कौशल्याधारित प्रशिक्षण देणारे ‘बेजॉन देसाई फाऊंडेशन’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Apr-2019   
Total Views |



सशक्त भारत निर्माणासाठी कौशल्याधारित शिक्षण व प्रशिक्षण याची शालेय स्तरावर गरज असल्याने हे कार्य केले जात आहे. शाळाबाह्य मुले बेरोजगार होऊ नयेत आणि भारताची सक्षम असणारी शक्ती ही बेरोजगारीच्या विळख्यात सापडून ती लोप पाऊ नये यासाठी फाऊंडेशनद्वारे या कार्याची संकल्पना राबविली जात आहे.


आजचे आधुनिक युग हे माहिती-तंत्रज्ञानाचे युग म्हणून संबोधले जाते. अशा गतिमान युगात व्यक्ती स्वतःच्या पायावर उभी राहणे, ही काळाची गरज आहे. समाजातील गोरगरीब विद्यार्थ्यांना त्यांच्या शालेय जीवनातच कौशल्याधारित प्रशिक्षण देण्याचे कार्य नाशिक येथील ‘बेजॉन देसाई फाऊंडेशन’च्या माध्यमातून करण्यात येत आहे. येथील युनिक स्किल डेव्हलपमेंट सेंटर हा ‘बेजॉन देसाई फाऊंडेशन’ पुरस्कृत उपक्रम आहे. या माध्यमातून उद्योगांचे प्रशिक्षण आजमितीस उपलब्ध करून देण्यात येत आहे. याबाबत या फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अश्विनीकुमार भारद्वाज यांच्याशी बातचीत केली असता त्यांनी सांगितले की, “शालेय जीवनात व्यवसायाभिमुख प्रशिक्षण विद्यार्थ्यांना द्यायला हवे आणि ही काळाची गरज असल्याने आम्ही हा उपक्रम सुरू केला. फाऊंडेशनच्या माध्यमातून इयत्ता सातवीच्या पुढील विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात येते. तसेच, जेथे गरीब विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, अशा महापालिका शाळा, शासकीय आश्रमशाळा, जिल्हा परिषद शाळा यामधील शाळाबाह्य विद्यार्थ्यांना कौशल्यावर आधारित प्रशिक्षण व शिक्षण देण्याच्या हेतूने सन २०१६ मध्ये हा उपक्रम सुरू करण्यात आला. सुरुवातीला कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून नाशिक येथील धनलक्ष्मी शाळेत १६२ विद्यार्थ्यांना बेसिक इलेक्ट्रिकल वायरिंग, मोबाईल रिपेरिंग यांचे प्रशिक्षण देण्यात आले.” या उपक्रमाचे फलित म्हणून या विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास, निर्णयक्षमता, सृजनशीलता वाढीस लागल्याचे फाऊंडेशनच्या निदर्शनास आले. त्यानंतर अजून विद्यार्थी शिक्षित करावे, असे वाटू लागले. त्यातून फाऊंडेशनने स्वतःचे कौशल्याधारित प्रशिक्षण केंद्र उभे करावे, असा विचार समोर आला. तसेच ते केंद्र अद्ययावत असावे हा ध्यास होता. तसेच, या अद्ययावत केंद्रात जास्तीत जास्त कौशल्यावर आधारित उपक्रम राबविले जावे, ही मनीषा फाऊंडेशनची होती.

 

