पालावरच्या जगण्याच्या वेगळ्या वाटा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Mar-2019   
Total Views |


 

मुंबई-पुणे मार्गावरील फूड मॉलचे व्यवस्थापक सुनील भिंगारे यांचा संघर्ष आणि समन्वय कदाचित वेगळ्या वाटेवरचा आहे. पण तो संघर्ष, समन्वय आज पालावरच्या जगण्याचा चिंतनीय विषय आहे.

सुनील भिंगारे... मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेच्या खालापूर रोडवरील फूड मॉलचे व्यवस्थापक. एक मोठी जबाबदारी. हाताखाली पूर्ण प्रशिक्षित सहकारी. एक वेगळीच चकाकती आणि तितकीच जबाबदारीची दुनिया. या सगळ्या धकाधकीमध्ये सुनील आयुष्याच्या महत्त्वाच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करून आहेत. ते ध्येय म्हणजे आंतरजातीय विवाह (हिंदू धर्मातच) केला म्हणून जातपंचायतीने बहिष्कृत केलेल्या विवाहितांना मानसिक आधार देण्याचे. त्यांना समाजाशी जोडून ठेवण्याचे आणि समाजामध्ये या जोडप्यांना पुन्हा स्वीकृती कशी मिळेल, यासाठीचे ते प्रयत्न करतात.

रत्नागिरीच्या मंडणगडच्या दहागावच्या पालावर राहणारे भिंगारे कुटुंब. मूळ नंदीबैल घेऊन भटक्याचे आयुष्य जगायचे. पण, कालांतराने भांडी विकण्याचे काम करू लागले. बाळू भिंगारे यांना पाच मुलं. त्यापैकी एक सुनील. पालावरचे जगणे ते काय? सगळ्याच वंचित आणि शोषित जगण्याचे प्रतिनिधित्व करणारे ते जगणे. सुनील भिंगारे म्हणतात, “हातावरचे पोट, आईबाबा कष्ट करायचे. पण, अठराविश्वे दारिद्य्र. यापेक्षा आयुष्य काही वेगळं असतं, असं कधी वाटायचचं नाही. सण आहे आणि आनंदाने हसणंही असतं, हे मला दुसर्यांकडे पाहून समजलं. त्या परिस्थितीला मला बदलायचे होते.” सुनील यांनी परिस्थिती बदलायचा चंग बांधला. शाळेमध्ये सैनिकांची गोष्ट ऐकलेली. सुनील यांना वाटे की, मीही सैनिक व्हावे. या देशासाठी, समाजासाठी काहीतरी करावे. त्यासाठी त्यांनी सैनिकी परीक्षाही दिल्या. पण, प्रत्येकवेळी काही ना काही कारणामुळे ते आरोग्यचाचणीमध्ये अनुत्तीर्ण व्हायचे. खूप सहनशक्तीचा काळ होता तो. कारण, त्यांच्या घरात अन्न नाही आणि खिशात पैसे नाहीत. पण, स्वप्न मोठी होती ना.

 

