शाश्वत ब्रह्म आणि मिथ्या जगत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Mar-2019
Total Views |


 


या सृष्टीत शाश्वत आणि अशाश्वत अशा दोनच गोष्टी आहेत
. आपण सर्वजण अशाश्वत गोष्टी आजूबाजूला घेऊन जगत असतो. फक्त परब्रह्म हे शाश्वत आहे, निश्चल आहे. त्याव्यतिरिक्त दृश्य जगात दिसणार्या इतर सर्व गोष्टी या मायोपाधिक असल्याने त्या अशाश्वत म्हणजे चंचल आहेत. दासबोधाच्या सुरुवातीस समर्थांनी या ग्रंथात काय सांगितले आहे, हे सांगताना, ’बहुधा अध्यात्मनिरोपण । निरोपिले’ असे म्हटले आहे. हे ‘अध्यात्म निरोपण’ म्हणजेच ब्रह्म निरूपण दासबोधात शेवटपर्यंत स्वामींनी सांगितले आहे. त्यामुळे दासबोधाच्या अभ्यासकाला या ब्रह्मवादाची माहिती करून घ्यावी लागते. इतर तत्त्वज्ञान्यांप्रमाणे रामदासांनी श्रोत्यांपुढे अवघड भाषेत हे तत्त्वज्ञान न मांडता सामान्यांना समजेल, त्यांच्या बुद्धीला पटेल, अशा भाषेत समजावले आहे.

ब्रह्म सत्यं, जगन्मिथ्या’, हे सूत्र तत्त्वज्ञानाच्या अभ्यासकांना तसेच सामान्यांनाही माहीत असते. सर्वसाधारण भाषेत बोलायचे तर ब्रह्म हे शाश्वत आहे. ते निश्चल आहे. त्यामुळे तेच फक्त सत्य आहे आणि ‘जगन्मिथ्या’ म्हणजे हे जगत् खोटे आहे, ते असत्य आहे, तो केवळ भास आहे. तत्त्वज्ञानातील या सूत्राचा सर्वसामान्यांना सांगितला गेलेला हा अर्थ. परंतु, हे जग जर खोटे आहे, असत्य आहे तरी ते आपल्याला दिसते, आपण त्यातच वावरत असतो, आपले सारे जीवन या जगातच चाललेले असते. मग त्याला खोटे कसे म्हणता येईल, अशी शंका उपस्थित होणे साहजिक आहे. संत आणि तत्त्वज्ञानी या जगाला खोटे, मायोपाधिक म्हणतात, याची संगती कशी लावायची?

हे जग मिथ्या आहे. हा प्रपंच मिथ्या आहे. प्रपंच म्हणजे केवळ माया आहे. प्रपंच एक स्वप्न आहे म्हणून प्रपंचाचा विचार करण्याचे कारण नाही. प्रपंच हा भ्रम आहे. स्वप्नातून जागे झाल्यावर माणूस सत्यात येतो. पण, स्वप्नात असेपर्यंत स्वप्नच सत्य वाटते. तसा हा प्रपंच म्हणजे एक स्वप्न आहे. प्रपंचात वावरताना प्रपंचच खरा आहे, असे वाटत असते. अशा प्रकारची शिकवण संतकुळाने आणि भारतीय तत्त्ववेत्त्यांनी पूर्वीपासून जनमानसात दृढ केली होती. या तत्त्ववेत्त्यांनी ‘जगत् मिथ्या’ याचा अर्थ हे जग मुळात नाहीच, ते आपल्याला असल्यासारखे वाटते, असा केला होता. अजूनही परमार्थ विचारांचे विवेचन करताना हे तत्त्वज्ञान सांगितले जाते. त्यामुळे लोकांच्या मनातील संभ्रम आणखी वाढतो. या विचारांपासून सुटण्यासाठी लोकांमध्ये वैचारिक क्रांती झाली पाहिजे, असे रामदासांना वाटत होते. या लोकांना ‘ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या’ सूत्राचा खरा अर्थ कळला पाहिजे. लोकांना प्रपंच विज्ञानाची गरज आहे, हे स्वामींच्या मनात भ्रमंतीच्या काळातच आले होते. एका अर्थाने स्वामी प्रपंंच विज्ञानाचे पुरस्कर्ते होते. तेव्हा हे जग मिथ्या आहे, असे पूर्वसुरींनी जरी म्हटले असले तरी त्याचा खरा अर्थ लोकांना कळला पाहिजे, असे रामदासांना वाटले.


