दोन वैमानिक आणि दोन देशांचे स्वभाव

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Mar-2019   
Total Views |

 

 
 
 
 
शहाजुद्दीनला ठेचून मारणारे सर्वजण सामान्य पाक नागरिक होते. ‘भारताविरुद्ध कारवाया पाक लष्कर आणि वाट चुकलेले अतिरेकी करतात, सर्वसामान्य पाकी जनतेला भारताबरोबर भाईचारा हवा आहे,’ असे सतत वरच्या आवाजात सांगत राहणारा एक बोलघेवडा वर्ग भारतात आहे. त्या वर्गाने पाकी जनतेने केलेल्या या अमानुष कृत्याचा एका अक्षराने निषेध केलेला नाही किंवा त्या वर्तणुकीची मीमांसा केलेली नाही.
 

गेल्या २६ फेब्रुवारी रोजी भारताने पाकिस्तानमधील बालाकोट शहराजवळ चालवला जाणारा जैश-ए-मोहम्मद या संघटनेचा दहशतवादी प्रशिक्षण तळ एक हवाई कारवाई करून उद्ध्वस्त केला. त्यानंतरच्या दोन-तीन दिवसांत घडलेल्या सर्व घटना अद्याप ताज्या आहेत. त्या घडामोडींबाबत वेगवेगळ्या पद्धतीने चर्चा चालू आहेत आणि अशा चर्चा पुढे दीर्घकाळापर्यंत चालतील. पण या सर्व घटनाक्रमांच्या केंद्रस्थानी असलेल्या दोन तरुणांच्या संदर्भातले काही समांतर मुद्दे थक्क करणारे आहेत त्याचप्रमाणे त्यातून समोर आलेली भारत व पाकिस्तान या दोन देशांच्या संदर्भातील काही वास्तवतादेखील मुद्दाम नोंदवली पाहिजे, अशी आहे.

 

भारताने केलेल्या अतिरेकी प्रशिक्षण तळावरील कारवाईला उत्तर म्हणून पाकिस्तानने बुधवार, दि. २७ फेब्रुवारी रोजी सकाळी आपल्यावर हवाई हल्ला केला आणि जम्मू-काश्मीर सीमेवरच्या आपल्या लष्करी तळावर मारा करण्याचा प्रयत्न केला. त्या हल्ल्यासाठी पाकिस्तानने ‘एफ-१६’ या अत्यंत आधुनिक अशा अमेरिकन विमानांचा वापर केला. आपल्या सेनेने त्या हल्ल्याला सणसणीत उत्तर देऊन पाकी विमानांना पळवून लावलं. पाकच्या ‘एफ-१६’ विमानांना उत्तर देण्यासाठी आपण वापरली ‘मिग-२१’ ही ४० वर्षे जुनी आणि तुलनेने मर्यादित क्षमतेची विमाने! पाकिस्तानने हल्ला केल्यानंतर आपल्या हवाई दलाने प्रत्युत्तरादाखल चढाई करून आपल्या हद्दीत शिरलेल्या पाकी विमानांना पिटाळून लावले आणि तिथेच हा नाट्यमय घटनाक्रम सुरू झाला. पाकच्या विमानांचा पाठलाग करत आपली विमानेही पाकच्या हवाई हद्दीत घुसली आणि दोघांनीही एकमेकांवर अस्त्रांचा मारा केला. त्यात पाकचे विमान अगोदर जायबंदी झाले आणि त्याच्या वैमानिकाने हवाई छत्रीच्या मदतीने बाहेर उडी घेतली, भारतीय विमान परत फिरले. पण दरम्यानच्या गोळाबारात ते विमानही जायबंदी झाले व वैमानिकाला हवाई छत्रीच्या मदतीने उडी घ्यावी लागली.

