नेमकं काय गमावलंय हे समजत नाहीए...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Mar-2019   
Total Views |



गोव्याला किंवा दिल्लीला पर्रिकर असताना जाण्याचे एक कारण आहे असे नेहमी वाटायचे आता ते नाही. विवेकचे, मुंबई तरूण भारतचे कार्यक्रम त्यात हक्काने बोलाविण्याचा हा पाहुणा. जाहीर कार्यक्रमात भाई कधी दिसले तर ओळख दाखवतील असे नाही पण व्यासपीठावरून थेट नजर देऊन आश्‍वासकपणे पाहीले तरी त्यांचे आणि आपले काम झाले समजा

 

एक सुन्नपणा मात्र नक्की आहे. गेल्या वर्षी लिलावतीच्या तळमजल्यावर बाबाला काहीच झालेलं नाही असं जेव्हा अभिजात सांगत होता तेव्हापासूनच या सुन्नपणाला सुरूवात झाली होती. रोगाचे निदान झाल्यापासून, भाई जाईपर्यंत; आशेचा किरण शोधण्याचा, चांगल्या वाईट बातम्यांची खातरजमा करण्याचा नाद नंतर सोडूनच दिला होता. पायात एका नंबरने मोठी सँडल घालून समोर रोखून बघत झपाझप चालत येणारा माणूस असा केविलवाणा कसा पहावा?

 

गोव्याला किंवा दिल्लीला पर्रिकर असताना जाण्याचे एक कारण आहे असे नेहमी वाटायचे आता ते नाही. विवेकचे, मुंबई तरूण भारतचे कार्यक्रम त्यात हक्काने बोलाविण्याचा हा पाहुणा. जाहीर कार्यक्रमात भाई कधी दिसले तर ओळख दाखवतील असे नाही पण व्यासपीठावरून थेट नजर देऊन आश्‍वासकपणे पाहीले तरी त्यांचे आणि आपले काम झाले समजा. नियमाबाहेरचे कुठलेच काम नाही पण नियमात बसूनही काम होत नसेल तर भाई त्याच्या मागे लागणारच. अख्खी फाईल समोर असेल मात्र दोन तीन पाने वाचली तरी सरकारी फाईलची नागमोडी चाल भाईंच्या लक्षात यायची. तू बस इथेचअसे सांगून फाईलवर शेरे मारत सह्या करीत खबर घ्यायचा कार्यक्रम सुरू व्हायचा. मूड असला तर कुठे रहातोयसं, जेवायचे काय? परत कसा जाणार? या सगळ्या प्रश्‍नाची उत्तरे ठाऊक असूनही. नाही तर सरळ तू कशाला आलायसं?. '

 

दोस्तात रंगणारा तरीसुध्दा कमालीचा एकाकी भाई. बोलणे तुटकच असायचे तुटक म्हणजे.. मतितार्थ बरोबर कळलेला असायचा पण लकबच ती. मागे उत्पलला काहीशी दुखापत झाली होती. प्रकरण जरा गंभीर होते म्हणून त्याला हिंदुजाला आणले तिथे जो हळवा बाप पाहीला... हाच का तो कणखर प्रशासक असा प्रश्‍न पडावा इतका हळवा. असं हळवं होताना दुसऱ्यांदा पाहीलं होतं अगदी डोळ्यात आसवांसह. ज्यांच्या बरोबर कधी विचारांसाठी काम केलं यांनीच विरोधात केलेले राजकारण अनुभवताना. भाईंनी ती निवडणुक सगळे अडथळे पार करून लढविली आणि मुख्यमंत्रीही होऊन दाखवलं. दिग्विजयी राजकारणी म्हणून आणि अंतर्यामी माणूस म्हणून भाई हे असे होते.

 

दिल्ली मानवली नाही भाईंना. दहा-बारा खोल्यांचा रक्षामंत्र्यांचा ऐसपैस बंगला. दोन खोल्यांत भाईंचे सगळे... बाकी बंदच. गप्पा रंगायच्या. जेवायला जायचे तर ताज मानसिंगला किंवा कुठेतरी तत्सम. असे पाहुणे ताज मानसिंगला नवे नाहीत पण बिल तपासून स्वत:च्या डेबिट कार्डने बिल भरणारा आणि टिप देऊन निघून जाणारा राजकारणी ताज मानसिंगने कदाचितच पाहीला असेल. भाईंच्या साधेपणाचे खुप कौतुक होते व्हायलाही हवे पण भाईच्या साधेपणाने त्याच्या कर्तृत्वावर मात केली नाही. खरोखरच साधे आणि साधेपणाचे आव आणणारे बरेच आहेत. अनेकांच्या कर्तृत्वापेक्षा त्यांच्या साधेपणातच लोक अडकतात. भाईंचे तसे मुळीच नव्हते अतिशय बुध्दीमान, तल्लख आणि नजरेत दुरचा टप्पा असणारा तिक्ष्ण राजकारणी. आपण काय करतोय आणि त्याचे काय परिणाम उमटू शकतात याची जाण भाईंना बरोबर असायची.

 

मोहाचे क्षण तर अगदी सहजपणे टाळायची सहजवृत्ती ही भाईंची खासीयतच. लोकांना भरपूर भेटायचे पण कोणाबरोबर किती वेळ घालावयाचा हे त्यांच्या डोक्यात पक्के होते. ती तसली माणसं नको रे त्यांचा कळत न कळत माझ्यावर परिणाम होतो. मीही तसाच झालो तर?’. त्यांच्याविषयी लिहीताना एक तुटकपणा येतच रहातो कारण त्यांच्याशी संवाद तसेच होते. मूळात आज सगळ्यांना आपला वाटणारा हा माणूस आतून कुणाचाच नव्हता. मनाने आणि वृत्तीने अगदी स्वतंत्र आणि बिनधास्त.... मी मुख्यमंत्री नव्हतो तेव्हा आमदार होतो अधे मधे काही नाही.त्यांनी आपले आयुष्य आपल्या अटींवर जगले. भाई दिल्ली सोडू नकाअसे सांगणारा मी एकटाच नव्हतो पण त्यांना जे करायचे होते तेच त्यांनी केले.

 

लिहीता लिहीता संपणार नाही असा हा मजकूर आहे. असा ही माणूस असू शकतो आणि तो यशस्वीही होऊ शकतो हा भाईंच्या आयुष्याचा संदेश आहे. दिल्ली मुक्कामी थंडीत भाईंकडून मिळालेली शाल ....ती बहुदा आयुष्यभर पुरेल.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@