सात्यकीचा पराक्रम

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Mar-2019
Total Views |



पूर आलेल्या नदीसारखा सात्यकी कौरवांच्या सैन्यात घुसत होता. तो अर्जुनाहून जराही कमी नव्हता. दुर्योधनाने त्याला थोपविण्यासाठी दगडफेक करणारे सैनिक सात्यकीकडे पाठवले.


सात्यकी हा सत्यक याचा पुत्र. वृष्णी घराण्यातला, यादव कुळातला राजा. त्याचे ‘युयुधान’ असेही नाव होते. त्याने अर्जुनाकडून धनुर्विद्या शिकून घेतली आणि अर्जुनाने त्याला अनेक दिव्य अस्त्रांची माहिती दिली. त्यामुळे तो युद्धात अर्जुनाहून अधिकच पारंगत होता. द्रोण हे जाणून होते, म्हणून त्यांनी सात्यकीला वाटेत अडवून अर्जुनाची निंदा केली. ते म्हणाले, “सात्यकी, तुझा गुरू महापराक्रमी अर्जुन मला प्रदक्षिणा घालून आणि मला पाहून भेकडासारखा आपली पाठ दाखवून पळून गेला. आता तू पण आपल्या गुरूचीच री ओढणार का?” त्यावर सात्यकी म्हणाला, “आपल्या गुरूच्या पावलावर पाऊल ठेवून जाण्यातच शिष्याचे भले असते. माझे गुरू जर भेकड आहेत, तर मलापण तसेच वागायला आवडेल!” असे म्हणून सात्यकीने पण अर्जुनासारखी रथातून द्रोणांभोवती प्रदक्षिणा घातली आणि तो व्यूहाकडे निघून गेला. हे पाहून द्रोण संतप्त झाले, ते त्याचा पाठलाग करू लागले.

 

सात्यकीने आपल्या सारथ्याला सांगितले, “लवकर चल, द्रोण आपला पाठलाग करीत आहेत. मला त्यांच्यात वेळ न घालवता अर्जुनाची मदत करायची आहे. तू मला राधेयाच्या समोर घेऊन जा.” त्याने राधेयाच्या सैन्याचा धुव्वा उडवला. समोरून कृतवर्मा आला. पण, सात्यकी लढत राहिला. त्याने आपल्या चुलत भावाला कृतवर्माला जखमी केले. त्याचा सारथी मारला. इतक्यात हत्तींचे सैन्य घेऊन जलसंध त्याला आडवा आला. सात्यकीने आता हत्तींचे मुडदे पाडायला सुरुवात केली. रक्ताचे पाट वाहत होते.सात्यकीने जलसंधाचे मुंडकेच उडवले. दुर्योधन आणि द्रोण त्याचा पाठलाग करत होते. त्याने दुर्योधनाचे ध्वज तोडले. रथाचे घोडे ठार केले. दुर्योधन तिथून पळून गेला. पुन्हा कृतवर्मा समोर आला. त्याने सात्यकीचा सारथी जखमी केला. सात्यकीने लगाम हातात घेऊन रथ सावरला आणि तो एका हाताने लढत राहिला. त्याच्या बाणांनी कृतवर्मा पण बेशुद्ध पडला. द्रोण पुढे आले, त्याने द्रोणाचे घोडे आणि सारथी जखमी केले. त्यांचे घोडे उधळले. ते नाद सोडून व्यूहाचे रक्षण करण्यासाठी परत गेले.

 

सात्यकीला सुदर्शन आडवा आला. तो खूप शूर होता. पण, सात्यकीने त्यालाही ठार मारले. हे पाहून भीम आणि त्याचे पुत्र आनंदित झाले. कौरवांचे सैन्य आता भीमाऐवजी सात्यकीला घाबरू लागले. सात्यकीने अगणित नरसंहार करून हा दिवस गाजवला. त्याने द्रोण, कृतवर्मा, जलसंध अशा मातब्बर योद्ध्यांचा पराभव केला. दुर्योधनालाही पळ काढावा लागला. जिथे अर्जुन होता, तिकडे सात्यकीला पोहोचायचे होते. सर्वांनी सात्यकीला अडविण्याचा यत्न केला. पण, तो आपल्या सारथ्याला म्हणाला, “एखाद्या नदीसारखे हे कौरवांचे सैन्य मला गिळून टाकण्यासाठी येत आहे. पण, मी त्यांच्याशी असा लढेन की माझे गुरू अर्जुन यांना माझा अभिमानच वाटेल. पाडवांनी माझ्यावर खूप प्रेम केले. त्या प्रेमाची परतफेड मला करायची आहे. त्या दुर्योधनाला मी दाखवून देईन की, विजय त्याला दुरापास्तच आहे. या अत्यंत दुर्गुणी आणि हावरट माणसाला मी धूळ चारेन. मी कृष्णाचा चुलत भाऊ आहे आणि अर्जुनाचा शिष्य आहे, हे सर्वांना आज पटेल. शत्रूच्या सैन्याची आज कशी दाणादाण उडते ते तू पाहा,” असे म्हणून सात्यकी अक्षरश: तुटून पडला. दुर्योधनाचे पण घोडे उधळले. त्याचा सारथी जखमी झाला. द्रोणांप्रमाणेच दुर्योधनाचे घोडे त्याला घेऊन उधळले आणि सात्यकीचा मार्ग मोकळा झाला. पूर आलेल्या नदीसारखा सात्यकी कौरवांच्या सैन्यात घुसत होता. तो अर्जुनाहून जराही कमी नव्हता. दुर्योधनाने त्याला थोपविण्यासाठी दगडफेक करणारे सैनिक सात्यकीकडे पाठवले. पण, त्याने आपल्या बाणांनी त्यांचे तुकडे तुकडे केले. (क्रमश:)

 

- सुरेश कुळकर्णी

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@