चहाच्या मळ्यातील सहकाराचा सुगंध

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Mar-2019   
Total Views |



चहाचे मळे म्हटले की, आपसुकच डोळ्यासमोर पहिले चित्र उभे राहते ते पारंपरिक वेशभूषेत चहाची नाजूक पानं अगदी खुबीने खुडणाऱ्या आणि पाठीला टांगलेल्या टोपीत अलगद जमा करणाऱ्या आसामी महिलांचे. त्यातच हे चहाचे मळे भारतात फक्त आसाम, दार्जिलिंग आणि केरळमध्येच, असा एक सर्व साधारण समज. पण, ईशान्य भारतातील इतर राज्यांमध्येही चहाचे मळे फुललेले दिसतात. त्रिपुराही त्याला अपवाद नाहीच. आगारताळ्यानजीक अशाच एका ‘दुर्गाबारी टी-इस्टेट’च्या भेटीत तेथील चहाच्या मळ्यात सहकाराचा सुगंध दरवळून आला.


चहा... बहुतांशी भारतीयांचे आद्यपेय, अमृतपेयच जणू! या चहाचा केवळ एक घोट म्हणजे झोपेतून उठलेल्या शरीराला, थकलेल्या मेंदूला जणू इंधनपाणी देणारा. अशा या लोकप्रिय चहाच्या उत्पादनात चीननंतर आपल्या भारताचाच दुसरा क्रमांक लागतो. आसामसह इतर १०-१२ राज्यांमध्येही चहाचे कमी-जास्त प्रमाणात उत्पादन घेतले जाते. पण, लोकपसंतीस पडतो तो पूर्वेचा आसामचा चहा आणि दक्षिणेतील केरळचा चहा. म्हणूनच तर देशातील एकूण चहाच्या उत्पादनापैकी जवळपास ७० टक्के चहा हा आपण भारतीयच फस्त करतो आणि उरलेली ३० टक्के निर्यात. असे हे लोकपेय अगदी सोळाव्या शतकापासून भारतीय खाद्यसंस्कृतीचा अविभाज्य भाग असल्याचे ऐतिहासिक पुरावेही आढळतात. आसाममधील सिंगपो आदिवासींना फार पूर्वीपासूनच चहाचे मळे फुलवण्याचे पारंपरिक तंत्र वंशपरंपरागत ज्ञात होतेच. अठराव्या शतकाच्या मध्यात मग ब्रिटिशांनी चिनी चहाची पाने भारतात आणून आसाममध्ये त्यांचीही लागवड सुरू केली. चहाच्या पानाचे आरोग्यदायी फायदेही हळूहळू समोर येऊ लागले. ब्रिटनमध्ये हा भारतीय चहा अल्पावधीत गोऱ्या साहेबांच्या पसंतीस उतरला, शिवाय या चहाच्या मळ्यांना एक व्यावसायिक स्वरूपही प्राप्त झाले. ईशान्य भारतातील पोषक पर्जन्यमान, लोहयुक्त सुपीक अशी डोंगरउताराची जमीन आणि कामगारांची उपलब्धता या सगळ्या बाबी चहा उत्पादनासाठी अनुकूल ठरल्याने आसामसह अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, मणिपूर, मिझोराम, मेघालय, नागालँड, हिमाचल प्रदेश, केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, प. बंगाल, बिहार, ओडिशा, उत्तराखंड या राज्यांमध्येही चहाचे कमी-अधिक प्रमाणात उत्पन्न घेतले जाते. यामध्ये खासगी मळेमालकांबरोबरच सहकारीतत्त्वावर चालणाऱ्या मळ्यांचाही समावेश होतो. असाच एक त्रिपुरातील फार जुना चहाचा मळा म्हणजे ‘दुर्गाबारी टी-इस्टेट.’

