आर्थिक नियोजनाचा वाटाड्या

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Apr-2019   
Total Views |


भविष्यासाठी योग्य ते आर्थिक नियोजन करणे आजघडीला तसे खूप महत्त्वाचे. परंतु, योग्य मार्गदर्शन न मिळाल्यामुळे अनेकांचे नुकसान होते. हे टाळण्यासाठी देवदत्त धनोकर यांनी पुढाकार घेतला आहे.

 

भारतीय नागरिक बँक, टपाल कार्यालय, विमा योजना आदी सेवांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करताना आपल्याला दिसतात. बहुतांशी भारतीय नागरिकांची गुंतवणूक मानसिकता ही धोका न पत्करण्याची. जर पैसे बुडाले तर सर्वच संपून जाईल, या भीतीने ते गुंतवणूक करताना शंभरदा विचार करतात. यामुळे ते आपसुकच मोठ्या अन् फायदेशीर गुंतवणुकीच्या पर्यायांना मुकतात. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे आर्थिक साक्षरतेचा अभाव. आर्थिक साक्षरतेचा म्हणजे आपल्या कुटुंबीयांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी असलेले नियोजन. ही गरज ओळखून आर्थिक सल्लागार देवदत्त धनोकर यांनी आर्थिक साक्षरतेबाबत जनजागृतीसाठी पुढाकार घेतला आहे.

 

म्युच्युअल फंड’ या विषयाबद्दल इंग्रजीमध्ये बर्‍यापैकी माहिती उपलब्ध असते. पण, देवदत्त धनोकर यांनी या विषयावर मराठीमध्ये लेखन केले. नुकतेच त्यांचे ‘गुंतवणुकीचा गुरुमंत्र’ हे पुस्तक प्रकाशित झाले आहे. त्याचप्रमाणे गुंतवणुकीबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी ते विविध उपक्रम राबवितात. गेल्या १५ वर्षापासून ते या क्षेत्रात कार्यरत आहेत. म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक केल्यास भविष्यात आपल्याला किती फायदा होऊ शकतो, याबद्दल धनोकर नेमकी माहिती देतात. ‘म्युच्युअल फंड’ या विषयाबद्दल असणारे समज आणि गैरसमज ते लोकांना समजावून सांगतात.

 

म्युच्युअल फंड’ हा विषय समजण्यास तसा काहीसा कठीणच. पण, या विषयाची अतिशय सरळ आणि सोप्या शब्दांत धनोकर मांडणी करतात. निवृत्तीनंतर आपल्याकडे विशिष्ट एकरकमी पैसे येतात. ते जर योग्य ठिकाणी गुंतवले नाहीत, तर वृद्धापकाळातील दिवस अतिशय बिकट जाऊ शकतात. भविष्यकाळ सुखकर होण्यासाठी गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही कोणता विचार करावा, म्युच्युअल फंड गुंतवणूक करताना तुमची मानसिकता कशी असावी, त्याचप्रमाणे तुम्ही म्युच्युअल फंड गुंतवणुकीचीआवश्यकता व यांसारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे ते मजेशीररीत्या देतात. ‘गुंतवणूक’ या अवघड विषयातदेखील लोकांनी अभ्यासपूर्वक गुंतवणूक करावी, असा त्यांचा उद्देश असतो.

 

देवदत्त धनोकर यांनी आतापर्यंत अनेक वृत्तपत्रांतून स्तंभलेखन केले आहे. त्याचप्रमाणे विविध ग्राहकांना शिक्षण, लग्न, गृहखरेदी, सेवानिवृत्ती अशी विविध आर्थिक उदिष्टे साध्य करण्यासाठी ते योग्य मार्गदर्शन करतात. देवदत्त धनोकर यांचे बालपण वांद्रे परिसरात गेेले. मराठी माध्यमाच्या शाळेतून त्यांचे शिक्षण पूर्ण झाले. त्यानंतर एलफिन्स्टन तांत्रिक महाविद्यालयामध्ये त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी स्थापत्त्य अभियांत्रिकी शाखेत पदवी घेतली. शिक्षण पूर्ण झाल्यावर ते गुंतवणूक क्षेत्राकडे वळले. ते विमा आणि म्युच्युअल फंड या विषयातील परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण झाले. त्यासोबतच प्रमाणित आर्थिक सल्लागाराचा कोर्सही त्यांनी पूर्ण केला. त्यामध्ये विमा, गृहखरेदी, गुंतवणूक, मुलांचे शिक्षण आदी बाबींचा समावेश होतो. गेल्या १५ वर्षांपासून ते गुंतवणुकीबाबत मार्गदर्शन करत आहेत.