 

 
 

विंग कमांडर अभिनंदन वर्धमान भारतीय ‘मिग-२१’चा वैमानिक तर विंग कमांडर शहाजुद्दीन हा पाकिस्तानच्या ‘एफ-१६’चा वैमानिक! दोघेही आपापल्या देशातील हवाईदलांच्या निवृत्त एअर मार्शलचे पुत्र! त्या दिवशी दोघांनीही एकाच वेळी आपापल्या देशांच्या आकाशात झेप घेतली आणि आमने-सामने आल्यावर त्यांनी एकमेकांवर मारा केला. आपापल्या विमानांना हानी पोहोचलेली पाहून दोघेही स्वदेशात येण्यासाठी परत फिरले. शहाजुद्दीन स्वदेशात पोहोचण्यात यशस्वी झाला,तर अभिनंदनला शत्रूच्या हद्दीतच उतरावं लागलं आणि बहुधा इथेच दोघांच्याही भाग्यरेषांनी वेगळे रस्ते निवडलेअभिनंदन शत्रूच्या हाती पडला आणि युद्धकैदी ठरला. पुढचे ६०-७० तास आंतरराष्ट्रीय राजकारणातील मुत्सद्देगिरी आणि दबाव-प्रतिदबावाच्या खेळाचा केंद्रबिंदू बनला. ज्यांच्या हाती तो पडला होता त्यांनी अभिनंदनला मारहाण केली. त्यात बहुधा तो जखमीही झाला असावा पण, तो वाचला. बातम्यांवर विश्वास ठेवायचा, तर अमेरिका आणि सौदी अरेबिया त्याला सोडवण्यासाठी भारताच्या मदतीला आले. अभिनंदन भारतात सुखरूप परत आला, १२५ कोटी भारतीयांचा ‘हिरो’ ठरला. संपूर्ण देशाने त्याचे आनंदाने स्वागत केले. त्या कसोटीच्या काळात संपूर्ण देश त्याच्या आणि त्याच्या कुटुंबाच्या पाठीशी उभा होता. त्या कुटुंबाच्या दु:खात आणि आनंदात पुरा देश सहभागी होता. भारताच्या सरकारने त्याच्या शौर्याची, कर्तृत्वाची योग्य ती दखल घेतली.

 

शहाजुद्दीनच्या कथेने मात्र इथे वेगळे वळण घेतले. शहाजुद्दीन स्वतःच्या देशात उतरला, स्वकीयांच्या हाती पडला पण, त्या स्वकीय बांधवांनीच त्याला ‘भारतीय समजून’ मरेपर्यंत मारहाण केली. शत्रूच्या माऱ्यातून सहीसलामत वाचलेला शहाजुद्दीन स्वकीयांकडून मारला गेला. त्याच्या देशाने ना त्याच्या शौर्याची, कौशल्याची दखल घेतली, ना त्याच्या हौतात्म्याची नोंद केली. त्याचा केवळ मृत्यूच नाही, तर तो स्वत:, त्याचे आई-वडील, कुटुंबीयसुद्धा पूर्ण उपेक्षित राहिले. पाकिस्तानने शहाजुद्दीनला नाकारण्याची भूमिका घेतली. त्याच्या दु:खी कुटुंबीयांच्या दु:खावर फुंकर घालायला सरकार, जनता आणि प्रसार माध्यमे यांच्यापैकी कोणीही गेले नाहीत. त्याची कर्तव्यदक्षता, शौर्य, कौशल्य आणि हौतात्म्य हे सगळे त्याच्याच सरकारने, जनतेने आणि संबधित सर्वांनी नाकारले. असे दुर्दैव शहाजुद्दीनच्या वाट्याला आले याचे खरोखरच वाईट वाटतेमी काही दैववादी नाही. तरीही हा समांतर घटनाक्रम आणि त्याचे वेगवेगळे शेवट थक्क करणारे आहेत. पण त्याचबरोबर या घटनाक्रमातून भारत आणि पाकिस्तान या दोन देशांचे स्वभाव व संस्कृती यावरही चांगलाच उजेड पडतो त्याचीही वेळीच नोंद घेणे आवश्यक आहे.

