राजकारणातील ‘अंतू बर्वा’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Apr-2019   
Total Views |




अंतू बर्व्याचे टिळक, गांधी, नेहरू, छत्रे, सावरकर यांच्या संबंधीचे उद्गार आणि राज ठाकरे यांचे मोदी आणि शाह यांच्याबद्दलचे उद्गार यात तिळमात्र फरक नाही. अंतू बर्व्याचे बोलणे चार घटका मनोरंजनासाठी घ्यायचे असते, गांभीर्याने नाही, याची रत्नागिरीच्या लोकांना सवय झाली होती. आता महाराष्ट्रातील लोकांना राज ठाकरेंचा नवा अवतार पाहून ती सवय होईल.

पु. ल. देशपांडे यांच्या ‘व्यक्ती आणि वल्ली’ मधल्या अनेक वल्ली या आपल्याला कोठे ना कोठे दिसत असतात. त्यापैकी लोकसभा निवडणुकीत ‘एका अंतू बर्वा’चा परिचय महाराष्ट्राला होत आहे. पु. ल. देशपांडेंनी अंतू बर्व्याचे वर्णन करताना म्हटले होते, “समोरासमोर अंतूला कोणी ‘अंतू’ म्हणत नाही. परंतु, उल्लेख मात्र सहसा एकेरी... पण अंतूला संबोधन ‘अंतूशेठ’ हे आहे. पहिल्या महायुद्धाच्या वेळी अंतूने बंदरावर कसले तरी दुकान काढले होते, ते केव्हाच बुडाले. परंतु, ‘अंतूशेठ’ व्हायला ते कारण पुरेसं होतं. त्यानंतर अंतूने पोटाचा उद्योग केल्याचे कोणाच्या स्मरणात नाही.”

 

राज ठाकरे यांची कथा यापेक्षा काही वेगळी नाही. चुलतभावाशी भांडून ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेना’ नावाचा पक्ष त्यांनी काढला. त्यात पहिल्या विधानसभेच्या निवडणुकीत उत्साहात तेरा आमदार, मुंबई, डोंबिवली, कल्याण, पुणे, नाशिक या महापालिकेत भरघोस नगरसेवक, असा त्यांचा राजकीय उद्योग काही काळ चालला. परंतु, दुकान चालवावे हा जसा अंतू बर्व्याचा पिंड नव्हता, तसेच कष्ट घेऊन राजकीय पक्ष चालवणे, हाही राज ठाकरेंचा पिंड नव्हता. त्यांच्यापाशी कर्तृत्वाचे नसले तरी शब्दाचे भांडवल होते आणि त्याचबरोबर पु. ल. देशपांडे यांनी म्हटल्याप्रमाणे, कारण असो वा नसो, आपल्या मताची पिंक टाकून जाणे, हा जसा अंतू बर्व्यांचा स्वभाव बनला होता, तसाच राज ठाकरे यांचा बनला आहे.

 

वास्तविक पाहता, राज ठाकरे यांनी मोठ्या उमेदीने राजकारणाला सुरुवात केली. शिवसेना मराठीपणाचा मुद्दा सोडून हिंदुत्वाकडे वळल्यामुळे निर्माण झालेली मराठी भावनेची राजकीय पोकळी भरून काढता येईल, असे त्यांना वाटले. त्यातच बाळासाहेबांची ठाकरी भाषाशैली उद्धवपेक्षा राज ठाकरेंना अधिक प्रसन्न. परंतु, बाळासाहेबांनी आपला प्रभाव केवळ भाषेमुळे निर्माण केला नव्हता. बाळासाहेबांच्या बालवयात त्यांच्या घरी प्रबोधनकार ठाकरे यांच्याबरोबर महाराष्ट्रातील अनेक विचारवंत, साहित्यिक, राजकीय नेते यांच्या चर्चा ऐकण्याचा योग त्यांना आला. त्यातून राजकारण समजण्याचा त्यांचा आवाका वाढत गेला. समोर दिसणार्‍या गर्दीच्या आत एक भावनांचे आंतरविश्व असते, हे बाळासाहेबांच्या मनातील कलाकाराला उमगत गेले. त्यामुळे बाळासाहेब आपल्यासमोरील गर्दीच्या भावनिक आंतरविश्वाला स्पर्श करणारी भाषणे करीत. त्याचा परिणाम म्हणजे, बाळासाहेबांवर जीव ओवाळून टाकणारे हजारो शिवसैनिक महाराष्ट्रात तयार झाले. बाळासाहेबांनी राजकीय हिशोब मांडून कधी आपल्या राजकीय भूमिका मांडल्या नाहीत. परंतु, त्यांच्या भूमिकेत एक पारदर्शी जिवंतपणा असल्यामुळे अनेक विवादास्पद विधाने करूनही त्यांची लोकप्रियता कमी झाली नाही. वास्तविक पाहाता, ओबीसी हा शिवसेनेचा महाराष्ट्रातील प्रमुख जनाधार. तसे असतानाही मंडल आयोगाच्या विरोधात भूमिका घेताना हा आधार आपल्यामागून निघून जाईल, अशी भीती बाळासाहेबांना वाटली नाही. तो आधार त्यांच्यापासून दूर गेलाही नाही. याचे कारण, त्यांची आपल्या मतावर असलेली दृढ श्रद्धा लोकांच्या अंतःकरणाला स्पर्श करणारी होती.