 

खरंतर १४५ एकरवर पसरलेला ‘दुर्गाबारी’चा हिरवागार चहाचा मळा काही खाजगी मळेमालकांचा. पण, वाढता खर्च आणि मजुरांचा ताळमेळ व्यवस्थित न बसल्यामुळे हा मळा तळ्यात जायची वेळ आली. त्यानंतर सरकारने मळ्याला मिळणारे अनुदान बंद करून, मळ्यातले शेतमजूर, फॅक्टरीतल्या कामगारांची मिळून २६ डिसेंबर, १९७८ रोजी ‘दुर्गाबारी को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि.’ नावाची सहकारी संस्था स्थापना केली. या संस्थेचे संस्थापक-संचालक पानु मजुमदार आज ८५ वर्षांचे असले तरी, त्यांनी आम्हाला ‘दुर्गाबारी’च्या स्थापनेपासूनची कहाणी अगदी उत्साहाने कथन केली. या सहकारी संस्थेने जेव्हा चहाचा हा मळा खाजगी भागीदारांकडून ताब्यात घेतला, तेव्हा जवळपास ३० हजार चहाची झाडं ५५ एकर परिसरात विखुरलेली होती. २० अनुनभवी शेतमजुरांच्या मदतीने १९७९ साली या चहाच्या मळ्यातून केवळ १७ हजार, ६०० किग्रॅम इतकेच चहाचे उत्पादन, तर केवळ १९ हजार, ४०० रुपये इतकीच कमाई वाट्याला आली. पण, टी-बोर्ड आणि सरकारच्या मदतीने हळूहळू ‘दुर्गाबारी’चे रुपडे पालटत गेले. आज ‘दुर्गाबारी’च्या माध्यमातून १४५.११ एकर क्षेत्रात आठ लाख चहाच्या झाडांतून १० लाख किग्रॅमपेक्षा जास्त चहाचे वार्षिक उत्पादन घेतले जाते. ठिबक सिंचन पद्धत वापरून संपूर्ण मळ्यामध्ये पाण्याचे तुषार चहाच्या पानांवर वर्षाव करतात. पण, जर चहाची ही खुजी झाडं खरंच अगदी तजेलदार आणि हिरवीगार बघायची इच्छा असेल, तर त्रिपुराला एप्रिल ते जुलै या पावसाळी महिन्यातच भेट द्यावी. अशा या ‘दुर्गाबारी टी-इस्टेट’च्या भेटीला पर्यटक तर येतातच; परंतु चित्रपटांच्या चित्रीकरणासही इथे परवानगी दिली जाते. अट एवढीच की, एकाही चहाच्या झाडाला इजा पोहोचता कामा नये. कारण, चहाची पानं ही तशी अगदी नाजूक. त्यामुळे कोणती पानं खुडायची आणि कधी, याचेही काही सर्वसाधारण नियम मजुरांना पाळावेच लागतात. यासाठी त्यांना कुठल्याही प्रकारचं विशिष्ट प्रशिक्षण दिलं जातं नसलं तरी, वर्षानुवर्षं हेच काम करणाऱ्या मजुरांच्या सान्निध्यात नवीन मंडळीही ही चहातोडणीची कला लवकरच आत्मसाद करतात.

 