 

एक गोष्ट स्पष्ट आहे, जर शहाजुद्दीन भारताच्या हद्दीत पडला असता, तर नक्कीच जीवंत राहिला असता, त्याला कोणी मारहाण केली नसती आणि योग्य वेळी तो आपल्या देशात परत गेला असता. पण पाकिस्तानच्या भूमीवर मात्र त्याला ‘भारतीय समजून’ ठेचून मारले गेले. शहाजुद्दीनला ठेचून मारणारे सर्वजण सामान्य पाक नागरिक होते. ‘भारताविरुद्ध कारवाया पाक लष्कर आणि वाट चुकलेले अतिरेकी करतात, सर्वसामान्य पाकी जनतेला भारताबरोबर भाईचारा हवा आहे,’ असे सतत वरच्या आवाजात सांगत राहणारा एक बोलघेवडा वर्ग भारतात आहे. त्या वर्गाने पाकी जनतेने केलेल्या या अमानुष कृत्याचा एका अक्षराने निषेध केलेला नाही किंवा त्या वर्तणुकीची मीमांसा केलेली नाही. आपण भारतीय म्हणून एक गोष्ट समजावून घेणे आवश्यक आहे ती म्हणजे पुलवामामधील दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर घडलेल्या सर्व घटनाक्रमात पाक लष्कर, सरकार, प्रसारमाध्यमे व जनता सगळे एकाच भूमिकेत आहेत आणि ही भूमिका आहे - ‘काहीही किंमत द्यावी लागली तरी ती देऊन भारताचे अस्तित्व संपवणे!’ अर्थात, ही त्यांची भूमिका आजची नाही. १५ ऑगस्ट १९४७ पासूनची आहे, आपणच इतके वर्ष विनाकारण ‘अमन की आशा’चे ढोलताशे वाजवत बसलो आहोत.

 

शहाजुद्दीन प्रकरणात पाकमधील प्रसारमाध्यमे पूर्णपणे गप्प आहेत. ते कोणीही त्यांच्या सरकारला कोणताही जाब विचारत नाहीत किंवा निषेधाचा सूरही आळवत नाहीत. त्याचे नावही कोणी काढत नाही. पाकिस्तानातही आपल्या सारख्याच असंख्य स्वयंसेवी संस्था आहेत. पण त्यांच्यापैकी कोणीही शहाजुद्दीनसाठी दोन टीपे गाळायला पुढे आलेले नाहीत. आश्चर्य म्हणजे भारतातले झोलावालेसुद्धा आत्ता गप्प आहेत. हेच जर उलटे झाले असते आणि शहाजुद्दीन भारतीय सैन्याच्या हातात पडला असता, तर हे सर्व ‘वाचीवीर’ आपल्या सरकारला जिनिव्हासकट असलेल्या नसलेल्या करारांचा दाखले देऊन प्रवचन देताना दिसले असते आणि दुर्दैवाने अभिनंदन वर्धमान तत्काळ परत आला नसता, तर या मंडळीनी काय काय तमाशे केले असते त्याची कल्पना करणे सहज शक्य आहे. संघर्षाच्या काळात किंवा कधीही पाकिस्तानी वृत्तपत्रे, प्रसारमाध्यमे आणि जनता, भारताच्या विरोधात एकाच आवाजात बोलतात, सरकारच्या बाजूने उभे राहतात. शहाजुद्दीनचे अस्तित्व नाकारणे ही पाकिस्तान सरकारची निकड असेल पण तेथील जनता, वृत्तपत्रे, प्रसारमाध्यमे, आणि मानवाधिकारवाले, बुद्धिवंतसुद्धा आज सरकारच्या बाजूनेच उभे राहिले आहेत, हे आपण समजून घेतले पाहिजे. पाकिस्तानबद्दल कोणतीही भूमिका घेताना हे वास्तव विसरून चालणार नाही. दोन वैमानिकांच्या बाबतीतला हा समांतर घटनाक्रम त्याच्या व्यापक परिप्रेक्ष्यामध्ये समजून घेतला पाहिजे.

 

(लेखक महाराष्ट्र भाजपचे मुख्य प्रवक्ते आहेत.)

 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

 
 
@@AUTHORINFO_V1@@