मुंबापुरी ही श्रीमंतांची पंढरी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Mar-2019   
Total Views |



'स्वप्ननगरी' म्हणून नावारूपास आलेली मुंबापुरी 'श्रीमंतांचीही पंढरी' अशी आपली जुनी ओळख पुनश्च अधोरेखित करण्यात यशस्वी झाली. 'क्नाईट फ्रँक'च्या नुकत्याच जाहीर झालेल्या जागतिक संपत्ती अहवालात जगभरातील श्रीमंत शहरांपैकी आपल्या मुंबईने १२ वे स्थान पटकावले. विशेष म्हणजे, २०१७ साली याच अहवालात श्रीमंतीच्या मोजपट्टीवर हीच मुंबई १७ व्या स्थानी होती. म्हणजेच, २०१८ हे वर्ष मुंबईला, खासकरून मुंबईतील लक्षाधीश, अब्जाधीशांना अधिक फलदायी ठरले, असेच म्हणावे लागेल. या अहवालातील २०१३ च्या आकडेवारीनुसार भारतातील लक्षाधीशांची संख्या ही २ लाख, ५१ हजार इतकी होती, जी २०१८ मध्ये ३ लाख, २६ हजारांवर पोहोचली आहे. यापैकी बहुसंख्य लक्षाधीश हे मुख्यत्वे मुंबईकरच. लक्षाधीशांच्या बरोबरच अब्जाधीशांच्या बाबतीतही भारताने बाजी मारलेली दिसते. कारण, अब्जाधीशांच्या संख्येत तब्बल ११६ टक्के वाढ या अहवालात नोंदविण्यात आली आहे. हे कमी की काय म्हणून, Ultra High Net Worth Individuals (UHNWI) या वर्गातही भारतानेच आघाडी घेतलेली दिसते. हे 'अल्ट्रामिलेनियर्स' म्हणजे असे धनाढ्य, ज्यांचा गुंतवणुकीनंतरचाही अधिशेष हा २२५ कोटी इतका प्रचंड असतो आणि अशा धनाढ्यांची संख्याही मुंबईमध्येच सर्वाधिक आढळते. त्याखालोखाल क्रमांक लागतो, तो 'आयटी हब' म्हणून वेगाने विकसित होणाऱ्या बंगळुरूचा. त्याचबरोबर या अहवालात आगामी चार वर्षांत अब्जाधीशांची संख्या ही आशिया खंडात २७ टक्क्याने वाढविण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे. म्हणजेच, संपत्तीचे केंद्रीकरण हे उत्तर अमेरिका आणि युरोपीय देशांमधून आशिया खंडाकडे वळणार असल्याचे सूतोवाच या अहवालात करण्यात आले आहे. एकूणच काय, तर श्रीमंतीचे हे डोळे दिपवणारे आकडे देशाच्या, मुंबईच्या विकासाचे द्योतकच म्हणावे लागतील. २०१४ पासून केंद्रातील आणि राज्य सरकारने सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने उचललेल्या पावलांचीच ही परिणती म्हणता येईल. कारण, उद्योगधंद्यांमध्ये, आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये झालेली वाढ, स्टार्टअप्सकडे झुकणारी तरुणाई, मुद्रा योजनेअंतर्गत सहजगत्या उपलब्ध होणारे नवउद्योजकांना कर्ज याचाच हा परिपाक.

 

श्रीमंती आली, मती खुंटली...

 

विरोधाभासांनी भरलेले शहर अशीही मुंबईची एक वेगळी ओळख. चांगले आहे, तितकेच वाईटही... श्रीमंती एकीकडे आभाळाला गवसणी घालतेय, तर शहरी गरिबांचा आकडाही दिवसेंदिवस फुगताना दिसतोय. मुंबईत कोणी उपाशी झोपत नाही, हाताला काम मिळतेच, या प्रस्थापित समजामुळे देशभरातून आपले नशीब आजमावण्यासाठी हौशेनवशेगवशे मुंबई गाठतात. कोणाला साधं वेठबिगारीचं काम मिळालं तरी बेहत्तर, तर कुणाच्या डोळ्यात भावी अमिताभ-ऐश्वर्या म्हणून लखलखत्या दुनियेत स्वत:चं नावं कमावण्याची असीम महत्त्वाकांक्षा. बघा, आहे की नाही विरोधाभास. म्हणजेच अगदी लहानसहान कामांपासून ते सुपरस्टार होण्याची स्वप्न उरी बाळगणाऱ्या प्रत्येकासाठी मुंबई ही सोन्याचं अंड देणारी कोंबडीच. आज या महानगरी मुंबईत श्रीमंती एकीकडे नाक उंचावून नांदत असली तरी दुसरीकडे या शहरातील गचाळपणामुळे त्याच नाकाला रुमाल बांधून वाट शोधण्याचीही वेळ येतेच. नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या स्वच्छ शहरांच्या यादीत, मुंबईचा क्रमांक वधारला नसून तो अजूनच खालावल्याचे लक्षात आले. स्वच्छ सर्वेक्षणातील निकालांनुसार, मुंबईचा क्रमांक थेट १२ व्या क्रमांकावरून ४९ व्या क्रमांकावर घसरला आहे. म्हणजे, एकीकडे शहरात श्रीमंती पाणी भरत असली तरी, दुसरीकडे सांडपाणी रस्त्यावर वाहून दुर्गंधीचे पाणीही वाहतेच आहे. याचाच अर्थ, एकीकडे श्रीमंतीचे इमले उभे राहत असले तरी दुसरीकडे शहरावर आदळणाऱ्या लोंढ्यांमुळे या शहराचे दिनमान दिवसेंदिवस खालावतच चालल्याचे दिसते. त्यामुळे गरीब-श्रीमंतांमधील ही मुंबईतील दरी तुम्ही विमानातून प्रवास करणारे असाल काय किंवा रेल्वेने, दिसून तर येतेच. यासाठी मुंबईकरांपेक्षा मुंबईच्या चाव्या ज्यांच्या हाती आहेत, तेच या मुंबईच्या दुर्दशेचे गुन्हेगार ठरतात. केवळ आपल्या स्वार्थापोटी मुंबईला यांनी झोपडपट्ट्यांच्या विळख्यात ढकलून दिले, नद्यांचे नाले होत असल्याचे दिसूनही आंधळेपणाचे ढोंग केले, मोठमोठाले पूल उभारून पुलाखालचे रस्ते मात्र खड्ड्यात घातले. भ्रष्टाचाराने बरबटलेल्या प्रशासकीय यंत्रणेतील शहराची दुरवस्था होते ते अशी. त्यामुळे एकीकडे श्रीमंतीच्या मुंबईने कितीही गमजा मारल्या तरी, त्या श्रीमंतीबरोबर मुंबईची मती मात्र खुंटल्याचेच आज खेदाने म्हणावे लागेल.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@