स्वामींची विचार करण्याची पद्धत सारासार बुद्धीवर अवलंबून आहे
. स्वामींना वाटते की, सारासार विचार न करता ‘सर्व खल्विदं ब्रह्म’ या सूत्राचे सरळ विवरण केले, तर या सिद्धांंताचे भलतेच अर्थ लावले जातील आणि ते स्वामींना मान्य नाही. स्वामी म्हणतात,“जर सर्व ठिकाणी ब्रह्म आहे, असे म्हटले तर स्वर्ग-नरक, पाप-पुण्य, विवेक-अविवेक हे सर्वच ब्रह्म आहे, असे मानावे लागेल.” अर्थात ते बरोबर नाही. 

पाप पुण्य स्वर्ग नर्क।

विवेक आणि अविवेक।

सर्वब्रह्मी काये एक । सापडले नाही॥

तैसा अज्ञानभ्रमे भुलला ।

सर्व ब्रह्म म्हणोन बैसला।

महापापी आणि भला । येकचि मानी॥


सर्व ब्रह्म आहे
. ब्रह्माव्यतिरिक्त काही नाही, असे म्हटले तर महापापी हा ब्रह्म आणि भला माणूसही ब्रह्म,तस, असे म्हणण्याची आपत्ती ओढवते. अर्थात ते योग्य नाही. स्वामींनी जगाचे मिथ्यत्व वेगळ्या प्रकारे लोकांसमोर आणले आहे. जगन्मिथ्या या सूत्राचा अर्थ, जग मुळात नाही पण असल्यासारखे भासते, असा नाही, हे प्रथम स्वामींनी स्पष्ट केले. त्यांच्या मते, हे जग मिथ्या आहे म्हणजे विनाशी आहे. या विश्वातील प्रत्येक दृश्य पदार्थ विघटनक्षम आहे. आपल्याला या जगात दिसणार्‍या प्रत्येक पदार्थाचे घटक वेगळे होऊन ती वस्तू नाश पावणार आहे. हे प्रतिपादन रामदासांनी दासबोधात अनेक ठिकाणी केले आहे. यासाठी एक साधे उदाहरण घेऊन स्वामींचे विचार समजून घेऊ. आपल्यासमोर एक इमारत आहे. ती आपण आपल्या डोळ्यांनी स्पष्टपणे पाहू शकतो. मग ती मिथ्या आहे, असे कसे म्हणता येईल? आता ही इमारत कशी बनली, याचे घटक पाहू. विटा, वाळू, दगड, सिमेंट, लाकूड, लोखंडी सळ्या इ. या घटकांपासून अभियंत्यांनी आपल्या कल्पनेतून इमारत प्रत्यक्षात उभी केली. कालांतराने हे घटक वेगळे होतील. हे घटक मूळ वस्तूतून वेगळे झाल्यावर आज दिसणारी इमारत दिसणार नाही. म्हणजे कालांतराने का होईना तिचे विघटन होणार आहे, म्हणून तिला ‘मिथ्या’ म्हटले पाहिजे. ‘जगन्मिथ्या’ याचा अर्थ सर्व वस्तुजात भ्रमरूप आहे, खोटे आहे, स्वप्नवत आहे, असा नसून ते विनाशी आहे, विघटनक्षम आहे, असा आहे. हा विनाश केव्हातरी घडणार आहे, हे विश्व कल्पांती विघटित होऊन नाश पावणार आहे, याबद्दल शंका नाही. पण, म्हणून आज आपल्या हाती असलेले वस्तुजात खोटे आहे, भ्रमरूप आहे, हेरामदासांना मान्य नाही. या विवेकपूर्ण विचारांवर रामदासांचे प्रपंच विज्ञान उभे आहे.

