खुदा के बाद बीएसएफ (भाग-२)

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Mar-2019   
Total Views |

 

 
 
 
मागील भागात त्रिपुरातील बीएसएफच्या सीमासंरक्षणाच्या कार्याचा आपण सविस्तर आढावा घेतला. पण, बीएसएफचे कार्य हे केवळ तेवढ्यापुरतेच मर्यादित नाही. मागासलेपण, गरिबी, अपुऱ्या नागरी सोयीसुविधा, सीमेवरील तस्करीचे जाळे, गुन्हेगारी, बेरोजगारी आणि अशा इतर शेकडो समस्यांच्या गर्तेत आजही त्रिपुराचे सीमावर्तीय आपले भवितव्य चाचपडताना दिसतात. परंतु, बीएसएफने हाती घेतलेल्या विविध समाजहितैषी प्रकल्पांमुळे, उपक्रमांमुळे हे विदारक चित्र हळूहळू का होईना बदलताना दिसले.
 

त्रिपुराच्या बाहेरचं जग त्यांच्यापैकी बहुतेकांनी कधी पाहिलचं नाही. त्यांच्या राज्याची राजधानी आगरताळाच काय ते त्यांच्यासाठी अगदी शेवटचं शहर. काळ्या अक्षरात कोरलेली ‘बीएसएफ’ ही तीन अक्षरं, त्यांच्या पांढऱ्या शुभ्र टी-शर्टच्या निधड्या छातीवर अगदी ठळकपणे उठून दिसत होती. ही १८-२३ वर्षांच्या वयोगटातली मुलं होती तारापूरच्या सीमावर्ती गावातली. सध्या बीएसएफच्या तारापूर कॅम्पमध्येच शारीरिक प्रशिक्षणाबरोबरच त्यांना पोलीस, सैन्यभरतीसाठी मार्गदर्शन करण्याचे मोलाचे कार्य बीएसएफकडून केले जाते. अशा या १५ उत्साही मुलांशी संवाद साधताना ते सुरुवातीला काहीसे अवघडलेही, पण तेवढ्यापुरतेच. नंतर मनमोकळेपणाने मस्तपैकी गप्पाही रंगल्या आणि हो, त्या प्रत्येकाला खिशातून मोबाईल काढून आम्हा पत्रकारांबरोबर सेल्फी घेण्याचा मोहही काही आवरला नाही. यापैकी बहुतांशी तरुणांचे आई-वडील हे शेतमजूर किंवा जवळच्याच विटभट्टीवर कामगार म्हणून दिवसरात्र राबणारे. कसाबसा मुलांच्या शिक्षणाचा खर्च काटकसर करून, घाम गाळून पै अन् पै पदरी जमा केलेला. गावापासून पुढे तीन किमी अंतरावर असलेल्या सरकारी शाळेतच ही मुलं शिक्षण घेतात. काही नववीची, तर काही दहावीच्या परीक्षेला बसलेली. बीएसएफच्या कॅम्पमध्ये प्रवेश केल्यानंतर खऱ्या अर्थाने त्यांना शिक्षण, क्रीडा, शारीरिक तंदुरुस्तीच्या ताकदीची जाणीव झाली. बीएसएफच्या जवानांनी अगदी घरोघरी जाऊन या मुलांच्या पालकांशी, मुलांशी संवाद साधला. ग्रामसभा घेतल्या. इतकंच काय, तर आपलेपणाची भावना निर्माण करण्यासाठी बंगाली तसेच स्थानिक भाषाही शिकून घेऊन ते अगदी त्रिपुराच्या या सीमावर्ती भागांशी समरस झाले. त्यामुळे आज सीमेवरील गावकऱ्यांमध्ये बीएसएफविषयी प्रचंड आदरभाव तर आहेच, पण आपल्या सगळ्या समस्या हे जवानच सोडवू शकतात, हा प्रचंड आत्मविश्वासही! म्हणजे कुटुंबातील मुलांच्या शिक्षणापासून ते त्यांच्या लग्नासाठी जेवणखाण, टँकरचे पाणी, रुग्णवाहिकेची सोय अशी वाट्टेल ती मदत बीएसएफचे जवान कुठल्याही मोबदल्याशिवाय अगदी नि:स्वार्थ भावनेने ३६५ दिवस करतात. कारण, या दुर्गम सीमावर्ती भागांकडे आजही ‘सरकार’ नावाची यंत्रणा पोहोचलेली दिसत नाही. त्यामुळे या सीमावासीयांमध्ये सरकारविषयी आत्मविश्वास निर्माण करणे, त्यांच्या मनात राष्ट्रभक्ती, राष्ट्रप्रेमाची ज्योत प्रज्वलित करून ती धगधगती ठेवणे हे बीएसएफचे जवान आपले एक समाजकर्तव्यच मानतात. त्याचे कारणही अगदी स्पष्ट आहे.

