आता तरी जागे व्हा!

    18-Apr-2019
Total Views |



बुतपरस्तांशी ओवेसींनी केलेली युती केवळ राजकीय फायद्यासाठीची, मुघलांची देशावरची कथित मालकी परत मिळवण्याच्या उद्दिष्टातली एक पायरी असते. त्यात दलितांच्या, बौद्धांच्या किंवा आंबेडकरी जनतेच्या श्रद्धा-आस्थेचा मानसन्मान ठेवण्याची त्यांना गरज वाटत नाही. हे समजून घेऊन प्रकाश आंबेडकरांनी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी आता तरी जागे व्हावे.

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख राजकीय भागीदार असलेल्या असदुद्दीन ओेवेसी यांनी औरंगाबादेत जे केले, त्यातून त्यांचा आणि त्यांच्या नादाला लागलेल्यांचा खरा चेहरा उघडकीस आला. प्रचारादरम्यान ओवेसी ज्या मार्गावर चालत फिरत होते, तिथे वाटेत एक बुद्धविहार आले. सोबतच्या कार्यकर्त्यांनी त्यांना आत येऊन अभिवादन करण्याची विनंती केली. यावर ओवेसींनी सोबतच्या कार्यकर्त्यांनाच हात दाखवून आत जाण्याचा इशारा केला आणि तिथून काढता पाय घेतला. ओवेसींच्या या वागण्यामुळे सध्या त्यांच्याकडून परिवर्तनाची अपेक्षा ठेवणार्‍या आंबेडकरी कार्यकर्त्यांना धक्का तर बसलाच; पण, हा सारा प्रसंग कॅमेर्‍यात चित्रित होऊन संपूर्ण महाराष्ट्रासमोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. प्रकाश आंबेडकरांनी आपल्या राजकीय अस्तित्वासाठी आंबेडकरी विचार मानणार्‍या मंडळींना वेठीस धरले आहे. बाबासाहेब आंबेडकरांची इस्लामविषयक मते सगळ्या जगाला ठाऊक असूनसुद्धा प्रकाश आंबेडकरांनी जो अनैसर्गिक पाट लावला, त्याचे परिणाम कधी ना कधी दिसणारच होते. ते ऐन निवडणुकीत दिसल्याने मात्र आता त्यांची चांगलीच पंचाईत झाली आहे. हे प्रकरण निस्तरण्याच्या दृष्टीने नंतर स्थानिक मंडळींनी धावत जाऊन बुद्धविहारात दर्शन तर घेतले. मात्र, ओवेसी काही केल्या तिथे फिरकले नाही.

 

निवडणुकीच्या धबडग्यात हे झालेले नाही. हा ओवेसींच्या मूळ विचारसरणीचा दोष आहे. ज्या इस्लामचा पाठीराखा म्हणून ते उभे राहतात, त्या इस्लाममध्ये मूर्तिपूजेला मान्यता नाही. प्रतिमेसमोर नतमस्तक होणे त्यांना मान्य नाही. मग ती बुद्ध प्रतिमा असो किंवा अन्य कुठल्याही देवतेची प्रतिमा. आता मुद्दा हाच की, ज्यांना आंबेडकरी विचारांच्या पवित्र प्रेरणाच मान्य नाही, त्यांनी त्यांच्या नावे मतांचा जोगवा का मागावा? व स्वत:ची राजकीय किंमत का वाढवून घ्यावी? मूळ मुद्दा ओवेसींचा नाही, त्यांनी आपल्या भूमिका कधीही बदललेल्या नाहीत. आपला विखार अत्यंत पद्धतशीरपणे ते मांडत असतात. मूळ मुद्दा आहे तो प्रकाश आंबेडकरांचा, ज्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचे नाव वापरून चळवळीतील मंडळींना त्यांच्यासोबत जोडले आहे. ओवेसी अत्यंत चलाखपणे या सगळ्याचा वापर करीत असतात. आपल्या तर्काला ते संविधानातील कलमांचा आधार देतात. हक्क व कर्तव्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू. ओवेसींना हक्क सगळे हवे आहेत, पण कर्तव्ये ते चतुरपणे मागे ठेवतात. ‘भारतमाता की जय म्हणणार नाही,’ असे ते ठामपणे सांगतात. असे वागण्याचे स्वातंत्र्य आपल्याला संविधानाने दिलेले आहे, असे सांगून ते घटनेचे कलम सांगतात. मात्र, त्यांना संविधानातील अन्य गोष्टींशी काहीही देणेघेणे नसते. गोहत्या बंदी सारखा विषय संविधानात असताना त्याची पायमल्ली करायला त्यांना काहीच वाटत नाही. समान नागरी कायद्यासारख्या गोष्टी ज्या संविधानाच्या परिणामकारक अंमलबजावणीसाठी उपयुक्त आहेत, त्यावर ते काहीच बोलत नाहीत. आमदार असलेल्या त्यांच्या भावाची मुक्ताफळे ते ज्या संविधानाचा जोहार करीत असतात, त्यात कुठे बसतात, हे त्यांनीच सांगावे.

 

ओवेसींचे कालचे वागणे हे त्यांच्या मूळ स्वभावधर्माचेच आहे. त्यांना कुठल्याही अन्य धर्म किंवा पंथासमोर नतमस्तक व्हायचे नाही. झाकीर नाईकसारखे माणुसकीचे शत्रू ज्या प्रकारची मांडणी करून मुसलमान मुलांना कट्टर करण्याचे उद्योग करायचे, त्याच मांडणीचा हा कृतीरूप भाग आहे. हा देश ब्रिटिशांनी सोडल्यामुळे भारताला स्वातंत्र्य मिळाले. हा देश मुळात राजकीयदृष्ट्या मुघलांचा होता, म्हणजेच मुसलमानांचा होता आणि त्यामुळे त्यावर राज्य करण्याचा संपूर्ण अधिकार हा मुसलमानांचाच आहे, असा या मंडळींचा तर्क असतो. आता एकदा लोकशाही स्वीकारल्यानंतर या सगळ्याला काहीच अर्थ राहत नाही. मात्र, ओवेसींना त्याच्याशी काही घेणेदेणे नाही. इस्लामी एकाधिकाराचा वर्चस्ववादी विचार त्यांना रुजवायचा आहे. त्यासाठी त्यांना आंबेडकरी चळवळ वापरता आली तर ते हवेच आहे. आंबेडकर-ओवेसी युतीचा हा जो काही प्रयोग आहे, तो आजचा नाही. ‘दलित-मुसलमान भाई-भाई, हिंदू कौम कहाँसे आई,’ असा नारा यापूर्वीही लगावला गेला आहे.

 

मतपेढ्यांचे राजकारण करणारी ओवेसींसारखी माणसे कुठल्याही थराला जाऊ शकतात. काँग्रेसने देशावरची आपली पकड जसजशी गमावली, तसतसा या मंडळींचा उदय झाला. काँग्रेसने आपले बालेकिल्ले परत मिळविण्यापेक्षा यांच्यासारख्या मंडळींना खतपाणी घालणे अधिक पसंत केले. आता हे सारे भस्मासूर झाले आहेत. महाराष्ट्रात ज्या जागांवर आज एमआयएमचे आमदार निवडून आले आहेत, तिथून ते केवळ हिंदू मतांच्या मतविभाजनामुळेच निवडून आले. ज्या पक्षाची धुरा ते सांगतात, त्याचे रझाकारांशी आणि मराठवाड्याशी काय संबंध आहेत, ते एकदा ओवेसींनी सांगावे. रझाकारांनी जेव्हा मराठवाड्यातील सर्वसामान्य जनतेला लुटले तेव्हा हा युतीचा भेदाभेद केला गेला होता का? तर नव्हेच, तेव्हा ओवेसींना आज ज्यांचा वारसा मिळाला, त्या रझाकारांच्या अन्याय-अत्याचारात सगळेच हिंदू पिचले गेले. तिथे कोणी कसला भेदभाव केला नाही, कारण ते सगळे काफिरच होते. परवा ओवेसींनी बुद्धविहारात जाण्याचे नाकारले ते याचमुळे. प्रकाश आंबेडकरांनी दलित-मुस्लीम एकतेचा नारा देत असदुद्दीन ओवेसींची शेरवानी पकडण्याचा कितीही प्रयत्न केला तरी ओवेसींच्या दृष्टीने बुद्धापुढे, आंबेडकरांपुढे नतमस्तक होणारा प्रत्येकजण ‘बुतपरस्त’च असतो.

 

अशा बुतपरस्तांशी ओवेसींनी केलेली युती केवळ राजकीय फायद्यासाठीची, मुघलांची देशावरची कथित मालकी परत मिळवण्याच्या उद्दिष्टातली एक पायरी असते. त्यात दलितांच्या, बौद्धांच्या किंवा आंबेडकरी जनतेच्या श्रद्धा-आस्थेचा मानसन्मान ठेवण्याची त्यांना गरज वाटत नाही. हे समजून घेऊन प्रकाश आंबेडकरांनी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी आता तरी जागे व्हावे; अन्यथा ओवेसींसारख्यांकडून आंबेडकरी जनतेच्या विचारांची, श्रद्धेची अशीच अवहेलना होत राहिल, तीही हातात हात घालून, मैत्रीच्या गळाभेटी घेऊन. ही अवहेलना टाळायची असेल तर प्रकाश आंबेडकर असो वा त्यांचे पाठीराखे, त्यांना आता ओवेसींचा धर्मांध विचार धाब्यावर बसवून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्याच मार्गावर परतावे लागेल, हे नक्की!

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat