जीवनशैली बदलावी लागेल...!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Mar-2019
Total Views |

 
 
 
 
जागतिक हवामानात झालेले बदल, त्यामुळे मनुष्यजीवनात आलेल्या समस्या, आलेले नवनवे आजार याला जबाबदार कोण? आम्हीच, दुसरे कोण? जे मिळाले त्यात समाधान न मानता अत्याधिक मिळविण्याच्या नादात आम्ही स्वत:च्या पायावर धोंडा पाडून घेतो आहोत, हे आम्हालाही लक्षात कसे येत नाही? की लक्षात येऊनही आम्ही त्याकडे दुर्लक्ष करतो आहोत? जर जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असू, तर ईश्वरही आम्हाला वाचवू शकणार नाही, हे लक्षात घेणे गरजेचे आहे. जागतिक हवामानात जे बदल आज जाणवत आहेत, त्याला आमची आधुनिक जीवनशैली कारणीभूत आहे, हे अमान्य करता येणार नाही.
मोठ्या प्रमाणावर जंगलतोड करण्यात येत आहे. या जंगलतोडीमुळे एकीकडे ऑक्सिजनची कमतरता भासते आहे, तर दुसरीकडे वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे कार्बनडाय ऑक्साईडचे प्रमाण वाढते आहे. कार्बनडाय ऑक्साईड शोषून घेत प्रदूषण कमी करण्याची क्षमता असलेली झाडंच आम्ही कापून फेकत आहोत. भूगर्भातील इंधनाचा मोठ्या प्रमाणात वापर करीत आहोत, शहरीकरण बेसुमार होत आहे, नियोजनाचा अभाव दिसतो आहे. त्यामुळे जागतिक हवामानात झालेल्या बदलास आणि त्याच्या दुष्परिणामास मनुष्यजातच जबाबदार आहे, हे नाकारताच येणार नाही. जर यासाठी आपण जबाबदार आहोत, तर या संकटातून वाचण्यासाठीचे उपायही आपल्यालाच शोधावे लागणार, यात शंका नाही!
 
 
 
 
सध्या केंद्रात आपल्या नागपूरचे नितीन गडकरी हे भूपृष्ठ वाहतूक मंत्री आहेत. त्यांच्याकडे कल्पनांचे भांडार असल्याने, या समस्येवर मात करण्यासाठीचे अनेक उपाय त्यांनी शोधून काढले आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या गाड्या वापरण्याऐवजी जैवइंधनाचा वापर केला गेला, सीएनजीचा वापर केला गेला, इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करण्यात आला, तर चित्र बदलू शकते. जलवाहतुकीवरही गडकरी यांनी भर दिला आहे. प्रारंभी त्यांनी जेव्हा जलवाहतुकीची कल्पना मांडली, तेव्हा लोकांनी टिंगल करण्याचा प्रयत्न केला. पण, बंगालमधील हल्दियापासून वाराणसीपर्यंत जहाजवाहतूक सुरू करून त्यांनी टीकाकारांना प्रत्यक्ष कृतीतून चोख उत्तर दिले आहे. या जहाजातून दीडशेपेक्षा जास्त कंटेनर्स वाहून नेले जाऊ शकतात. याचाच अर्थ असा की, रस्त्यावरून धावणारे दीडशे ट्रेलर्स कमी होऊ शकतात. ते तसे झालेही आहेत. ट्रेलर्ससारख्या महाकाय वाहनांची रस्त्यांवरील संख्या कमी झाल्यास कार्बनडाय ऑक्साईडचे उत्सर्जनही आपोआपच कमी होईल, परिणामी प्रदूषणही घटेल, रस्त्यांवरील वाहतूककोंडी कमी होईल, अपघात कमी होतील आणि अंतिमत: मनुष्यजीवन सुखी होईल. त्यामुळे देशातल्या नद्या स्वच्छ केल्या, त्यांची खोली वाढविली, पाण्याचा प्रवाह बारमाही ठेवण्याचा प्रयत्न झाला, तर एका शहरातून दुसर्या शहरात बोटींनी जाणे आणि जहाजांतून मालवाहतूक करणे सोपे होऊ शकते. गडकरींनी सुचविलेल्या या उपायाचे देशवासीयांनी खरेतर स्वागत करायला हवे.
 