 

राज ठाकरेंनी बाळासाहेबांची वक्तृत्व कला आणि व्यंगचित्रकला उचलली; पण त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा जो गाभा होता, त्याचे आकलन त्यांना कधी झाले नाही आणि पुढे कधी होईल, असेही वाटत नाही. केवळ शब्द आणि अभिनयाने इतिहास घडवता आला असता तर नाटकात किंवा सिनेमात शिवाजी महाराजांच्या आणि संभाजी महाराजांच्या भूमिका करणार्‍या नटांनीच देशाचे नेतृत्व केले असते. राज ठाकरेंच्या वक्तृत्वाला काही काळ लोक भुलले. परंतु, त्यातील पोकळपणा लक्षात आल्यानंतर त्यांनी केवळ वाघाचे कातडे पांघरले आहे, हे लोकांच्या लक्षात आले. वास्तविक बाळासाहेबांच्या घरी चित्रपट कलावंत, साहित्यिक, राजकीय नेते यांचा राबता होता. परंतु, आपल्याभोवती प्रवाह वाहता असला तरी त्यातील पाणी उचलण्याची क्षमता प्रत्येकापाशी वेगवेगळी असते. अंतू बर्वाचे वर्णन करत असताना पु. ल. देशपांडे म्हणतात, “देवाने ही माणसाची एक निराळीच घडण केलेली आहे. त्याच्यात रत्नागिरीच्या लाल चिर्‍याचे, नारळा-फणसाचे, खाजर्‍या अळवाचे आणि फट्ट म्हणता प्राण कंठाशी आणणार्‍या ओल्या सुपारीचे गुण एकवटून आले आहेत.” कोकणचा निसर्ग समृद्ध असला तरी त्यातील कोण काय वेचतो, हे महत्त्वाचे.

 

मागच्या लोकसभेच्या निवडणुकीत राज ठाकरे मोदींच्या कर्तृत्वाने भारावून गेले होते. त्यांनी गुजरातचा प्रवास केला होता. गुजरात हे विकासाचे एकमेव मॉडेल आहे, असा त्यांना साक्षात्कार झाला. परंतु, या मोदीलाटेत राज ठाकरेंचा पक्ष असा वाहून गेला की, त्यानंतर त्यांच्यासमोर राजकीय अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण झाला. शिवसेना भाजपबरोबर असल्यामुळे तिकडे जाणे राज ठाकरेंना शक्य नव्हते. स्वतंत्र राहण्याची त्यांची उमेद संपली होती आणि अशा मानसिकतेत शरद पवारांनी आपल्यासोबत येण्याचा त्यांना सल्ला दिला असावा आणि तो सल्ला मानण्याशिवाय राज ठाकरेंपाशी दुसरा पर्याय नव्हता.

 

आपला एकही उमेदवार मैदानात नसताना राज ठाकरेंचा चाललेला प्रचारदौरा हा परस्पर सोईचा मामला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वच नेत्यांच्या एवढ्या भानगडी अडकल्या आहेत की, देवेंद्र फडणवीस यांच्यावर काय किंवा नरेंद्र मोदींवर काय, किती टीका करायची, याच्या मर्यादेचे त्यांना भान आहे. त्यामुळे बेतालपणे टीका करणारा एखादा हुकमी वक्ता त्यांना हवाच होता. वास्तविक पाहाता, राजू शेट्टी, प्रकाश आंबेडकर, बहुजन विकास आघाडी किंवा रवी राणा यांच्याएवढी जरी मनसेची किंमत आघाडीने केली असती, तर मुंबई, ठाणे, नाशिक परिसरातील एखादी तरी जागा त्यांनी या पक्षाला सोडली असती. बाळासाहेब आंबेडकरांनी आघाडीला झिडकारून टाकले, ही गोष्ट वेगळी. विधानसभेसाठी काय वायदा झाला आहे, माहीत नाही. कारण, आजच्या स्थितीत त्या वायद्याला काहीच किंमत नाही. दिल्लीत मोदींचे सरकार आले तर काँग्रेस-राष्ट्रवादीचे कठीण आहे, अशी कबुली पृथ्वीराज चव्हाणांनी एका मुलाखतीत दिली आहे. ज्यांच्यासमोर स्वतःच्या भवितव्याची खात्री नाही, त्यांच्यावर विधानसभेसाठी कोण विश्वास ठेवेल?

