संघर्ष संपला, समस्या कायम!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Mar-2019   
Total Views |

 

 
 
 
पाकिस्तानात काय सुरू आहे याची कल्पना असल्याने इमरानने ‘नया पाकिस्तान’ची घोषणा देत नवा पक्ष काढला, जो आज सत्तारुढ आहे. इमरान खान लष्कराच्या पाठिंब्याशिवाय भारताशी बोलू शकत नाही, हे सत्य आहे आणि पाकिस्तान लष्करालाही एक चेहरा हवा आहे, हेही सत्य आहे. त्यातून पाकिस्तानची सध्याची राजवट साकारली आहे. ही राजवट इमरान खानचे किती काळ ऐकणार हे कुणालाही माहीत नाही.
 

आपल्या शत्रूला कमी लेखू नका! युद्धशास्त्राचा हा पहिला नियम. पाकिस्तान कोणत्याही नियमाचे पालन करीत नसला तरी त्याने हा नियम लक्षात ठेवला. भारतानेही लक्षात ठेवला. याने भारत-पाकिस्तान यांच्यात उदभवू शकणारा संघर्ष टळला. युद्ध म्हणजे काय, त्याची तयारी काय याची कल्पना लष्कराला, वायुदलाला असते. ती चॅनेलवाल्यांना नसते. १९७१ चे युद्ध सुरू होण्यापूर्वी एप्रिल महिन्यात पंतप्रधान इंदिरा गांधी यांना पूर्व पाकिस्तानात आताच्या बांगलादेशमध्ये लष्करी कारवाई हवी होती आणि जनरल माणेकशाँसारखा सेनापती त्यास तयार नव्हता. इंदिरा गांधी व तत्कालीन संरक्षणमंत्री जगजीवनराम यांनी माणेकशाँ यांना तातडीने कारवाई करण्यासाठी राजी करण्याचा प्रयत्न केला. पण, माणेकशाँ तयार झाले नाहीत. आता युद्ध झाल्यास, पराभव निश्चित, असे सडेतोड उत्तर त्यांनी दिल्यानंतर, इंदिरा गांधींनी आपला आग्रह मागे घेतला व युद्ध झाले डिसेंबर महिन्यातभारत-पाकिस्तान दोन्ही देश मोठ्या युद्धासाठी तयार नव्हते. दोन्ही देशांच्या चॅनेलनी युद्धाची तयारी सुरू केली होती. सुदैवाने, युद्धाचा निर्णय चॅनेलवाल्यांच्या हाती नव्हता. तो राजकीय व लष्करी सेनापतींच्या हाती होता. त्यांनी स्थिती हाताबाहेर जाऊ दिली नाही.

 

भारताने पाकिस्तानमधील अतिरेकी अड्ड्यांवर हवाई कारवाई केल्यानंतर पाकिस्तानने दुसऱ्या दिवशी भारताच्या राजौरी भागात हल्ले करण्याचा प्रयत्न केला. यात पाकिस्तानने भारताचे एक विमान पाडले आणि भारताने पाकिस्तानचे एक विमान पाडले. दुदैवाने भारताचा एक पायलट पाकिस्तानच्या हाती सापडला. त्याची सुटका करण्याचा एक चांगला निर्णय पाकिस्तानने घेतलापाकिस्तानमधील बालाकोट येथील अतिरेकी अड्ड्यांवर भारताने ही कारवाई केली. पाकिस्तानात दोन बालाकोट आहेत. एक भारतीय सीमेपासून १६०० किलोमीटरवर खैबर पख्तुनवा भागात आहे तर दुसरे सीमेपासून ४० किलोमीटरवर आहे. भारताने केलेली कारवाई या दुसऱ्या बालाकोटजवळ आहे. सीमेलगतच्या बालाकोटपासून १५ किलोमीटर अंतरावर जाबा टॉप नावाची पहाडी आहे. तेथे अतिरेक्यांचे अड्डे होते. त्याविरोधात ही कारवाई करण्यात आली. यात २००-३०० अतिरेकी ठार झाले. याचे पुरावे सरकारजवळ असून, ते योग्य वेळी जारी केले जातील.

 

भारत-पाकिस्तान यांच्यात थेट युद्ध होण्याची शक्यता जवळपास नव्हतीच. कारण, या युद्धाचे परिणाम दोन्ही देश जाणून आहेत. भारत व पाकिस्तान यांनी परस्परांच्या हवाई हद्दीत कारवाया वाढविण्याचा प्रश्नच नव्हता. मात्र, जमिनीवर दोन्ही देशांमध्ये दररोजच्या चकमकी सुरू आहेत व त्या सुरूच राहणार आहेत. मुख्य प्रश्न आहे-पाकिस्तानने दहशतवादी कारवाया करण्याचा व त्यासाठी काश्मीर खोऱ्याचा वापर करण्याचा. पाकिस्तानची आर्थिक स्थिती चांगली नाही. या कारणामुळे तो भारताशी युद्ध करणार नाही, असा एक युक्तिवाद केला जात होता. अफगाणिस्तानची आर्थिक स्थिती कोणती चांगली आहे? मात्र, तेथे तालिबानी व अफगाणिस्तान सरकार यांच्यात मागील १७ वर्षांपासून संघर्ष सुरू आहे. पाकिस्तानची स्थिती कमजोर झाली, ती ओसामा बिन लादेन पाकिस्तानात मारला गेल्यापासून. पाकिस्तानातील अबोटाबाद लष्करी अकादमीला लागून ओसामा राहात होता. हे काही पाक लष्कराच्या साहाय्याशिवाय होत नव्हते. तो पाकिस्तानात मारला गेला, हे भारतासाठी फार चांगले झाले. पाकिस्तान दहशतवादाला खतपाणी घालत आहे, या भारताच्या युक्तिवादाला त्या घटनेने फार मोठे बळ मिळाले; अन्यथा पाकिस्तान आजवर प्रत्येक घटनेचा इन्कारच करीत आला आहे.

