरण ओढवले. प्रसारमाध्यमांतील वृत्तानुसार बलुच रिपब्लिकन आर्मीने या हल्ल्याची जबाबदारी घेतली होती. उल्लेखनीय म्हणजे, बीआरएएसची बलुच लिबरेशन आर्मी, बलुचिस्तान लिबरेशन फ्रंट आणि बलुच रिपब्लिकन गार्ड या बलुच स्वातंत्र्याच्या समर्थक तिन्ही संघटनांबरोबर आघाडी आहे.

 

इराणची चाल

 

दहशतवादाची निर्यात करणारा पाकिस्तान आपल्या इथे होणाऱ्या अशा घटनांचे खापर शेजारी देशांवर फोडताना नेहमीच दिसतो. १८ एप्रिलला झालेल्या हल्ल्यालाही पाकिस्तानने इराणलाच जबाबदार धरले. पाकिस्तानने या हत्याकांडात सहभागी असलेल्या आणि ज्यांना इराणचा पाठिंबा असल्याचे म्हटले जाते, त्या दहशतवाद्यांविरोधात कारवाईची मागणी करणारे एक पत्र पाठवले. पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयानुसार, बलुच राष्ट्रवादी समूहांशी संबंधित दहशतवादी इराणच्या सीमावर्ती भागात काम करत असून त्यांच्याविरोधात कारवाई करावी, असे पाकिस्तानने म्हटले आहे. दरम्यान, ही हिंसक घटना पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान आपल्या पहिल्याच इराण दौऱ्यावर जाण्याआधीच घडली. तथापि, इराणचे परराष्ट्रमंत्री जवाद जरीफ या हल्ल्याबाबत म्हणाले की, “आम्ही या घटनेचा निषेध करतो तसेच पाकिस्तान व इराणदरम्यान संबंध सुरळीत होऊ नये, अशी मनिषा बाळगणारेच या घटनेला जबाबदार आहेत.” परंतु, पाकिस्तान इराणच्या भूमीत दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देत आल्याचे तथ्य सर्वांनाच माहिती आहे, हेही इथे लक्षात घ्यायला हवे. गेल्याच महिन्यात इराणचे राष्ट्रपती हसन रुहानी यांनी दहशतवादाविरोधातील भारताच्या भूमिकेचे समर्थन केले होते. सोबतच सीमेपलीकडून दहशतवाद्यांना पुरवल्या जाणाऱ्या आर्थिक रसदीचे पाक-आधारित स्रोत आणि प्रायोजक कोण आहेत, हेही लपून राहिलेले नाही. शिवाय दहशतवाद्यांविरोधातील पाकिस्तानची निष्क्रियता आणि त्या देशातून सातत्याने होत असलेल्या दहशतवादी कारवायांमुळे इराण-पाकिस्तान संबंध दुबळे होऊ शकतील, असा इशाराही दिला होता. दुसरीकडे इराणच्या ‘रिव्हॉल्युशनरी गार्ड्स’नेदेखील पाकिस्तानातून कार्यरत असलेल्या दहशतवादी अड्ड्यांवर कारवाई करण्यात पाक सैन्य आणि आयएसआय अपयशी ठरले तर आम्ही थेट हल्ला करू, असा इशारा दिला होता. ‘रिव्हॉल्युशनरी गार्ड्स’ने या दहशतवाद्यांना पाक-प्रायोजित दहशतवादी असे जाहीर केले आहे. ‘रिव्हॉल्युशनरी गार्ड्स’च्या ‘कुर्द्स फोर्स’नामक एका विशिष्ट युनिटचे प्रमुख असलेल्या कासिम सोलेमानी यांनी हा इशारा दिला आहे. उल्लेखनीय म्हणजे, इराक आणि सीरियामध्ये ‘इसिस’विरोधातील लढ्यामध्ये कुर्द्स फोर्स सर्वात पुढे आहे. बलुचिस्तानला स्वातंत्र्य मिळावे यासाठीच्या सशस्त्र संघर्षाला मोठा इतिहास आहे. अब्दुल करीम आगा खान यांच्यापासून नवाब अकबर खान बुगती यांच्यापर्यंत या संघर्षाच्या नायकांनी आपली महत्त्वपूर्ण भूमिका त्यात वठवली. त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे बलुचिस्तानचे सातत्याने होत आलेले शोषण आणि उत्पीडन! बलुचिस्तानची परिस्थिती सध्या अत्यंत चिंताजनक आहे. २०१७च्या एका अध्ययनानुसार, इथल्या ९० टक्के वस्त्यांमध्ये पिण्याचे शुद्ध-स्वच्छ पाणीदेखील नाही. सोबतच येथील लोकांचे सरासरी उत्पन्न राष्ट्रीय उत्पन्नापेक्षाही कमी आहे. मूलभूत सुविधांच्या अभावात जगणाऱ्या या लोकांचा आपल्या प्रदेशातील नैसर्गिक साधनसंपत्तीवर कोणताही अधिकार नाही. आता तर या अधिकारावर घाला घालण्यासाठी दहशतवादी पाकिस्तानबरोबर साम्राज्यवादी चीनने ‘ना-पाक’ आघाडी केली आहे. हे बलुच राष्ट्रवाद्यांच्या अस्तित्वावरचे मोठे संकट आहे.

