ज्ञान नव्हे सद्गुरुविण...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Apr-2019
Total Views |



आजच्या काळातील वैचारिक चश्म्यातून आपण सतराव्या शतकातील माणसांची मानसिकता अजमावू लागलो, तर अनर्थ ओढवेल, हे माहीत असूनही आजचे टीकाकार समर्थांवर अकारण टीका करताना दिसतात. आजचा वाचकवर्ग हा सूज्ञ आहे. त्यामुळे समर्थांवरील टीकेतील कालविपर्यास हे वाचक ओळखतात.


समर्थांनी तीर्थाटनाच्या काळात पाहिले होते की, राजकीय क्षेत्राबरोबर सर्व हिंदुस्थानात धार्मिक आणि आध्यात्मिक क्षेत्रातही अराजकता निर्माण झालेली होती. कोणी कोणाला विचारत नव्हते. सामान्य माणसांची स्थिती चिंताजनक होती. राज्य तर म्लेंच्छांच्या हाती गेले होतेच. पण, धार्मिक क्षेत्रातही कोणाला ‘गुरू’ म्हणावे हे कळत नसल्याने लोक परधर्मात गुरू शोधू लागले. परधर्मीयांना ‘गुरू’ मानण्यापर्यंत लोकांची मजल गेली. अनेकांनी स्वतःच्या स्वार्थासाठी म्लेंच्छ गुरूंचे शिष्यत्व पत्करले होते. धार्मिक अधोगतीला हा काळ समर्थांना पाहवत नव्हता. म्लेंच्छांचे गुरुत्व मान्य करणाऱ्या या बावळट हिंदूंना रोखले पाहिजे, असा विचार करून समर्थांची जुन्या दासबोधातील ‘गुरूलक्षण’ समास पुन्हा नव्या दासबोधात सविस्तरपणे मांडला आहे. तथापि ‘गुरूलक्षण’ सांगण्यापूर्वी समर्थांनी त्या अगोदर ‘गुरूनिश्चय’ (५.१) हा समास लिहिला. या समासात तत्कालीन लोकांची धर्मविषयक तसेच धर्माचार्यांविषयीची मानसिकता समर्थांनी स्पष्ट शब्दांत मांडली आहे. समर्थांचा काळ हा सतराव्या शतकातील आहे. आजच्या एकविसाव्या शतकातील विचार आणि कल्पना त्या काळातील समाजाकडून अपेक्षित नाहीत. आजच्या काळातील वैचारिक चश्म्यातून आपण सतराव्या शतकातील माणसांची मानसिकता अजमावू लागलो, तर अनर्थ ओढवेल, हे माहीत असूनही आजचे टीकाकार समर्थांवर अकारण टीका करताना दिसतात. आजचा वाचकवर्ग हा सूज्ञ आहे. त्यामुळे समर्थांवरील टीकेतील कालविपर्यास हे वाचक ओळखतात.

 

आजचे युग हे विज्ञानयुग आहे, बुद्धिप्रामाण्याचे युग आहे. आज प्रत्येकजण आपापल्या बौद्धिक कुवतीनुसार स्वतंत्रपणे विचार करून आपले मत ठरवतो. या युगात धार्मिकतेपेक्षा राजकारणाला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. राजकारणातील पुरुषांना आज महत्त्वाचे स्थान आहे. सध्या तर निवडणुकांची रणधुमाळी चालू आहे. त्यामुळे सर्व समाजघटक (युवा, तरुण, गृहस्थ, ज्येष्ठ वगैरे) ‘राजकारण’ या विषयावर बोलत आहेत. राजकीय नेत्यांना, त्यांच्या सभांना, भाषणांना महत्त्व आले आहे. परंतु, समर्थ रामदास ज्या काळात वावरले, त्या सतराव्या शतकातील सामान्य माणसे प्रामुख्याने ‘धर्मप्रधान’ होती. त्याकाळी धर्मप्रधान आचार्यांना समाजात मान होता. त्याकाळी परंपरा सांभाळण्याला महत्त्व होते. लोक धार्मिक पूजाअर्चा, व्रत-वैकल्ये निष्ठेने करीत असत. बहुजन समाज श्रद्धावान होता. त्यामुळे धर्माचार्यांना समाजात मानाचे स्थान होते. त्याकाळच्या ब्राह्मणवर्गाला धार्मिक आचाराचे काम नेमून दिले होते. बहुजन समाजाच्या वैयक्तिक जीवनातील धर्मपरंपरेत व सामाजिक किंवा सार्वजनिक धार्मिक समारंभात अर्थातच धर्माचार्य म्हणून ब्राह्मणाला एक वेगळे स्थान होते. त्यामुळे तत्कालीन समाजाची ब्राह्मणांविषयी मानसिकता मोठ्या विचित्र अवस्थेतून जात होती. समर्थ रामदासांनी तत्कालीन समाजाचे ब्राह्मणांविषयीचे समज दासबोधातून (द. ५ स. १) दाखवून दिले आहेत. त्या काळच्या समाजाची मानसिकता कशी होती, पाहा -

 

) सकळांसि पूज्य ब्राह्मण ।

हे मुख्य वेदाज्ञा प्रमाण ।

 

) लक्षभोजनीं पूज्य ब्राह्मण ।

आन यातिसी पुसे कोण ।

 

) गुरू तो सकळासि ब्राह्मण ।

जऱ्ही तो जाला क्रियाहीन ।

 

) जरी ब्राह्मण मूढमती ।

तरी तो जगद्वंद्य ।

 

अशा रीतीने तत्कालीन समाज ब्राह्मणांना किती महत्त्व देत होता, हे दाखवण्यासाठी समर्थांनी ‘गुरूनिश्चय’ समासात ही विधाने केली आहेत. टीकाकार ही मते समर्थांची आहेत, असे मानून त्यांच्यावर ब्राह्मणप्रशस्तीचा आरोप लावतात. पण, समर्थांनी ब्राह्मणांचा उदो उदो केलेला नाही. वरील मते समर्थांची आहेत का, ते तपासून पाहता येते. समर्थ हे बुद्धिवादी संत होते. समर्थांनी आळसाचा तिटकारा जागोजागी सांगितला आहे. त्यांनी जी चार मूलभूत तत्त्वे सांगितली ती अशी- हरिकथा निरूपण, राजकारण, सावधपणा आणि साक्षेप (सततोद्योगी). समर्थांनी साक्षेपाला महत्त्व दिले आहे. तेव्हा असे हे रामदासस्वामी, क्रियाहीन ब्राह्मणाला शरण जावे किंवा ब्राह्मण मूढमती (मूर्ख) असला तरी तो जगाला वंदनीय आहे, असे म्हणतीलच कसे? ते त्यांच्या स्वभावधर्मात बसत नाही. तरीही ब्राह्मणांविषयीच्या वरील विधानांच्या आधारे, ‘रामदासांना वर्णाश्रमभेद व त्यातील ब्राह्मणवर्चस्व टिकवून धरायचे होते,’ अशी टीका मोठमोठ्या विद्वानांनी सातत्याने केली आहे. त्या टीकेला फारसा अर्थ नसल्याचे वरील विवेचनावरून जाणवेल. ‘ब्राह्मण रक्षावे आदरे’ असे स्वामी दासबोध ४.२.२० या ओवीत म्हणाले खरे, पण त्यातील ‘ब्राह्मण’ शब्दाचा अर्थ ‘सज्जनांच्या ठिकाणी असणारा सद्गुणांचा समुच्चय’ असा आहे. हे भगवद्गीतेवरील १८.४२ या श्लोकाच्या आधारे मागील एका लेखात आपण पाहिले आहे. त्याची पुनरुक्ती टाळून एवढेच सांगतो की, ‘ब्राह्मण्य’ आणि ‘ब्राह्मण’ यांचा थेट संबंध नाही.

 

तत्कालीन समाजात ब्राह्मणांविषयी ज्या कल्पना दृढ होत्या, त्या या समाजात मांडण्यात समर्थांचा उद्देश असा होता की, ब्राह्मण गुरूंप्रमाणे पूज्य असेलही, पण तो खरे ज्ञान देऊ शकणार नाही. खरे ज्ञान सद्गुरूंशिवाय प्राप्त होणार नाही. दासबोध द. ५ स. १ मधील २०व्या ओवीत समर्थ हे स्पष्ट करतात.

