कोण लालबहादूर शास्त्री?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Mar-2019   
Total Views |


संतापजनक आणि दु:खदायक, संस्कार नसणे म्हणजे काय? हे प्रियांका वढेरा या महिलेने नुकतेच दाखवून दिले. प्रियांकाने आपल्या गळ्यातला लाल रंगाचा पुष्पहार चक्क माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्रींच्या प्रतिमेस अर्पण केला. प्रियांका कुण्या एका ‘रॉबर्ट’ नावाच्या व्यक्तीची (ज्याची सध्या ‘ईडी’कडून चौकशी सुरू आहे) इसमाची पत्नी असली तरी राजमाता सोनियांची कन्या आणि राजकुमार राहुलची भगिनी. त्याशिवाय ओढूनताणून त्यांनी आडनावाला ‘गांधी’ चिकटवलेले आहेच. त्यामुळे आपल्याला हवे ते करण्याची मुभा आहे, असे मला किंवा जनतेला वाटत नाही, तर खुद्द प्रियांकाला वाटत असेल, तर यात आश्चर्य ते काय? असो, पण प्रियांकाने आपल्या गळ्यातला हार माजी पंतप्रधानांच्या प्रतिमेस घातला यावर कोण गहजब उडाला. पण, लोक बेअक्कल आहेत. त्यांना प्रियांकाची ही थोरवी माहिती नसेल का? की, सोनिया मैया, राहुल गांधी भैय्या आणि रॉबर्ट सैय्या या तिघांवर जरी कोर्टकचेऱ्यांची पाळी आली असली तरी ते भारताचे स्वयंघोषित राजघराण्याचे मालक आहेत. त्यांच्यापुढे लालबहादूर शास्त्री कोण? त्यांच्या नावामागे ‘गांधी’ नाव लागले आहे का? त्यांनी देशाला लुटले का? जन्माने कर्माने आणि विचारांनीही हिंदू असून त्यांनी कधी जानवं घालून दाखवून आपले गोत्र कौल ‘दत्तात्रय’ असे सांगितले का? अरे हो, आणि लालबहादूर शास्त्रींनी कधी ‘नॅशनल हेरॉल्ड’सारखे पराक्रम केलेत का? त्यांच्याकाळी तर मोकळ्या जमिनी खूप असतील, पण लालबहादूर यांनी त्या जमिनी मातीमोल भावात लाटल्या का? आपण पंतप्रधान होतो म्हणून आपल्या खानदानीला फुकटात सरकारी सेवा पुरविण्याचा चांगुलपणाही लालबहादूर शास्त्रींना दाखवता आला नाही. ‘जय जवान जय किसान’चा कसला फालतू विचार त्यांनी देशाला दिला. त्याऐवजी ‘मेरी जय, मेरीही जय, हो सके तो मेरे खानदान की जय,’ असा बाणा त्यांनी का दाखवला नाही. छे! परकीय कोणत्याही दलालाबरोबर या लालबहादूर शास्त्रींनी संवाद साधत त्या दलालांना दलालीचीही संधी दिली नाही. लालबहादूर शास्त्री राष्ट्रभक्त होते, सच्चे समाजचिंतक होते आणि भारतीय समाजाचे खरे आदर्श होते आणि आहेत, या गोष्टीशी प्रियांकांना काय देणेघेणे? काँग्रेसने देशावर भरपूर राज्य केले. त्या राजपाटाचे आपण, आपली मुलबाळं वारसदार आहोत, हा कैफ प्रियांकामध्ये ओतप्रोत आहे. या कैफापुढे आदर्शांचा सन्मान वगैरे फालतू गोष्टी आहेत. मात्र जनता सुज्ञ आहे. ते आगामी काळातील निवडणुकांमध्ये दिसून येईलच.

 
 

महाराणीची सवय हो !!!



पूर्वीच्या काळी महाराण्यांची एक सवय असायची. कुणी चांगली बातमी आणली किंवा काही मनाजोगते घडले की, या महाराण्या आपल्या गळ्यातला हार समोरच्याच्या गळ्यात घालीत. अर्थात, गरिबाला मागत्याला काही मिळणे यावर आक्षेप नाही. पण, दुसर्‍याला आपल्यापेक्षा कमी लेखून आपण मोठे दाते आहोत, ही भावना मात्र अतियश कद्रू. असो, देश स्वतंत्र झाला आणि राजा-राणी, सरंजामशाही गुंडाळली गेली. पण, हा आपला गैरसमज आहे, असे वाटते. आज प्रियांंका गांधींनी दाखवून दिले की, राजा-राणी सरंजामशाही आणि अपवाद वगळता त्यांची ती जनतेला लाचार समजण्याची वृत्ती अजूनही जिवंत आहे. तो जिवंतपणा बापड्या जनतेसाठीच नाही, तर देश ज्यांना आदर्श मानतो, त्यांनाही ही सरंजामशाही मनोवृत्ती कस्पटासमान मानते. तसे नसते तर प्रियांकांनी त्यांच्या गळ्यातला हार काढून तो माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या पुतळ्याला घातला नसता. केवढी ही मग्रुरी, की त्या मग्रुरीमध्ये आपण देशाच्या माजी पंतप्रधानांचा, नव्हे तर देशाच्या अस्मितेचा अपमान करतोय, हेसुद्धा प्रियांका यांच्या ध्यानात येऊ नये? अगदी अठराविश्वे दारिद्य्र असलेला भारतीय माणूसही त्याच्या आदर्श असलेल्या व्यक्तींच्या प्रतिमेस स्वतः विकत घेतलेली आणि अनाघ्रात पुष्ममाला अर्पण करतो. निदान भारतीय संस्कारात वाढलेली कुणीही व्यक्ती हेच करेल. पण नाही, प्रियांकाने आपल्या गळ्यातला पुष्पहार काढून लालबहादूर शास्त्रींच्या पुतळ्याला घातला. जसे काही प्रियांकाच्या गळ्यातला पुष्पहार लेऊन लालबहादूर शास्त्रीच कृतकृत्य झाले. यावरून एक गोष्ट आठवली. मागेही नाही का, मनमोहन सिंग पंतप्रधान असताना त्यांच्या निर्णयाचे कागद प्रियांकाच्या भावाने, राजकुमार राहुलने कसे टराटरा फाडले होते. त्यावेळी त्यांनीही देशाच्या पंतप्रधानाचा आणि त्याचबरोबर वयाने, अनुभवाने ज्येष्ठ असलेल्या व्यक्तीचाच अपमान केला होता. थोरामोठ्यांचा आदर, सन्मान हे शिकवावे लागत नाहीत, ते रक्तातच असते, असे म्हटले जाते. राजकुमार राहुल गांधी आणि युवराज्ञी प्रियांका यांना पाहून या म्हणण्याची सत्यता पटते.

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा...facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@