राधाकृष्ण विखे पाटीलांनी दिला राजीनामा

    19-Mar-2019
Total Views |

 

 
 
 
मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा काँग्रेस  वरिष्ठांकडे सोपावला आहे. काँग्रेस अध्यक्षांकडून लवकरच त्यांच्या राजीनाम्याबाबत निर्णय घेण्यात येईल. मुलगा सुजय विखे पाटील याने भाजप प्रवेश केल्यानंतर राधाकृष्ण विखे पाटीलांच्या राजीनाम्याची चर्चा सुरु झाली होती. त्यावेळी राजीनामा देणार नसल्याचे राधाकृष्ण विखे पाटीलांनी सांगितले होते. पण अखेर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
 

मुलाने भाजपमध्ये प्रवेश केला म्हणून मी विधानसभेतील विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा देणार नाही. काँग्रेस पक्ष देईल ती जबाबदारी मी पार पाडेन. असे राधाकृष्ण विखे पाटीलांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले होते. सुजय विखे पाटीलांच्या भाजप प्रवेशानंतर त्यांनी ही पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेत त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले होते. नगरच्या जागेबाबत आघाडीचा कोणताही निर्णय झालेला नव्हता, त्यावेळी शरद पवारांनी आमच्या वडिलांविषयी बाळासाहेब यांच्याबाबत केलेले विधान दुर्दैवी होते. मला त्याचे अत्यंत वाईट वाटले होते. आघाडीत नसताना आणि आमचे वडील हयात नसताना अशा प्रकारे त्यांच्यावर टीका करणे हे शरद पवारांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याला न शोभणारे आहे.

 

शरद पवारांच्या या विधानानंतर सुजयने भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. हा त्याचा वैयक्तिक निर्णय होता. असे राधाकृष्ण विखे पाटलांनी सांगितले होते. काही दिवसांपूर्वी त्यांनी नगरच्या जागेबाबत चाललेल्या संघर्षाबाबत स्पष्टीकरण दिले होते. तसेच पक्षाने अविश्वास दाखविल्यास विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा द्यावा लागेल. असे विधान राधाकृष्ण विखे पाटलांनी पत्रकार परिषदेत केले होते. अखेर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat