पाकची ‘कौमी मिठाई’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Mar-2019   
Total Views |



 


एकीकडे शेजारी पाकिस्तानला भिकेचे डोहाळे लागले असले, भारताच्या हल्ल्याचे सावट अजूनही कायम असले तरी गोडाधोडाची पाकड्यांची हौस काही फिटलेली दिसत नाही. कारण, पाकिस्तान सरकारच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून नुकतेच एक सर्वेक्षण करण्यात आले. सर्वेक्षणही कसले, तर पाकिस्तानची ‘कौमी मिठाई’ म्हणजे राष्ट्रीय गोडाचा पदार्थ कुठला असावा? पर्याय होते फक्त तीन. जिलेबी, बर्फी आणि गुलाबजाम. जेमतेम २२ कोटी लोकसंख्येच्या या देशात ट्विटरवर केवळ १५ हजार, १४७ पाकिस्तानींनी आपला कौल दिला तो गुलाबजामला. १९ टक्के बर्फी, ३४ टक्के जिलेबी आणि ४७ टक्क्यांच्या पसंतीस उतरला तो साखरेच्या पाकातील गोड, रुचकर गुलाबजाम...

 

या सर्वेक्षणावरून मात्र पाकिस्तानची स्तुती करण्यापेक्षा नागरिकांनी सरकारलाच धारेवर धरले. खरंतर, कुठल्याही गोष्टीची अशी ‘राष्ट्रीय’ ओळख जाहीर करण्यासाठी, प्रत्यक्षात लोकांशी भेटून सर्वेक्षण केले जाते, त्यांची मते विचारात घेतली जातात. शिवाय त्या विशिष्ट गोष्टीचा इतिहासही आपल्या देशाशी निगडित आहे अथवा नाही, त्या निवडीमुळे कोणाच्या भावना दुखावणार नाहीत, अशा विविध निकषांचा विचार करावा लागतो. पण, असा शास्त्रशुद्ध विचार करतील ते पाकिस्तानी कसले!! म्हणूनच, पाकिस्तानचे गुलाबजामशी कोणतेही ऐतिहासिक ‘पाकबंध’ नसतानाही गुलाबजामची ताजपोशी ‘कौमी मिठाई’ म्हणून करण्यात आली. कराचीचा हलवा तसेच पाकिस्तानातील विविध भागांत प्रसिद्ध असणाऱ्या मिठायांची साधी दखलही न घेतल्यामुळे सरकारला ट्विटरवर चांगलेच ट्रोल केले गेले. पण, नागरिकांना, त्यांच्या भावनांना जुमानेल तो पाकिस्तान कसला! या निमित्ताने दुसरा प्रश्न उपस्थित होतो की, पाकिस्तान गुलाबजामला ‘राष्ट्रीय मिठाई’चा दर्जा देण्यासाठी गुलाबजामचेही काही ‘पाक कनेक्शन’आहे का? अहो, तो ‘पाकात’ बनतो म्हणून ‘पाकिस्तानचा’, असेही कोणी खोडसाळपणे म्हणेल; म्हणूनच गुलाबजामचा थोडक्यात इतिहास समजून घ्यायला हवा. गुलाबजाम नेमका भारतात आला तरी कुठून, याबाबत दोन तर्क सांगितले जातात. पहिला म्हणजे मध्य आशियातील तुर्कांनी भारतावर आक्रमण केले, त्या काळात गुलाबजाम भारतात दाखल झाला असावा. दुसरा कयास म्हणजे, शहाजानच्या आचाऱ्याने स्वयंपाकगृहात प्रयोग करता करता त्याला गुलाबजामचा शोध लागला. एवढेच काय, तर अरबांच्या ‘लकमत-अल-कादी’ किंवा तुर्कांच्या ‘लोकमा’ या गोड पदार्थाशीही गुलाबजामचे साधर्म्य दिसून येते. फक्त फरक आहे तो, गुलाबजाम तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मिश्रणाचा. तर असा हा सुप्रसिद्ध गुलाबजाम आज भारतीय उपखंडातील भारतासह, पाकिस्तान, बांगलादेश, भूतान, म्यानमारमध्येही अगदी आवडीने खाल्ला जातो. त्याचबरोबर द. अमेरिकेतील काही देशांपर्यंतही गुलाबजामची ख्याती अशी सर्वदूर पसरली आहे.

 

‘गुलाब’ आणि ‘जामुन’ अर्थात गुलाबाचे फूल आणि जांभळाचे फळ. साखरेच्या पाकात बरेचदा सुगंधासाठी गुलाबजलाचाही वापर केला जातो आणि जांभळाच्या आकाराचे खव्याचे छोटे छोटे ते जामून. तसेच, गुलाबजाम तयार करताना वेगवेगळ्या पाककृतीही वापरल्या जातात. यामध्ये दुधाची पावडर, दही आणि काही देशांत चक्क अंड्याचाही वापर केला जातो. अशा या गुलाबजामचे पाकिस्तानात मोठ्या प्रमाणात चाहते असले तरी निश्चितच त्याचे मूळ मात्र पाकिस्तानी नाही, हे निश्चित. पण, जे आपले नाही, कधीही नव्हते आणि होणारही नाही, त्यावर अधिकार सांगण्याची पाकिस्तानची तशी जुनीच खोड. ती काही केल्या मोडणारी नाहीच. एकीकडे आर्थिक तंगी, दहशतवादाची काळी छाया, तर दुसरीकडे भारताकडून हल्ल्याच्या भीतीपोटी चलबिचल पाकिस्तानचे, सरकारी पातळीवर असे हे ऑनलाईन सर्वेक्षणाचे केविलवाणे प्रकार सुरू आहेत. पाकिस्तानने अशा ऑनलाईन सर्वेक्षणांचा वापर त्यांच्या देशातील नागरिकांची मते, समस्या जाणून घेण्यासाठी, सोडविण्यासाठी केला असता, तर त्याचे कौतुक झालेच असते. पण, अल्पसंख्याक, महिलांवर होणाऱ्या अत्याचारांवर कठोर कारवाई करण्यास कुचरणाऱ्या पाकिस्तान सरकारच्या जिभेवर गुलाबजामची गोडी कशी काय तरळू शकते, हाच प्रश्न पडतो.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@