 

विश्वाची उभारणी व संहार हे कसे होत जातात, याची सविस्तर चर्चा समर्थांनी दासबोधात केली आहे. तो भाग समजून घेताना समर्थांचे वाङ्मयीन कौशल्य त्यात पाहायला मिळते. तो समर्थांच्या आवडीचा विषय आहे. विश्वाची उभारणी व संहार सांगताना समर्थ अष्टधा प्रकृतीचे व्यापार खुलवून सांगतात. प्रसिद्ध लेखक श्री. म. माटे यांनी समर्थांना ’एक जबरदस्त वाङ्मयमल्ल’ असे म्हटले आहे, याची प्रचिती दासबोध वाचताना येते. रामदासांनी ‘जगन्मिथ्या’ याचा अर्थ हे वस्तूजात विघटनक्षम आहे, असा केला असला तरी पूर्वीच्या संतांनी, तत्त्वज्ञांनी त्या द्वारा प्रतिपादन केलेला निवृत्तीवाद, त्यांनी सांगितलेला निवृत्तीमार्ग चुकीचा होता, असे मात्र नाही. पण, त्या मार्गाने जे जातात, त्यांची ध्येयं निराळी असतात. त्यांचे प्रश्नही वेगळे असतात. त्यांचे प्रश्न असे असतात की, हे विश्व वस्तूजात कसे उत्पन्न झाले? मी कोण? मी कुठून आलो? मरणानंतर कुठे जाणार? इत्यादी. या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी निवृत्तीमार्गाची मदत होत असेलही, पण हे प्रश्न ज्यांना पडत नाहीत, त्यांनी केवळ संतवाणी आणि तत्त्ववेत्ते सांगतात म्हणून निवृत्तीच्या मागे लागावे, हे रामदासांना मान्य नाही. निवृत्तीवादाने प्रतिपादलेली प्रपंचाची अशाश्वतता, परलोेकीचा न्याय या गोष्टी पटल्याने लोक सद्गुणाने वागू लागतील किंवा यमलोकीच्या नरकयातनांच्या भीतीने लोक पापाचरणाला घाबरतील, हे खरे आहे. तथापि स्वामींच्या मते, केवळ निवृत्तीवादाच्या आहारी जाऊन, सर्व विषयीचे सावधपण व विवेक सोडला तर प्रपंच हातचा जाईल आणि परमार्थ खोटा ठरेल. म्हणून रामदासांनी प्रपंचाचे खरेपण मान्य करून प्रयत्नवाद सांभाळून अन्यायाच्या प्रतिकारासाठी योद्ध्याप्रमाणे उभे राहिले पाहिजे, असे मत व्यक्त केले आहे.

 

या विश्वात परब्रह्माशिवाय काही सत्य नाही. ते सर्वत्र भरून उरले आहे. असे जरी पूर्वीच्या संतांनी प्रतिपादन केले असले तरी, जगात दिसणारे भेद अमान्य करता येत नाहीत. व्यवहारात पाप-पुण्याचा भेद केलाच पाहिजे. ‘भेद ईश्वर करून गेला,’ असे स्वामींनी म्हटले आहे. असे असले तरी ‘बहुधा अध्यात्मनिरोपण । निरोपिले’, असे जे प्रथम दशकात पहिल्या समासात सांगितले, ते शेवटपर्यंत आहे. दृश्य येते आणि जाते पण, परब्रह्म आहे तसेच राहते. शेवटी समर्थ सांगतात.

 

दृश्य चळे ब्रह्म चळेना

दृश्य कळे ब्रह्म कळेना

दृश्य आकळे ब्रह्म आकळेना । कल्पनेसी ॥

 

‘ब्रह्म’ कल्पनेच्या पलीकडे असले तरी त्यातून या दृश्य जगाची निर्मिती करणारी कोणती अद्भुत शक्ती आहे, या विचारातच देव कल्पनेची बिजे आहेत. ती देवकल्पना पुढील लेखात पाहू.

- सुरेश जाखडी 

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा...facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@