 

भारतातआर्थिक सल्लागार’ ही योजना फारशी रुजलेली दिसत नाही. म्हणून या क्षेत्रात काम करताना काही अडचणीही आल्या. कित्येक लोकांना असे वाटते की, आर्थिक गुंतवणूक करणे आमची गरजच नाही. त्यामुळे गुंतवणुकीसाठी लोकांचा प्रतिसाद कमी मिळतो. बर्‍याचदा चुकीचे व्यवहार करून फसल्यानंतर लोक सल्ला घेण्यासाठी येतात. परंतु, त्यावेळी आर्थिक संकट सोडवणे शक्य नसते. त्यांनी योग्य तज्ज्ञांचा सल्ला घ्यायला हवा, असे ते सांगतात. त्याप्रमाणे तरुणांनी पदवीसोबत आर्थिक नियोजनाचे शिक्षण घेतले पाहिजे. या शिक्षणाचा केवळ त्या व्यक्तीला नाही, तर संपूर्ण कुटुंबाला फायदा होतो. तसेच मध्यम वर्ग ३५ ते ४० वयोगटातील व्यक्तींना थोडा अनुभव आलेला असतो. थोडे थोडे पैसे शिल्लक राहतात. हल्ली करिअरमुळे लग्न उशिरा होतात. तर त्यांनी गरजेनुसार, विमा गुंतवणूक करायला हवी, असे त्यांचे मत आहे. निवृत्त व्यक्तींना नियमित उत्पन्न हवे असेल, तर त्यांनी आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर कोणताही धोका पत्करू नये. निवृत्तीनंतर गुंतवणूक करण्याचा विचार करतात. परंतु, त्यांचे त्यामध्ये नुकसान होऊ शकते. त्यामुळे त्यांनी आपल्या गरजा ओळखून गुंतवणूक करायला हवी. टपाल कार्यालयाच्या योजना, बँकेत एफ.डी. आणि गरज असेल, तर म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करायला हवी. निवृत्तीधारकांनी इच्छापत्र करून घ्यायला हवे, असेही त्यांनी सांगितले.

 

ज्या विद्यार्थ्यांना या क्षेत्रात करिअर करायचे आहे, त्यांनी आवडेल त्या भाषेतील या विषयाशी संबंधित पुस्तके वाचावीत. जे कोर्सेस असतील ते करावेत. युट्युब, इंटरनेटच्या माध्यमांतून आर्थिक साक्षरतेकडे लक्ष द्यावे. गुंतवणूक करताना ती सर्वसमावेशक असावी. केवळ गृहखरेदी किंवा म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करु नये. धोका स्वीकारण्याच्या क्षमतेनुसार निर्णय घ्यावे. कारण, एका चुकीमुळे केवळ आपण नव्हे, तर संपूर्ण कुटुंब अडचणीत येते. बर्‍याचवेळा सहा महिन्यांत दोनदा किंवा जास्त व्याजाने पैसे असे आमिष दाखवून फसवणूक होते. आर्थिक व्यवहार समजण्यासाठी आर्थिक साक्षर असणे गरजेचे आहे. आर्थिक लोभामुळे डॉक्टर, अभियंतेसुद्धा आमिषांना बळी पडतात. स्त्रिया आर्थिक साक्षर झाल्या, तर कुटुंब आर्थिक साक्षर होण्यास मदत होईल, असेही ते सांगतात.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा...facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@