चौकीदार विरुद्ध चोर!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Mar-2019   
Total Views |

 

 
 
 
पंतप्रधान मोदी यांनी ‘मैं भी चौकीदार’ मोहीम पुकारत आपल्या नावाच्या आधी ‘चौकीदार’ असा उल्लेख करण्यास प्रारंभ केला. मोदींनी देशात भ्रष्टाचार करणाऱ्यांना, गैरकारभार करणाऱ्या मंडळींना हा ‘चौकीदार’ कोणतेही गैरकृत्य करू देणार नाही, असाच इशारा त्यानिमित्ताने पुन्हा दिला आहे.
 

लोकसभा निवडणुकांचे पडघम आता जोरजोरात वाजू लागले आहेत. केंद्रात सत्तेवर असलेल्या भारतीय जनता पक्षाने अन्य विरोधी पक्षांच्या तुलनेत प्रचारात प्रचंड आघाडी घेतल्याचे दिसत असताना विरोधक अजून आघाड्यांची गोळाबेरीज कशी करायची यामध्ये मग्न आहेत. विरोधकांकडे अन्य कोणताच भरीव कार्यक्रम नाही, धोरण नाही. त्यांच्यापुढे आहे एकच कार्यक्रम आणि तो म्हणजे भारतीय जनता पक्षास पुन्हा सत्तेवर येऊ न देणे! त्यासाठी कोणत्याही थरापर्यंत जाऊन भाजपची, भाजपच्या नेत्यांची बदनामी करण्याची मोहीम ‘महामिलावट’ असलेल्या विरोधकांनी घेतली आहे. देशातील जनतेच्या भल्यासाठी विरोधकांकडे काही कार्यक्रमच नाही. सत्ता मिळाल्यास आम्ही काय करणार याच्या तकलादू घोषणा काही नेत्यांकडून देण्यात येत असल्या तरी, त्यामध्ये काही दम नसल्याचे लक्षात येत आहे. देशाच्या ‘चौकीदारा’ने काही कृती केली की विरोधी पक्षरूपी ‘चोर’ एका सुरात ‘चौकीदारा’विरुद्ध गळा काढताना दिसत आहेत. अशा विरोधकांना जनता निवडून देईल?

 

आपल्या कारकिर्दीत देशातील जनतेचे भले करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने उत्तम योजना आखल्या. तळागाळातील जनतेच्या हालअपेष्टा कमी करण्याकडे लक्ष दिले. संपूर्ण देशाला स्वच्छतेचा मंत्र दिला. या मंत्राचे अनुकरण करण्यास प्रवृत्त केले. देशात काँग्रेसची खूप काळ सत्ता होती. पण देशातील समस्त जनतेसाठी स्वच्छतेचा मंत्र देण्याचा विचार त्या पक्षाच्या मनात कधी आला नाही. आपल्याला मिळालेल्या सत्तेचा वापर करून आपली घरे कशी भरता येतील आणि आपल्या पुढील कित्येक पिढ्यांची सोय कशी करून ठेवता येईल याकडेच स्वार्थी राजकारणी मंडळींनी लक्ष दिले. जनतेने २०१४ साली विरोधकांना त्यांची जागा दाखवून दिल्याने त्यांची अवस्था केविलवाणी झाली आहे. स्वत:च्या गैरकृत्यांमुळे आणि त्यांच्याकडून झालेल्या प्रचंड भ्रष्टाचारामुळे विरोधकांना आज प्रचंड नैराश्य आले आहे, अशी जी टीका उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली आहे, ती गैर म्हणता येणार नाही. असे नैराश्याने पछाडलेले विरोधक पंतप्रधानांवर वाट्टेल तशी टीका करताना दिसत आहेत. पंतप्रधान मोदी यांनी ‘मैं भी चौकीदार’ मोहीम पुकारली आणि आपल्या नावाच्या आधी ‘चौकीदार’ असा उल्लेख करण्यास प्रारंभ केला. मोदींनी देशात भ्रष्टाचार करणाऱ्यांना, गैरकारभार करणाऱ्या मंडळींना हा ‘चौकीदार’ कोणतेही गैरकृत्य करू देणार नाही, असाच इशारा त्यानिमित्ताने पुन्हा दिला आहे. ‘ना खाऊंगा और ना खाने दूंगाअशी घोषणा पंतप्रधानांनी या आधीच केली होती. आता स्वत:च्या नावाआधी ‘चौकीदार’ शब्द लावून, देशविघातक कृत्य करणाऱ्या कोणाचाही हा ‘चौकीदार’ मुलाहिजा ठेवणार नाही, असा इशाराच त्यांनी दिला. नरेंद्र मोदी यांच्या पाठोपाठ भारतीय जनता पक्षाच्या अनेक नेत्यांनी आपल्या नावाच्या आधी ‘चौकीदार’ या शब्दाचा प्रयोग करण्यास प्रारंभ केला आणि आता सगळीकडे ‘चौकीदार’ या शब्दाची चर्चा चालू आहे.

 

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आणि त्यांच्या पक्षातील अन्य नेत्यांनी पंतप्रधान मोदी यांची बदनामी करण्याची कोणतीही संधी सोडली नाही. तसेच पंतप्रधानांवर टीका करताना सभ्यतेची पातळी त्यांनी सोडल्याचे दिसून आले. ‘चौकीदार चोर है’ असा खोटारडा प्रचार करणाऱ्या राहुल गांधी आणि त्यांच्या काँग्रेस पक्षाला नरेंद्र मोदी आणि भाजपच्या अन्य नेत्यांनी ठणकावून, ‘आम्ही ‘चौकीदार’ आहोत,’ असे सांगितले आहे आणि या ‘चौकीदारा’चे देशाची लूट करणाऱ्या ‘चोरां’च्यावर बारकाईने लक्ष असल्याचेही लक्षात आणून दिले आहे. भाजपने ‘मैं भी चौकीदार’ अशी प्रचार मोहीम हाती घेतल्याने गोंधळून गेलेले काँग्रेसचे नेते पंतप्रधानांवर काहीही आरोप करीत सुटले आहेत. सोनिया गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर ‘मौत का सौदागर’ अशी टीका केली होती. मणिशंकर अय्यर यांनी त्यांना ‘नीच’ म्हटले होते. आता काँग्रेसच्या पवन खेडा नावाच्या एका बौद्धिक दिवाळखोर नेत्याने मोदी यांची मसूद, ओबामा, दाऊद आणि इसीस यांच्याशी तुलना करून आपलाच पक्ष किती नीच राजकारण करीत असल्याचे दाखवून दिले आहे. पवन खेडा यांच्या या वक्तव्याचा भाजपने चांगलाच समाचार घेतला. काँग्रेस असताना देशाला पाकिस्तानसारख्या शत्रूची गरजच नाही तसेच, पंतप्रधानांवर अशी टीका करून काँग्रेसने देशाचा अपमान केला असल्याचे भाजपने म्हटले आहे. पंतप्रधान मोदी यांच्यावर पातळी सोडून जितकी टीका केली जाईल, त्याची तेवढीच तीव्र प्रतिक्रिया जनतेमधून उमटेल, असे भाजप नेते अरुण जेटली यांनी म्हटले आहे. अशी टीका करणे हे काँग्रेसच्या ‘डीएनए’मध्येच असल्याचे प्रकाश जावडेकर यांनी म्हटले आहे.

 

लोकसभा निवडणुकांसाठी विविध पक्षांच्या उमेदवारांची नावे घोषित होऊ लागली असली तरी, भाजपविरोधी पक्ष अजून चाचपडत असल्याचे दिसत आहे. ‘महागठबंधन’ निर्माण झाल्याचे दिसत नाही. तिसरी आघाडीही दृष्टीपथात नाही. काही राज्यांमधील प्रादेशिक पक्ष सावधपणे पावले टाकताना दिसत आहेत. प. बंगालमध्ये काँग्रेस आणि डाव्या पक्षांची युती होण्याची चिन्हे दिसत नाहीत. ममता बनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसपुढे भाजपने आव्हान उभे केले आहे. बळाचा वापर करून विरोधकांना नामोहरम करण्याचे ममता बॅनर्जी यांचे प्रयत्न चाललेले आहेत. त्यातूनच, आपल्या राज्यात केंद्रीय सुरक्षादले तैनात करण्यास ममता बॅनर्जी विरोध करीत आहेत. तृणमूल काँग्रेसचे उमेदवार निवडून यावेत म्हणून उमेदवारांच्या पोस्टरपुढे ब्रह्मवृदांकडून मंत्रपठण केले जात आहे. एकूणच ममता बॅनर्जी यांच्याही पायाखालची वाळू घसरू लागली आहेतिकडे उत्तर प्रदेशात राहुल गांधी यांच्या भगिनी प्रियांका गांधी जनतेच्या भावनांना आवाहन करून मते मिळविण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. आता त्यांना गंगामातेचे प्रकर्षाने स्मरण होऊ लागले आहे. त्यांचा ‘गंगा की बेटी’ असा उल्लेख केला जाऊ लागला आहे. प्रचाराचा एक भाग म्हणून त्यांनी नुकताच प्रयागराज ते वाराणसी असा प्रवास बोटीतून करून मतदारांना प्रभावित करण्याचा प्रयत्न केला.पण काँग्रेस पक्षाने आपल्या पापांचे ओझे गंगामातेवर लादू नये, अशी टीका भाजपने केली आहे. निवडणूक प्रचारास वेग आला की काँग्रेस नेत्यांना देवदेवता, मंदिरे, पवित्र नद्या यांचे मोठ्या प्रमाणात स्मरण होईल हे स्पष्टच आहे.

 

पुलवामा घटनेनंतर वायुदलाने पाकव्याप्त काश्मीरमधील ‘जैश-ए- मोहम्मद’ या दहशतवादी संघटनेच्या तळांवर हवाई हल्ले केले. संपूर्ण देशाने त्याबद्दल सरकारचे, सेनादलाचे कौतुक केले. पण विरोधकांना वेगळीच भीती वाटू लागली. या ‘सर्जिकल स्ट्राईक’मुळे निवडणुकीत भाजपला लाभ होईल असा कोता विचार त्यांच्या मनात आला. त्यातून आपणच पाकिस्तानवर हल्ला करण्याचा सल्ला सरकारला दिला होता, अशी भाषणबाजी करून त्याचे श्रेय आपल्याकडे घेण्याचा केविलवाणा प्रयत्न ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केल्याचे मतदारांना पाहावयास मिळालेभाजप विरुद्ध विविध गैरव्यवहार करणारे पक्ष असा सामना या निवडणुकीत रंगणार आहे. ‘चौकीदारा’मुळे सर्व ‘चोर’ अस्वस्थ झाले असल्याने त्यास बदनाम करण्याची मोहीम ‘चोरां’नी उघडली आहे. पण संपूर्ण देश ‘मैं भी चौकीदार’ म्हणून ‘चौकीदारा’च्या मागे उभा राहत असल्याचे दिसू लागले आहे. त्यामुळे ‘चोरां’चे भवितव्य काय असेल हे आता वेगळे सांगण्याची गरजच नाही!

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

 
 
@@AUTHORINFO_V1@@