सद्विद्या बरवी । सर्वत्रांसी असावी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Mar-2019
Total Views |

 

 
 
 
 
मागील लेखात कुविद्येची लक्षणे सांगून झाली. कुविद्येमुळे सुसंस्कृत समाजाचे मोठे नुकसान होते. समाजात अनेक प्रकारची माणसे असतात. आज सभोवताली दिसणारे समाजाचे चित्र फारसे आशादायक नाही. हा विषय समाजशास्त्राचा असला तरी, त्यावर चिंतन झाले पाहिजे. एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे की, आपण कोणताही आदर्श समाजापुढे ठेवत नाही. ज्या काही आदर्श विभूती होऊन गेल्या, त्यांचे विचार समाजापुढे नीटपणे मांडले जात नाहीत. कुविद्याधारक माणसे आपल्या अंगी असणाऱ्या गुणांनी समाजस्वास्थ्य बिघडवत असतात. त्यांच्या ठिकाणी सारे अवगुण एकत्रपणे आलेले असतात. ही मंडळी वगळली तरी, एकंदर माणसे स्वार्थी, अविवेकी असतात. ‘मी श्रेष्ठ, माझे विचार उच्च, मी सांगतो ते सर्वांनी ऐकावे’ असे अनेकांना वाटते. त्यामुळे समाजात, कुटुंबात गुंतागुंतीची स्थिती निर्माण होते. अशा लोकांमध्ये सुधारणा व्हावी, असे वाटत असेल, तर त्यांच्या समोर एखादा आदर्श ठेवावा लागतो. त्याचे अनुकरण लोक करतात. भगवंतांनी गीतेत सांगितले आहे की,
 

यद्यदाचरति श्रेष्ठस्तत्रदेवेतरो जनः ।

स यत्प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते ॥

 

अशा आदर्शांना, श्रेष्ठांना अनुसरून लोक तसे वागतात. म्हणून लोकांच्या समोर चांगले आदर्श ठेवल्यास लोकांमध्ये सुधारणा शक्य आहे. या समासात समर्थांनी सांगितलेली सद्विद्येची लक्षणे ही अशा आदर्श पुरुषाची लक्षणे आहेत. ती सर्व या समासात एके ठिकाणी आल्याने सद्गुणांचा मोठा कोश आयता आपल्या हाती आला आहे. स्वामींच्या मते ही सद्विद्येची लक्षणे ऐकून त्यावर विचार केला, तर ती सहजपणे आपल्या अंगी बाणतात. ही आदर्श पुरुषाची लक्षणे ऐकली तरी त्याने समाधान प्राप्त होतेकुविद्या लक्षण’ समासाप्रमाणे या समासातही स्वामींनी ‘आणि’ या उभयान्वयी अव्ययाचा अर्थपूर्ण प्रयोग केला आहे. या ठिकाणी ‘आणि’चा अर्थ ‘असूनही’ असा घेतल्यास त्यातील भाव अधिक स्पष्ट होतो.

 

परम सुंदर आणि चतुर । 

परम सबळ आणि धीर ।

परम संपन्न आणी उदार । अतिशयेसी ॥

परम ज्ञाता आणि भक्त ।

महापंडित आणि विरक्त ।

महातपस्वी आणी शांत । अतिशयेसी ॥

 

वरील ओव्यांत सांगितलेल्या जोड्या परस्परविरोधी आहेत, असे वाटते. स्वामींचे रचनाकौशल्य असे की, ‘असूनही’ अशा अर्थाने ‘आणि’ शब्दाचा प्रयोग त्यांनी केला आहे. वरीलपैकी एक जोडी स्पष्ट करू. ‘राजा आणि धार्मिक’ म्हणजे राजा असूनही धार्मिक. राजा हा राज्यातील सर्वेसर्वा असतो. सर्व सैन्य त्याच्या ताब्यात असते. सत्ता आणि संपत्ती बाळगणारा राजा धार्मिकपणे राहत असेल, तर प्रजा त्याचा आदर्श ठेवते. त्यामुळे प्रजा धर्माचरणात राहून पापापासून मुक्त असते. अशा रीतीने वरील जोड्या उलगडता येतील. हा आदर्श पुरुष आपल्या वागण्याने, आचरणाने लोकात परिवर्तन घडवून आणतो. आदर्श पुरुषाच्या ठिकाणी असणारे गुण समर्थांनी सविस्तरपणे सांगितले आहेत. हा पुरुष मोठे कार्य करतो, पण तो निराभिमानी असतो. तो उत्तम गाणारा, वैभवसंपन्न असेल तरी त्याच्या ठिकाणी गर्व, ताठा नसतो. तो अत्यंत प्रेमाने, आस्थेने भगवंताचे भजन करतो. हा आदर्श पुरुष अंतर्बाह्य पवित्र असतो. त्याचे अंत:करण शुद्ध असून त्याचे चारित्र्य निष्कलंक असते. त्याला परमार्थाची आवड असते. तो सन्मार्गाने वागतो. परंतु, याचा अर्थ तो भोळसर असतो, असे समजण्याचे कारण नाही. लोकांची लबाडी ओळखण्याइतका तो धूर्त असतो. तो बहुश्रुत असून त्याला साहित्याचे ज्ञान असते.

