भूकंपाने हादरलेले पालघर आणि सरकारी उपाययोजना

    05-Mar-2019   
Total Views | 301
 

पालघर जिल्ह्यातील डहाणू व तलासरी तालुक्यातील काही गावांत नोव्हेंबर २०१८ पासून भूकंपाचे छोटे-मोठे धक्के बसत आहेत. यामुळे तेथील नागरिकांना साहाय्य करून या धक्क्यांमुळे नुकसान होणार नाही व त्यांना सर्वतोपरी मदतीची जाणीव राज्य सरकारने वेळोवेळी करुन दिली.

 

भूकंपप्रवण क्षेत्रात पालघर?

गेल्या नोव्हेंबरपासून होत असलेल्या भूकंपाचा केंद्रबिंदू तलासरी तालुक्यातील धुंदलवाडी गावात होता आणि या केंद्रबिंदूचा शोध तांत्रिकदृष्ट्या अभ्यास करणार्‍या संस्थांनी घेतल्याची माहिती आहे. शुक्रवार, दि. १ मार्चला भूकंपाचे छोटे धक्के या भागात बसले. या भूकंपाचा केंद्रबिंदू होता गुजरातमधील सिल्वासा. हे भूकंपाचे छोटे धक्के विक्रमगड, जव्हार, मोखाडा ते अगदी त्र्यंबकेश्वरपासून नाशिकच्या सीमेपर्यंत जाणवले. बोईसर औद्योगिक परिसरातही हे धक्के जाणवले. कारण, हा धक्का ४.३ रिश्टर तीव्रतेचा होता व नोव्हेंबरपासून आतापर्यंतच्या धक्क्यांमधील तो सर्वात मोठा धक्का होता. आधीचे सर्वाधिक रिश्टर स्केलचे धक्के- २० जानेवारी - ३.६, २४ जानेवारी - ३.४ व १ फेब्रुवारी - ४.१ असे होते. 

 

या छोट्या धक्क्यांमुळे कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी गावातील अनेक कच्च्या घरांच्या भिंतींना मात्र तडे गेले. दि. १ मार्चच्या सकाळी ११ वाजून १४ मिनिटांनी हा भूकंप झाला. तेव्हा डहाणूचे तहसीलदार राहुल सारंग व इतर अधिकारी भूकंपविषयक चर्चेसाठीगावसभेत होते. डहाणूमध्ये एकूण १४ गट ठिकठिकाणी भूकंपाचे निरीक्षण करीत आहेत. आपत्कालीन व्यवस्था विभागाच्या अधिकार्‍यांचे म्हणण्यानुसार, केंद्रबिंदू भूकंपनाभीच्या (Epicentre) वर असतो. परंतु, धुंदलवाडीतील ही भूकंपनाभी जमिनीच्या पृष्ठभागापासून फक्त पाच किलोमीटरच खाली आहे. म्हणजे, तु्लनात्मकरित्या उथळ जागी आहे. भूकंपनाभीच्या खोलीवरुन भूकंपामुळे किती नुकसान होते, ते ठरते. परंतु, याविषयी अधिक विश्लेषण करण्यासाठी शास्त्रज्ञांकडे पुरेशी माहिती अद्यापही गोळा झालेली नाही.

 

पूर्वी दख्खनचे पठार एक ज्वालामुखीचे केंद्र होते व आता हा ज्वालामुखी शांत झालेला असला तरी, काही ठिकाणी पृथ्वी कवचावरील खडकांचे पदर उत्तरेकडे वा ईशान्येकडे हळूहळू सरकत आहेत. त्यामुळे या खडकांच्या हालचालीतून (fault) जी ऊर्जा निर्माण होते, ती सर्व दिशांना पसरते व त्यातून भूकंपाचे धक्के बसतात. परंतु, हे बर्‍याच वेळेला जाणवणारे धक्के तीव्र स्वरूपाचे नसून ते थोड्या वेळाचे असतात. रायगड जिल्ह्यात व तामिळनाडूमध्ये असे धक्के काही वर्षांपूर्वी स्थानिकांनी अनुभवले होते. या भागात स्वातंत्र्योत्तर काळात म्हणजे २५ डिसेंबर, २०१७ ला व वाळवंडा भागात २ जानेवारी, २०१८ असे दोनदा भूकंपाचे सौम्य धक्के बसले होते. पण, सद्यपरिस्थितीत डहाणूचे जिल्हाधिकारी प्रशांत ननावरे यांनी नागरिकांच्या मदतीस तत्पर असल्याचे म्हटले आहे.