 
सीमावर्ती भागांमध्ये सरकारी यंत्रणेची अनुपस्थिती ही तस्करांना, शेजारी देशातील घुसखोरांना आपसुक निमंत्रण देणारी ठरू शकते. मग या सीमावर्तीय ग्रामस्थांची माथी भडकावून, त्यांच्या हाती चार पैसे टेकवून, त्यांच्या मुलांना व्यसनांच्या जाळ्यात गुरफटून राष्ट्रविरोधी कृत्यांसाठी बळी पाडण्याचे काम सहजगत्या होते. म्हणूनच सीमा संरक्षणाबरोबर समाजसंरक्षकाची भूमिका बीएसएफला सीमावर्ती भागात पार पाडावीच लागते. अशा या दुर्गम सीमाभागात आजही ना स्वच्छ पाणी, ना वैद्यकीय सोयीसुविधा आणि रस्ते तर फक्त नामधारी. त्यामुळे ‘सरकार’ म्हणून कार्यरत असलेली यंत्रणा स्वातंत्र्यानंतर आज ७० वर्षं उलटूनही परिणामकारकरित्या या सीमावासीयांपर्यंत पोहोचलेली नाही. त्यामुळे सीमावर्ती भागातील नागरिक आणि सरकारमधील दुवा म्हणून बीएसएफचे जवान आपले कर्तव्य अगदी जबाबदारीने निभावताना येथे दिसतात. म्हणूनच बीएसएफचे जवान हेच खरे या सीमावासीयांचे सरकार, असे म्हटले तरी ती अतिशयोक्ती ठरू नये.
 

मिशन समाजसंरक्षणाचे...

 

सीमावर्ती भागात रोजगाराच्या संधींची आधीच वानवा. लहान-मोठे उद्योगधंदेही अशा दुर्गम, अविकसित आणि संवेदनशीलक्षेत्रात गुंतवणूक साहजिकच करताना दिसत नाही. अशावेळी सीमावर्ती गावातील तरुणांची पावलं मग आपसुकच शहराकडे वळतात. त्यातच त्रिपुरासारख्या छोट्या राज्यातही रोजगाराच्या मर्यादा लक्षात घेता, हे तरुण कोलकाता, गुवाहाटी आणि इतर जवळच्या शहरांमध्ये मग आपले भवितव्य शोधू लागतात. याची संपूर्ण जाणीव असलेल्या बीएसएफने त्या अनुषंगाने अगदी तरुणांपासून ते गावातील बेरोजगारांसाठी विविध उपक्रम हाती घेतले. यामध्ये तरुणांना मोफत शैक्षणिक आणि करिअर मार्गदर्शन, संगणक प्रशिक्षण, त्यासाठी ‘प्रेपमंत्रा’ हे संकेतस्थळ आणि ऑनलाईन अ‍ॅप्लिकेशन, कवायती-कसरती यांचा प्रामुख्याने समावेश होता. ज्यांच्या हाताला रोजगार नाही, त्यांच्यासाठी कौशल्य विकासाचे कार्यक्रमही बीएसएफने त्रिपुराच्या सीमावर्ती भागांत राबविले. यामध्ये शिवणकाम, वाहनचालकाचे प्रशिक्षण, इलेक्ट्रिशियन्सना मार्गदर्शन यांसारखे चार पैसे मिळवून देणारे रोजगार निर्माण करून देणे हा यामागचा उद्देश. त्याचबरोबर गावातील दिव्यांग, महिला यांनाही मदतीचा हात बीएसएफतर्फे अशाच अनेकविध उपक्रमांतून दिला जातो. ग्रामीण भागात आरोग्य सुविधांबाबतची अनास्था हा वर्षानुवर्षे एक गंभीर प्रश्न. त्यातच सीमावर्ती भागामध्ये या समस्येची दाहकता ही तीव्रतेने जाणवते. रुग्णांना, गरोदर महिलांना वेळीच योग्य उपचार न मिळाल्याने किरकोळ आजारांमुळे त्यांना जीव गमवावा लागतो. त्रिपुराच्या या सीमावर्ती भागातही हेच दुर्दैवी चित्र. साधी एक आरोग्य चाचणी करण्यासाठी शहरापर्यंत ४०-५० किमीचा प्रवास करण्याशिवाय गत्यंतर नाही, तर मग रुग्णालयांविषयी काय सांगावे... ही बाब लक्षात घेता, बीएसएफने गावातच आरोग्य केंद्राची उभारणी केली. आज सीमेनजीकच्या ग्रामस्थांना रक्तचाचणी, ईसीजी यांसारख्या आरोग्य चाचण्यांसाठी शहरावरील अवलंबित्व संपुष्टात आले. नागरिकांसाठी मोफत वैद्यकीय चाचण्यांचीही सोय बीएसएफने केली आहे. त्याचबरोबर रुग्णवाहिका आणि इतर वैद्यकीय सोयीसुविधांनीही या सीमावर्ती भागातील नागरिकांचे जीवन अधिक आरोग्यदायी आणि सुरक्षित केले आहे. म्हणूनच तारापूरचे सीमावर्ती ग्रामस्थ अगदी अभिमानाने म्हणतात, ‘खुदा के बाद बीएसएफ...’

