विरोधकांची पराभवाच्या भीतीपोटी आदळआपट!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Apr-2019   
Total Views |


 

 

भाजपला पुन्हा निवडून दिल्यास लोकशाही धोक्यात येईल, देशाची घटना धोक्यात येईल अशाप्रकारचे तेच ते आरोप विरोधकांकडून उगाळले जात आहेत. असे आरोप करून मतदारांच्या मनात भ्रम निर्माण प्रयत्न केले जात आहेत. दोन टप्पे पार पडले तरी विरोधकांचे ऐक्य होताना दिसत नाही. असे असताना आम्हाला बहुमत मिळेल, अशा बाता ही विरोधी मंडळी कशाच्या जीवावर मारीत आहेत?


लोकसभा निवडणुकांचे दोन टप्पे पार पडले असून तिसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान होत आहे. तिसऱ्या टप्प्यासाठी मतदान होत असताना भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीने प्रचारात जोरदार आघाडी घेतल्याचे दिसून येत असतानाच विरोधकांच्या हाती पंतप्रधान मोदी यांच्यावर खोटे आरोप करण्यापलीकडे काहीच राहिले नसल्याचे दिसून येत आहे. भाजपला पुन्हा निवडून दिल्यास लोकशाही धोक्यात येईल, देशाची घटना धोक्यात येईल अशाप्रकारचे तेच ते आरोप उगाळले जात आहेत. असे आरोप करून मतदारांच्या मनात भ्रम निर्माण प्रयत्न केले जात आहेत. दोन टप्पे पार पडले तरी विरोधकांचे ऐक्य होताना दिसत नाही. असे असताना आम्हाला बहुमत मिळेल, अशा बाता ही विरोधी मंडळी कशाच्या जीवावर मारीत आहेत? लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यात १३ राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशातील मिळून लोकसभेच्या ११७ जागांसाठी मतदान होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या सुरक्षेसंदर्भात काही वक्तव्य केले किंवा सेना दलाने यशस्वीपणे पार पाडलेल्या मोहिमा यांच्याविषयी जनतेला माहिती दिली, तर लगेच देशातील समस्त विरोधकांच्या पोटात दुखायला लागते. पंतप्रधान हे देशाचे नेतृत्व करीत असतात, याचा विसर त्यांना पडतो. पंतप्रधान या नात्याने जे निर्णय घेण्यात आलेले असतात, त्याचे थोडेसेही श्रेय नरेंद्र मोदी यांना देण्याची त्यांची तयारी नसते. बांगलादेशच्या युद्धानंतर झालेल्या निवडणुकांमध्ये इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वामुळे देशाला विजय मिळाला, असा प्रचार करून त्या विजयाचे भांडवल काँग्रेसकडून करण्यात आले. पण, त्याबद्दल विरोधकांनी आक्षेप घेतल्याचे दिसून आले नाही. पण, ‘सर्जिकल स्ट्राईक’ किंवा अन्य कोणत्याही लष्करी मोहिमेविषयी मोदी यांनी काही वक्तव्य केले की, लगेच विरोधकांची कोल्हेकुई सुरू होते. या लष्करी मोहिमांचे श्रेय आपल्याकडे घेण्याचा पंतप्रधानांचा हेतू नसतो किंवा सेना दलांना दुय्यम लेखण्याचा त्यांचा हेतू नसतो. पण देशाचे नेतृत्व करणारा पंतप्रधान कणखर असेल, योग्यवेळी योग्य ते निर्णय घेण्याची क्षमता त्याच्यात असेल तरच देश खंबीरपणे कोणत्याही आव्हानांना तोंड देऊ शकतो, हे विरोधकांना काय सांगायला हवे?

 

देशाच्या सुरक्षेबाबत उचललेल्या पावलांची माहिती पंतप्रधानांनी दिली की लगेच, पंतप्रधान सेना दलाला त्याचे श्रेय न देता ते स्वत:कडे घेण्याचा प्रयत्न करीत असल्याचा कांगावा करायचा. याला काय म्हणायचे? विंग कमांडर अभिनंदन वर्धमान याला न सोडल्यास होणाऱ्या गंभीर परिणामांना तोंड देण्यास तयार राहा, असा कडक इशारा पाकिस्तानला देण्यात आल्यानंतर पाकिस्तानने त्यांची सुटका करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानला दिलेल्या खणखणीत इशाऱ्यामुळे अभिनंदन वर्धमान यांची सुटका झाली. राहुल गांधी वा मणिशंकर अय्यर यांनी इमरान खान यांच्याकडे वकिली केल्याने ती झाली नाही! पण, विरोधकांना ते मान्य करवत नाही. विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना जरादेखील काही झाल्यास नंतर मोदी यांनी काय केले असे जगास सांगत बसू नका, असा दम पाकिस्तानला देण्यात आल्यानेच अभिनंदन यांची सुटका झाली, याची माहिती पंतप्रधान मोदी यांनी प्रचारसभांमधून दिली की लगेच विरोधकांचे पित्त खवळल्यावाचून राहत नाही. प्रचारसभेत मोदी यांनी हे सांगताच मोदी खोटे बोलत असल्याचा आरोप करायचा, त्यांच्या कणखर भूमिकेस दाद देण्याऐवजी पातळी सोडून त्यांच्यावर टीका करायची, अशी विरोधकांची भूमिका दिसून येत आहे.

