मनोहर पर्रीकर पंचत्वात विलीन

    18-Mar-2019
Total Views | 32

 

 
 
 
पणजी गोव्याचे मुख्यमंत्री व माजी केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यावर सोमवारी सायंकाळी पणजीतील मिरामार येथे शोकाकुल वातावरणात व लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. ‘मनोहरभाई अमर रहें’च्या घोषणा देत, साश्रुपूर्ण नयनांनी गोवेकरांनी आपल्या लाडक्या लोकानेत्यास अखेरचा निरोप दिला. तत्पूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक प्रमुख नेत्यांनी पर्रीकर यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतले व पर्रीकरांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले.

स्वादुपिंडाच्या कर्करोगाशी गेले अनेक महिने झुंज देणाऱ्या मनोहर पर्रीकर यांचे रविवारी सायंकाळी पणजी येथे निधन झाले. यानंतर केंद्र सरकारने रविवारी शासकीय दुखवटा जाहीर केला तसेच गोवा राज्य सरकारनेही सोमवारी सुट्टी जाहीर करत ७ दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर केला. सोमवारी सकाळी पर्रीकर यांचे पार्थिव गोव्याच्या भाजप प्रदेश कार्यालयात ठेवण्यात आले. त्यानंतर गोवा कला अकादमी येथे ठेवण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन, नितीन गडकरी, सुरेश प्रभू, स्मृती इराणी, गोव्याच्या राज्यपाल मृदुला सिन्हा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल आदींसह भाजप व अन्य राजकीय पक्षांच्या नेत्यांनी पर्रीकरांचे अंतिम दर्शन घेतले. यानंतर कला अकादमीतून पर्रीकरांची अंत्ययात्रा काढण्यात आली व मीरामार किनाऱ्यावर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

या अंत्ययात्रेत सर्वपक्षीय राष्ट्रीय व प्रादेशिक राजकीय नेत्यांसह कार्यकर्ते, सर्वसामान्य नागरिक, विशेषतः विद्यार्थी व युवा वर्ग हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते. अंतिम संस्कारांपूर्वी भारतीय नौदलाने हवेत गोळीबाराच्या तीन फैरी झाडून पर्रीकरांना मानवंदना दिली. पर्रीकरांच्या अंतिम संस्कारांच्या वेळी असंख्य नागरिकांना आपले अश्रू अनावर झाले. आपला साध्या राहणीचा परंतु कर्तृत्ववान, प्रतिभावान लोकनेता पंचतत्वात विलीन होत असताना ‘मनोहरभाई अमर रहें’च्या घोषणा गोवेकरांनी दिल्या. सोमवारी गोव्यातील पणजी, मडगाव, म्हापसा आदी प्रमुख शहरांसह अनेक ठिकाणी बाजारपेठा व कार्यालये पर्रीकरांना आदरांजली म्हणून बंद ठेवण्यात आली होती.

 
 
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121