 

दक्ष, धूर्त योग्य तार्किक ।

सत्य साहित्य नेमक भेदक ॥

 

त्याचा विवेक सतत जागृत असतो. त्यामुळे कोणाचा आदर करावा, कोणाचा सन्मान करावा, याचे तारतम्य त्याच्या ठिकाणी पाहायला मिळते. हा आदर्श पुरुष नेहमी सावधपणे वागतो. तो सतत उद्योगशील असून त्याचा वेदशास्त्राचा अभ्यास असतो. स्वत: आत्मस्वरूपाचा अनुभव घेऊन इतरांना तो अनुभव देण्याची क्षमता त्याच्या ठिकाणी असते. त्याचे बोलणे नेहमी सत्य, शुभ, मृदू आणि निश्चयात्मक असते. तो निष्कपटी, निर्व्यसनी, प्रसन्न असतो आणि पवित्र मार्गाने जीवन जगतो. पैसा आणि स्त्रिया यांच्याबाबत त्याची वागणूक नीतीमर्यादेला धरून असते. तो आपल्या सत्तेचा वापर सज्जनांच्या व अनाथांच्या रक्षणासाठी करतो. ज्या समाजात असे आदर्श पुरुष जन्माला येतात, त्या समाजाचे भले होते. समर्थांच्या भाषेचे वैशिष्ट्य असे की, ते एखादा विषय निवेदनासाठी घेतात तेव्हा त्यातील सर्व बारकाव्याची माहिती श्रोत्यांना देतात. येथवर सद्विद्येची सांगितलेली सर्व लक्षणे आदर्श पुरुषाची आहे. श्रोत्यांनी ती मन:पूर्वक ऐकली, तर ते गुण घेण्याची प्रेरणा त्यांच्या ठिकाणी निर्माण होईल असे स्वामींना वाटते. आपल्या देशात आजवर अनेक आदर्श पुरुष निर्माण झालेले आहेत. लोक त्यांचा आदर्श समोर ठेवतात. आदर्श पुरुषाची समर्थांनी सांगितलेली लक्षणे वाचताना साहजिकच प्रभू रामचंद्र, हनुमान, शिवाजी महाराज अशा आदर्श पुरुषांची आठवण येते. या समासातील काही ओव्या समर्थांची आठवण करून देणाऱ्या आहेत.

 

पुरश्चरणी तीर्थवासी ।

दृढव्रती कायाक्लेशी ।
उपासक निग्रहासी । करू जाणे ॥
 
 

ही ओवी वाचताना समर्थ जणू आपला स्वानुभव सांगत आहेत असे वाटते. आता या समासातील पुढील ओव्या पाहा.

 

येशवंत कीर्तिवंत । शक्तिवंत सामर्थ्यवंत ।

वीर्यवंत वरदवंत । सत्यवंत सुकृती ॥

विद्यावंत कलावंत । लक्ष्मीवंत लक्षणवंत ।

कुळवंत सुचिष्मंत । बळवंत दयाळू ॥

 

या ओव्या वाचताना श्रीरामाचे व शिवरायांचे स्मरण होते यात संदेह नाही. पुढे समर्थांनी शिवरायांना जे पत्र लिहिले, त्यातील काही भाग या समासात ‘सद्विद्येची लक्षणे’ सांगताना आदर्श पुरुषाचे वर्णन केले त्या स्वरूपाच्या आहेत. शिवरायांना पाठवलेल्या पत्रात समर्थ शिवरायांचे वर्णन करताना जी विशेषणे वापरतात ती अशी आहेत.

 

येशवंत कीर्तिवंत । सामर्थ्यवंत वरदवंत ।

पुण्यवंत नीतिवंत । जाणता राजा ॥

आचारशील विचारशील। दानशील धर्मशील ।

सर्वज्ञपणे सुशील । सकला ठायी ॥

 

यावरून समर्थ शिवरायांना आदर्श पुरुष या रूपात पाहत होते, त्यांचा आदर्श महाराष्ट्रातील जनतेने समोर ठेवावा ही समर्थांची अपेक्षा होतीही सद्विद्येची लक्षणे, आदर्श पुरुषांचे गुण समाजासमोर मांडण्याचे प्रयोजन समर्थांनी ‘सद्विद्या निरूपण’ समासाच्या अखेरीस स्पष्ट केले आहे. या गुणांचा अभ्यास व्हावा म्हणून थोडेसे गुण सांगितले असे समर्थ म्हणतात.

 

असो ऐसे उत्तम गुण ।

हें सद्विद्येचे लक्षण ।

अभ्यासाया निरूपण ।

अल्पमात्र बोलिले ॥

 

समर्थांच्या मते रूप, लावण्य, सौंदर्य, शरीराची ठेवण, अंगक्रांती ही निसर्गाची देणगी असते. या गोष्टी उपजत असतात. त्या काही सहजपणे किंवा अभ्यासाने मिळत नाहीत. परंतु, आदर्श पुरुषाच्या अंगचे हे ‘अगांतुक गुण’ अभ्यासाचे मिळवता येतात. अशा शेवटच्या ओवीने महत्त्वाचा विचार स्वामींनी मांडला आहे.

 

रूप लावण्य अभ्यासिता न ये । सहजगुणास न चले उपत्ये ।

काहीतरी धरावी सोये । अगांतुक गुणाची ॥ (२.८.३१)

 

या ओवीची गंमत अशी की, पुढे ‘चातुर्यलक्षणे’ सांगताना ही ओवी दशक १४ समास ६ मध्ये सुरुवातीस जशीच्या तशी वापरली आहे. शेवटी समर्थांच्या शब्दांत एवढेच सांगावेसे वाटते-

 

अवगुण सोडिता जाती ।

उत्तम गुण अभ्यासिता येती ॥

 
 
- सुरेश जाखडी
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

 
 
@@AUTHORINFO_V1@@