लाल कोळ्यासारखा कीडा, सुरवंट यापासून चहाच्या झाडांचे रक्षण करण्यासाठी कीटकनाशकांचीही फवारणी केली जाते. पण, चहानिर्मितीच्या प्रक्रियेत या फवारणीचा कुठलाही अंश पावडर बनवाताना समाविष्ट होणार नाही, याची रीतसर काळजी घेतली जाते. ‘दुर्गाबारी’ चहाच्या फॅक्टरीत दर तासाला १०० किलो चहाचे उत्पादन घेतले जाते आणि मशीनच्याच मदतीने तिथल्या तिथे पॅकिंगही. चहाचेही वेगवेगळे प्रकार उपलब्ध असून १६० रुपये प्रतिकिलो असा हा सामान्य चहाचा दर असून ऑरगॅनिक चहासाठी मात्र किलोला दोन हजार रुपये मोजावे लागतात. उत्सुकता म्हणून, ऑरगॅनिक चहाची पानं वेगळी असतात का, असा प्रश्न आम्ही केल्यावर, फॅक्टरी दर्शन घडवणारे आशिष नावाचे अधिकारी म्हणाले की, “काही ठिकाणी ऑरगॅनिक चहाची पानंही वेगळी उपलब्ध होत असली तरी,‘दुर्गाबारी’मध्ये या प्रकारच्या चहासाठी पानं तीचं असली तरी प्रक्रियेत मात्र फरक पडतो.” अशा या ‘दुर्गाबारी टी इस्टेट’मध्ये २० कामगारांची जागा आता २५० कर्मचाऱ्यांनी घेतली असून सध्या या सहकारी संस्थेचे १०० भागधारक आणि ९० सदस्य आहेत. आज तब्बल १०० कुटुंबांचा या चहाच्या मळ्यावर उदरनिर्वाह चालतो. कामगारांची मेहनत, गुणवत्तेकडे विशेष लक्ष केंद्रित केल्यामुळे ‘दुर्गाबारी’च्या उत्पादनामध्ये भरघोस वाढ होत गेली. आज या मळ्यातील एकूण उत्पादनापैकी ४० टक्के चहा हा गुवाहाटीच्या लिलाव बाजारात विकला जातो, तर ६० टक्के चहा स्थानिक पातळीवरच वापरला जातो. ‘टाटा टी,’ ‘ब्रुकबाँड’ यांसारखे चहाचे मोठे ब्रॅण्डही ‘दुर्गाबारी’कडून चहा विकत घेतात, हे विशेष. यावरून ‘दुर्गाबारी’च्या चहाच्या दर्जाची आपण कल्पना करू शकतो.

 

‘दुर्गाबारी’च्या यशाचे खरे गमक म्हणजे सहकार आणि सहकार्य. ‘दुर्गाबारीच्या टी-इस्टेट’वर काम करणाऱ्या मजुरांना राहण्या-खाण्याची सोय त्याच परिसरातील कॉटेजसमध्ये करण्यात आली असून त्यांच्या मुलांच्या खाजगी शिकवणीसाठीही शिक्षक उपस्थित राहतात. त्याचबरोबर ४४ टक्के बोनस, वैद्यकीय मदत, निवृत्तीवेतन यांसारख्या सुविधाही मजुरांना पुरविल्या जातात. त्यामुळे महाराष्ट्रातील ‘सहकार मॉडेल’प्रमाणे संस्थाचालक म्हणजे अगदी सहकारमहर्षी, राजकारणी, श्रीमंत आणि कामगार केवळ घाम गाळणारे असली ‘सहकार शैली’ त्रिपुरात नाही. पण, खेदाची बाब म्हणजे, दिवसाला तब्बल २० किलो चहाची पाने खुडल्यानंतर या शेतमजुरांच्या पदरात पडतात ते केवळ १२५ रुपये. त्यामुळे ४००-५०० रुपये दिवसाला मिळतील, म्हणून ‘मनरेगा’च्या कामांकडे कित्येक शेतमजुरांचा कल वाढल्याची चिंताही संबंधितांनी बोलून दाखविली. मग त्रिपुरात मजूर उपलब्ध नाहीत, म्हणून ओडिशातूनही मोठ्या प्रमाणावर शेतमजूर त्रिपुरात दाखल होतात. ‘दुर्गाबारी’च्या चहाच्या मळ्यांत तसेच फॅक्टरीतही या ओडिशातील मजुरांची संख्या मोठी आहे. त्यामुळे आगामी काळात चहाचे उत्पादन वाढवण्याबरोबरच शेतमजुरांची संख्या कायम ठेवण्याचे मोठे आव्हान आज ‘दुर्गाबारी’ तसेच त्रिपुरातील इतरही ५४ खाजगी टी-इस्टेट मालकांना भेडसावताना दिसते. त्यामुळे सहकाराचा हा सुगंध असाच कायम दरवळत ठेवायचा असेल, तर आधुनिकीकरणाबरोबरच मनुष्यबळाचीही जपणूक तितकीच महत्त्वाची.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@