 
पूर्वी लोकसंख्या कमी होती, मनुष्यजीवन हे साधेसरळ होते. गरजा मर्यादित ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे आवश्यकतेनुसार नैसर्गिक संसाधने वापरली जात होती. आपल्या देशात तर 65 टक्के लोक शेतीवर आधारित जीवन जगत होते. आताही आपल्या देशात पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त लोकांचा गुजारा हा शेतीवरच होतो. असे असले तरी पूर्वीची शेती आणि आजच्या शेती करण्याच्या पद्धतीत कमालीचा बदल झाला आहे. पूर्वी फक्त सेंद्रिय पद्धतीने शेती केली जायची. रासायनिक खतांचा वापर मर्यादित होता. पण, काळाच्या ओघात ग्रामीण भागातील जनतेनेही स्वत:ला बदलले आणि ते कधी आधुनिक शैलीचा भाग बनले, हे त्यांचे त्यांनाही कळले नाही. रासायनिक खतांचा मारा केला जात असल्यामुळे अन्नधान्याचे उत्पादन तर वाढले, पण जमिनीचा कस कमी होत चालला आहे, मनुष्याला होणार्या आजारांचे, विशेषत: कर्करोगासारख्या गंभीर आजारांचे प्रमाण वाढले आहे. पण, अजूनही आम्ही गांभीर्याने विचार करून जीवनशैली बदलायला तयार नाही, हे दुर्दैवीच होय. नितीन गडकरी यांच्यासारखा द्रष्टा नेता आपल्याला लाभला आहे, त्यांनीही सेंद्रिय शेतीची पाठराखण केली आहे. त्यांच्या मार्गदर्शनात खरेतर आम्ही बराच बदल घडवून आणू शकतो. त्यांच्याकडे राजकीय इच्छाशक्ती आहे. पण, आम्ही कमी पडतो आहोत, हे लक्षात घेतले तरी पुरेसे आहे.
 
 
आपण आज ज्या प्रकारची जीवनशैली अंगीकारली आहे, ती घातक आहे. तिचे परिणाम आज ना उद्या आपल्याला भोगावेच लागणार आहेत. काही मूलभूत सोईसुविधा आवश्यक आहेतच. पण, त्याची मर्यादा आम्ही पार केली असल्याने परिणाम भोगण्याची तयारीही आता ठेवायलाच हवी ना! आज सायकल घेतली, उद्या स्कूटर, परवा छोटी कार, मग मोठी कार, अशी आपली लालसा वाढतच जाणार. आज भाड्याच्या घरात राहतो, उद्या छोटेखानी का होईना घर होणार, मग आपल्याला त्यापेक्षा मोठ्या घराची लालसा होणार, हे असेच सुरू राहिले तर निसर्गाचे दोहनही गरजेपेक्षा जास्त होणार आणि शेवटी निसर्ग आपला रंग दाखवणार. यातून काय होईल? विनाश, दुसरे काय? आम्हाला ऐषोरामाचे जीवन जगण्याची सवय जडली आहे. जागतिक हवामान बदलाची चर्चा तर आम्ही भरपूर करतो, त्याचे धोकेही माहिती करून घेतो. पण, असलेल्या सुविधांमध्ये आम्हाला कसलीही कमतरता नको असते. काही सुविधांचा त्याग करता आला तर अधिक चांगले हे आम्हाला कळते, पण वळत नाही, हे दुर्दैवी होय. दुष्परिणाम समोर दिसत आहेत. ऋतुबदल जाणवत आहेत. पावसाळ्यात नीट पाऊस पडत नाही. हिवाळ्यात पाहिजे तशी थंडी पडत नाही आणि कधीकधी नको तेवढी पडते. या वर्षीचा हिवाळा आपण सगळ्यांनीच अनुभवला आहे. वातावरणातील बदलांमुळे एकतर अनावश्यक जास्त पाऊस पडतो वा मग उन्हाळ्यात प्रमाणाबाहेर उष्णता निर्माण होते. हे थांबणार कधी आणि थांबवायचे तरी कसे, याचा गांभीर्याने विचार आपल्यालाच करावा लागणार आहे. परग्रहावरून कुणी येईल आणि आमची संकटं दूर करील, असा जर आपला समज असेल तर विनाशाचा सामना करायला तयार राहिले पाहिजे.
 