मात्र, सुनील यांनी धीर सोडला नाही. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. कामानिमित्त त्यांचा मोठा भाऊ मुंबईला राहायचा. त्याच्यासोबत ते राहू लागले. छोटी-मोठी कामे करू लागले. कष्ट करत, मेहनत करत आज ते मोठ्या फूड मॉलचे व्यवस्थापक आहेत. काम करताना मुंबईमध्ये त्यांना समाजाची माणसे भेटली. पालावरच्या जगण्यापेक्षा या सार्यांचे जगणे अतिशय वेगळे होते. पण, दुबईला जाणार्या उच्चशिक्षित माणसालाही त्याच्या गावच्या जातपंचायतीच्या न्यायनिवाड्यानुसार जगावे लागते, हे वास्तव त्यांनी इथेच पाहिले. समाजाचे भावनिक आणि दंडात्मक संघटनेचे शक्तिमान रूप सुनील यांना चांगलेच परिचित होते. याच दरम्यान सुनील यांनी अनुभवले की, समाज सर्वशक्तिमान आहे, पण प्रगतिपथावर जाण्यासाठी समाजामध्ये सकारात्मक परिवर्तन आणण्यासाठी लवचिकता असायला हवी. पिढ्यान्पिढ्या असलेल्या सगळ्याच परंपरा आता कालानुरूप योग्य असतीलच असे नाही. कालसुसंगत नसलेल्या आणि समाजाचे ज्यांच्यामुळे हनन होते, अशा रूढींना हळूहळू का होईना त्यागण्याची तयारी समाजात कशी येईल, याचा ते विचार करू लागले. त्यासाठी काम करू लागले. आज नंदीबैल समाजाचे 32 युवक बहिष्कृत आहेत. कारण, त्यांनी आंतरजातीय विवाह केला आहे. या सार्यांना समाजाने पुन्हा आपल्यात सामावून घ्यावे, यासाठी सुनील कार्यशील आहेत.सुनील म्हणतात त्याप्रमाणेरिल आणि रियलजीवनामध्ये तुफान अंतर असते. ‘रिलमधीलसैराटच्या आर्ची-परश्याच्या आयुष्याचा वणवा बराच काळ चर्चेत राहिला. पण, ‘रियलजीवनात असे बरेच परशा आणि आर्ची आहेत जे ना मेले ना जगले. त्यांची नाळ त्यांच्या त्यांच्या समाजाशी, जातीशी आणि कुटुंबाशी घट्ट जुळलेली. पण, आंतरजातीय विवाह केला म्हणून त्यांना समाजाबाहेर म्हणजे वाळीतच टाकलेले आहे. त्यांच्या घरातल्यांनी त्यांच्याशी संबंध ठेवला तर तेही वाळीत. मुलाला किंवा मुलीला कितीही वाटले की, घरच्यांना भेटावे तर चोरूनमारूनच भेटावे लागणार; अन्यथा त्या घरातल्यांच्याही नशिबी बहिष्कृताचे जगणे. आंतरजातीय विवाह करून समाजातून बहिष्कृत केलेली जोडपी, काय करत असतील? हा विचारही सहसा मनात येत नाही. पालाच्या बाहेरच्या समाजासाठी परिस्थिती बदललीही असेल. पण, पालावर जगणार्या अठरापगड समाजामध्ये सध्या या प्रश्नाने उचल खाल्ली आहे.”

 

सुनील यांनाही 2017 साली मराठा समाजाच्या मुलीशी विवाह केला म्हणून त्यांना समाजातून बहिष्कृत करण्यात आले. पण त्यांचे आईवडील आणि भाऊ त्यांच्यासोबत ठामपणे उभे राहिले. काकांनी मात्र पंचायतीला जामीनदार म्हणूनआडपूम्हणजे दंड भरला. पंच जे सांगतील, तो निर्णय सुनील यांना मान्य करायला लावतील, असे काकांनी सांगून टाकले. सुनील यांनीही समाजाच्या पंचांशी संपर्क केला, संवाद केला. ते म्हणाले, “कोणी सांगितले की, तुला बहिष्कृत केले?” पण त्यानंतर समाजातल्या कोणत्याही कार्यात सुनील यांच्या कुटुंबीयांना बोलावले गेले नाही. मात्र, भेटल्यावर सगळे हेच म्हणत की, “कुणी सांगितले तुम्हाला की, तुम्हाला जातीबाहेर काढले?” पुढे काकाच्या मृत्यूनंतर सुनील कुटुंबासह कार्याला गेले. तिथे सर्वच जण व्यवस्थित वागले. पण, दहाव्याला केस कापल्यानंतर नंदीबैल समाजातबट्टूनावाचा विधी करतात. तो विधी सुनील यांना केला नाही. असे का? विचारल्यावर कुणीही उत्तर दिले नाही. सुनील यांचे कुटुंब समाजाने आपल्यातून दूर ठेवले तरी सुनील यांना समाजाबद्दल आजही तितकेच प्रेम आहे. समाजातील युवकांचा शिक्षण आणि रोजगाराचा गंभीर प्रश्न आहे. नंदीबैल घेऊन भिक्षा मागणारा समाजातला युवक सक्षम व्हायला हवा, त्याच्यापर्यंत त्याच्यासाठीच्या योजना पोहोचायला हव्यात, हाही त्यांचा प्रयत्न असतो. हे सर्व करण्यासाठी जातपंचायतीसारखे माध्यम नाही, त्याचबरोबर कायदा-सुव्यवस्था आणि प्रशासनाची साथ हवी असे सुनील यांचे मत आहे. सुनील यांचा संघर्ष समन्वय कदाचित वेगळ्या वळणाचा...

 


माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा...facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@