
शरद पवार, राज ठाकरे, पराभवाच्या भीतीने दुसर्या मतदारसंघात पलायन करणारे राहुल गांधी, काश्मिरींच्या कित्येक पिढ्या बरबाद करणार्या फारुख अब्दुल्ला यांचे नाव अग्रक्रमाने घ्यायला हवे. प्रचाराचे वातावरण जसजसे तापू लागले, तसतसे या मंडळींच्या तोंडातून खोटारडेपणाचे, विद्वेषाचे, असूयेचे, देशविरोधाची गरळ बाहेर पडू लागली.
काही माणसे सडकी वृत्ती आणि कुजकी बुद्धी घेऊनच जन्माला येतात. त्यात जातीयतेच्या विखाराची, व्यक्तिगत स्वार्थाची, देशविरोधाची भर पडली की, ही माणसे वाट्टेल ते बडबडत सुटतात. देशात सध्या लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून जनतेचे मत आपल्याच झोळीत पाडण्यासाठी तसेच विरोधी पक्षाला आस्मान दाखविण्यासाठी राजकीय नेते कोणत्याही थराला जाताना दिसतात. अशा ताल सोडून बरळणार्यांत नाव ‘राष्ट्रवादी’ असले तरी ‘भ्रष्टवादी’ झालेल्या पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार, उमेदवार नसलेल्या सेनेचे सेनापती राज ठाकरे, पराभवाच्या भीतीने दुसर्या मतदारसंघात पलायन करणारे राहुल गांधी, काश्मिरींच्या कित्येक पिढ्या बरबाद करणार्या फारुख अब्दुल्ला यांचे नाव अग्रक्रमाने घ्यायला हवे. प्रचाराचे वातावरण जसजसे तापू लागले, तसतसे या मंडळींच्या तोंडातून खोटारडेपणाचे, विद्वेषाचे, असूयेचे, देशविरोधाची गरळ बाहेर पडू लागली. तत्कालीन संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी राफेल खरेदी व्यवहारात घोटाळा झाल्यानेच गोव्यात परतण्याचा निर्णय घेतला, असे वक्तव्य शरद पवारांनी नुकतेच केले.
शरद पवारांच्या या विधानावरून हा मृत व्यक्तीच्या टाळूवरील लोण्याचा वापर करून आपल्या सत्तेची खिचडी शिजवण्याचाच प्रकार असल्याचे स्पष्ट होते. तसेही पवारांनी कोणाकोणाला कसकसे वापरून घेतले, त्याचीही कितीतरी उदाहरणे आहेत. यशवंतराव चव्हाणांपासून लोकांना वापरण्याचा कुटील डाव खेळत आलेल्या पवारांनी सध्या दादरच्या पोपटाचाही ताबा घेतला आहेच की! मात्र, व्यक्तीच्या मृत्युनंतर, ती व्यक्ती आपली बाजू मांडायला हयात नसताना अशाप्रकारे एखाद्या घटनेचा सत्तेचा सोपान चढण्यासाठी आधार घेणे, यातून शरद पवारांची माणुसकीहीन वृत्तीच दिसून येते. आज पर्रिकरांशी संबंधित प्रसंगातून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आरोप करणारे शरद पवार, मनोहर पर्रिकर काळाशी झुंजत असताना त्यांना कधी भेटायला गेले नाहीत की, पवारांनी त्यांची साधी विचारपूसही केली नाही. पण, स्वतःच्या स्वार्थाशिवाय दुसरे काहीही साध्य न करण्याचा बाणा अंगी रुजवणार्या पवारांना आता लगेच पर्रिकर आठवले, पवारांना त्यांच्या गोव्यात परतण्याच्या निर्णयावर भाष्य करावेसे वाटले. हे कसले लक्षण? मनोहर पर्रिकरांचे पुत्र उत्पल पर्रिकर यांनी शरद पवारांच्या याच वागण्यावर बोट ठेवत तुम्ही राजकीय चिखलफेकीसाठीच माझ्या वडिलांचे नाव घेत असल्याचे रोखठोकपणे सांगितले, ते खरेच.
