निर्भिड पत्रकारितेचा सन्मान

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Apr-2019   
Total Views |


जगभरात माध्यमांवर असे अनेक भ्याड हल्ले झाले. पण, असा क्रूर हल्ला यापूर्वी माध्यमांनी, जगानेही कधी पाहिला नव्हता आणि परवा याच वृत्तपत्राला वृत्तांकन आणि पत्रकारांनी दाखवलेल्या धाडसासाठी अमेरिकेच्या प्रतिष्ठित ‘पुलित्झर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.


दि. २९ जून २०१८... ’कॅपिटल गॅझेट’ या वृत्तपत्राचे कार्यालय अगदी नेहमीप्रमाणे गजबजलेले. साधारण १७० कर्मचारी या वृत्तपत्राच्या इमारतीमधील आपल्या प्रशस्त कार्यालयात दैनंदिन कामात व्यस्त होते. संपादकीय विभागाची मजकुराच्या जुळवाजुळवीची लगबगही सुरुच होती. सगळे कर्मचारी अगदी निर्धास्तपणे आपापली कामे पार पाडत होते. तेवढ्यात अचानक बंदुकीच्या फैरींचे मोठे आवाज कानावर धडकले. कर्मचार्‍यांची एकच धावपळ उडाली. नेमकं काय झालं, हे कोणालाच समजत नव्हतं. पण, आपण मरणाच्या दारात उभे आहोत, हे या कर्मचार्‍यांना कळून चुकलं होतं. त्यामुळे जो तो आपला जीव वाचवण्यासाठी सुरक्षित ठिकाण शोधू लागला. गोळ्यांच्या फैरी काही थांबत नव्हत्या. आक्रोशाचे ते आर्त स्वर रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडलेल्या त्या निर्दोष देहांमध्ये कुठे तरी विरुन गेले होते. माध्यमांवर झालेला हा काही पहिला निर्घृण हल्ला नाही. जगभरात माध्यमांवर असे अनेक भ्याड हल्ले झाले. पण, असा क्रूर हल्ला यापूर्वी माध्यमांनी, जगानेही कधी पाहिला नव्हता आणि परवा याच वृत्तपत्राला वृत्तांकन आणि पत्रकारांनी दाखवलेल्या धाडसासाठी अमेरिकेच्या प्रतिष्ठित ‘पुलित्झर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

 

अमेरिकेतील एनापोलीस राज्याची राजधानी असलेल्या मेरीलँडमध्ये ’कॅपिटल गॅझेट’ या वृत्तपत्राची चारमजली इमारत. माध्यमजगतातील अत्यंत प्रतिष्ठेचा ‘पुलित्झर’ पुरस्कार प्राप्त झाला असला तरी या वृत्तपत्राने त्याचा आनंद साजरा केला नाही. आपल्या कार्यालयात अंदाधुंद गोळीबार होतो आणि यात पाच कर्मचार्‍यांना आपला जीव गमवावा लागतो आणि याच घटनेच्या वृत्तांकनासाठी अमेरिकेतील प्रतिष्ठित असा पुरस्कार मिळतो, यात आनंद कसला? पण, इतका क्रूर हल्ला होऊनही ‘कॅपिटल गॅझेट‘ने धिटाई दाखवत दुसर्‍या दिवशी आपल्या निर्धारित वेळेत वृत्तपत्र प्रकाशित केलेच. ‘कॅपिटल’च्या याच धाडसाचे कौतुक नंतर जगभरात केले गेलेपण, नेमका ‘कॅपिटल’वर हल्ला का झाला, याची पार्श्वभूमी जाणून घेणेही गरजेचे आहे. जॅरोड वॉरेन रामोस याचा एका महिलेसोबतचा फेसबुकवरील संवाद ‘कॅपिटल’ने २०१२ साली प्रकाशित केला होता. यावरून रामोस प्रचंड संतापला व त्याने ‘कॅपिटल गॅझेट’ व पत्रकार थॉमस हार्टले विरोधात अब्रूनुकसानीचा दावा ठोकला. यात त्याला यश आले नाही. न्यायालयाने रामोसचा अब्रूनुकसानीचा दावा फेटाळत उलट त्यालाच शिक्षा सुनावली होती.

२०१७ साली तो शिक्षा भोगून बाहेर आला आणि सूडाच्या भावनेने ‘कॅपिटल’ला अद्दल घडवायची त्याने ठरवले आणि अखेर २७ जून, २०१८ रोजी त्याने ‘कॅपिटल’च्या कार्यालयावर बेछूट गोळीबार केला. यात जॉन मॅकनामारा, वेंडी विंटर्स, रेबेका स्मिथ, गेराल्ड फिचमॅन आणि रॉब हियासेन या ‘कॅपिटल’च्या पाच शिलेदारांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ‘कॅपिटल गॅझेट’ने हा पुरस्कार मृत्युमुखी पडलेल्या आपल्या सहकार्‍यांना अर्पण करत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. १ लाख डॉलर्स आणि प्रशस्तिपत्रक या वृत्तपत्राला पुरस्कारस्वरुप देण्यात येणार आहे. ‘कॅपिटल गॅझेट‘ला हा पुरस्कार जाहीर करताना, अमेरिकेच्या इतिहासात पत्रकारांवरील सर्वात क्रूर हल्ल्यांपैकी एक असलेल्या या प्रकरणात स्वतःचे वृत्तांकन आणि धाडसासाठी हा विशेष पुरस्कार जाहीर करण्यात आला असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले.

प्रतिष्ठित ‘पुलित्झर’ पुरस्कारांमध्ये ‘कॅपिटल गॅझेट’सोबतच अन्य वृत्तपत्रांनाही हा पुरस्कार जाहीर झाला आहे. यामध्ये अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी संबंधित शोध पत्रकारितेसाठी ‘न्यूयॉर्क टाइम्स’ आणि ‘वॉल स्ट्रीट जर्नल’ला हा पुरस्कार मिळाला आहे. ट्रम्प यांच्या करचोरीबद्दल करण्यात आलेल्या वृत्तांकनासाठी आणि संपादकीय लेखनासाठी असे दोन पुरस्कार ‘न्यूयॉर्क टाइम्स’ला मिळाले आहेत. ट्रम्प यांच्याशी संबंधित दोन महिलांना गप्प बसण्यासाठी पैसे पुरवलेल्या प्रकरणाची ‘वॉल स्ट्रीट जर्नल’ने पोलखोल केली होती. येमेनमधील छायावृत्तांकन तसेच टीकात्मक वृत्तांकनाकरिता ‘वॉशिंग्टन पोस्ट’ला दोन पुरस्कार मिळाले आहेत, तर ‘पिटसबर्ग पोस्ट-गॅजेट’ला पेन्सिल्वेनियामध्ये एका ज्यू प्रार्थनास्थळावर ऑक्टोबरमध्ये झालेल्या हल्ल्याच्या वृत्तांकनासाठी ‘ब्रेकिंग न्यूज’ पुरस्कार मिळाला आहे. दक्षिण फ्लोरिडाच्या ‘सन सेंटिनल’ने फेब्रुवारी २०१८ मध्ये एका शाळेत झालेल्या गोळीबाराच्या वृत्तांकनासाठी ‘पुलित्झर’ पटकावला आहे. या हल्ल्यात १७ जण मृत्यमुखी पडले होते. या वृत्तपत्राला सार्वजनिक सेवा श्रेणीतील पुरस्कार मिळाला आहे. त्यामुळे पत्रकारितेसाठी आपले सर्वस्व पणाला लावणार्‍या पत्रकारांचा हा खरा सन्मान आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.


माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@