 

स्वधर्मकर्मी पूज्य ब्राह्मण ।

परी ज्ञान नव्हे सद्गुरूविण ।

ब्रह्मज्ञान नस्तां सीण ।

जन्ममृत्य चुकेना ॥ (५.१.२०)

 

सद्गुरूंचे महत्त्व सांगण्यासाठी अगोदरच्या ओव्यांतून ब्राह्मणांविषयी विधाने आलेली आहेत. ब्राह्मणांकडून धार्मिक कृत्ये करून घेताना त्याचा आदर करावा हे ठीक आहे. परंतु, आत्मज्ञान हे अतींद्रिय असल्याने ते सद्गुरूवाचून प्राप्त होणार नाही. ब्राह्मण चांगला हे गृहीत धरले तरी, तो देहबुद्धीत वावरणारा सामान्य, स्वार्थी माणूस आहे. त्याला ब्रह्मस्वरूपाचे ज्ञान असेलच असे नाही. फक्त ब्रह्मज्ञानी पुरुषच म्हणजे सद्गुरूच आपल्याला ब्रह्मस्वरूपापर्यंत नेऊ शकतात, असे समर्थांचे म्हणणे आहे. या समासात समर्थ पुढे सांगतात की, सद्गुरूंचे मार्गदर्शन नसल्यामुळे ही अज्ञानी माणसे हलक्या दर्जाची, मामुली साधने करण्यात वेळ आणि श्रम वाया घालवतात. त्या साधनात स्वामींनी कार्तिक स्नान, माघस्नान, व्रते, उद्यापने यांचा उल्लेख केला आहे. काही लोक अतिशय कठीण अशा तीर्थयात्रा करतात. तांब्याच्या पत्र्यावर लिहिलेले यंत्र, आकृती यांची पूजा करतात. कोणी गोपीचंदनाचे टिळे लावून गळ्यात वेगवेगळ्या माळा घालतात. काही लोक नुसत्या घंटा वाजवत बसतात, देवाची स्तुती स्तोत्रे म्हणतात. काही लोक आसने, मुद्रा, ध्यान लावून बसतात, तर काही नुसतेच प्रदक्षिणा घालतात. पण, हे करून काही परमार्थ घडत नाही. ही कर्मे धर्माच्या दृष्टीने पुण्यकर्मे म्हणता येतील. पण, ते सर्व आसक्ती वाढवणारी असल्याने अध्यात्मदृष्ट्या निष्फळ होत. अशा कृत्यांनी माणूस परमेश्वराला प्रपंचातील वस्तू मिळवण्याचे एक साधन असे समजतो. सद्गुरूकृपेशिवाय आत्मज्ञान होत नाही, स्वहीत साधता येत नाही. (सद्गुरूकृपेविरहीत । सर्वथा न घडे स्वहित ।)मानवी जीवन हे ज्ञानाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही, अशी ज्ञानाची महती समर्थांनी सांगितलेली आहे. प्रापंचिक ज्ञान असो वा पारमार्थिक आत्मज्ञान असो, ज्ञानाच्या प्राप्तीशिवाय चांगले जीवन जगता येत नाही. यासाठी माणसाच्या ठिकाणी ज्ञानाची लालसा आणि उपासना असली पाहिजे. सद्गुरू ती ज्ञानाची लालसा पुरवतात. त्याशिवाय माणसाची तळमळ, अस्वस्थता जात नाही.

 

सद्गुरूविण जन्म निर्फळ ।

सद्गुरूविण दुःख सकळ ।

सद्गुरूविण तळमळ ।

जाणार नाही ॥ (५.१.३९)

 

तत्कालीन अज्ञानी भरकटलेल्या समाजाला म्लेंच्छ गुरूंपासून सोडवण्यासाठी समर्थांनी ‘गुरूनिश्चय’ किती महत्त्वाचा आहे, ते या समासात सांगितले आहे. म्लेंच्छ गुरू केल्यास म्लेंच्छांशी संगत करावी लागेल, तो सत्संग होणार नाही. सद्गुरूंशिवाय सत्संगाचे महत्त्व समजून येत नाही.

 

जयास वाटे देव पाहावा ।

तेणे सत्संग धरावा ।

सत्संगेविण देवाधिदेवा ।

पाविजेत नाही ॥ (५.१.२३)

 

- सुरेश जाखडी

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@