प्रकाशवाटेवरील प्रेमळ पांथेय

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Apr-2019
Total Views |



सद्गुरूंचे चरण घट्ट धरून ठेवले की, भवसागरात बुडण्याचं भय संपून जातं. एक अलौकिक, आगळी, अध्यात्म्याची प्रकाशवाट गवसते. तिथे अशांतता, अस्वस्थता याला कणभरही जागा नसते. असीम शांतता, अफाट ज्ञान, अंतिम समाधान, अचाट परमार्थशक्ती यांसह अध्यात्माचं सारं जीवन ओंजळीत घेता येतं. माझी लेखणी चालवणारे सद्गुरू आहेत. या पाच वर्षांच्या स्तंभलेखनात सगळं कर्तृत्त्व सद्गुरूचं आहे.


पाच वर्षांपासून स्तंभाद्वारे मी आपल्याशी संवाद साधते आहे. वाचक आणि लेखकाचे एक छान नाते जुळले आहे. सलग पाच वर्षे मी विविध संत, सण, संस्कृती यांची गुंफण अध्यात्म्याच्या व संत वाङ्मयाच्या आधारे करत गेले. वेळोवेळी वाचकांनी माझ्या लेखनाला भरभरून प्रतिसाद दिला. सगळ्या दूरवरच्या छोट्या गावांपासून ते मोठ्या शहरांपर्यंत वाचक लेख आवडल्याचे आवर्जून कळवतात. कोणी माझ्या लेखांचं संकलन केलं, तर कोणी संस्थांमधून, मंडळांमधून जाहीर वाचन करत असल्याचं सांगितलं. अध्यात्माची पाऊलवाट प्रकाशवाट होऊन गेल्याचं मनःपूर्वक कथन करणारे मधुरध्वनी येत गेले. त्यामुळे माझ्या लेखणीला आनंदाचे धुमारे फुटले. आपल्या प्रेमाने मी भारावले. संत सकल समाजावर प्रेम करतात आणि करायला सांगतात. निःस्वार्थ प्रेमाची जातकुळीच वेगळी! संतांचे निरोप, त्यांचा उपदेश समाजाला उपकारक व हितकारक ठरणारा आहे. धर्मग्रंथ, भगवंत, संत यांच्यामधून एक नितांत नितळ असा भक्तीचा झरा अखंड झुळझुळत राहतो. जगण्याला नवे आयाम, नवे रंग देणारा हा भक्तीचा भावपूर्ण झरा समाजमनामधून सदैव वाहत जावा, या प्रांजळ हेतूनेच संत झटतात. युग कोणतेही असो, ते न थकता, न कंटाळता समाजहितासाठी कष्ट घेतात. कलियुग तर सगळ्या युगांमध्ये अस्थिर, अशांत, अस्वस्थ करणारं युग आहे. या कलियुगामध्ये नराचा नारायण होण्यासाठी नामसाधना, दत्तभक्ती लाभदायक ठरते. भगवंताचे, संतांचे प्रकट होणे अत्यंत गरजेचे आहे. नरदेह दुर्लभ असून त्यामध्ये भगवंताची भक्ती, परमार्थ साधणं हे अधिक अवघड आहे. परमात्मा परमेश्वराची प्राप्ती होण्यासाठी पापाचा लय आणि पुण्याचा संचय यांची आवश्यकता आहे. उपासना, पारायणं, ध्यान, जप सातत्याने करण्यासाठी प्रेमळपणाने प्रोत्साहन देणारे संत, सद्गुरू मातेप्रमाणे माया करतात. सद्गुणांचा अंगीकार करून निर्मळ चित्त करण्यासाठी धर्मग्रंथाची, भक्तीच्या संस्कारांची पेरणी करतात. मायेच्या पलीकडे पोहोचलेल्या, मायेच्या गुंत्यात गुंतलेल्यांना लिलया बाहेर काढतात. त्यांचं कौशल्य थक्क करणारं आहे.

