विवेक उद्योगस्वामिनी : महिलांनी महिलांसाठी महिलांकडून चालवलेलं उद्योगपीठ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Mar-2019   
Total Views |


 

आज दि. ८ मार्च... दरवर्षी हा दिवस ‘जागतिक महिला दिन’ म्हणून साजरा केला जात असला तरी, त्याचं औचित्य साधून संपूर्ण मार्च महिनाच महिलांसाठीच्या काही ना काही कार्यक्रमांनी भरलेला असतो. यावर्षी महिला दिनाचं औचित्य साधून ‘विवेक समूह’ महिला उद्योजकांसाठी ‘विवेक उद्योगस्वामिनी’ हा एक अभिनव उपक्रम घेऊन आला आहे.

शनिवार दि. १६ मार्च रोजी बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज, मुंबई येथे दुपारी ३ ते ६ या वेळात या उपक्रमाचा भव्य उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे. नीती आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. राजीव कुमार आणि ‘बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज’चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आशिषकुमार चौहान यांची प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमाला लाभणार आहे. महाराष्ट्राच्या विविध भागांतल्या महिला उद्योजकांचा असा हा एक आनंदमेळाच...

‘विवेक उद्योगस्वामिनी’ हे महिला उद्योजकांना एकत्र आणणारं एक हक्काचं व्यासपीठ. भारतात सुमारे ५ कोटी, ८५ लाख उद्योजक आहेत. त्यांपैकी केवळ ८० लाख उद्योजक या महिला आहेत. म्हणजेच, भारतात महिला उद्योजकांचं प्रमाण हे फक्त १३.७६ टक्के आहे. महिला उद्योजकांनी सुमारे दीड कोटी लोकांना रोजगार दिला आहे. भारताच्या एकंदर लोकसंख्येचा विचार करता हे प्रमाण तसं खूपच कमी म्हणावं लागेल. गेल्याच महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एका मुलाखतीत म्हटलं की, “Women are Natural Entrepreneurs..”

महिला या निसर्गतःच उद्योजक असतात. याचा अर्थ असा होतो की ‘उद्योगशीलता’ हा गुण महिलांमध्ये निसर्गतःच असतो. मात्र ‘उद्योगशीलता’ असणं आणि ‘उद्योजक’ होणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. स्वयंपाक करणं, घराची आवराआवर करणं, मुलांना सांभाळणं ही रोजची घरगुती कामे करताना महिलांची उद्योगशीलता आणि व्यवस्थापनकौशल्य प्रत्ययास येतं. कामातली शिस्त, सचोटी, निष्ठा, तत्परता, अंगमेहनत, इ. गुण कुठल्याही स्त्रीकडे निसर्गतःच असतात. मात्र, भारतीय स्त्रीचं विश्व हे घरगुती कामांपुरतंच मर्यादित राहिल्यामुळे उद्योजकतावाढ आणि देशाची आर्थिक प्रगती यासाठी महिलांकडे असणार्‍या या नैसर्गिक गुणांचा आणि क्षमतांचा पुरेसा वापर आपल्याकडे झाला नाही. आज मात्र परिस्थिती बदलली आहे. सर्व प्रकारच्या शिक्षणाचे दरवाजे महिलांसाठी खुले झाले आहेत. शिक्षणामुळे महिला आत्मनिर्भर झाल्या आहेत. उद्योजकतेचं क्षेत्रही महिलांना खुणावू लागलं आहे. आपल्यातल्या क्षमतांना पूर्ण वाव देण्याच्या संधी निर्माण झाल्या आहेत. वर नमूद केलेला ८० लाख महिला उद्योजकांचा आकडा हा याचीच फलश्रुती दर्शवतो.

 
 हा आकडा वाढावा यासाठी आजच्या काळात माध्यमांची भूमिका फार महत्त्वपूर्ण ठरणार आहे. महिला उद्योजकतेला चालना देण्यासाठी शासनाने ‘मुद्रा’ योजनेसारख्या अनेक उत्तमोत्तम योजना आणल्या आहेत. भारताच्या विविध भागांत अनेक स्वयंसेवी संस्था महिला उद्योजकता वाढीसाठी प्रयत्न करत आहेत. मात्र, हे सर्व एका ठराविक वर्तुळात फिरत न राहता समाजाच्या शेवटच्या स्तरापर्यंत झिरपणं महत्त्वाचं आहे. यासाठी गरज आहे ती ज्ञानाचं आदानप्रदान आणि विचारांची देवाणघेवाण करण्याचं प्रभावी माध्यम उपलब्ध करुन देण्याची. आज राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर अशी माध्यमे निर्माण होत आहेत. नीती आयोगाच्या अंतर्गत २०१८ साली सुरू झालेला "Women Entrepreneurship Platform' हे महिला उद्योजकांना एकत्र आणणारं भारतातलं सर्वांत मोठं व्यासपीठ आहे. 'Women First, Prosperity for all' असं या व्यासपीठाचं घोषवाक्य आहे. नवमहिला उद्योजकांना आवश्यक त्या सुविधा या व्यासपीठांतर्गत पुरवल्या जातात. आंतरराष्ट्रीय स्तरावरही 'Female Entrepreneurs Association', 'SheWorks, Ladies Who launch', 'In Good Company', 'Catalyst', 'American Business Women Association', अशी विविध माध्यमे देशविदेशांत उदयाला आली आहेत, जी महिला उद्योजकतेला चालना देण्याचं काम करत आहेत. देशविदेशातल्या अनेक महिला उद्योजक या माध्यमांशी जोडल्या गेल्या आहेत.
 

असं एखादं माध्यम महाराष्ट्रातही असावं हा
‘विवेक उद्योगस्वामिनी’ सुरू करण्यामागचा मूळ हेतू. ‘एक उद्यमशील राज्य’ अशी महाराष्ट्राची ओळख निर्माण झाली, ज्यात महिला उद्योजकांचा मोठा वाटा आहे. नुकतीच महाराष्ट्र सरकारने ग्रामीण भागातून महिला उद्योजिका पुढे याव्यात यासाठी ‘नवतेजस्विनी’ नावाची योजना सुरू केली. गेल्याच महिन्यात केंद्रीय वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू यांनी ‘हिरकणी महाराष्ट्राची’ आणि "District Business Plan Competition' नावाच्या दोन योजनांची घोषणा केली. या दोन्ही योजना महाराष्ट्रात महिला उद्योजकतेला चालना देणार्‍या आहेत. तात्पर्य, महिला उद्योजकतेसाठी सकारात्मक वातावरण तयार व्हावं यासाठी शासन, वित्तसंस्था आणि सामाजिक संस्था आपापल्या परीने प्रयत्नशील आहेत. या तयार झालेल्या सकारात्मक वातावरणाचा थेट लाभ महिला उद्योजकांना घेता यावा, हे ‘विवेक उद्योगस्वामिनी’चं मुख्य ध्येय.
 

‘विवेक उद्योगस्वामिनी’ हे उद्यमी महिलांनी उद्यमी महिलांसाठी उभारलेलं एक हक्काचं उद्योगपीठ. या उपक्रमाद्वारे महाराष्ट्रातील तमाम महिला उद्योजकांना एका व्यासपीठावर येण्याची संधी मिळेल. उद्योजक महिलांना उद्योगविस्तारासाठी आणि उद्योजक होऊ इच्छिणार्‍या महिलांना नव्या उद्योगांच्या निर्मितीसाठी आवश्यक ते सर्व मार्गदर्शन आणि मदत इथे मिळेल. ‘विवेक समूह’च्या अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या ‘उद्योगविवेक’ या संकेतस्थळावर ‘विवेक उद्योगस्वामिनी’ हे एक ऑनलाईन सल्ला केंद्र असेल, जे महिला उद्योजक आणि उद्योगक्षेत्रातली तज्ज्ञ मंडळी यांच्यात परस्पर संवादाचं एक कायमस्वरूपी माध्यम म्हणून काम करेल. महिला उद्योजकांचे मेळावे, परिसंवाद, मुलाखती, कर्तृत्ववान महिला उद्योजकांचे सन्मान, असे अनेकविध कार्यक्रम ‘विवेक उद्योगस्वामिनी’ उपक्रमांतर्गत भविष्यात हाती घेतले जातील. ‘उद्यमशील महिलांचा महाराष्ट्र’ घडविण्याची ‘विवेक उद्योगस्वामिनी’ ही नांदी ठरो, हीच आंतरराष्ट्रीय महिला दिनी सदिच्छा!

 


माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@