 

डहाणू तालुक्यातील ४० गावांतील १० हजारांहून अधिक नागरिक सध्या घराबाहेर झोपतात. परंतु, डहाणूतील काही विद्यार्थी १ मार्चपासून शालान्त परीक्षा देत आहेत. सौम्य भूकंपाच्या धक्क्यांमुळे विविध ठिकाणी शाळेतील ६० टक्के विद्यार्थी भीतीने गैरहजर राहत असल्याचीही नोंद आहे. त्यामुळे त्यांच्या मनातील भीती दूर करणे महत्त्वाचे आहे. फेब्रुवारी महिन्यात या भागात रोज ३० ते ४० भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. त्यांची तीव्रता १.५ रिश्टर स्केलच्या वर होती. येथे एकूण १ हजार, ५८ धक्के बसले आहेत. या भूकंपाच्या घटनाक्रमामुळे महाराष्ट्राला लातूरच्या भूकंपाची आठवण आल्याशिवाय राहत नाही. ३० सप्टेंबर, १९९३ रोजी लातूरला भूकंपाचे जबरदस्त धक्के बसले होते. त्या भूकंपाची तीव्रता ६.४ रिश्टर स्केल होती व त्यात ७ हजार, ९१७ माणसे मृत्युमुखी पडली होती.

 

हैद्राबादच्या राष्ट्रीय भूभौतिक संशोधन संस्थेतील ((NGRI) दोन अभियंते डहाणूला भूकंपाची पाहणी करण्यासाठी तळ ठोकून आहेत. दिल्लीच्या राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राचे (NCS) अधिकारी म्हणतात की, “मागील ऐतिहासिक अनुभवावरून असे भूकंपाचे धक्के मध्य व पश्चिम भारतात जास्त वेळा बसतात व ते तीन ते चार महिन्यांच्या फरकाने बसतात. अशा धक्क्यांना भूकंप स्वार्मम्हणतात. परंतु, भूकंपाच्या बाबतीत काही स्पष्ट सांगता येत नाही. कारण, भूकंपामध्ये पुष्कळ गूढता व गुंतागुंत असते. त्यामुळे नैसर्गिक आपत्तीपुढे मानवाचे काही सांगता येत नाही. नागरिकांनी घरे, इतर इमारती व पूल भूकंपरोधक बांधावेत.

 
 


भूकंप तीव्रतेनुसार भारताचे विभाग -

. तीव्रता क्षेत्र परिणाम भारतातील प्रदेश २.५ ते ५.४

. धक्का फक्त जाणवतो व थोडेसे नुकसान भारतातील बाकी विभाग सोडून उरलेला प्रदेश

.५ ते ६

. काँक्रिटच्या इमारतींचे जास्त नुकसान केरळ, गोवा, लक्षद्वीप, उत्तरप्रदेशचा काही भाग, पंजाब, राजस्थान, बिहार, झारखंड महाराष्ट्र, मध्यप्रदेश, छत्तीसगढ, ओडिशा, आंध्रप्रदेश, तामिळनाडू, कर्नाटकाचा काही भाग

.१ ते ६.९

. धक्क्यांमधून मोठे नुकसान व हानी जम्मू-काश्मीरचा उर्वरित भाग, हिमाचल, दिल्ली, सिक्कीम, उत्तरप्रदेशचा उत्तरेकडील भाग बिहार, प. बंगाल, गुजरात, राजस्थान व महाराष्ट्राचा काही भाग

७ ते ७.९

. मोठे भूकंप व मोठे नुकसान ईशान्य भारत, जम्मू-काश्मीरचा काही भाग, हिमाचलचा काही भाग, उत्तरांचल, कच्छचे रण, बिहारच्या उत्तरेचा काही भाग, अंदमान व निकोबार