 

पाकिस्तान सातत्याने आमच्याकडे अण्वस्त्रे असल्याचे सांगत असल्याबद्दलचा मुद्दा गुजरातमधील एका प्रचारसभेत उपस्थित करताना, पंतप्रधानांनी “आमच्याकडील अण्वस्त्रे दिवाळीतील फटाके उडविण्यासाठी नाहीत,” असे पाकिस्तानला बजावले. देशाच्या पंतप्रधानांनी ज्या रोखठोक भाषेत शत्रूला उत्तर द्यायला हवे, त्याच भाषेत मोदींनी उत्तर दिले. भारत काही ‘मोठी कृती’ करण्याच्या तयारीत असल्याची बातमी अमेरिकेपर्यंत गेली होती. पाकिस्तानच्या दिशेने बारा क्षेपणास्त्रे भारताने रोखल्याची माहितीही अमेरिकेला मिळाली होती. अभिनंदन वर्धमान यांना न सोडल्यास ती ‘कत्ल की रात’ ठरेल, असा इशारा दिला गेल्याचे अमेरिकेलाही वाटले! ही सर्व माहिती पंतप्रधान मोदी यांनी जनतेला देण्यामध्ये गैर ते काय? पण, विरोधकांना मात्र ते मान्य नाही. पंतप्रधान खोटी वक्तव्ये करून संबंधित यंत्रणेला कमी लेखत असल्याचा आरोप त्यांच्याकडून करण्यात आला आहे. दुसरीकडे, विरोधकांनी भाजप, पंतप्रधान मोदी, भाजप अध्यक्ष अमित शाह आणि अन्य नेत्यांविरुद्ध काहीही आरोप केले तरी चालतात. याला शरद पवार यांच्यापासून गल्लीतल्या विरोधी नेत्यांपर्यंत अशा कोणाचाही अपवाद नाही. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राफेल विमान प्रकरणी पंतप्रधान मोदी यांनी ‘चोरी’ केल्याचा ‘निर्वाळा’ सर्वोच्च न्यायालयाने दिला असल्याचा धादांत खोटा आरोप केला होता. सर्वोच्च न्यायालयाने त्याबद्दल जाब विचारल्यानंतर, आपण प्रचाराच्या आवेगात तसे बोलून गेल्याचे म्हटले आणि आता त्यांनी सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करून आपल्या त्या वक्तव्याबद्दल खेद व्यक्त केला आहे. पंतप्रधान मोदी आणि सर्वोच्च न्यायालय यांच्याबाबत बेजबाबदार वक्तव्ये करताना त्यांनी बुद्धी गहाण टाकली होती की काय? देशातील सर्वात जुन्या पक्षाच्या नेत्याला काय बोलावे आणि काय बोलू नये, याचे जराही तारतम्य नको का? आता राहुल गांधी यांची सर्व भाट मंडळी याप्रकरणी सारवासारव करून आपल्या नेत्याच्या घोडचुकीवर पांघरूण घालण्याचा प्रयत्न करतील!

 

राहुल गांधी यांच्याप्रमाणे विरोधी पक्षातील अन्य नेतेही ताळतंत्र सोडून वक्तव्ये करीत आहेत. राष्ट्रीय जनता दलाच्या नेत्या, लालूप्रसाद यादव यांच्या पत्नी माजी मुख्यमंत्री राबडीदेवी यांनीही असेच एक विधान केले आहे. आपले पती लालूप्रसाद यादव यांच्यावर भाजप विषबाधा करण्याचा कट रचत असल्याचा आरोप त्यांनी केला. भाजपच्या नेत्यांनी त्वरित या आरोपाचे खंडन केले. पण, राबडीदेवी असे आरोप करण्यास धजावतात तरी कशा? आपला पती चारा घोटाळा केल्याने आणि न्यायालयात ते आरोप सिद्ध होऊन न्यायालयाने दिलेली शिक्षा तुरुंगात भोगत असल्याचे माहीत असूनही त्या असे बिनबुडाचे आरोप करतात! प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी याही त्याच पठडीतील नेत्या. प. बंगालमधील लोकांचा निवडणूक आयोग ‘अपमान’ करीत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्या राज्यातील निवडणुका सुरळीतपणे पार पडल्या जातात की नाही, यावर लक्ष ठेवण्यासाठी आयोगाने निवडणूक निरीक्षक नेमल्याने त्या संतापल्या. भाजपच्या सांगण्यावरून आयोगाने ही कृती केल्याचा आरोप त्यांनी केला. असे अनेक विरोधी नेते खोटारडे आरोप करण्यात गुंतले आहेत. तिसऱ्या टप्प्याचे मतदान आज पूर्ण होत आहे. तरीही भाजपचा वारू रोखण्यामध्ये विरोधकांना म्हणावे तसे यश येत असल्याचे दिसत नाही. पण, भाजपवर आणि भाजपच्या नेत्यांवर वाटेल ते आरोप केल्याने जनता आपल्यामागे उभी राहील, अशी स्वप्ने रंगविण्याचे दिवस कधीच इतिहासजमा झाले आहेत. ते विरोधकांनी ध्यानात घेण्याची गरज आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@