 

परमार्थामध्ये ‘पाच’ या आकड्याला महत्त्व आहे. परमार्थाच्या पाऊलवाटेवर ‘पाचां’चा मेळ आणि खेळ अव्याहतपणे चालू असतो. सकल सृष्टी ही पंचमहाभूतांनी बनलेली आहे. आपला देहदेखील पंचमहाभूतांनी तयार झालेला आहे. पृथ्वी, आप, तेज, वायु, आकाश ही पंचमहाभूते एकमेकांशी सख्यत्त्वाने नांदतात. परंतु, या पंचभूतांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली, तर पाचावर धारण बसते. त्यांचा समतोल बिघडला की, मानवाचं स्वास्थ बिघडतं. प्रत्येक भूत हे महत्त्वपूर्ण आहे. देहामधील ‘पंचप्राण’ खूप महत्त्वाची भूमिका वठवतात. पाच वायू देहामध्ये खेळतात, तोपर्यंतच जीवनाचा खेळ रंगतो. पंचप्राणाचं पाखरू उडून गेलं, तर मानवी देह क्षणात निष्प्राण होतो. त्याला काहीही किंमत उरत नाही. ही सगळी ’पाचां’ची किमया आहे. ‘अंतःकरणपंचक’ यामध्येदेखील पाच तत्त्वच आहे. हे शुद्ध, निर्मळ करण्यासाठी अखंड साधना करणं गरजेचं आहे. शुद्धतेशिवाय शुद्ध परमात्म्याचे आकलन होणं, त्याचा बोध होणं शक्य नाही. पाच तत्त्वाच्या, पंचप्राणाच्या, पंचारतीने आत्मारामाला ओवाळून आर्ततेनं आरती केली की तो प्रसन्न होतो. ब्रह्मांड-सृष्टीची रचना कळली की जगणं, वागणं जमून जातं. परमात्मा खेळ खेळतो. त्याला एकट्याला कंटाळा आला म्हणून त्यानं चौऱ्यांशी लक्ष योनी निर्माण केल्या. त्यामध्ये परमात्म्याला साद घालून संवाद साधणारी एकच योनी, ती म्हणजे मानवयोनी. त्याला विशेष बुद्धी, मन देऊन त्यानं संपूर्ण विश्वामध्ये भरलेल्या परमात्म्याला शोधून काढावं, यामध्ये त्याच्या नरदेहाचं सार्थक आहे. परमात्म्याची प्राप्ती होण्यासाठी कर्म, भक्ती, ज्ञान या मार्गावरून संत, सद्गुरूंच बोट धरून चालत जायचं. धर्मग्रंथांमध्ये अध्यात्म्याचे गूढ रहस्य उकलून सांगितलेले असते. ग्रंथ, संत यांची सुसंगती घडली, तर परमार्थ साध्य करून घेता येतो. गीता, ज्ञानेश्वरी, गाथा, दासबोध असे अलौकिक धर्मग्रंथ आपल्याला अज्ञानाच्या अंधःकारातून बाहेर येण्यास साहाय्य करतात. सद्गुरूंची प्राप्ती मग अनुग्रहप्राप्ती आणि शेवटी कृपाप्राप्ती होण्यासाठी सद्गुरूंची सेवा कशी करावी ते कथन करणारा ‘श्रीगुरुचरित्र’ ग्रंथ आहे. सद्गुरूंच्या सेवेमुळे त्यांच्या कृपेच्या शीतल छायेत राहून अध्यात्मज्ञान प्राप्त होते. परमार्थाची वाट कळली तरी वळत नाही. कारण, या वाटेवर अवघड वळणं खूप आहेत. ही बिकट वाट सद्गुरूंशिवाय कोण पार करू शकेल? या वाटेवर षड्रिपूंची हिंस्त्र श्वापदे दबा धरून बसलेली असतात. त्यांना नष्ट करण्यासाठी सद्गुरूंची कृपा हवीच.

 

सद्गुरू अशक्य ते शक्य करतात. पापांचे डोंगर भुईसपाट करतात. अशुद्ध ते शुद्ध करतात. अमंगल गोष्टी मंगल करतात. अज्ञानाला दूर करून ज्ञानप्राप्ती करून देतात. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात-

 

सद्गुरू वाचोनि सापडेना सोय।

धरावे ते पाय आधी आधी॥

 

सद्गुरूंचे चरण घट्ट धरून ठेवले की, भवसागरात बुडण्याचं भय संपून जातं. एक अलौकिक, आगळी, अध्यात्म्याची प्रकाशवाट गवसते. तिथे अशांतता, अस्वस्थता याला कणभरही जागा नसते. असीम शांतता, अफाट ज्ञान, अंतिम समाधान, अचाट परमार्थशक्ती यांसह अध्यात्माचं सारं जीवन ओंजळीत घेता येतं. माझी लेखणी चालवणारे सद्गुरू आहेत. या पाच वर्षांच्या स्तंभलेखनात सगळं कर्तृत्त्व सद्गुरूचं आहे. त्यांच्या कृपेच्या सुगंधात सचैल स्नान घडलं. वाचक हो, आता निरोपाची वेळ आली आहे. पुनश्च एकवार मनःपूर्वक धन्यवाद देऊन लेखणीला विराम देते.

 

- कौमुदी गोडबोले

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@