 

भूकंपाच्या लाटांचे प्रकार

भूकंप लाटांचा पहिला प्रकार - दाब असणार्‍या पृष्ठभागावरच्या लाटा. त्याला ‘पी लाटा’ वा ‘मुख्य लाटा’ म्हणतात. ‘पी लाटा’ या सर्वात वेगवान असतात. पृष्ठभागावर २२ हजार किमी प्रतितास, तर पृथ्वीच्या कवचाकडे त्या ४० हजार किमी प्रतितास असतात.

शीअर लाटा’ हा दुसरा प्रकार आहे. याला ‘एस लाटा’ किंवा ‘दुय्यम लाटा’ म्हणतात. त्या ‘पी लाटां’च्या अर्ध्या वेगाने असतात व फक्त घन वस्तूंतून वा पृथ्वीच्या कवचातून जातात. जेव्हा या लाटा द्रवरूपातील लोखंड वा निकेलमधून तेथे धक्का मारल्यावर पुढे जात नाहीत.

पृष्ठभाग लाटा’ हा तिसरा प्रकार आहे. तो ‘पी’ व ‘एस लाटां’मधून तयार होतो व त्या कमी वेगाच्या असतात. परंतु, या लाटा सगळ्यात जास्त विनाशकारक असतात.

 

‘एनजीआरआय’ व ‘एनसीएसनी’ काय साधले?

या संस्थांनी सहा ठिकाणी भूकंपमापन केंद्रे स्थापन्न केली आहेत. त्यातील एक भूकंपमापन केंद्र केंद्रबिंदू धुंदलवाडीपासून जवळच आठ किमींवरच आहे. संस्थेतील भूकंपशास्त्रज्ञ म्हणतात की, “पृथ्वीच्या कवचाजवळच्या खडकांचे दोष १०० किमीपर्यंत लांब असू शकतात. परंतु, सर्व लांबीवर दोष व त्यामुळे ऊर्जा बाहेर पडण्याची क्रिया होत असेलच असे नाही.” ‘एनजीआरआय’ आता या भूकंपस्थानांचा शोध घेत आहे, तसेच भूकंपनाभी खोल आहे का की उथळ भागात आहे, याचाही शोध घेत आहे. खडकातील दोषांचा नकाशा करण्याकरिता ‘मॅग्नेटोटेल्युरिक’ साधनांनी निरीक्षण करीत आहेत. नोव्हेंबर २०१८ पासून या संस्थेचे सर्वेक्षण सुरू आहे व भूकंपनाभी १ किमी ते १४ किमीपर्यंत खोल आढळल्या आहेत.

 

दिल्लीच्या ‘एनसीएस’ संस्थेने खडकांची दोषरेषा ११ किमी लांब व दोन किमी रूंद आहे, असे भूकंपाच्या नकाशावरून ताडले. पालघर जिल्हा भूकंप प्रवणतेच्या विभाग तीनमध्ये मोडतो व तेथे ५.५ ते ६.५ रिश्टर स्केल इतकी भूकंपाची तीव्रता असू शकते. पावसाळ्यानंतर जमिनीतील पाण्याची पातळी वाढते व नंतर पाणी खेचल्यावर कमी होऊ शकते. खडकात गेलेल्या पाण्याचा दाब कमी-जास्त होऊन ऊर्जा उत्पन्न होते व टेक्टॉनिक जोर निर्माण होतो. भारतीय भूकंप केंद्राने (ICS) एका अहवालात हलाडपाडा, करंजविरा, ओसारविरा, अंबिवले, शिसने, देऊर आणि दापचरी अशी सात गावांची यादी देऊन ही गावे भूकंपनाभीच्या जवळ असल्याने त्यांनी विशेष खबरदारी घ्यावी, असा सल्ला दिला आहे.

 

‘ट्रेमर’ने काय घडले व सरकारने कशी मदत केली?