 

२०००च्या दशकाच्या प्रारंभीच राष्ट्रवाद्यांच्या छोट्या छोट्या गटांनी सुरक्षादलांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली, तेव्हाच या संघर्षाची सुरुवात झाली. नवाब अकबर बुगती सुरक्षादलांबरोबरील धुमश्चक्रीत ठार झाल्यानंतर मात्र या संघर्षाला जास्तच धार आली. बलुचिस्तानमध्येच ग्वादर बंदरदेखील आहे, जे एका चिनी ऑपरेटरकडून चालवले जाते. बलुचिस्तानमध्ये ‘सीपेक’ आणि ‘ओबोर’ची उपस्थितीही जास्तच मजबूत होताना दिसत आहे. फुटीरतावाद्यांनी मात्र विविध प्रकल्पांवर, योजनांवर काम करणाऱ्या चिनी अभियंत्यांवर निशाणा साधला आहे. सोबतच मागच्या वर्षीही कराचीतील चिनी साम्राज्यवादाचे प्रतीक असलेल्या चिनी वाणिज्य दूतावासावर त्यांनी हल्ला केला होता. सुरक्षादले मात्र राष्ट्रवाद्यांची हत्या करून त्यांची प्रेते नेहमीच जमिनीत गाडून टाकत आले. कित्येक वर्षांपासून बेपत्ता असलेल्या बलुच कार्यकर्त्यांची प्रेते प्रांतातील विविध भागांत पाहायला मिळाली. परकीय हस्तक्षेप, वनवासी म्होरक्यांचे उत्पीडन आणि धामिक कट्टरतावाद्यांच्या उपस्थितीने मात्र या समस्येला अधिकच जटिल केले आहे. दहशतवाद्यांचे कारखाने चालवलेल्या पाकिस्तानची साम्राज्यवादी चीनबरोबरील कुत्सित आघाडी त्याला सातत्याने अडचणींच्या गर्तेत ढकलत आहे. पाकिस्तान चीनच्या कर्जाच्या जाळ्यात दिवसेंदिवस इतका अडकत चालला आहे की, भविष्यात त्याच्याजवळ आपले सार्वभौमत्व गमावण्याखेरीज अन्य कोणताही पर्याय राहणार नाही. अशा स्थितीमध्ये बलुच राष्ट्रवाद्यांच्या आपल्या हितांसाठीच्या लढ्याने अधिकच तीव्र रूप धारण केले, तर आश्चर्य वाटणार नाही. 

(अनुवाद : महेश पुराणिक)

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@