सावधान : आयपीएलचे तिकिटे विकत घेताना जरा सांभाळून

    17-Apr-2019
Total Views |



मुंबई : सध्या आयपीएल २०१९चे वारे जोरात आहे. अशामध्ये मैदानाबाहेर बेटिंग आणि फसवेगिरीचे प्रकार सर्रास होत असतात. अशीच एक घटना सोमवारी झालेल्या मुंबई इंडियन्स विरूद्ध बेंगळुरू रॉयल चॅलेंजर सामन्यादरम्यान समोर आली. हा सामना पाहण्यासाठी आलेल्या ५४ क्रिकेट शौकिनांना सामन्याला मुकावे लागले. एवढेच नाही तर त्याबरोबर पोलिसांच्या चौकशीलादेखील सामोरे जावे लागले. या सर्वांनी आयपीएलची तिकिटे गैरमार्गाने, सवलतीमध्ये खरेदी केली. चौकशीत ही तिकिटे काही ऑनलाइन भामट्यांनी एका परदेशी नागरिकाच्या क्रेडिट कार्डचे क्लोनिंग करून खरेदी केल्याचे उघड झाले.

 

सायबर पोलिसांनी आकाश घोसालीया, केवल घोसालीया, मनीष मोनानी आणि विजय राजपूत या चौघांना मंगळवारी अटक केली. कॅनडातील नागरिकाच्या क्रेडिट कार्डचे तपशील चोरून क्लोनिंगद्वारे बनावट कार्ड तयार करून या सामन्याची ६८ तिकिटे खरेदी करण्यात आली. आपल्या क्रेडिट कार्डचा वापर झाल्याचे समजताच, या परदेशी नागरिकाने बँकेशी संपर्क साधला. सायबर पोलिसांनी गुन्हे शाखेच्या मदतीने सोमवारी संध्याकाळी वानखेडे स्टेडिअम गाठले. तिकिटांच्या तपशिलानुसार ६८ तिकिटांपैकी ५४ क्रिकेट शौकिनांना प्रवेशद्वारावरच ताब्यात घेण्यात आले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat