देशातील पहिला दलित अब्जाधीश

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Apr-2019   
Total Views |


 


भारताचे पहिले दलित उद्योजक, अशी ओळख असलेले आणि लाखो युवकांसाठी प्रेरणादायी ठरणारे राजेश सरैया यांच्या कार्यकर्तृत्वावर प्रकाश टाकणारा हा लेख...

 

कौन कहता है,

आसमान मै सुराख नहीं हो सकता,

एक पत्थर तो तबियतसे उछालो यारों

 

एका मागासवर्गीय कुटुंबात जन्मल्यानंतर कर्तृत्वाचा गौरव झालेल्या एका उद्योजकाची ही बोलकी प्रतिक्रिया इतरांसाठी एक आशेचा किरण दाखवणारी आहे. ‘तुमचा जन्म गरीब कुटुंबात झाला असेल तरी चालेल, पण तुम्ही गरीब कुटुंबातच मरणार असाल तर ती तुमची मोठी चूक आहे,’ हा विचार आपल्या आयुष्यात रुजवत लाखो युवकांसाठी प्रेरणादायी ठरणारे राजेश सरैया यांनी आपल्या व्यवसायाची मुहूर्तमेढ रचून देशविदेशात त्याची पाळेमुळे रोवली आहेत. एका मागासवर्गीय कुटुंबात जन्म झालेल्या राजेश यांनी आज स्वतःच्या कर्तृत्वाच्या जोरावर वर्षाला अडीच हजार कोटी रुपयांची उलाढाल करणारा उद्योग उभा केला आहे. धातू क्षेत्रात काम करणार्‍या ‘स्टील मोंट’ या कंपनीचे ते मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.

 

राजेश यांचा जन्म २ ऑक्टोबर, १९६९ रोजी उत्तर प्रदेशातील सीतापूर जिल्ह्यातल्या सैनी गावात झाला. वडील नाथाराम हे सरकारी कर्मचारी होते. त्या काळातील मागासवर्गीय कुटुंबांची आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती पाहता आपला मुलगाच आपली आणि समाजाची ही स्थिती बदलेल, असा विश्वास राजेशच्या वडिलांनी व्यक्त केला. त्याकाळी मुलांची नावे ठेवताना अगदीच साधारण ठेवली जात. मात्र, वडील नाथाराम यांनी मुलाचे नाव ‘राजेश’ ठेवले. प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर देहरादून आणि त्यानंतर रशियाला एअरोनॉटिक्स इंजिनिअरिंगचे शिक्षण राजेश यांनी पूर्ण केले. तो काळ होता १९९१चा. युक्रेन हे स्वतंत्र राष्ट्र झाले होते. राजेश यांनी त्यावेळी शिक्षण पूर्ण करतानाच खासगी कंपन्यांमध्ये प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली होती. त्यांच्या या प्रशिक्षणात त्यांना मोठा अनुभव गाठीशी येत गेला. व्यवसाय करण्याची इच्छा सुरुवातीपासूनच असल्याने त्यांनी या काळात व्यापारातील बारकावे समजून घेण्यास सुरुवात केली. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना ‘निप्पोन इस्पात’ या कंपनीत नोकरी मिळाली. हीच लक्ष्मी मित्तल यांची कंपनी होय.

 

स्टील मोंट’ या कंपनीची त्यांनी सुरुवात केली. स्टील उद्योगातील व्यापार, वित्तीय सेवा आणि अन्य स्तरावर ही कंपनी काम करते. सध्या कंपनीचा व्यवसाय भारतासह युके, युएई, टर्की, रशिया, चीन, सिंगापूर आदी देशांमध्ये विस्तारला आहे. कंपनी १९९३ पासून स्टील, मिश्र धातू, बांधकाम साहित्य, कोळसा, रसायने, खनिजे, खते आणि कृषिविषयक मालाचा व्यापार करते. याशिवाय जगभरातील धातू क्षेत्रातील उद्योजकांना अर्थसाहाय्य, मालाचा पुरवठा, लॉजिस्टिक आणि शिपिंग आदी सेवा ग्राहकांना दिल्या जातात. कंपनीला ‘आयएसओ २००१-०८’ने प्रमाणित केले आहे. प्रमुख व्यवसाय आणि कार्यालय युक्रेनमध्ये आहे. प्रामुख्याने ब्रिटनमध्ये सर्व व्यवहार केले जातात. असे असूनही त्यांना भारताविषयी जास्त प्रेम आहे. गेली २५ वर्षे ते परदेशात आहेत. मात्र, त्यांच्या मुलांकडे भारतीय पासपोर्ट आहे, असे ते आवर्जून सांगतात. पुढील काळात त्यांना भारतात येऊन राहायची इच्छा आहे. भारतात उद्योगपूरक वातावरण असल्याचे ते अभिमानाने सांगतात. भारतासारख्या कृषिप्रधान देशात स्वतःचे फूड प्रोसेसिंग युनिट सुरू करण्याची त्यांची इच्छा आहे.

 

इतकी वर्षे देशाबाहेर राहिल्यानंतर ते भारताबद्दल अभिमानाने एक गोष्ट सांगतात की, “माझ्या मागासवर्गीय असण्याचा व्यवसायावर कधीही परिणाम झाला नाही. परिस्थिती बदलत आहे. जगातही आता अशा प्रकारच्या वर्णभेदाचा उल्लेख होताना दिसत नाही.” भारत सरकारने त्यांना यापूर्वी दोनदा पुरस्काराने सन्मानित केले होते. त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना २०१४ मध्ये तत्कालीन राष्ट्रपतींच्या हस्ते ‘पद्मश्री’ पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले. २०१२ मध्ये त्यांना ‘प्रवासी भारतीय पुरस्कार’ही प्रदान करण्यात आला होता. भारताचे पहिले दलित उद्योजक, अशी त्यांची ओळख आहे. ‘दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्रीज’तर्फे (डिक्की) त्यांचा सत्कार करण्यात आला होता. त्यावेळी त्यांच्यासारख्याच मध्यमवर्गीय कुटुंबातील तरुणांना त्यांनी मोलाचा संदेश दिला होता की, “तुम्ही बदल स्वतःपासून करायला शिका, जगात काय चालू आहे, आपण कुठे आहोत, याचा विचार करायला शिका. तुमचे आदर्श जसे असतील तसेच तुम्हीही बनाल,” असा कानमंत्र ते तरुणांना नेहमीच देत असतात. “मागासवर्गातील तरुणांनी पुढे येऊन काम करण्याची गरज आहे. त्यासाठी शिक्षणालाही महत्त्व द्यायला हवे,”असे मार्गदर्शन ते युवावर्गाला करतात.

 

गेली २१ वर्षे त्यांनी आपला उद्योग केवळ सुरूच ठेवला नाही, तर त्याचा विस्तार जगभर करण्यावर भर दिला आहे. राजेश यांच्या हाताखाली शंभर जणांची टीम हा पसारा हाताळत असते. आपल्या ग्राहकापर्यंत सेवा उत्तमरित्या आणि इतर कुणाहीपेक्षा जलद पोहोचविण्यावर भर देणे, हे त्यांच्या व्यवसायाच्या यशाचे गमक असल्याचे ते सांगतात. ‘ग्राहक हाच देव’ हेच तत्त्व मानत आजवर त्यांनी प्रवास केला आहे. आपल्या कार्यक्षेत्रातील सर्वोत्तम उद्यमी म्हणून उदयास येणे, हे राजेश आणि त्यांच्या कंपनीचे ध्येय आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@