दुसर्या बाजूला शरद पवारदेखील काही काळ देशाच्या संरक्षणमंत्रिपदी राहिले होतेच. मात्र, स्वतः संरक्षणमंत्री असताना शरद पवार कधी काही बोलले नाहीत, कितीतरी विषय भाष्य न करताच त्यांनी सोडूनही दिले. तेच पवार आज जर राफेल व्यवहारावरून मोदींवर टीका करण्यासाठी पर्रिकरांच्या कृतीचा उपयोग करून घेत असतील तर, हा जाणत्या की खणत्या राजाचा दुसर्याचे पाहावे वाकूनचाच उद्योग म्हटला पाहिजे. महाराष्ट्रात शरद पवारांइतका सुसंस्कृत नेता दुसरा कोणीही नसल्याच्या झांजा वाजवणारा एक गट आहे, त्यांनी पवारांचे हे अधःपतन नक्कीच पाहावे.
वाचाळवीरांच्या माळेतला आणखी एक फुटका मणी म्हणजे महा‘राष्ट्रवादी’ नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे. ज्या इसमाला स्वतःच्या पक्षासाठी, उमेदवारांसाठी मते मागताना जनतेने धूप घातली नाही, तो माणूस आज केवळ मोदी-शाह द्वेषासाठी बारामतीसम्राटांच्या इशार्यावर तोंड चालवताना दिसतो. फेक न्यूज किंवा व्हॉट्सअॅप विद्यापीठातून बाहेर पडलेल्या खोटारडेपणाचा आधार घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्यावर बेछूट आरोपबाजी करण्याचा खेळ सध्या राज ठाकरेंनी चालवल्याचे दिसते. पूर्वी ‘बहुरंगी, बहुढंगी’ अशा शब्दांत गावोगावच्या यात्रा-उत्सवांत, आठवडी बाजारात तमाशाची जाहिरात केली जायची, तशीच अवस्था सध्या राज ठाकरेंच्या सभेची झालेली पाहायला मिळते. पक्षाचे खेळणे आणि खुळखुळा केलेल्या राज ठाकरेंच्या सभेत मिमिक्री, नकला, ऑडिओ-व्हिडिओचा मालमसाला अशा सगळ्याच गोष्टी असतात, अर्थातच मुद्दे सोडून.
परिणामी, मोदींच्या कथित भ्रष्टाचाराबद्दल कितीही आरडाओरडा केला तरी राज ठाकरेंना कोणी गांभीर्याने घेत नाही, सर्वत्र त्यांची खिल्लीच उडवली जाते. अर्थात, स्वतःच्या काकांशी एकनिष्ठ न राहता दुसर्याच्या काकांचा प्रचार करणार्यांची अशीच अवस्था होणार म्हणा! आज ज्या पोटतिडकीने की नोटाबंदीनंतरच्या कडकीने, राज ठाकरे बोलतात, तितकेच कष्ट स्वतःच्या पक्षबांधणीसाठी घेतले असते तर मनसेचा एखादा का होईना शिलेदार नक्कीच उभा करता आला असता. परंतु, ते जमत नसल्याने राज ठाकरेंना सध्या शरद पवारांच्या आदेशावर कठपुतळीसारखे नाचावे लागते. म्हणूनच राज ठाकरे कितीही ‘मोदी-शाह हटाव’ म्हणत असले तरी त्यांची खरी भूमिका ‘राष्ट्रवादी-काँग्रेस बचाव’ हीच असल्याचे स्पष्ट होते. आता निवडणूक आयोगानेच एकही पक्ष निवडणुकीत उभा न करणार्या राज ठाकरेंकडून सभांच्या खर्चाचा हिशोब मागावा अथवा राष्ट्रवादी-काँग्रेसच्या खर्चात वर्ग करावा. सोबतच राज ठाकरे मोदींना ‘हिटलर’ म्हणताना दिसतात. परंतु, जगातल्या कोणत्याही देशाने हिटलरचा कधी आपला सर्वोच्च पुरस्कार देऊन गौरव केल्याचा दाखला नाही. मोदींना मात्र रशिया, संयुक्त अरब अमिराती, दक्षिण कोरिया, अफगाणिस्तान, संयुक्त राष्ट्रसंघ, सौदी अरेबियाने आपले सर्वोच्च सन्मान जाहीर केले. तेव्हा राज ठाकरेंनी द्वेषाचा चष्मा बाजूला करून वास्तवाची माहिती करून घ्यावी, तेच त्यांच्या आणि पक्षाच्याही हिताचे राहिल.
शरद पवार आणि राज ठाकरे राज्यात इकडे-तिकडे बेतालपणा करत भटकत असतानाच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी तरी कसे मागे राहतील? सांगण्यासारखे काहीही नसल्याने आणि लपवण्यासारखे कितीतरी असल्याने जनतेचे लक्ष महत्त्वाच्या मुद्द्यांवरून वळवण्यासाठी राहुल गांधींनी राफेल लढाऊ विमानांच्या खरेदी व्यवहारावर सुरुवातीपासूनच आरोपबाजी चालवली. एकीकडे आईसोबत स्वतःचेही पाय नॅशनल हेराल्ड अन् ऑगस्टा वेस्टलॅण्ड हेलिकॉप्टर घोटाळ्यात रुतले असताना त्यावरून लक्ष विचलित करण्यासाठी राहुलनी राफेलचा आडोसा घेण्याचे ठरवले. काही दिवसांपूर्वी नेहरू-गांधी घराण्याशी कसलेतरी संबंध बाळगून असलेल्यांनी राफेलविषयक कागदपत्रांचा निवडक भाग प्रसिद्ध करत चिवडाचिवड केली. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेल्यानंतर बाहेर गेलेल्या कागदपत्रांआधारे सुनावणी घेण्यास न्यायालयाने मान्यता दिली. तेव्हाच हर्षवायू झालेल्या राहुलचे भान हरपले व न्यायालयानेदेखील ‘चौकीदार चोर है, चौकीदार चोर है’ ला मान्यता दिल्याचे त्यांनी खपवले. परंतु, न्यायालयाने पंतप्रधानांवर अशी कोणतीही टिप्पणी केलेली नसल्याने व राहुल गांधी स्वतःचे वाक्य न्यायालयाच्या तोंडी कोंबत असल्याचे दिसल्याने सर्वोच्च न्यायालयाने कालच त्यांना झटका दिला. खोटे बोलणे, दरडावून बोलणे आणि सातत्याने बोलण्याच्या कृतीतून मोदींसारख्या देशनिष्ठ व्यक्तीविरोधात भ्रष्टाचाराची धुळवड उडविणार्या राहुल गांधींनी आपल्या विधानांतून न्यायालयाचाच अवमान केला. आता याप्रकरणी पुढील सुनावणीत आरोप सिद्ध झाले की, सहा महिने कारावास किंवा आर्थिक दंड अथवा दोन्ही शिक्षा एकत्रितरित्या राहुल गांधींना नक्कीच भोगाव्या लागतील.
दुसर्यासाठी खड्डा खणायचा प्रयत्न केला की, माणूस स्वतःच त्यात कसा अडकतो, पडतो सांगणारे हे जितेजागते उदाहरणच. आणखी एक असेच बोलके पात्र म्हणजे देशात राहूनही देशाबाहेरच्यांशी आत्मीयता बाळगणारे फारुख अब्दुल्ला. सत्तेवर असले की, केंद्र सरकारशी गुलुगुलु करायचे आणि सत्तेतून पायउतार झाले की, राज्यघटनेशी, सैन्यदलांशी फटकून वागत देशविघातक वक्तव्ये करायची, काश्मिरी जनतेला भावनिक मुद्द्यांच्याआधारे भडकवायचे, ही अब्दुल्लांची खासियत. आता ते म्हणाले की, “आम्हाला जर भारत तोडायचा असता तर भारत राहिलाच नसता.” म्हणजे यांच्यामते देश एकसंध राहिला तो आमच्यामुळे अन् आम्ही मनात आणले तर देशाचेही तुकडे करू, असेच ना! परंतु, अब्दुल्लांनी एक लक्षात ठेवावे की, भारत किंवा काश्मीर अब्दुल्ला कुटुंबीयांच्या ‘रहमो-करम’वर अखंड नाही, तर इथल्या जनतेच्याच मनात एकतेची उत्कट भावना आहे, म्हणूनच तो एक देश आहे. अब्दुल्लांनी त्याचे श्रेय घेऊ नये. परंतु, ते घेणारच, कारण निवडणुका आल्यावरच तर, असल्या वाचाळवीरांचा खरा मोसम सुरू होतो ना! ते टिवटिव करतच राहणार, अर्थात तरीही शरद पवार असो वा राज ठाकरे वा राहुल गांधी, मतदार मात्र देशहित डोळ्यासमोर ठेऊनच मतदान करणार, यात कसलाही किंतु-परंतु नाही!
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat