अपना टाईम आयेगा...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Apr-2019   
Total Views |




वर्षा गांगुर्डे या मुंबई महानगरपालिकेमधील ‘बी’वॉर्डपासून ‘एल’ वॉर्डपर्यंतच्या महानगरपालिकांच्या ९५ शाळेच्या बिट ऑफिसर म्हणून काम करतात. इथपर्यंतचे त्यांचे जगणे म्हणजे परिस्थितीवर मात करण्याचे एक प्रेरणादायी वास्तव आहे.

 

नशिबाच्या पुढे काय असते माय?

उत्तर आले त्या पल्याडही

साता जन्मीचं दु:खच असतं माय...

 

शोषित-वंचित समाजातील स्त्रियांच्या जगण्याचे संदर्भ यापलीकडे काही असतील का? या विचाराला छेद देत महानगरपालिकेच्या बिट ऑफिसर वर्षा गांगुर्डेंचे जगणे आहे. मूळ चांदवड नाशिकचे, पण साखर कारखान्यामध्ये सुरक्षा रक्षकाच्या नोकरीमुळे श्रीरामपूरला स्थायिक झालेल्या भाऊसाहेब जाधव आणि शोभा यांना पाच मुले. त्यातली दुसरी मुलगी वर्षा. भाऊसाहेब यांना २५ रुपये पगार. त्यात व्यसन तर पाचवीला पुजलेले. शोभाबाई सकाळी ८ ते संध्याकाळी ७ पर्यंत मजुरी करायच्या, तेव्हा कुठे दिवसाला एक रुपया मिळायचा. वर्षा यांना त्यावेळी तिच्यापेक्षा लहान भावंडांना सांभाळावे लागे. यातच त्यांना पहिलीला शाळेत टाकले. पण पाटी-पेन्सिल घ्यायला पैसे नव्हते. पाटी-पेन्सिल नाही म्हणून शिक्षकांचा मार पडे. शाळेत एक मुलगी हौसेने दोन पाट्या घेऊन यायची. तिला विनवणी करून वर्षा ती पाटी वापरत असत. पण, त्यासाठीची लाचारी शब्दातीत असे. उपाशी-तापाशी कष्टाचे काम करून शोभाबाई गंभीर आजारी झाल्या. यामुळे दोन दिवस घरात चूल पेटलीच नाही. त्यावेळी चौथीला शिकत असलेल्या वर्षा यांनी निर्णय घेतला की, आपण मोलमजुरी करायची. रस्त्यासाठी लागणारी खडी भरण्याचे आणि उचलण्याचे काम त्या करू लागल्या.

 

कोवळे वय, रणरणते ऊन आणि असंख्य जबाबदार्‍या. इतके करूनही दिवसाला एक भाकरी मिळणे मुश्किल. पुढे त्यांच्या आईंचा आजार बरा झाल्यावर शिक्षणासाठी त्या आणि त्यांची बहीण नाशिकला गेल्या. खाजगी वसतिगृहात त्या राहत होत्या. त्यांना आणि त्यांच्या बहिणीला घालायला कपडे म्हणून शाळेचा ड्रेस. सकाळपासून तो ड्रेस घालायचा. रात्री झोपण्याआधी धुवायचा. वाळवायचा. तोपर्यंत अंगावर टॉवेल घेऊन राहायचे. त्यातच ड्रेसला उवा लागल्या. ते दिवस भयंकर होते. पुढे आठवीनंतर घरची परिस्थिती अतिशय गंभीर झाली. शिक्षण सोडण्याशिवाय गत्यंतर नव्हते. मात्र, वर्षा यांना शिकायचे होते. त्यांचे मामा शिकलेले आणि त्यामुळे सधन परिस्थितीतले. वर्षांना वाटे आपणही शिकलो तर परिस्थिती पालटेल. त्यांनी मामाला सांगितले की, “मी सगळं काम करीन, मला तुझ्याकडे ने.” त्या मामाकडे खेलदरी चांदवडला आल्या.

