कास नवविचारांची...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Apr-2019   
Total Views |



सद्यस्थितीत कृषी व्यवसायाकडे ‘समस्यांचे अंगण’ म्हणून बघितले जाते. दुष्काळ, पाणीटंचाई, नापिकी, अवकाळी पाऊस, कमी हमीभाव, एकाच मालाचे अनेकांनी उत्पादन केल्याने कोसळणारे बाजारभाव, पाण्याची कमी असणारी उपलब्धता या व अशा सर्व बाबींमुळे कृषी व्यवसाय अडचणीत असल्याची ओरड आपण नेहमीच ऐकत असतो. कृषीमाल उत्पादनकामी केलेली गुंतवणूकदेखील मिळणार्‍या भावातून वसूल होत नसल्याने आणि त्यामुळे कर्जाचा डोंगर वाढल्याने शेतकरी आत्महत्यांच्या घटनादेखील घडत असतातमात्र, बळीराजाने नव्या विचारांची कास धरली आणि प्रयत्नांची पराकाष्ठा केली तर, त्याच शेतीतून नंदनवनदेखील फुलविता येते. याचे उदाहरण नाशिक जिल्ह्यातील बेळगाव कुर्‍हे येथील शेतकरी संजय बोराडे यांनी समाजासमोर ठेवले आहे. त्यांनी व त्याचे बंधू विजय बोराडे व पोपट बोराडे यांनी इगतपुरी तालुक्यातील अस्वली स्थानकाजवळ शेतात पॉलिहाऊसची उभारणी करत फुलशेती फुलविली आहे आणि या शेतीच्या माध्यमातून त्यांनी तब्बल २७ लाखांच्या घरात उत्पन्नदेखील प्राप्त केले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना नुकतेच घोटी मार्केट कमिटीमार्फत ‘लोकनेते गोपाळराव गुळवे कृषी पुरस्कार’ या मानाच्या पुरस्कारानेदेखील गौरविण्यात आले आहे. या फुलशेतीच्या माध्यमातून बोराडे बंधूंनी उत्तम प्रतीचा गुलाब फुलविला आहे. आजमितीस त्यांच्या उत्पादित गुलाबाचा सुगंध हा दिल्ली, हैदराबाद, पंजाब, राजस्थान यांसारख्या राज्यांत दरवळत आहे. त्यांच्या या निर्यातक्षम कृषी मालामुळे त्यांना या माध्यमातून अर्थार्जन प्राप्त झाले आहे. याबाबत बोलताना बोराडे बंधू सांगतात की, “जिल्ह्यातील दिंडोरी येथील प्रगतशील शेतकरी हिरामण शिंदे यांचे याकामी मार्गदर्शन मिळाले. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली गेल्या तीन वर्षांपासून या फुलशेतीच्या माध्यमातून उत्पादन घेत आहोत. या फुलशेतीच्या माध्यमातून ‘टॉप सिक्रेट’ या उच्च प्रतीच्या गुलाबाचे उत्पादन घेतले जाते. त्यानंतर तयार झालेला गुलाब थेट दिल्ली येथे निर्यात करण्यात येतो.” या फुलांसाठी त्यांनी आपले पॉलीहाऊस संपूर्ण अत्याधुनिक पद्धतीने बनविले आहे. बोराडे यांनी स्वतःच्या प्रगतीबरोबरच इतरांनाही रोजगार उपलब्ध करून दिल्याने समस्याग्रस्त शेतकर्‍यांनी नव्या विचारांची कास धरणे आवश्यक आहे.

 

जाणीव सामाजिकतेची

 

सामाजिक प्रश्न सोडविण्यासाठी केवळ त्यावर तासन्तास चर्चा, विचारमंथन किंवा बैठकांचे फड जमविणे अशा खूप कष्टदायी आणि अवघड उपायांची गरज नसते, असते ती केवळ कृतिशीलता नामक सहज साध्या व्यवहाराची गरज. मनातील जाणिवांना आपल्या कृतीची जोड देत सामाजिक प्रश्नांची उकल शोधण्याची दोन उदाहरणे अलीकडच्या काळात भारतात घडली. भारतात वैद्यकीय उपचारासाठी आवश्यक असणारी ७५ टक्क्यांपेक्षा जास्त उपकरणे आपण आयात करत असतो. त्यामुळे सरकारच्या अर्थनीतीचे गणितदेखील बिघडत असते. भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या संशोधकांनी अलीकडच्या काळात संशोधन करत या समस्यांचे समाधान शोधण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे गरजू रुग्णांवरील उपचारांचा भार कमी होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. या संस्थेच्या माध्यमातून अशी २० उपकरणे तयार करण्यात आली आहेत, ज्यांच्या किमती या आयात उपकरणांपेक्षा कितीतरी कमी आहेत. यात त्यांनी भारतीय बनावटीची स्टेंट, स्मार्ट स्टेथोस्कोप, डायबेटीस फुट स्क्रीनर, हाडाला मार लागल्यानंतर सामान्य माणसाला सहज करता येईल, अशी प्लास्टर पट्टी यांसारखी उपकरणाची निर्मिती केली आहे. यातील काही उपकरणांना ‘बायोटेक्नॉलॉजी इग्निशन’ ग्रांट यांच्यातर्फे पन्नास लाखांचे अनुदानदेखील घोषित झाले आहे. ही उपकरणे आगामी काळात बाजारपेठेत दाखल होणार आहेत. पाण्याचे कमी प्रमाण लक्षात घेत पाण्याचा होणारा अपव्यय आपण सर्वांनीच टाळावयास हवा, यात दुमत नाहीच. मात्र, केवळ चर्चा आणि उपदेश करून पाणीबचत होणार नाही. यासाठी पुणे येथील युवकानेदेखील आपल्या याच कार्याला कृतिशिलतेची जोड देत पाणी वाचविण्याचा आदर्श आपल्यासमोर उभा केला आहे. कार धुण्यासाठी शेकडो लिटर पाण्याची नासाडी केली जाते. मात्र, औषध फवारणीच्या पंपाचा वापर कार धुण्यासाठी केला तर केवळ तीन ते चार लिटर पाण्यात कार स्वच्छ धुता येते, हे या युवकाने सप्रमाण दाखवून दिले आहे. म्हणजेच सोळा लिटर क्षमता असणार्‍या फवारणी यंत्राची टाकी एकदा भरल्यास कमाल आठ दिवस तेच पाणी कार धुण्यासाठी वापरता येणे सहज शक्य आहे. या दोन्ही उदाहरणांनी मानवी जीवनाशी निगडित असणारे वैद्यकीय आणि पाण्यासंबंधी प्रश्नांची सोडवणूक करण्याचा प्रयत्न केला आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@