 

कारणे कोणतीही असोत, पाहुण्याकडून साप मारण्याची शक्कल आघाडीने लढवली आहे. त्याचा निवडणुकीवर किती परिणाम होईल, हा प्रश्न वेगळा. परंतु, सध्या लोकांचे मनोरंजन तरी त्यातून होत आहे. अंगी कोणतेही राजकीय कर्तृत्व नसताना केवळ शब्दांचे उडवलेले फुगे लोक गांभीर्याने घेत नाहीत. ज्याप्रमाणे टिळक असोत, गांधी असोत किंवा नेहरू असोत, त्यांची टर उडवण्यापलीकडे अंतू बर्व्याला दुसरा उद्योग नव्हता, तसेच राज ठाकरेंचे सध्या सुरू आहे. अंतू बर्व्यावर टिप्पणी करताना पु. ल. म्हणतात, “मला नेहमी प्रश्न पडे की, या मंडळींची आदराची स्थाने कोणती? गावात ‘पंडित’ आला की त्याला ‘पढिक’ म्हणून उडव, बाजारात जाऊन पैशाचं लिंबू आणण्यास सांग, स्तंभाजवळच्या लायब्ररीत जाईल नि तिथे मागेल लिंबू. कुणाचा मुलगा प्रोफेसर झाला, हे ऐकल्यावर अंतूशेठ चटकन म्हणत, “सर्कशीत काय हो? पूर्वी एक छत्रे प्रोफेसर होता. कुणी नवे दुकान काढले, तर दिवाळ्याचा अर्ज आताच मागवून ठेव म्हणावं,” हा आशीर्वाद!”

 

जीवनाच्या कुठल्या तत्त्वज्ञानाचा अर्क ही मंडळी प्यायली आहेत. त्यातली निम्म्याहून अधिक माणसे मनिऑर्डरवर जगतात आणि त्यातले पैसे वाचवून दावे लढवतात. प्रत्येकाची तारीख पडलेली. विशाल सागरतीर आहे, नारळीची बने आहेत, पोफळीच्या बागा आहेत, सारे काही आहे, पण त्या उद्दात्ततेला दारिद्य्र विलक्षण छेद देऊन जाते आणि मग उठते एक भयाण विनोदाचे अभेद्य कवच.”

 

कशावरून तरी गांधींच्या गोष्टी निघाल्या. अंतूशेठनी आपले भाष्य सुरू केले. “अहो कसला गांधी? जगभर गेला, पण रत्नागिरीस फारसा आला नाही. पक्का तो! त्यास नेमकं ठाऊक, इथे त्याच्या पंचाचं कौतुक नाही नि दांडीचं नाही. आम्ही सगळेच पंचावाले नि त्याच्याहीपेक्षा उघडे! सुताबितात तथ्य नाही हो. आमचा शंभूशेठ जन्मभर जानव्याचं सूत काढीत आला. ब्रिटिश सरकार सोडा, पण रत्नागिरीचा गिलिगन कलेक्टरदेखील घाबरला नाही. तिसरं शस्त्र म्हणजे उपासाचं! इथे निम्मं कोकण उपाशी. नेहमी तुपाशी खाणार्‍यास उपाशी माणसाचं कौतुक, आम्हांस कसलं? नाही, माणूस असेल मोठा... पण, आमच्या हिशेबी त्याच्या मोठेपणाची नोंद करायची कुठल्या खात्यावर? आणि स्वराज्याचा म्हणावं तर संबंध गांधींशीही नाही, टिळकांशीही नाही नि सावरकरांशीही नाही.”

 

अंतू बर्व्याचे टिळक, गांधी, नेहरू, छत्रे, सावरकर यांच्या संबंधीचे उद्गार आणि राज ठाकरे यांचे मोदी आणि शाह यांच्याबद्दलचे उद्गार यात तिळमात्र फरक नाही. आपल्या भाषणात राज ठाकरे मोदींची जुनी भाषणे दाखवून त्यावर भाष्य करीत आहेत. कोणीतरी राज ठाकरे यांची जुनी भाषणे दाखवून तसाच उद्योग केला, तर तो ही एक नवा मनोरंजनाचा फड तयार होईल. परंतु, तेवढीही किंमत राज ठाकरेंना द्यावी, असे कोणाला वाटत नाही. अंतू बर्व्याचे बोलणे चार घटका मनोरंजनासाठी घ्यायचे असते, गांभीर्याने नाही, याची रत्नागिरीच्या लोकांना सवय झाली होती. आता महाराष्ट्रातील लोकांना राज ठाकरेंचा नवा अवतार पाहून ती सवय होईल. मात्र, अंतू बर्वा होण्यासाठी ‘फकीर’ आणि ‘बेफिकीर’ व्हावे लागते. राज ठाकरे सध्या ‘बेफिकीर’ होऊन वागत आहेत. मात्र, राजकीय ‘फकीर’ होण्याची वेळ आता फार दूर नाही.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@