चिनी फंडाचा पाकी पंगा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Apr-2019   
Total Views |




‘चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर’ अर्थात ‘सीपेक’ प्रकल्पासाठी चीनने दिलेला निधी इतर कामांसाठी पाकिस्तान सरकारने वापरल्याची माहिती समोर आली आहे.


शेजारी पाकिस्तानात कधी काय होईल, याची शाश्वती देता येत नाही. परवाच रात्री पाकिस्तानची विमाने भारतीय सीमेनजीक घिरट्या घालताना आढळली होती, तर मध्यंतरी १०० किलो ड्रग्जने भरलेल्या एका पाकिस्तानी बोटीला भारतीय नौसेनेने ध्वस्त केले होते. त्यामुळे परिस्थिती कितीही ताणतणावाची, बिकट असली तरी पाकिस्तान सुधारेल, अशी अपेक्षा करणेच मुळी फोल ठरावे. आर्थिक परिस्थितीही बेताची असताना पाकच्या नापाक मनसुब्यांमध्ये किंचितही फरक पडलेला नाही. आपण कर्जबाजारीपणाच्या उंबरठ्यावर आहोत, आपल्याला युद्धापेक्षा विकासावर लक्ष केंद्रित केले पाहिजे, असे ‘नव्या पाकिस्तान’चे कप्तान इमरान खान कितीही कंठशोष करत असले तरी भ्रष्टाचार आणि महागाईवर नियंत्रण मिळवण्यात त्यांचे सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. असाच एक गुपचूप निधी वळवण्याचा प्रकार सध्या पाकिस्तानात उघड झाला. म्हणजे पैसे वळवण्याइतकेही या देशाकडे पैसे नसले तरी ‘चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर’ अर्थात ‘सीपेक’ प्रकल्पासाठी चीनने दिलेला निधी इतर कामांसाठी पाकिस्तान सरकारने वापरल्याची माहिती समोर आली आहे.

‘सीपेक’ प्रकल्प हा पाकिस्तानपेक्षा चीनच्याच दृष्टीने किती फायदेशीर आहे, हे वेगळे सांगायलो नको. त्यामुळे चीनच्या दृष्टीने पाकिस्तान सर्व स्तरांवर स्थिर राहणे गरजेचे आहे. म्हणूनच मसूद अझहरचा मुद्दा असेल किंवा भारताला वारंवार डोळे दाखविण्याचा प्रयत्न, आपला मित्र पाकिस्तान आनंदी राहावा, यासाठीचा हा खटाटोप. पण, आता याच चीनच्या परममित्राने ‘सीपेक’साठी दिलेला निधी इतरत्र वळवल्याचा करंटेपणा दाखवला आहेप्राप्त माहितीनुसार, चीनने पाकिस्तानला ‘सीपेक’ प्रकल्पांतर्गत दळणवळण आणि इतर सोयीसुविधांच्या निर्मितीसाठी तब्बल ६२ अब्ज डॉलरचा निधी दिला. परंतु, त्यापैकी तब्बल २४०० कोटींचा निधी पाकिस्तान सरकारच्या नियोजन आणि विकास मंत्रालयाने संयुक्त राष्ट्रसंघाच्या विकास कार्यक्रमांच्या नावाखाली लोकप्रतिनिधींना विकासनिधी म्हणून देऊ केला. याचा अर्थ असा की, पाकिस्तानच्या तेहरिक-ए-इन्साफचे हे लोकप्रतिनिधी हाच फंड वापरून आपापल्या क्षेत्रात विकासकामे करतील आणि त्याचे सगळे श्रेय पक्षाला, इमरान खान यांना मिळेल. त्यामुळे ‘निकम्मी सरकार’ असा खान सरकारवर लागलेला आरोप काहीसा पुसला जाण्यास मदत होईल, असे पक्षाला वाटले असावे. शेवटी खानसाहेब आणि त्यांचा पक्ष तरी पैसे आणणार कुठून?

 

त्यातच ‘सीपेक’ प्रकल्प हा इमरान खान यांचे पूर्वसुरी नवाझ शरीफ यांच्या काळात कागदावर आला. पण, शरीफांच्या काळातही या प्रकल्पावर फारसे काम होऊ शकले नाही. आज चीन सोडल्यास पाकिस्तानच्या सावलीतही उभं राहायला कोणताही देश तयार नाही. त्यामुळे चीनला खुश ठेवण्यासाठी ‘सीपेक’ प्रकल्प लवकरात लवकर कसा पूर्णत्वास येईल, यासाठी इमरान सरकार प्रयत्नशील आहेच. पण, या प्रकल्पाचा फायदा मोठ्या प्रमाणात पंजाब आणि सिंध या राज्यांना होणार असून बलुचींचा तर या प्रकल्पाला सुरुवातीपासून विरोध कायम आहे. पण, पाकिस्तान सरकार सध्या कोणाचाही विरोध जुमानत नसून उलट चिनी सैनिकच ‘सीपेक’च्या प्रकल्पांची रखवाली करताना दिसतात. कारण, खुद्द चीनचाही पाकिस्तानच्या सुरक्षाव्यवस्थेवर काडीमात्र विश्वास नाही. त्यामुळे मोठ्या संख्येने चिनी सैनिकांच्या तुकड्या पाकिस्तानात दाखल झाल्या आहेत. एका अहवालानुसार, भारत-पाक सीमेपासून फक्त ९० किमी अंतरावर येऊन हे चिनी सैन्य धडकले आहे.

 

याच महिन्यातच चीनची दुसरी ‘बेल्ट रोड’ परिषद पार पडणार आहे. जी जी राष्ट्रं या ‘बेल्ट रोड’ने जोडली जातील, त्यांचे प्रतिनिधी या परिषदेला उपस्थित राहतील. त्यामध्ये साहजिकच पाकिस्तानचाही समावेश असेल. त्यामुळे या निधीच्या अफरातफरीवरून चीनकडून पाकिस्तानला कानपिचक्या मिळू शकतात आणि सक्त ताकीदही. पण, काहीही असले तरी पाकिस्तानची शेपूट वाकडी ती वाकडी! अमेरिकेनेही इतकी वर्षं दहशतवाद्यांविरोधी लढण्यासाठी पाकला दिलेला पैसा, उलट याच दहशतवाद्यांना पोसण्यासाठी वापरला. ‘एफ-१६’चेही असेच. त्याचाही वापर पाकिस्तानने भारताविरोधातच केला. त्यामुळे पाकची ही जुनीच खोड म्हणावी लागेल. पण, इतकी वर्षं पैसे उकळून अमेरिकेलाच मूर्ख बनविणार्‍या पाकिस्तानला तसेच चीनसोबत करणे महागातही पडू शकते. कोणास ठाऊक, हा पाकिस्तानच चीनच्या ‘सीपेक’ पुरता मर्यादित न राहता, आर्थिक दुर्बलतेपोटी चीनचाच मांडलिक होऊन बसेल!

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा...facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat




@@AUTHORINFO_V1@@