 

नववीलावर्गात पाऊल टाकले आणि काही जण त्यांना बघून हसायला लागले, काहींनी नाक मुरडले, काहींच्या कपाळावर आठ्या पडल्या. कारण, वर्षा यांचे कपडे मोजता येणार नाही इतक्या जागी फाटलेले आणि शिवलेले. पहिल्या दिवसाचे स्वागत असे झाले. पण, तरीही शिकायचे तर होतेच. घरी पूर्ण काम आणि शनिवार, रविवार शेतमजुरी करणे हा त्यांचा नित्यक्रमच. दहावीचा शुभेच्छा समारंभ वर्षा यांना अजूनही आठवतो. शुभेच्छा समारंभासाठीचे दोन रुपये नव्हते म्हणून, पण त्या दिवशी त्या शाळेत गेल्या नाहीत. पुस्तकं नाहीत, वह्या नाहीत. दुसर्‍यांकडे हाजी-हाजी करून एका दिवसाच्या बोलीवर पुस्तक आणून त्यांनी अभ्यास केला. दहावीचा निकाल लागला आणि त्या शाळेतल्या फक्त दोनच विद्यार्थिनीच उत्तीर्ण झाल्या होत्या. त्यामध्ये एक वर्षा होत्या.

 

इथे श्रीरामपूरला साखर कारखाना बंद पडला, वडिलांची नोकरी गेली. त्यातच त्यांना क्षयरोग झाला. चारही बाजूंनी कोंडी झाली होती. शोभाबाई पती मुलांना घेऊन माहेरी आसर्‍याला आल्या. पण, माहेरच्यांनी घराची दारे बंद केली. शेवटी गावाच्या चावडीमध्ये शोभाबाई परिवारासह राहू लागल्या. अन्न-पाणी तर सोडाच सगळे जिणे उघड्यावर. वर्षा यांना शिकायचे होते. त्यांनी नाशिकच्या मामाकडे शिक्षणासाठी विनवण्या केल्या. तिथे त्या सगळे घर सांभाळून बारावी विशेष श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाल्या. पण, हाल मात्र संपत नव्हते. गरीब, लाचार, गरजू मुलगी म्हणून २४ तास हरकामी नोकरापेक्षा तिची स्थिती वेगळी नव्हती. वर्षा मग पुढील शिक्षणासाठी सरकारी वसतिगृहामध्ये गेल्या. कला शाखेची पदवी त्यांनी संपादन केली.

 

तोपर्यंत परिस्थिती तीच, तशीच. त्यानंतर मुलुंडच्या संतोष गांगुर्डेंसोबत त्यांचा विवाह झाला. संतोष एका कंपनीमध्ये कामाला. वर्षांच्या लग्नाला माहेरी घरी विष खायलाही पैसे नव्हते. त्यामुळे दूरच्या नात्यातल्या एका बहिणीचे वापरलेले आणि टाकून दिलेेले खोटे मंगळसूत्र वर्षांना घालावे लागले. कारण, मंगळसूत्र माहेरचे असते. पुढे पती संतोष यांनी त्यांना साथ दिली. मात्र, मुलुंडच्या १० बाय १० च्या झोपडपट्टीत दोन जावांच्या संसारामध्ये त्यांचा संसार चालवावा लागला. जी माहेरची परिस्थिती तीच सासरची. वर्षांना वाटले, शिकून आपली परिस्थिती पालटायची होती. पण, आपली परिस्थिती तर तीच आहे. त्यांनी पतीच्या सहकार्याने सिन्नरला बी.एडला प्रवेश मिळवला. तिथे काही मुलींसोबत भाड्याने रूम घेऊन शिक्षण पूर्ण केले. घरी परतल्यावर शिक्षकी पेशातल्या छोट्या-मोठ्या नोकर्‍या केल्या. तीन वर्षे तर मुंबई-विक्रमगड असाही प्रवास केला. दरम्यान, दोन मुले झाली. आयुष्यात स्वस्थता नव्हतीच.

 

अशातच महानगरपालिकेमध्ये बिट ऑफिसरची भरती निघाली. वर्षा यांना वाटले, आपले नशीब फुटके आहे. नोकरी मिळणारच नाही. पण संतोष यांनी धीर दिला. वर्षा बिट ऑफिसर म्हणून आज कार्यरत आहेत.शाळेत पाटी न मिळालेल्या वर्षा आज महानगरपालिकेच्या ९५ शाळेच्या विद्यार्थ्यांना शिकवणार्‍या शिक्षकांसाठी काम करतात. वर्षा म्हणतात, “मला वाटते कोणीही कधीही परिस्थिती समोर हात टेकू नये. प्रतिकूल परिस्थितीमध्येही मनात एक आशा ठेवावी अपना टाईम आयेगा...”

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@