 
 
आपल्या वैज्ञानिकांनी फार पूर्वीच सांगून ठेवले आहे की, वातावरणात बदल होऊ शकतात. ग्रीन हाऊस गॅसेसमुळे उष्णताही वाढू शकते आणि थंडीही कडाक्याची राहू शकते. कार्बनडाय ऑक्साईड जास्त प्रमाणात उत्सर्जित होतो याचा अर्थ हा की, मोठ्या प्रमाणात आपण जीवाश्म इंधनाचा वापर करतो आहोत. हे वैज्ञानिकांनी फार आधी सांगितले आहे. आपल्यापैकी अनेकांना हे माहितीही आहे. पण, प्रत्येक चांगल्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करण्याची सवय आम्हाला जडली आहे, त्याला कोण काय करणार? ग्रीन हाऊस गॅसेस तयार होण्याचे सगळ्यात मोठे कारण म्हणजे रस्त्यांवरून धावणारी असंख्य वाहने. आज संपूर्ण जगात दोन अब्ज पस्तीस कोटी वाहनं रस्त्यांवरून धावतात. पुढल्या दहा-बारा वर्षांत या वाहनांची संख्या तीन अब्जांपेक्षाही जास्त होईल, यात शंका नाही. एकट्या अमेरिकेत वाहतुकीमुळे ग्रीन हाऊस गॅसेस तयार होण्याचे प्रमाण हे 28 टक्के आहे. उद्योगांमुळे 22 टक्के ग्रीन हाऊस गॅसेसचे उत्सर्जन होते. म्हणजे रस्तेवाहतूक आणि उद्योग यामुळे पन्नास टक्के उत्सर्जन होते, ही बाब लक्षात घेतली तर काय उपाययोजना करायला हव्यात, याचा अंदाज आपल्याला सहज येईल. वीज उत्पादनामुळेही सुमारे 30 टक्के ग्रीन होऊस गॅस उत्सर्जन होते. ही अमेरिकेतली आकडेवारी आहे. आपण भारताच्या बाबतीत विचार केला तर मुंबई, दिल्लीसारखी जी मोठी शहरं आहेत, तिथं वाहनांची संख्या प्रचंड वाढली आहे. वाहतुकीत अडथळे येतात ते वेगळेच. ग्रीन हाऊस गॅस तयार होऊन प्रदूषण वाढते आणि त्याचा मानवी जीवनावर विपरीत परिणाम होतो, तो वेगळा. एकट्या दिल्लीत तीन कोटींपेक्षा जास्त वाहनं रस्त्यांवर धावतात, त्यामुळे दिल्लीची काय अवस्था झाली आहे, हे आपण जाणतोच. चारचाकी वाहन चालविणारे असंख्य लोक त्या वाहनात एकटेच प्रवास करत असतात. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उत्तम ठेवण्यात आली, तर रस्त्यांवरील वाहनांची संख्या कमी होऊ शकते आणि दुसरा उपाय म्हणजे कायद्यानेच एकट्या व्यक्तीला चारचाकी वाहनातून प्रवास करण्यास प्रतिबंध घालण्यात आला, तर तोही प्रभावी उपाय होऊ शकतो. आपल्याकडे जगातली सगळ्यात मोठी लोकशाही असल्याने असा प्रयोग करता येईल का, हे सांगणे कठीणच आहे.
 
 
 
डॉ. रिता विवेक सोनटके
9422827547
@@AUTHORINFO_V1@@