 

किंचित बदल

 

दोन घटनांमुळे पाकिस्तानच्या भूमिकेत काहीसा बदल झाला आहे. यातील एक प्रमुख घटना म्हणजे दशतवादाच्या समस्येने पाकिस्तानला ग्रासले आहे. दहशतवादाचा भस्मासूर पाकिस्तानने उभा केला. तो त्याच्याच मानगुटीवर बसला. या तडाख्यातून पाक लष्करही सुटले नाही. या दहशतवादाने पाक जनमानसाला जबर धक्का दिला. त्यातही पेशावरमधील एका शाळेत १५६ विद्यार्थ्यांची हत्या झाली, ती घटना पाकिस्तानी जनतेला मोठा धक्का देणारी ठरली. त्या साऱ्या वातावरणात पाकिस्तानच्या जनतेने इमरान खानच्या पक्षाला जनादेश दिला. यात पाकिस्तान लष्कराचा मोठा वाटा होता. नवाझ शरीफ सरकार व पाकिस्तान लष्कर यांच्यात शीतयुद्ध सुरू होते. नवाझ शरीफ भारताशी जेव्हा जेव्हा सहकार्य करण्याची भाषा बोलत, पाकिस्तानी लष्कर त्याला सुरुंग लावीत असे. आज पाकिस्तानात सरकार व पाकिस्तानी लष्कर एकत्र आहेत. सध्या तरी इमरान खानने आपले लक्ष्य पाकिस्तानच्या आर्थिक विकासावर केंद्रित केले आहे. इमरान खान हा राजकारणी नाही. त्याला क्रिकेटने पैसा दिला, प्रसिद्धी दिली. मात्र, पाकिस्तानात काय सुरू आहे याची कल्पना असल्याने त्याने ‘नया पाकिस्तान’ची घोषणा देत नवा पक्ष काढला, जो आज सत्तारुढ आहे. इमरान खान लष्कराच्या पाठिंब्याशिवाय भारताशी बोलू शकत नाही, हे सत्य आहे आणि पाकिस्तान लष्करालाही एक चेहरा हवा आहे, हेही सत्य आहे. त्यातून पाकिस्तानची सध्याची राजवट साकारली आहे. ही राजवट इमरान खानचे किती काळ ऐकणार हे कुणालाही माहीत नाही.

 

पाकची डोकेदुखी

 

पाकिस्तानसाठी दाऊद इब्राहीम, मौलाना मसूद अझहर हे आता डोकेदुखी आहेत. मात्र, यांचा वापर भारताविरुद्ध करण्यात आला होता. आता ते पाकिस्तानच्या अंगलट आले आहे. मधूनच मौलाना मसूद अझहरला त्याच्या घरात स्थानबद्ध केले जाते. त्याला लपवून ठेवले जाते. जे सध्या करण्यात आले आहे. भारत-पाक यांच्यातील तणाव निवळला असला तरी दहशतवादाची समस्या कायम आहे आणि याच्या मुळाशी आहे काश्मीर! जोपर्यंत या समस्येवर तोडगा शोधला जात नाही, भारतीय जवानांचे रक्त सांडणे बंद होणार नाही. दोन्ही देशांना याची जबर आर्थिक किंमत मोजावी लागत आहे. दोन्ही देशांत कमालीची गरिबी आहे. आरोग्याच्या सेवा मर्यादित व महागड्या आहेत. नवनवे प्रश्न निर्माण होत आहेत. ते सोडविण्यासाठी दोन्ही देशांजवळ पुरेसा निधी नाही. मात्र, तरीही लष्करी सामुग्रीची खरेदी दोन्ही देशांना करावी लागत आहे. भारताला ५८ हजार कोटींची राफेल विमाने खरेदी करावी लागली तर पाकिस्तान चीनसोबत जेएफ-१७ थंडर विमान विकसित करीत आहे. दोन्ही देशांत शस्त्र विकणाऱ्या लॉबी सक्रिय आहेत. भारत-पाकिस्तान यांच्यात कायम तेढ राहावी, असा प्रयत्न दहशतवादी गट करीत आहेत, तेच उद्योग शस्त्र लॉबी करीत असतात. याच लॉबी दहशतवादी गटांना सहकार्य करीत असल्यास त्यात आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. कारण, या लॉबीसाठी भारत एक मार्केट आहे. भारताजवळ रशियन बनावटीचे ‘सुखोई ३०’ विमान आहे. आता ही कंपनी आपले ‘सुखोई ३५’ पाकिस्तानला विकण्याच्या प्रयत्नात आहे. अमेरिकेची ‘एफ-१६’ विमान निर्मिती करणारी लॉकहीड कंपनी भारताला आपले विमान विकण्याच्या प्रयत्नात आहे. बंगळुरूत नुकत्याच झालेल्या एअर शोमध्ये ‘एफ-१६’ विमानाची कामगिरी दाखविण्यात आली. भारत-पाक यांच्यात शांतता निर्माण झाल्यास, ही विमाने कोण खरेदी करणार? रशिया, ब्रिटन यांच्या जुनाट विमानवाहू युद्धनौका हजारो कोटी रुपये देऊन कोण खरेदी करणार? भारत आणि पाकिस्तान यांनी काश्मीरवर तोडगा काढणे, ही काळाची गरज ठरणार आहे.

 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

 
 
@@AUTHORINFO_V1@@