त्यानुसार आजमितीस फाऊंडेशनच्या माध्यमातून यूएसडीसीद्वारे २६ प्रकारचे विविध कोर्सेस चालविले जातात. त्यात मुखत्वे सीएनसी ऑपरेटिंग, लेथ, ऑटोमोबाईल, टू व्हीलर फॉर व्हिलर, मेकॅनिकल, औद्योगिकी व गृहोपयोगी असे इलेक्ट्रिकल कोर्स, एसी व रेफ्रिजरेशन कोर्स, बेसिक आणि अ‍ॅडव्हान्स ड्रेस डिझायनिंग, ज्वेलरी मेकिंग, कॉम्प्युटर हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर कोर्स यांचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. फाऊंडेशनच्या मदतीने शैक्षणिक वर्ष २०१८-१९ मध्ये ६०० च्या जवळपास विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. लेव्हल वन ते लेव्हल थ्री दर्जाचे प्रशिक्षण यात समाविष्ट आहे. नाशिक जिल्ह्यातील जाखोरी, त्र्यंबकेश्वर, वणी, सुरगाणा आदी वनवासी भागातील व शहरी भागात रचना ट्रस्ट, पुणे विद्यार्थीगृह , मानवधन आदी भागांतील विद्यार्थी आजमितीस फाऊंडेशनच्या माध्यमातून प्रशिक्षण घेत आहेत. तसेच, ज्यांना या केंद्रावर येणे सोयीचे ठरत नाही, त्यांच्यासाठी डांग सेवा संचालित ठक्कर बाप्पा शाळा, आंबेगण, पेठ येथे इलेक्ट्रिकल वायरिंग, मोबाईल रिपेरिंग, बेसिक कॉम्प्युटर, शिवणकाम असे चार कोर्स चालू करण्यात आले आहेत. आजमितीस १३२ विद्यार्थी त्याचा लाभ घेत आहेत. तसेच, शैक्षणिक वर्ष २०१९-२० मध्ये अजून दोन शाळांना कौशल्य विकासाच्या दारी नेण्यात येणार आहे. त्या शाळा वनवासी पाड्यावर अतिदुर्गम भागात आहेत. सुळे व वारे येथील भागात हे केंद्र सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे तेथील विद्यार्थ्यांना कौशल्याधारित प्रशिक्षण उपलब्ध होणार आहे. या माध्यमातून वनवासी भागातील विद्यार्थ्यांनादेखील आपल्यातील कौशल्याला प्रशिक्षणाची जोड देण्याची संधी उपलब्ध होणार असून त्यामुळे या अतिदुर्गम भागातील विद्यार्थीदेखील स्वतःच्या पायावर उभे राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

 

या सर्व कार्याच्या मागे केंद्राचा उद्देश हा केवळ भारताच्या तरुण पिढीला आणि भारताच्या भविष्याला आत्मविश्वासपूर्ण आणि स्वावलंबी बनविणे, हाच आहे. विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षणाचे ध्येय बाळगत ते जरूर घ्यावे, असेही डॉ. भारद्वाज सांगतात. मात्र, काही परिस्थितीजन्य घटकांमुळे समाजातील काही विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेता न आल्यास या माध्यमातून स्वतःच्या पायावर उभे करण्याचा फाऊंडेशनचा प्रामाणिक प्रयत्न असल्याचे त्यांच्या कार्याच्या माध्यमातून दिसून येते. भविष्यात शासकीय आदिवासी शाळांसमवेतदेखील अशाच प्रकारचे प्रकल्प राबविण्याचा मानस फाऊंडेशनचा आहे. सशक्त भारत निर्माणासाठी कौशल्याधारित शिक्षण व प्रशिक्षण याची शालेय स्तरावर गरज असल्याने हे कार्य केले जात आहे. शाळाबाह्य मुले बेरोजगार होऊ नयेत आणि भारताची सक्षम असणारी शक्ती ही बेरोजगारीच्या विळख्यात सापडून ती लोप पाऊ नये यासाठी फाऊंडेशनद्वारे या कार्याची संकल्पना राबविली जात आहे. बेजॉन देसाई फाऊंडेशनच्या या कार्याची दखल आजवर अनेक प्रख्यात व्यक्तींनी घेतली आहे. त्यात प्रामुख्याने महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी फाऊंडेशनच्या या कार्याचे विशेषत्वाने कौतुक केले आहे. तसेच, त्यांच्याव्यतिरिक्त थोर शास्त्रज्ञ विजय भटकर, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू ई. वायुनंदन, मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. आर. चोपडे, तंत्र शिक्षण संचालनालयाचे संचालक प्रफुल्ल वाकडे यांनीदेखील फाऊंडेशनच्या या कार्याचे कौतुक केले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय बौद्धिक प्रमुख रंजन सावंत यांनी फाऊंडेशनच्या या कार्यास आवर्जून भेट देत असे केंद्र संपूर्ण भारतभर सुरू होणे आवश्यक असल्याचे मतदेखील नोंदविले आहे. सामाजिक समस्येवर केवळ भाष्य न करता आपल्या कृतिशीलतेतून शिक्षण देणे आणि शिक्षण हाच व्यक्तीच्या जीवनाचा मूलाधार आहे, या शिक्षणतज्ज्ञ बेजॉन देसाई यांच्या विचारधारेवर आधारित फाऊंडेशनचे सुरू असणारे हे कार्य निश्चितच कौतुकास्पद आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@