सरकारच्या आपत्कालीन विभागाच्या सूचनेप्रमाणे भूकंपग्रस्त क्षेत्रातील नागरिक घराबाहेर पडले व सरकारने दिलेल्या तंबूत राहिल्यामुळे थंडीने कुडकुडत राहिले. जेवण शिजविणे व खाणे आदी कामेही त्यांनी तंबूतच उरकली. विद्यार्थ्यांनीही शाळेत जाणे बंद केले. रुग्णालयातील रुग्णही भीतीपोटी बाहेर राहिले. पालघर जिल्हाधिकार्‍यांच्या अंदाजाप्रमाणे, १० किमी व्यासाचे क्षेत्र या भूकंपाने बाधित झाले. या भागातील घरे कच्च्या मालाने बांधलेली असल्यामुळे भूकंपाच्या सौम्य धक्क्यानेसुद्धा भिंतींना तडे गेले.

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १७ भूकंपबाधित गावांतील गावकर्‍यांना १५ हजार भूकंपरोधक घरे बांधण्याचे आश्वासन दिले आहे. आपत्कालीन विभागाने ‘एनडीआरएफ’कडून मिळालेले २०० तंबू नागरिकांमध्ये वाटले. तंबू जास्त लागले असता, निधीदेखील पुरविला. आयआयटी मुंबईकडून या भूकंपरोधक घरांकरिता तज्ज्ञ अभियंत्यांची एक विशेष समिती स्थापून योग्य तो सल्लाही घेतला गेला. तसेच भूकंपाच्या धक्क्यामुळे भिंत पडलेल्या नागरिकांना १६०० रुपयांच्या निधीची सरकारने मदत केली.

 

पाण्याच्या उपलब्धतेकरिता दमणगंगा व वैतरणा खोर्‍यात अनेक लहान-मोठे प्रकल्प पूर्ण झाले असून,२० ते २५ पाटबंधारे प्रस्तावित आहेत व ७७ प्रकल्पांची कामे सुरू आहेत. दापचरीतील कुर्झे धरण धुंदलवाडीपासून १८ किमीवर, सूर्या प्रकल्पातील कवडास २३ किमीवर, तर धामणी धरण ३० किमीवर आहे. या सगळ्या पाणीसाठ्यांचे रक्षण करण्याची जबाबदारी घेण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांनी सरकारकडे सूचना केल्यावर सरकारने १.८२ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

 

अच्युत राईलकर

गणित आणि भौतिकशास्त्रात बीएससी करुन त्यांनी सिव्हिल इंजिनिअरिंग केले. महानगरपालिकेपासून ते मध्य पूर्व तसेच थायलंडमध्ये बांधकामअभियंता म्हणून कार्याचा व्यापक अनुभव. पायाभूत सोयीसुविधा, शहरीकरण, संशोधनपर विषयात अभ्यासपूर्ण लेखनाचा प्रदीर्घ अनुभव.

 

अग्रलेख
जरुर वाचा
जयंत पाटील यांनी राजीनामा दिला, की घेतला? - चर्चांना उधाण; शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष, रोहित पवारांचे स्वप्न पुन्हा भंगले

जयंत पाटील यांनी राजीनामा दिला, की घेतला? - चर्चांना उधाण; शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष, रोहित पवारांचे स्वप्न पुन्हा भंगले

स्थानिक स्वराज्य संस्थांचा बिगुल वाजला असताना, शरद पवारांनी अचानक प्रदेशाध्यक्ष बदलल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ७ वर्षे एकहाती पक्ष सांभाळणाऱ्या जयंत पाटलांनी अचानक राजीनामा द्यावा आणि तो शरद पवारांनी स्वीकारावा, इतक्यापुरती ही घटना मर्यादीत नाही. त्यामुळे हा राजीनामा खरोखरच स्वेच्छेने दिला गेला की पक्षातील गटबाजीमुळे त्यांना हटवण्यात आले, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. दुसरीकडे, शशिकांत शिंदे यांच्या गळ्यात प्रदेशाध्यक्ष पदाची माळ पडली असली, तरी रोहित पवार आणि समर्थकांत भलती नाराजी पसरल्या..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121