 

देश के लिए कुछ करना है...

 
 

 
 

बीएसएफच्या तारापूर पोस्टमध्ये सूर्योदयाच्या प्रहरी कवयती-कसरतींसाठी पोलीस तसेच सैन्य भरतीचे प्रशिक्षण घेणारे हे उत्साही तरुण दाखल होतात. त्यांच्या व्यायामापासून ते पोषक आहारापर्यंत सगळी जबाबदारी ही बीएसएफची. आतापासूनच कडक शिस्त, अनुशासन आणि वक्तशीरपणाचे सैन्य संस्कार केल्यामुळे ‘देश के लिए कुछ करना है’ अशी राष्ट्रसमर्पित भावना त्यांच्यामध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळे एकीकडे हातात बंदुका घेऊन सीमासंरक्षणाचे शिवधनुष्य पेलणारेही हेच जवान आणि सीमेनजीकच्या गावांच्या विकासासाठी, पुढच्या पिढीच्या उज्ज्वल भवितव्यासाठी झटणारेही बीएसएफच्या जवानांचेच हात...

 

महाराष्ट्राची रणरागिणी त्रिपुरा सीमेवर

 
 
 

 
 

बीएसएफची आणि विशेष करुन महाराष्ट्राची त्रिपुरा सीमेवर कर्तव्य बजावणारी तरुण महिला कॉन्स्टेबल जयश्री लांबट भागलपूर पोस्टनजीकच्या सीमेवर चार किलो वजनाची रायफल खांद्यावर घेऊन कर्तव्य बजावताना पाहून तर आम्हा महाराष्ट्रातील पत्रकारांचा उर अभिमानाने अगदी भरून आला. बीएसएफच्या सीमा प्रहरी विभागातीलप्रजासत्ताक दिनाच्या मोटरसायकल टीममध्ये जयश्री सहभागी झाली होती. आई, वडील आणि एकूण तीन बहिणी असा जयश्रीचा परिवार. पण, सुरुवातीपासूनच वर्दीची आवड असल्यामुळे सैन्यात प्रवेश करायचं जयश्रीने मनोमन ठरवलं. शाळा-महाविद्यालयातही त्याच दिशेने प्रोत्साहन मिळतं गेलं. पुढे पंजाबमधून खडतर प्रशिक्षणानंतर २०१४ साली मूळची नागपूरची जयश्री बीएसएफमध्ये रुजू झाली. मुलीही सैन्यात जातात, हे सिद्ध करण्यासाठीच ही इज्जतीची नोकरी पत्करल्याचे जयश्री अभिमानाने सांगते. जयश्रीला आज बंगाली भाषा समजतेही आणि थोडीफार बोलताही येते. त्यामुळे बीएसएफमध्ये महिला आणि पुरुष असा कोणताही भेदभाव न करता सर्वांकडे केवळ ‘सैनिक’ याच दृष्टिकोनातून बघितले जाते. जयश्रीही १२ तास ड्युटी करते, तर काही वेळेला नाईट पेट्रोलिंगही करावे लागते. पण, ‘हम किसीसे कम नही’ म्हणत, सर्व आव्हानांचा सामना करणाऱ्या ‘जयश्री’ने खऱ्या अर्थाने आपले नाव सार्थकी लावले, हे खरे...

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

 
 
@@AUTHORINFO_V1@@